माया, मूर्ती आणि राजकारण

विवेक मराठी    18-Feb-2019
Total Views |

 

 

पुतळे उभारण्याच्या 'शौकापायी' मायावतींनी उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी 'पार्क' तयार करून त्यात आपले पुतळे बसवले आहेत. एकटया लखनौमध्ये सात ठिकाणी, वेगवेगळया उद्यानांमध्ये मायावतीबाईंचे आणि हत्तींचे पुतळे आहेत. हत्ती हे बहुजन समाज पक्षाचं निवडणूक चिन्ह आहे. मायावतींनी निवडणूक आयोगाच्या कचाटयात सापडू नये म्हणून या सर्व हत्तींची सोंड वर ठेवली आहे.  सर्वोच्च न्यायालयाने त्यांना त्या पुतळयांचे पैसे परत करण्याचा 'सल्ला' दिलेला आहे आणि त्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात एक नवीन तरंग निर्माण झालेला आहे.

 

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

 उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गोमती नगरात 125 एकर जागेत पसरलेलं एक विस्तीर्ण उद्यान आहे. जनसामान्यांच्या भाषेत याचं नाव 'आंबेडकर पार्क' आहे. पण कागदोपत्री हे ओळखलं जातं 'डॉ. भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन प्रतीक स्थल' या लांबलचक नावाने.

या पार्कमध्ये प्रवेश केल्याबरोबर असं वाटतं की आपण एखाद्या स्वप्नदृश्यात आलेलो आहोत. साठ-सत्तरच्या दशकात, दक्षिणेच्या चित्रपटांमध्ये गाण्याच्या शूटिंगसाठी जुन्या काळच्या राजवाडयांचे भलेमोठे सेट उभारले जायचे. तसंच काहीसं ह्या पार्कमध्ये प्रवेश केल्यावर वाटतं. चकचकीत टाइल्सचा रस्ता, दोन्ही बाजूंना सोंड वर करत सलामी देत असलेले, भलेमोठे 62 हत्ती, रस्त्याच्या कडेला सुशोभित केलेले स्तंभ... अगदी स्वप्नदृश्यच!

आत गेल्यावर मध्यभागी उभे आहेत अजस्र आकाराचे, बारा-चौदा फूट उंच असलेले मायावती, काशीराम आणि डॉ. आंबेडकर यांचे पुतळे. हे सारंच दृश्य भारावून टाकणारं. भव्य-दिव्य असलेलं. उत्तर प्रदेशाच्या तत्कालीन मुख्यमंत्री 'कुमारी मायावती' (हेच त्यांचं अधिकृत नाव) यांच्या कल्पनेतून साकार झालेलं. म्हणायला आंबेडकरांचं स्मारक, पण सारा भर आहे तो मायावतींच्या आणि हत्तींच्या पुतळयांवर.

मायावती ह्या उत्तर प्रदेशाच्या चार वेळा मुख्यमंत्री झाल्या. पहिल्या तीन वेळा त्यांची कारकिर्द जेमतेम वर्षभर टिकली. मात्र सन 2007मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला घवघवीत यश मिळालं. अगदी दोन तृतीयांश बहुमत. मग मायावतीबाईंनी मागे वळून पाहिलंच नाही. त्या अगदी सुसाट निघाल्या. त्यांना पुतळयांचं भारी वेड. त्यामुळे गौतम बुध्द, डॉ. आंबेडकर यांचे पुतळे त्यांनी उभारले, तर ते आपण समजू शकतो. काशीराम यांचा पुतळा उभारणंही तर्काला धरून आहे. पण जिवंत असताना, स्वत:चाच पुतळा (नव्हे, असंख्य पुतळे) उभारण्याचं अफलातून काम मायावतींनी केलंय.

आणि म्हणूनच त्या सध्या बातम्यांमध्ये जागा अडवून बसल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना त्या पुतळयांचे पैसे परत करण्याचा 'सल्ला' दिलेला आहे आणि त्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात एक नवीन तरंग निर्माण झालेला आहे.

