मोहन भागवत इन्फ्ल्युएन्सर-इन-चीफएक वस्तुनिष्ठ मांडणी

विवेक मराठी    16-Feb-2019
Total Views |

 

 संघ जगणाऱ्यांचा संघ वेगळा असतो आणि बाहेरून जे संघावर लिहितात, त्यांचा संघ फारच वेगळा असतो. परंतु किंगशूक नाग यांनी या पुस्तकात संघाची मांडणी अगदी वस्तुनिष्ठ केली आहे. रूपा प्रकाशनाने प्रकाशित केलेले किंगशूक नाग यांचे इंग्लिश भाषेतील'मोहन भागवत इन्फ्ल्युएन्सर-इन-चीफ' हे पुस्तक फक्त दोनशे पानांचे आहे. घटना- आणि माहितीप्रधान आहे. विचारधारेचा भाग अतिशय अल्प आहे, त्यामुळे ते अतिशय वाचनीय झालेले आहे.

 

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक यांबद्दल लिहिलेली पुस्तके वाचणे माझ्यासारख्याला फार कठीण जाते. बालवयापासून मी संघातच जगतो आहे, त्यामुळे असे म्हणायला हरकत नाही की, संघ माझ्या डीएनएचा भाग झालेला आहे. संघ जगणाऱ्यांचा संघ वेगळा असतो आणि बाहेरून जे संघावर लिहितात, त्यांचा संघ फारच वेगळा असतो. काही वेळा हे लिखाण अज्ञानी, वेडगळपणाचे, कधीकधी मूर्खपणाचे असते. ते वाचण्यासाठी जो वेळ जातो, तो फुकट गेला असे वाटू लागते.

परंतु कधी कधी याला अपवाद होतात. रूपा प्रकाशनाने प्रकाशित केलेले किंगशूक नाग यांचे 'मोहन भागवत इन्फ्ल्युएन्सर-इन-चीफ' हे पुस्तक याला अपवाद आहे. दिलीप करंबेळकरांनी हे पुस्तक माझ्याकडे पाठवून दिले. काय वाचायला लागेल, अशा मनःस्थितीत मी पुस्तक वाचायला घेतले आणि संघाविषयीचे अगदी वेगळे पुस्तक मला वाटले. संघाविषयी अल्पज्ञान, अज्ञान या पुस्तकात नाही, असे काही मी म्हणणार नाही, त्याचे भरपूर दाखले देता येतील. परंतु हे पुस्तक वाईट हेतू मनात धरून लिहिलेले नाही. डावे लेखक अगोदर निष्कर्ष काढतात आणि तो सिध्द करण्यासाठी भाराभर लिहितात. माझ्या दृष्टीने हे सर्व लिखाण उसाच्या चिपाडाइतकेही महत्त्वाचे नसते.

किंगशूक नाग यांनी आपल्या पुस्तकात डॉ. हेडगेवारांपासून सुरुवात करून मोहनजी भागवतांच्या कारकिर्दीपर्यंत पहिल्या दोन प्रकरणांत आढावा घेतलेला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी श्रीगुरुजींना लिहिलेल्या पत्राचा त्यात उल्लेख आहे. संघस्वयंसेवकांनी काँग्रेसमध्ये सामील व्हावे, असे पटेल यांनी सुचविलेले आहे. प्रस्तावना आणि उपोद्घात या दोन प्रकरणात संघ आणि काँग्रेस यांचे ऐतिहासिक संबंध कसे राहिले, हे फार चांगले लिहिलेले आहे. राजीव गांधी यांच्या भाऊराव देवरसांबरोबर झालेल्या बैठकांचे उल्लेख आहेत. रामजन्मभूमी आंदोलनात राजीव गांधी यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका यांचे दाखले दिलेले आहेत. संघाने त्यांना समर्थन द्यावे ही राजीव गांधी यांची अपेक्षा होती. त्याचेही काही किस्से या पुस्तकात वाचायला मिळतात. सामान्यपणे ही माहिती संघस्वयंसेवकांनादेखील फार कमी असते. किंगशूक नाग यांनी माहिती देताना आवश्यक ते संदर्भ दिलेले आहेत आणि त्यावर कुठेही तिरकस शेरे मारलेले नाहीत. ज्याला वस्तुनिष्ठ माहिती म्हणतात, अशी ही माहिती आहे.

