घाव मुळावर हवा

विवेक मराठी    15-Feb-2019
Total Views |

 

14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड आणि भीषण हल्ल्यात सुमारे 40 जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. या जवानांना श्रध्दांजली वाहत असतानाच, देशभरातल्या नागरिकांच्या मनात तीव्र संतापाची आणि शोकाची लाट उसळली. 'जैश-ए-महंमद'सारखी दहशतवादी संघटना, त्यांना रसद पुरवणारा पाकिस्तानसारखा कटकारस्थानी देश आणि हे कट पूर्णत्वास जाण्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी झालेले स्थानिक या सर्वांबद्दलच्या संतापाला सर्वसामान्य भारतीयांनी विविध माध्यमांतून मोकळी वाट करून दिली. उरी आणि पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यानंतर झालेला आणि त्याच्याहीपेक्षा मोठा असा हा हल्ला आहे. भारताच्या सार्वभौमत्वाची आणि सहिष्णुतेची परीक्षा पाहणारा आणि सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर देशभर अस्थिरता, संभ्रमाचे वातावरण निर्माण करणारा हा हल्ला आहे. या सगळयामुळे या हल्ल्याचे गांभीर्य शतपटीने वाढले आहे.

युध्दशास्त्राचे नियम अवलंबत समोरासमोर येऊन लढण्याचे बळ नसल्याची जाणीव असलेला पाकिस्तान सातत्याने दहशतवादी संघटनांच्या जिवावर भारतात अशांतता माजवण्याचे प्रयत्न करत आहे. 'जैश-ए-महंमद' संघटनेला मिळणारी रसद हे त्याचे एक उदाहरण. तेव्हा अशा या भ्याड शत्रूशी लढण्यासाठी वेगळी रणनीती अवलंबायला हवी. अर्थात हा सल्ला लष्कराला देण्याची आवश्यकता नाही. याचा सांगोपांग विचार करण्याची क्षमता लष्कराकडे आहे यावर आपण विश्वास ठेवायला हवा. त्यांना गरज आहे ती, अशा कसोटीच्या वेळी सत्तेवर असलेल्या आणि विरोधी पक्षात बसलेल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या निर्णयाला आणि त्याबरहुकूम केल्या जाणाऱ्या कारवाईला नि:संदिग्ध पाठिंबा देण्याची आणि त्याच वेळी समांतरपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करण्याची. त्या दिशेने एक पाऊल उचलताना केंद्र सरकारने, 'मोस्ट फेवर्ड नेशन' हा पाकिस्तानचा दर्जा काढून घेतला आहे. तसेच, या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी लष्कराला कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य देऊ केलेआहे.

मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय दबावामुळे लष्कर-ए-तोयबाला होणारी मदत पाकिस्तानने कमी केली आणि मदतीचा ओघ जैशकडे वळवला. त्यामुळे 2015नंतर जैश पुन्हा सक्रिय झाली. गेल्या तीन-चार वर्षांत काश्मीरमध्ये जैशच्या वाढलेल्या कारवाया हे त्याचेच फलित आहे. गेल्या वर्षभरात  सीआरपीएफच्या जवानांनी जैशच्या अनेक हस्तकांचा खात्मा केला आणि काश्मीरमधले त्यांचे तळे उद्ध्वस्त करण्याचा सपाटा लावला. परिणामी, चवताळेल्या जैशने 14 फेब्रुवारी रोजी हा आत्मघातकी स्फोट घडवून आणला.