शशिकांत उर्फ भावेश पांडे ह्या व्यक्तीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर(P.I.L.वर) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी म्हटलं की ''मायावतींनी स्थापन केलेल्या मूर्तींवरचा पैसा हा सामान्य जनतेचा पैसा असल्यामुळे, त्यांनी तो जनतेला परत केला पाहिजे.'' अर्थात हा कोर्टाचा 'आदेश' नाही. कारण ही हंगामी सुनावणी असून दिनांक 2 एप्रिल रोजी याची पुढील सुनावणी होणार आहे. जरी हा कोर्टाचा आदेश नसला, तरी कोर्टाने जे मत व्यक्त केलं आहे, ते पाहता नैतिकतेच्या नात्याने मायावतीबाईंनी हे पैसे सरकारला परत करणं आवश्यक दिसत आहे.

 


आपले पुतळे उभारण्याच्या 'शौकापायी' मायावतींनी उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी असे 'पार्क' तयार करून त्यात आपले पुतळे बसवले आहेत. एकटया लखनौमध्ये सात ठिकाणी, वेगवेगळया उद्यानांमध्ये मायावतीबाईंचे पुतळे आहेत. एकटं 'आंबेडकर सामाजिक परिवर्तन प्रतीक स्थल' हे 125 एकराच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेलं आहे. या एका प्रकल्पावर 1363 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. याशिवाय लखनौमध्येच असलेली इतर ठिकाणं आहेत - काशीराम मेमोरिअल, रमाबाई रैली स्थल, बुध्द शांती उपवन, काशीराम इको पार्क, गोमती विहार पार्क आणि गोमती पार्क. या सर्वांवर झालेला एकूण खर्च आहे - तब्बल 4,708 कोटी रुपये..!

नॉयडा/ग्रेटर नॉयडामध्ये तीन ठिकाणी पार्क उभारले आहेत. लखनौ शहरात हत्तींचे एकूण 125 भव्य पुतळे उभारले आहेत, तर नॉयडामध्ये 56 आहेत. एकटया लखनौच्या आंबेडकर पार्कमध्ये उभारलेल्या हत्तींच्या 62 पुतळयांवर 52.02 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

हत्ती हे बहुजन समाज पक्षाचं निवडणूक चिन्ह आहे. मायावतींनी निवडणूक आयोगाच्या कचाटयात सापडू नये म्हणून या सर्व हत्तींची सोंड वर ठेवली आहे. बसपाच्या निवडणूक चिन्हातील हत्तींची सोंड खालच्या बाजूला झुकलेली आहे. पण इतकं करूनही, निवडणूक आयोग निवडणुकीच्या आधी ते विशालकाय हत्ती झाकून ठेवण्याचं काम करतो. हे तसं फार किचकट आणि खर्चीक काम आहे. पण जनतेच्या पैशांनी निवडणूक आयोगाला हे काम करावं लागतं.

मायावतींच्या राजकारणाचा हा 'पुतळे' पैलू म्हणजे त्यांच्या तथाकथित अस्मितेची पराकाष्ठा आहे. राजकारणात मायावतींचा उदय विलक्षण आहे. माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंह राव यांनी मायावतींचं राजकारणात इतकं पुढे येणं याबाबत म्हटलं होतं की ''हे 'miracle of democracy' (अर्थात लोकशाहीचा चमत्कार) आहे.''

मायावती ह्या तशा दिल्लीच्या. त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही दिल्लीतच झालं. 1977मध्ये मायावती दिल्ली विद्यापीठातून एलएल.बी. करत होत्या. केंद्रात इंदिराजींची हुकूमशाही राजवट जाऊन जनता पक्षाचं सरकार आलेलं होतं. सारा देश लोकशाहीचा मोकळा श्वास घेत होता. ह्याच दिवसात, शेडयुल्ड कास्टचं राजकारण करणारे काशीराम मायावतींच्या घरी आले आणि ह्या एका घटनेने मायावतींचं अवघं आयुष्य बदललं.

