तरुणाईचा नवा आवाज

विवेक मराठी    16-Feb-2019
Total Views |


 

तरुणांना रागदारी संगीत ऐकायला, शिकायला आवडत नाही, ते शिकण्याची चिकाटी तरुणांमध्ये नाही असा मतप्रवाह आपल्याला सध्या दिसून येतो. या 'फास्ट' युगात आणि 'स्मार्ट' जगात आपल्या व्यापात गुंतलेल्यांनी रियाजाकरिता लागणारी चिकाटी आणि उत्साह आणायचा कोठून? हा एक यक्षप्रश्नच असतो. पण इच्छा असली की मार्ग सापडतो आणि यशही प्राप्त करता येते, हे दाखवून दिले आहे ओम्कार प्रभुघाटये या तरुण गायकाने.

 

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

  भारतीय संगीताला अनेक शतकांची परंपरा आहे. पुढे नाटय आणि चित्रपट संगीतावरही याचाच प्रभाव दिसून आला. मराठी चित्रपटसृष्टीने आणि ललित संगीताने रागदारीचा प्रभाव असणारी अनेक रागमधुर गाणी आपल्याला दिली आहेत. अनेक पिढयांचे कान या गाण्यांनी तृप्त केले आहेत. सध्या जमाना आहे तो रॅप आणि पॉप संगीताचा. तरुणांना रागदारी संगीत ऐकायला, शिकायला आवडत नाही, ते शिकण्याची चिकाटी तरुणांमध्ये नाही असा मतप्रवाह आपल्याला सध्या दिसून येतो. या 'फास्ट' युगात आणि 'स्मार्ट' जगात आपल्या व्यापात गुंतलेल्यांनी रियाजाकरिता लागणारी चिकाटी आणि उत्साह आणायचा कोठून? हा एक यक्षप्रश्नच असतो. पण इच्छा असली की मार्ग सापडतो आणि यशही प्राप्त करता येते, हे दाखवून दिले आहे ओम्कार प्रभुघाटये या पंचविशीच्या तरुण गायकाने. आपल्या साधनेतून रसिकांना तृप्त करणे आणि स्व-आनंद प्राप्त करणे हेच कलावंताचे स्वप्न असते. ओम्कार यांनी हे स्वप्न पाहिले आणि पूर्णही केले. त्यांच्या या संगीत प्रवासाविषयी आम्ही त्यांच्याशी संवाद साधला.

''मी साधारण तिसरी-चौथीपासून रागदारी शिकतो आहे. खरं सांगायचं, तर गाणंबिणं शिकायचं असं काहीच माझ्या मनात नव्हतं. माझे वडील विनायक प्रभुघाटये हे गेली अनेक वर्षं संगीत नाटकांतून काम करत आहेत. त्यामुळे घरात गाणं होतंच. बाबा शिकवायचा प्रयत्न करत होते, पण त्यांना माझी काही फारशी प्रगती दिसत नव्हती. बाबांचे गुरू एस.के. अभ्यंकर यांच्या घरी मी त्यांच्याबरोबर जायचो. एका गुरुपोर्णिमेला मी बाबांबरोबर त्यांच्या घरी त्यांना नमस्कार करायला गेलो होतो. गुरुजीनी बाबांना विचारलं, काय रे, हासुध्दा गातो का? त्यावर बाबांनी हा 'गाण्यातला औरंगजेब' आहे, समोर दिसेल ते फक्त बडवतो, असं सांगितलं होतं. वेळ मिळेल तेव्हा पाठवत जा! असं गुरुजी म्हणाले आणि मी शिकायला लागलो. पुढे वयपरत्वे गुरुजींचं निधन झालं आणि मी गुरुजींचे नातू, समीर अभ्यंकर यांच्याकडे पुढील शिक्षण घ्यायला सुरुवात केली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी वझे केळकर कॉलेजमधून बी.कॉम. आणि नंतर एम.कॉम. केलं. सी.ए. करायचं ठरवलं. पण रियाज आणि अभ्यास एकत्र जमेनासं झालं, म्हणून मी आईवडिलांची रीतसर परवानगी घेऊन सी.ए.च्या दुसऱ्या वर्षी शिक्षण सोडलं. या काळात त्यांनी मला समजून घेतलं. घरच्या जबाबदाऱ्यांमुळे वडिलांना नोकरी सांभाळून नाटकात काम करावं लागलं. त्यामुळे मला या क्षेत्रात उतरता यावं, म्हणून त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला.''