कटकारस्थानात स्थानिकांची मदत घेण्याचे धोरण जैशने अवलंबले. गरीब घरातल्या तरुणांची माथी भडकवून त्यांच्या विचारशक्तीला आपल्या ताब्यात घेणे आणि त्यांच्याकडून दहशतवादी कृत्य करवून घेणे ही त्यांची कार्यपध्दती आहे. हे तरुण काश्मीरियतसाठी लढत नाहीयेत. तसे मानणे म्हणजे आपण मूर्खांच्या नंदनवनात राहतो आहोत याची कबुली देण्यासारखे आहे. या हल्ल्यासाठी पुलवामातील आदिल अहमद या काश्मिरी युवकाला तयार करण्यात आले. 'गोमूत्र पिणाऱ्या हिंदू सैन्यावर हा इस्लामचा हल्ला आहे आणि हे पुण्यकृत्य केल्याने तो जन्नतमध्ये जाणार आहे' असे आदिल अहमद म्हणत असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसते आहे. हा व्हिडिओ इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात पोहोचला आहे. काश्मीरियत संदर्भातला आपला भ्रम दूर करायला हा पुरावा पुरेसा आहे. 

गेल्याच वर्षी जैशच्या संपर्कात आलेला हा युवक नेमका कोणत्या कारणासाठी स्वत:चा बळी द्यायला आणि लष्करी जवानांचा बळी घ्यायला तयार झाला? हे कृत्य केल्यानंतर आपल्याला थेट जन्नतमध्ये जागा मिळेल हा भ्रम त्याच्या मनात रुजवण्यात जैशसारखी दहशतवादी संघटना यशस्वी झाली ती मरणाच्या बदल्यात त्याला कबूल करण्यात आलेल्या आर्थिक खैरातीच्या बळावर, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तेव्हा केवळ लष्करी सामर्थ्याच्या बळावर काश्मीरमधली स्थिती नियंत्रणात आणण्यात अडथळे आहेत ते तिथल्या विपन्नावस्थेचे आणि शिक्षणाच्या अभावामुळे रुजलेल्या धार्मिक अंधश्रध्देचे. ही विपन्नावस्था आली आहे ती सतत दहशतीच्या छायेत राहिल्याने. या विपरीत सामाजिक स्थितीचा गैरफायदा उठवत काश्मिरी जनतेच्या मनात भारतविरोधी विखारी भावना जिवंत ठेवण्यात दहशतवादी संघटनांना यश आले आहे. म्हणूनच या दोन मुद्दयांवर समांतरपणे काम करण्याची गरज आहे. त्यातून परिस्थितीत होणारे सकारात्मक बदल भारतीय लष्करालाही अधिक बळ देतील.

14 ऑगस्ट 1947पर्यंत भारताचा अभिन्न भाग असलेला हा प्रदेश आज आपला शेजारी देश आहे. शेजारी कसा नसावा याचे ते जितेजागते उदाहरण आहे. सुरुवातीपासून अनेक समस्यांनी घेरलेल्या पाकिस्तानातील राजकारण्यांना त्या बिकट समस्या सोडवण्यापेक्षाही भारतात अशांतता माजवणे हे सर्वात महत्त्वाचे काम वाटते ते त्यांच्यात रुजलेल्या आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवलेल्या वैरभावनेच्या वारशामुळे. ही वैरभावना इतकी प्रखर की, त्यापायी ते स्वत:च्या देशाची विल्हेवाट लावायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. हा कैफ या देशाला बरबाद करेलच, तसेच भारतासारख्या विकासाच्या मार्गावर पुढे पुढे चाललेल्या देशाच्या मार्गातही अडथळे निर्माण करेल. करतोच आहे.

या हल्ल्याचा निषेध नोंदवत असताना अनेक देशांनी आणि संयुक्त राष्ट्रांनी या लढाईत भारताच्या बरोबर असल्याचे म्हटले आहे. चीनसारखा एक धूर्त, चाणाक्ष, मतलबी शेजारी आणि एक कपटकारस्थानात मश्गुल असलेला शेजारी, या दोघांच्या बेचक्यात भारत सापडला आहे. आता घाव समस्येच्या मुळावर हवा याबाबत सर्वसामान्यांचे आणि सरकारचे एकमत आहे. ही कारवाई विचारपूर्वक आणि शत्रूवर कायमचा वचक बसवणारी असायला हवी. या विचाराने प्रयत्नशील असलेल्या सरकारच्या पाठीशी विश्वासाने उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. तीच देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्यांना
खरीखुरी श्रध्दांजली ठरेल.