मायावती ह्या जाटव समाजातल्या. घर तसं साधंच. अगदी सामान्य. घरी सहा भाऊ आणि दोन बहिणी. वडील पोस्ट खात्यात नोकरीला. मात्र अशा घरातील मायावतींमध्ये काशीराम यांनी स्पार्क बघितला. त्या काळात वकिलीचा अभ्यास करता करता त्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षांची तयारी करत होत्या. ते बघून काशीराम म्हणाले, ''तू आयएएस बनण्याचं स्वप्न बघते आहेस. पण लक्षात ठेव, एक दिवस एकच काय, अनेक आयएएस अधिकाऱ्यांची रांग तुझ्या आज्ञा झेलण्यास तयार असेल!''

काशीराम यांच्या आग्रहावरून मायावती राजकारणात आल्या. डी.एस.फोरनंतर काशीराम यांनी 1984मध्ये 'बहुजन समाज पार्टी' हा राजकीय पक्ष स्थापन केला. त्याच वर्षी इंदिराजींची हत्या झाली आणि निवडणुका जाहीर झाल्या. कुमारी मायावती यांनी त्यांच्या आयुष्यातली पहिली निवडणूकही ह्याच वर्षी लढवली. तीही थेट लोकसभेची. आणि त्यात बाई सणकून आपटल्या. जिंकलेल्या उमेदवार होत्या लोकसभेच्या माजी सभापती श्रीमती मीरा कुमार. पण ह्या पराभवाने त्यांचा पुढचा मार्ग सुकर केला. 1989च्या लोकसभा निवडणुकीत त्या परत उत्तर प्रदेशातल्या 'बिजनौर' ह्या सुरक्षित मतदारसंघातून उभ्या राहिल्या आणि चक्क निवडून आल्या. यानंतर त्यांनी अनेकदा जय-पराजय बघितले, पण त्या खेळल्या ते सत्तेचं राजकारणच!

नव्वदच्या दशकापर्यंत काशीराम यांनी स्वत:ची एक व्होट बँक तयार केली होती. मायावतींना ह्या व्होट बँकचा सीधा-सरळ फायदा झाला. 'काशीराम यांच्या अत्यंत विश्वासातल्या' असं जेव्हा लोकांना स्पष्ट झालं, तेव्हा बसपा ह्या पक्षावरची त्यांची पकड एकदम मजबूत झाली. 9 ऑॅक्टोबर 2006ला काशीराम यांचा मृत्यू झाला. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या शेवटच्या दिवसात मायावतींनी त्यांना अक्षरश: बंधक बनवलं होतं.

मायावतींची काम करण्याची शैली एकदम बिनधास्त आहे. मनात जे येईल, ते त्या बोलतात. अगदी पैशांचे व्यवहारसुध्दा त्या खुलेआम करतात. सन 2007मध्ये त्यांनी 54 कोटी रुपयांपेक्षा जास्त आयकर भरला होता. त्या वर्षी देशातील सर्वात जास्त आयकर भरणाऱ्या लोकांमध्ये त्यांचा विसावा क्रमांक होता.

मायावतींचं राजकारण हे नेहमीच उलट-सुलट दिशेने चालत राहणारं राजकारण आहे. 1995मध्ये त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या आधीच्या काळात त्यांची युती होती समाजवादी पक्षाशी. त्या देशातील पहिल्या 'शेडयुल्ड कास्ट' महिला मुख्यमंत्री आहेत. मात्र पुढे 1997मध्ये आणि 2003मध्ये भारतीय जनता पक्षाच्या मदतीने त्यांनी सरकार स्थापन केलं होतं. या तिन्ही खेपेस त्यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर एका वर्षापेक्षा जास्त बसता आलं नाही.

मात्र सन 2007मध्ये त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवली. आदल्याच वर्षी काशीराम यांचा मृत्यू झालेला होता. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी प्रचंड विजय खेचून आणला. त्यांची घोषणा होती - 'हाथी नही, गणेश हैं। ब्रह्मा विष्णू महेश हैं!'