मोहनजी भागवत सरकार्यवाह झाले, त्याबद्दल किंगशूक नाग यांनी म्हटले की, ते अगोदर सहसरकार्यवाह नव्हते. त्यांची निवड थेट झाली. सहसरकार्यवाहपद हे पॉवर हाउस आहे, या भूमिकेतून किंगशूक नाग विश्लेषण करतात. त्यांना हे सुचवायचे आहे की, मोहनजी भागवत यांनी त्यांच्या तथाकथित प्रतिसर््पध्यांना मागे सारले. माझ्यासारख्या संघकार्यकर्त्याला हे विश्लेषण विनोदी वाटते. संघात पदांसाठी स्पर्धा नसते. मोठे पद नको, अशी सर्व कार्यकर्त्यांची मानसिकता असते. किंगशूक नाग यांच्या हे लक्षात येणे अवघड आहे.

दुसरा असाच विषय त्यांनी सरकार्यवाह सुरेश (भय्याजी) जोशी यांच्या निवडीसंबंधी केलेला आहे. 2015 साली कोइम्बतूर येथे झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत भय्याजी जोशी यांची सरकार्यवाहपदी निवड झाली. 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. किंगशूक नाग म्हणतात की नरेंद्र मोदी अधिकारवादी आहेत. संघातही आपला माणूस असावा, म्हणून त्यांनी दत्तात्रय होसबाळे यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती. सरकार्यवाह म्हणून त्यांची निवड व्हावी असा त्यांनी प्रयत्न केला.

हेदेखील विनोदी लिखाण आहे. मोदी असे करू शकत नाहीत आणि दत्तात्रय होसबाळे अशा प्रकारच्या राजकारणात उतरण्याची शक्यता शून्य. ज्यांना संघ समजतो, त्यांना हे समजावून सांगावे लागणार नाही. नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीबद्दल आणि संघापासून ठरावीक अंतर ठेवण्याच्या त्यांच्या भूमिकेबद्दल किंगशूक नाग यांनी काही विधाने केली आहेत. इतक्या वर्षांत मोहनजी भागवत हे पंतप्रधानांना कधीही भेटलेले नाहीत, हेदेखील त्यांनी नमूद केलेले आहे. परंतु केंद्रातील भाजपा शासन जे काही करते ते आम्हाला मान्य आहे, अशी भूमिकाही भागवत यांनी कधीही मांडलेली नाही. काँग्रेसमुक्त भारत ही राजकीय घोषणा असू शकते, पण आम्हाला सर्वयुक्त भारत हवा आहे, हे मोहनजी भागवत यांनी स्पष्ट केलेले आहे. मोहनजींच्या कार्यकाळातच नितीन गडकरी भाजपाचे अध्यक्ष झाले आणि नंतर त्यांच्या व्यवसायाबद्दल काही जणांनी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. हे काम भाजपातीलच कोणी मोठया नेत्याने केले, असा मा.गो. वैद्य यांनी मोठा लेख लिहून आरोप केला. तो सर्व किस्सा या पुस्तकात वाचायला मिळतो. नितीन गडकरी यांची अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली असती तर 2014ची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली झाली असती, हेदेखील नाग सांगून जातात.

मोहनजी भागवत यांच्या काळात भाजपा केंद्रस्थानी सत्तेवर आला. भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी देशभर संघस्वयंसेवकांनी कशा प्रकारे प्रयत्न केले, याचा लेखाजोखा या पुस्तकात वाचायला मिळतो. बिहारची 2015ची निवडणूक भाजपाला जिंकता आली नाही, त्याची कारणमीमांसा करताना संघस्वयंसेवक आणि भाजपा यांच्यात समन्वय आणि सामंजस्य राहिले नाही, हे सांगायला नाग विसरत नाहीत. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशची निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकण्याचे कारण संघस्वयंसवकांचे निवडणुकीत उतरणे होते. नीट समन्वय राहावा म्हणून दत्तात्रय होसबाळे यांनी कसे प्रयत्न केले, याची माहिती पुस्तकात दिलेली आहे.

