देवाला वाहिलेलं फूल

विवेक मराठी    16-Feb-2019
Total Views |


 

''आप्पा म्हणजे देवाला वाहिलेलं फूल आहेत'', अलिकडेच एकांनी बोलता बोलता आप्पांविषयी - आप्पा जोशींविषयी हे उद्गार काढले. 'किती यथार्थ वर्णन आहे हे...आप्पांचा समर्पण भाव याच तोडीचा तर आहे' मनात येऊन गेलं.  नुसतं आवडलंच नाही तर आतवर जाऊन भिडलं. आज त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार मिळाल्याची बातमी ऐकली आणि ते उद्गार आठवले.

 

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/


विश्व हिंदू परिषद संचालित, वनवासी बांधवांच्या मुलांसाठी सुरू झालेल्या तळासरी केंद्राची जबाबदारी स्वीकारून आप्पा सपत्नीक तिकडे जाऊन राहिले. ही गोष्ट किमान चाळीसेक वर्षांपूर्वीची.  त्यावेळीही त्यांना स्वतःचा संसार होता, मात्र तो वनवासी आश्रमाहून वेगळा कधी मानलाच नाही त्यांनी. समाजासाठी काम करताना त्यात एकरूप होऊन जाणं म्हणजे काय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांचं आयुष्य. आश्रमाचं काम करताना अडचणी कमी आल्या नाहीत, पण त्या सगळ्यांवर मात करत आणि चित्ताची शांतवृत्ती ढळू न देता त्यांचं काम चालूच होतं.

त्या वेळी त्या भागात कम्युनिस्टांनी शिरकाव केला होता. संघ माध्यमातून वनवासी क्षेत्रातल्या मुलांना शहाणं करण्याचं सुरू झालेलं काम त्यांना सलत होतं. ते बंद पाडण्याचे प्रकार सुरू झाले होते. आप्पांसारख्या खमक्या कार्यकर्त्यामुळे त्यात यश मिळण्याची चिन्हं दिसेनात तेव्हा कायमस्वरूपी दहशत बसावी या हेतूने आप्पांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. आप्पा त्या जीवघेण्या हल्ल्यातून वाचले ही ईश्वरी योजना असावी. कारण त्यानंतर ते दुप्पट उत्साहाने कामाला भिडले. ना त्यांनी त्या हल्ल्याचा कधी बाऊ केला, ना कधी काही मिळवण्यासाठी त्याचा वापर. आजही त्यांच्या डोक्यावर मागच्या बाजूला असलेली ती खूण नजरेत भरण्याइतकी आणि बघणा-याला अस्वस्थ करण्याइतकी ठळक आहे. तरीही विचारल्याखेरीज त्या खुणेमागचा इतिहास आप्पा सांगत नाहीत. त्याचं भांडवल वगैरे करणं तर दूरची बात!

त्यांच्या निरपेक्ष काम करण्याच्या वृत्तीमुळे वनवासी क्षेत्रातलेे अक्षरशः हजारो विद्यार्थी, शिक्षक, कार्यकर्ते आप्पांशी प्रेमाच्या, आपुलकीच्या धाग्याने कायमचे जोडले गेले आहेत. आजही त्यांच्या शब्दाला दिला जाणारा मान, त्यांचा राखला जाणारा आदर प्रत्यक्ष पाहिला की याची प्रचिती येते.

वास्तविक अशी प्रतिष्ठा मिळाल्यावर भल्याभल्यांचे पाय जमिनीवरून सुटतात. देहबोली बदलते. पेहराव बदलतो. बोलण्याचं वळण बदलतं. आप्पा याला अपवाद आहेत.

इथवरच्या वाटचालीत समाजाने दिलेल्या कडूगोड अनुभवांनी समृद्ध झालेले आणि आजही केवळ समाजासाठी आयुष्य वेचणारे आप्पा मोठेपणा घेणं तर सोडाच, 'धाकुटे होऊन रहावे', या विचाराने आजही कार्यरत आहेत.   

आप्पा विवेकच्या म्हणजे हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या कार्यवाहपदी आहेत. त्यांच्या अनेक चालू असलेल्या कामांपैकी हे एक काम. स्वीकारलेल्या सर्व कामांप्रती लगाव तोच. कामातली लगनही सारखीच. जी 40 वर्षांपूर्वीच्या तरुण आप्पा जोशींमध्ये होती तीच.  

कोणत्याही सामाजिक कामासाठी आर्थिक मदत मिळवताना संकोचाचा लवलेशही आप्पांच्या मनात नसतो. कारण ते काम समाजाच्या किती गरजेचं आहे याबाबत त्यांची खात्री पटलेली असते. अशा कामांसाठी लोकांना आर्थिक आवाहन करणं हे आपलं कर्तव्य आहे ही त्यांची भावना असते. आपल्या हातातलं काम मन लावून करत असतानाच, आजूबाजूच्या तरुण कार्यकर्त्यांना त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल खुल्या दिलाने शाबासकी देतील, गरज वाटेल तिथे सूचनाही करतील पण त्याही अतिशय मृदू स्वरांत. समोरचा दुखावला जाणार नाही याची काळजी घेत.

आप्पांचं वय माहित नाही. ते कधी 'दिसलं' नाही, जाणवलं नाही की बोलण्यातूनही डोकावलं नाही. अदम्य उत्साहाला वय नसतं हेच खरं....! लोकांसाठी, एखाद्या सामाजिक संस्थेसाठी/संघटनेसाठी काही करायचं ठरवलं की त्यांना जो हुरूप येतो तो पहावा. मात्र त्या उत्साहाच्या भरातही  त्यांचे पाय वास्तवाच्या जमिनीवरून हलत नाहीत, हातातली विचाराची पारंबी सुटत नाही. त्या संस्थेसाठी हिताच्या योजना मुद्देसूद रूपात आधी त्यांच्या डोक्यात तयार होतात आणि मग लगोलग कागदावर उतरतात....आदर्श ब्ल्यू प्रिंट कशी असावी त्याचं उदाहरण जणू! त्याबरहुकूम ते स्वतः लगेच कामाला सुरुवातही करतात. आणि लोक प्रतिसाद देतील याबद्दल आशावादीही असतात. लोक तसं वागतातच असंही नाही. पण त्यामुळे आप्पा निराश होत नाहीत कधी. ते माणसांना भेटत राहतात..समाजाच्या भल्याच्या कामासाठी जोगवा मागत राहतात.

आप्पा आमच्याबरोबर आहेत म्हणजे सज्जनशक्ती आपल्याबरोबर आहे असं आम्ही मानतो. त्यातून आम्हांलाही हुरूप येतो. बळ मिळतं.

आजच त्यांना शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार मिळाल्याची बातमी आली आणि गेली कित्येक वर्षं त्यांच्याविषयी मनात असलेला आदर, आस्था यांना शब्दरूप देण्याची उर्मी दाटून आली.

हा पुरस्कार त्यांच्या नि:स्पृह कार्याचा गौरव आहे. आणि हा जसा त्यांचा गौरव आहे तसा या फकिराबरोबर संसार करणा-या त्यांच्या पत्नीचा, आपल्या वडिलांचं मोठेपण कळलेल्या त्यांच्या समजूतदार मुलींचाही गौरव आहे...या चौघींची मनःपूर्वक साथ होती म्हणूनच तर आप्पा निर्धास्त मनाने आपलं आयुष्य समाजाला देऊ शकले....'देवाला - समाजपुरुषाला वाहिलेलं फूल' होऊ शकले.

- अश्विनी मयेकर