या पाच वर्षांच्या काळात त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे राज्य केलं. याच काळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे भरपूर आरोप झाले. 2017मध्ये त्यांचा एक भाऊ आनंद कुमार याच्यावर आरोप झाला की सन 2012पासून फक्त पाच वर्षांत या आनंद कुमार यांनी चालवलेल्या कंपन्यांना अठरा हजार पट नफा झाला!

'ताज कॉरिडॉर घोटाळा' हादेखील त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक मोठा डाग आहे. अनुपमा सिंह यांच्या तक्रारीवरून लखनौच्या हजरतगंज पोलीस स्टेशनात माजी कॅबिनेट सेक्रेटरी शशांक शेखर आणि मायावतींचे माजी सचिव नवनीत सेहगल यांना इतर दोघांसह अटक झालेली आहे. मायावती मुख्यमंत्री असताना ही दोघं त्यांची अगदी खास माणसं होती. याच घोटाळयात नंतर स्वत: मायावती आणि मंत्रीमंडळातील त्यांचे सहकारी नसिमुद्दिन सिद्दिकी यांनाही आरोपी बनवण्यात आलेलं आहे.

 गेस्ट हाउस कांड

 
जिवावर उठलेल्या सपाच्या त्याच 'गुंड' आमदार-कार्यकर्त्यांबरोबर आघाडी करायला तयार होताहेत

उत्तर प्रदेशाच्या राजकारणात 2 जून 1995चे 'गेस्ट हाउस कांड' हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

यापूर्वी 1993मध्ये मुलायमसिंहांच्या सपाने आणि मायावती-काशीराम यांच्या बसपाने आघाडीचं सरकार चालवलं होतं. ठरल्याप्रमाणे सुरुवातीची अडीच वर्षं मुलायमसिंह यांच्या नेतृत्वात हे सरकार चाललं. पुढील अडीच वर्षं त्यांनी सत्ता बसपाला, म्हणजे अर्थातच मायावतींना देणं अपेक्षित होतं. मात्र मुलायमसिंह काही सत्ता सोडायला तयार नव्हते. त्यामुळे दिनांक 1 जून 1995ला बसपाने मुलायमसिंह यांचं सरकार पाडण्याची घोषणा केली. मायावतींना मुख्यमंत्री व्हायचं होतं. काशीराम यांची तब्येत अत्यंत खराब होती आणि ते दिल्लीला हॉस्पिटलमध्ये भरती होते.

त्या वेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते मोतीलाल व्होरा. त्यांना भेटून मायावतींनी भाजपा,काँग्रेस आणि जनता दल यांच्या समर्थनाने सरकार बनवण्याचं पत्र दिलेलं होतं. पैलवान मुलायमसिंह यादव मायावतींच्या ह्या 'विश्वासघातकी' भूमिकेने प्रचंड संतापलेले होते. त्यांना काहीही करून मुख्यमंत्रिपद सोडायचं नव्हतं.

इकडे लखनौच्या व्ही.आय.पी. गेस्ट हाउसमध्ये मायावती, आपल्या आमदारांबरोबर 'तख्तापलट' योजनेला अंतिम रूप देत होत्या. काही निवडक आमदारांना घेऊन त्या रूम नंबर 1मध्ये गेल्या. त्यांचे बाकीचे आमदार कॉमन हॉलमध्ये बसले होते. संध्याकाळची सुरुवात होत होती. साधारण पाच वाजत होते.

आणि... समाजवादी पार्टीच्या दोनशेपेक्षा जास्त आमदार-कार्यकर्त्यांनी या गेस्ट हाउसवर हल्ला केला. बाहेर बसलेल्या बसपाच्या आमदारांनी गेस्ट हाउसचं दार बंद करण्याचा प्रयत्न केला, पण सपाच्या खवळलेल्या आमदारांनी ते दारच फोडलं. जबरदस्त राडा झाला. बसपाच्या पाच आमदारांना अक्षरश: फरफटत नेऊन गाडीत टाकलं आणि त्यांना मुख्यमंत्री निवासात नेलं. तिथे त्यांच्याकडून, बसपाचे बंडखोर नेते राजबहादूर यांच्या नेतृत्वाखाली सपाला समर्थन देण्याच्या पत्रावर सह्या घेतल्या. काही आमदार तर इतके घाबरलेले होते, की त्यांनी कोऱ्या कागदावरच सह्या केल्या.