 साप्ताहिक विवेक आणि ओंकार प्रभुघाटे यांची रूद्र एंटरप्रायजेस यांच्या संयुक्त विद्यमाने, पुढील काळात वेगवेगळ्या शहरांत 'पंचवटीतील वाल्मिकी' हा ग. दि. माडगूळकरांच्या गीतावरील कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस आहे. ज्यांना आपल्या गावात हा कार्यक्रम आयोजित करायचा आहे त्यांनी राहूल पाठारे 9594961842 यांच्याशी किंवा ओंकार प्रभुघाटे 9594049105 यांच्याशी संपर्क करावा.

 कॉलेजच्या काळात ओम्कार यांनी ग्वाल्हेर घराण्याचे पं. मधुकरबुवा जोशी यांच्याकडे शिकायला सुरुवात केली. मागील  सात-आठ वर्षे बुवांकडे शिकत असून सध्या ते पुणे येथील भारती विद्यापीठातून रागदारी संगीतात एम.ए. करत आहेत. भारती विद्यापीठात त्यांना पं. उल्हास कशाळकर, पं. विकास कशाळकर यांच्यासारख्या अनेक मान्यवरांकडून शिकण्याची संधी मिळाली. यासह गेली अनेक वर्षे ओम्कार हे गाण्याच्या कार्यक्रमातूनही सहभागी होत आहेत. तसेच 'रुद्र' ही त्यांची स्वत:ची इव्हेंट मॅनेजमेंट संस्थाही सुरू आहे. त्याविषयी ते सांगतात,

''आईचे वडील आणि माझा मामा छान गातात. गाण्याचे कार्यक्रमही आमच्या घरात अनेक वर्षे होत आहेत. माझे सख्खे आजोबा, नात्यातले अन्य काही आजोबा, माझे बाबा यांचं स्वत:चं भजनी मंडळ होतं. कॉलेजमधल्या स्पर्धांमुळे मलाही थोडी ओळख मिळाली. त्यानंतर कार्यक्रमांतून सहभागी व्हायला लागलो. तुमच्या निर्माण  झालेल्या ओळखीतूनच कार्यक्रम मिळतात असं मला वाटतं. 2013-14पासून मी व्यावसायिक कार्यक्रमांतून गायला सुरुवात केली. पण अनेकदा आयोजकांना संगीताची पार्श्वभूमी नसते असा माझा अनुभव होता. त्यामुळे कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळी कशा कार्यक्रमाची आवश्यकता आहे, समोरचा श्रोता कसा आहे याचा त्यांना अंदाज येत नाही. हे गणित चुकलं की गाण्याचं समाधान मिळत नाही. डोंबिवलीमधील ज्येष्ठ संवादिनी वादक मकरंद कुंडले हेही माझे या क्षेत्रातले गुरू, त्यांना हे सर्व सांगितलं. ते म्हणाले की मग तूच स्वत:ची संस्था का नाही सुरू करत? या प्रेरणेतूनच मी 2017 साली गुढीपाडव्याला 'रुद्र' या इव्हेंट मॅनजमेंट संस्थेची स्थापना केली.''


डोंबिवलीच्या सर्वेश कार्यालयात रुद्र संस्थेचा 'नाटयसंध्या' हा पहिला कार्यक्रम सादर झाला. नीलाक्षी पेंढारकर, प्रल्हाद अडफडकर, ओम्कार स्वत:, संवादिनीवर मकरंद कुंडले आणि तबल्यावर धनंजय पुराणिक असा कार्यक्रम झाला. तीनशे लोकांची क्षमता असणाऱ्या कार्यालयात सुमारे पाचशे मंडळी जमली होती. सणाच्या दिवशी एवढे दर्दी येतील असे आपल्याला अजिबात वाटले नव्हते, असे ओम्कार सांगतात. यानंतर त्यांनी वैशिष्टयपूर्ण  संकल्पनांवर आधारित कार्यक्रम करायला सुरुवात केली.