भाजपा सत्तेवर आल्यानंतर आग्रा परिसरात घरवापसीचा कार्यक्रम झाला. दोनशेहून अधिक मुस्लीम बांधव स्वगृही - म्हणजे हिंदू धर्मात परतले. मीडियाने त्याच्यावर गदारोळ केला. मोहनजी भागवत यांनी पूर्वीच म्हटले आहे की, परधर्मात गेलेले आपली संपत्ती आहे, ती परकीयांनी लुटलेली आहे, ती परत मिळविणे आवश्यक आहे, या प्रकारची रोखठोक भूमिका मांडलेली आहे. अयोध्येत रामजन्मस्थानावर राम मंदिर उभे राहिले पाहिजे, ही भूमिका मोहनजींनी स्वच्छ शब्दात कशी मांडली आहे, हे नाग यांनी अधोरेखित केले आहे. अयोध्येतील राम मंदिर भारतातील मुसलमानांनी पाडले नसून ते आक्रमक मुसलमानांनी पाडलेले आहे, असा आक्रमक मुसलमान आणि भारतीय मुसलमान भेद मोहनजी करतात.

मोहनजी सरकार्यवाह असताना अडवाणीजी यांचा जीनास्तुतीचा विषय आला. हा विषय संघ विचारधारेत अजिबात न बसणारा आहे. त्यामुळे अडवाणी यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. मोहनजींनी तेव्हा एक वक्तव्य केले होते की, वयाची पंचाहत्तर वर्षे झाल्यानंतर अधिकारपदावर राहू नये. 2009च्या आणि 2014च्या निवडणुकीत लालकृष्ण अडवाणी वयामुळे बाद झाले होते. परंतु ते पंतप्रधानांच्या शर्यतीतून बाजूला व्हायला तयार नव्हते. गोव्याच्या बैठकीत मोदी नावाची शिफारस झाली, ती मान्य झाली, अडवाणी या बैठकीला गेले नव्हते आणि मोहनजींनी मोदींच्या नावाला कशी मान्यता दिली, हा सर्व भाग या पुस्तकात वस्तुनिष्ठ पध्दतीने आलेला आहे.

संघाची प्रतिमा दलितविरोधी अशी जाणीवपूर्वक बनविण्यात आलेली आहे. ही प्रतिमा बदलण्यासाठी नव्हे, तर हिंदू संघटन म्हणजे समग्र हिंदूंचे संघटन प्रस्थापित करण्यासाठी दलित क्षेत्रात मोहनजींच्या काळात समरसता हा विषय कसा वेगवान करण्यात आलेला आहे, हे किंगशूक सांगतात. मंदिरात सर्वांना प्रवेश, जलस्रोत सर्वांना खुले, एक स्मशान सर्वांसाठी हे विषय मोहनजींनी आपल्या दसरा भाषणात मांडले. संघातील कर्तृत्ववान कार्यकर्ते समरसता या विषयासाठी जोडले. बिहारमधील पासी समाज, उत्तर प्रदेशातील जाटव यांच्यात कामाची गती वाढविण्यात आली. त्याचे लाभ भाजपाला कसे झाले, हे सांगायला किंगशूक नाग विसरत नाहीत.

पुस्तक फक्त दोनशे पानांचे आहे. घटना- आणि माहितीप्रधान आहे. विचारधारेचा भाग अतिशय अल्प आहे, त्यामुळे ते अतिशय वाचनीय झालेले आहे. मुखपृष्ठावरील मोहनजींचा फोटो डॉ. हेडगेवारांची आठवण करून देणारा आहे. दोघांच्या चेहरेपट्टीतील साम्य लेखकाने आपल्या पुस्तकातही चांगल्या प्रकारे व्यक्त केलेले आहे.

पुस्तकाचे नाव : मोहन भागवत इन्फ्ल्युएन्सर-इन-चीफ

लेखक : किंगशूक नाग

प्रकाशन : रूपा प्रकाशन

मूल्य : 500 रुपय{ l पृष्ठसंख्या : 206

 

vvivekedit@gmail.com