इकडे गेस्ट हाउसवर हल्ला चालूच होता. मायावतींच्या रूमच्या दरवाजावर सपाचे तीस-चाळीस कार्यकर्ते शिव्या देत दरवाजा तोडण्याच्या प्रयत्नात होते. 'चमार औरत को उसकी मांद से घसीट के निकालो..' असा घोष चालू होता. आत मायावती आपल्या निवडक दोन-चार आमदारांबरोबर अक्षरश: थरथर कापत उभ्या होत्या.

तितक्यात पोलीस आले. मायावतींची विटंबना टळली. पण मायावती आयुष्यभर हा प्रसंग विसरू शकत नाही, असं त्यांनीच म्हटलंय.

आणि गंमत बघा - प्रचंड घाबरलेल्या, थरथर कापत कापत, जिवाच्या आकांताने आक्रंदन करणाऱ्या मायावती 2 जून1995ला, त्यांच्या जिवावर उठलेल्या सपाच्या त्याच 'गुंड' आमदार-कार्यकर्त्यांबरोबर आघाडी करायला तयार होताहेत. मोदींचा धाक हा असा आहे..!

  गंमत म्हणजे नंतर लोकायुक्तांच्या (पुतळे निर्मितीसंबंधी झालेल्या) चौकशीत त्यांनी याच नसिमुद्दिन सिद्दिकी आणि बाबू कुशवाहा यांच्यासह बसपाच्या बारा आमदारांना दोषी ठरवलं आहे.

सध्या मायावतींची अवस्था दारुण आहे. पक्ष स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच लोकसभेत त्यांच्या पक्षाचा एकही खासदार नाही. त्या स्वत: राज्यसभेत होत्या. तेथून त्यांनी काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिला. एकूण 404 आमदार असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेत त्यांचे फक्त 19 आमदार आहेत. एकुणात काय, तर सध्या त्यांच्या पक्षाने जवळपास तळ गाठला आहे.

पण मायावतींना आपल्या 'ब्रँड व्हॅल्यू'ची जाणीव आहे. आपली 'व्होट बँक' त्या नीट ओळखतात. आणि म्हणूनच त्यांनी उत्तर प्रदेशात कट्टर हाडवैरी असलेल्या समाजवादी पक्षाशी आघाडी केली आहे. साधं-सुधं, मतांच्या बेरजेचं गणित मांडलं तर त्यांच्या सपा-बसपाच्या आघाडीला बऱ्यापैकी जागा मिळू शकतात, असं चित्र आहे. मात्र राजकारणात दोन आणि दोन चार होतातच असं नाही. ते तीनही होऊ शकतात आणि पाचही.

लोकसभेमध्ये बहुमताची किल्ली उत्तर प्रदेशाजवळ आहे. 80 खासदार असणारं हे भलंमोठं राज्य आहे. त्यामुळे ह्या राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचं प्रत्येकाचंच स्वप्न आहे. सध्या जरी लोकसभेत मायावतींचा पक्ष सफाचट झालेला असला, तरी कोणीही राजकारणी त्या पक्षाची उपेक्षा करू शकत नाही.

अशा वेळेला सर्वोच्च न्यायालयाने मायावतींना दिलेला 'पुतळयांचे पैसे परत करा' हा सल्ला महत्त्वाचा ठरतो. या 'सल्ल्याने' बसपा काही प्रमाणात तरी 'बॅकफूट'वर गेलाय. तिकडे प्रियंकांची एंट्री, इकडे मुलायमसिंहांनी लोकसभेत व्यक्त केलेली इच्छा की 'मोदीच परत यावेत' आणि मायावतींना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा सल्ला... या सर्वांमुळे लोकसभेच्या निवडणुका चुरशीच्या झालेल्या आहेत, हे निश्चित!

 9425155551