''सध्या गदिमा, बाबूजी आणि पुलं यांचं जन्मशताब्दी वर्षं सुरू आहे. या औचित्याने 'पंचवटीतील वाल्मिकी' या संकल्पनेअंतर्गत गदिमांची फार प्रसिध्द न झालेली गाणी या कार्यक्रमांत समाविष्ट करण्यात आली आहेत. रागदारी गायक स्व. वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं 'माझं ठरल्यालं लगीन मोडलं गं' हे उडत्या चालीचं गाणं अनेकांना ठाऊक नाही. अशी अनेक दुर्लक्षित पण वैशिष्टयपूर्ण गाणी पंचवटीतील वाल्मिकी कार्यक्रमात ऐकायला मिळतात. 'स्वरगंध' ही संकल्पना आम्हाला मकरंदकाकांनी सुचवली. रागदारी गायकांनी गायलेली भावगीतं अशी ही संकल्पना आहे. कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, किशोरी आमोणकर, भीमसेन जोशी असा अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ गायकांनी गायलेली अनेक भावगीतं आम्ही यात एकत्र केली आहेत. बगळयांची माळ फुले, राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे, आज अचानक गाठ पडे, वाटेवर काटे वेचीत चाललो, हे श्यामसुंदर राजसा, अनंता तुला पाहू शके रे अशी अनेक गाणी या गायकांना आदरांजली म्हणून आम्ही  सादर करतो. सध्या पुलंच्या पूर्ण आयुष्यावर आधारित कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. पुलंनी आपल्या आवडत्या गायकांवर एक पुस्तक लिहिलं आहे, त्याचा आधार घेऊन आम्ही त्या कार्यक्रमाची रचना करणार आहोत. निमेश कैकाडी, मी आणि प्राजक्ता काकतकर असे तिघे गायक, ऑॅर्गनवादक, व्हायोलीन वादक, तबलावादक आणि सौरभ सोहोनी हा निवेदक असा आमचा सात जणांचा चमू आहे. या संकल्पनांवर आधारित कार्यक्रमाव्यतिरिक्तही नाटयसंगीत, भावगीत असेही कार्यक्रम रुद्रच्या माध्यमातून सादर केले जातात. संकल्पनांवर आधारित कार्यक्रमात आम्हाला मकरंद कुंडलेकाका यांचं मोलाचं मार्गदर्शन प्राप्त होतं. अनेकदा संकल्पना सुचवण्यात त्यांचा मोठा सहभाग असतो.''

संकल्पनाधारित कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे ओम्कार आवर्जून सांगतात. त्यातही तरुणांचा फार चांगला प्रतिसाद असतो. भारतीय रागदारी, नाटयसंगीत, भावगीत यांची आवड आजच्या तरुणांनी जपली आहे, हे या प्रतिसादावरून दिसून येते. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून ही आवड अबाधित राहील असेही त्यांना वाटते. त्यासाठी रुद्रच्या माध्यमातून असेच कार्यक्रम करत राहण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र या सगळयासाठी रियाज आणि सातत्य आवश्यक असल्याचे ते नमूद करतात. ''तुम्ही रागदारी गायक असा वा भावगीत गायक. रियाजाला पर्याय नाही. पहाटे उठून खर्जातला रियाज करणं प्रत्येक गायकासाठी आवश्यक आहे. गायक व्हायचं असेल तर कठोर मेहनतीची तयारी असायला हवी.''

संकल्पनाधारित कार्यक्रम हे ओम्कार प्रभुघाटये आणि त्यांच्या रुद्र या संस्थेचे वैशिष्टय आहे. एखादी संकल्पना निश्चित करणे, त्याचा अभ्यास करणे, त्यासाठी योग्य त्या व्यक्तीची मदत घेणे, त्या त्या गायकाच्या वैशिष्टयानुसार तयारी करणे यासाठी मेहनतीची आवश्यकता असते. ती मेहनत घेतली, तर रसिकही तितक्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतातच, हे रुद्रच्या कार्यक्रमावरून दिसून येते.