सर्वांनीच भान राखण्याची गरज

विवेक मराठी    22-Feb-2019
Total Views |

 

 

गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा इथे झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत भयानक आणि भ्याड असल्याचं मत नोंदवत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने या घटनेचा कडक शब्दांत निषेध केला आहे. त्याचबरोबर, या हल्ल्याला जबाबदार असलेल्या पाकिस्तानपुरस्कृत मसूद अझरच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा स्पष्ट शब्दांत उल्लेख करत, आपल्या प्रसिध्दीपत्रात, 'अशा दहशतवादी हल्ल्यांचा कट रचणारे आणि त्यांना रसद पुरवणारे, या दोहोंवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. सर्व सदस्य देशांनी आंतरराष्ट्रीय कायदा, बंधनं यांचं तसंच सुरक्षा परिषदेच्या ठरावांचं पालन करत भारताला व अन्य सर्व तपास यंत्रणांनाही सहकार्य करावं' असं अन्य सदस्य राष्ट्रांना स्पष्ट आवाहन केलं आहे. स्पष्ट उल्लेख नसला, तरी हे निवेदन म्हणजे चीन आणि पाकिस्तान या दोघांनाही दिलेला इशारा आहे. दहशतवादाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर उचलण्यात आलेलं महत्त्वाचं पाऊल आहे. चीन यापुढे या विषयात काय भूमिका घेतो हे जसं महत्त्वाचं, तसं पाकिस्तान यातून काही धडा घेतो का, हेही महत्त्वाचं असणार आहे. मसूद अझरची आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने पाठराखण करणारा आणि दुबळया पाकिस्तानला आर्थिक रसद पुरवणारा चीन आता काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भारताने आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही राजकीय-आर्थिक कोंडी केल्यानंतरही पाकिस्तानच्या जन्मजात घमेंडीचा बुरखा अजून गळून पडलेला नसला, तरी त्या बुरख्याआडचा पाकिस्तान मनातून हादरला आहे असा कयास नक्की बांधता येतो. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भारतीय लष्कराला दिलेल्या सर्वाधिकारामुळे, भारताकडून युध्द पुकारलं जाईल अशी अटकळ बांधत पाकिस्तानने खबरदारीचे शक्य ते सर्व उपाय योजायला सुरुवात केली आहे. जवानांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी पाकिस्तानातल्या सर्व रुग्णालयांना तयारीत राहायचे आदेश दिल्याचं वृत्त आहे. त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमधून दहशतवादी तळ हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सीमेजवळच्या नागरिकांनाही खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अर्थात या सगळया खबरदारीचा एक अर्थ कुटिल, कारस्थानी पाक युध्द छेडण्याच्या तयारीत आहे, असाही होऊ शकतो. मात्र संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने केलेल्या कानउघाडणीनंतर पाठीराख्या चीनने जर त्याला धोका दिला, तर कंगाल पाकिस्तान स्वबळावर युध्द पुकारण्याची शक्यता धूसर आहे. कुरापती काढणं आणि दहशतवादी संघटनांना बळ देणं यासाठीही आर्थिक रसद लागते. चीनने पाठ फिरवली, तर या गोष्टी करणार कोणाच्या बळावर? हा त्याच्यापुढील प्रश्न आहे. चीनच्या बरोबरीने सौदी अरेबियानेही या आवाहनातून बोध घ्यायला हरकत नसावी.

सर्वात आधी 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढत भारताने पाकची केलेली आर्थिक नाकेबंदी, त्यानंतर पाकिस्तानकडे जाणारं नद्यांचे पाणी रोखण्याचा (जरी ते प्रत्यक्षात यायला बराच वेळ असला, तरी) घेतलेला निर्णय, अमेरिकेसह अनेक महत्त्वाच्या देशांनी पाकचा स्पष्ट शब्दांत केलेला निषेध आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुरक्षा परिषदेकडून मिळालेला हा थेट इशारा यातून जगातली बहुतेक राष्ट्रं पाकविरोधात गेल्याचं चित्र स्पष्ट होत चाललं आहे.

'हा माझ्या नेतृत्वाखाली असलेला नवा पाकिस्तान आहे. पुलवामा हल्ल्याशी या पाकिस्तानचा संबंध नाही' असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हापुन्हा सांगत असले, तरी ते किती फसवं आहे हे सगळं जग समजून चुकलंय. मेहबूबा मुफ्तींसारख्या पाकधार्जिण्या, 'इम्रान यांना संधी द्यावी' अशी इच्छा जाहीरपणे प्रदर्शित करत असल्या, तरी त्यांचं हे विधान म्हणजे 'उंदराला मांजर साक्षी' प्रकारात मोडणारं आहे आणि म्हणूनच हास्यास्पद आहे.

पुलवामासंदर्भात भारताकडे पुरावे मागणाऱ्या इम्रान खानचे त्याच्या माजी पत्नीनेच जाहीर वाभाडे काढले आहेत. 'पुरावे कसले मागतोस, जैशवर कारवाई कर' असा थेट सल्ला देत रेहम खान हिने, 'इम्रान हा पाकिस्तानी लष्कराच्या हातातलं कळसूत्री बाहुलं आहे. त्यांच्या आशीर्वादानेच तो पंतप्रधानपदावर बसला आहे. जैशशी पाकिस्तानी सरकारचे काही संबंध नाहीत, तर कारवाई का करत नाही?' असा सवाल तिने ट्वीटच्या माध्यमातून विचारला आहे.

सारांश, 'पुलवामाचा हल्ला पाकिस्तानला महागात पडेल' या पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या इशाऱ्याचा गर्भितार्थ पाकिस्तानच्या, त्याला समर्थन देणाऱ्या देशांच्या आता लक्षात येऊ लागला असावा. मात्र तो भारतात राहणाऱ्या पाकधार्जिण्या लोकांच्या केव्हा लक्षात येईल, हा प्रश्न आहे. काश्मीरसंदर्भात भारत-पाकदरम्यानचे संबंध, ते अधिकाधिक चिघळण्यामागची कारणं याकडे डोळेझाक करत पाकिस्तानच्या बाजूने बोलणाऱ्या, सद्यःस्थितीत काश्मीरमध्ये जनमत घेण्याची मागणी करणाऱ्यांच्या बालिश बुध्दीची कीव करावी तेवढी थोडीच आहे. लष्कराच्या निर्णयप्रक्रियेवर वा सरकारच्या ठाम भूमिकेवर त्याचा परिणाम होणार नसला, तरी ही माणसं आपल्या आजूबाजूचं वातावरण प्रदूषित करत असतात. पूर्ण अज्ञानापेक्षा अर्धवट ज्ञान हे अधिक धोकादायक असतं, म्हणून त्यांच्या तोंडाला वेळीच लगाम घालणं जरूरीचं आहे.

पुलवामात झालेला हल्ला हा देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला आहे. या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन राजकारणातल्या नेत्यांनी मतप्रदर्शन करायला हवं. ते भान काहींनी बाळगलंही. काही मात्र मनाला येईल ते बरळत आहेत. या घटनेचं राजकीय भांडवल करण्याची त्यांची धडपड केविलवाणी आणि हास्यास्पद आहे.

आत्ता सगळयात मोठी गरज आहे ती सूचक मौन राखून, भडक विधानांपासून चार हात लांब राहत दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्वशक्तीनिशी उभ्या ठाकलेल्या भारतीय लष्कराला नैतिक पाठिंबा देण्याची, त्यांचं मनोधैर्य कायम राखण्याची. ही जबाबदारी सर्वपक्षीय राजकारण्यांची आहे आणि सर्वसामान्य नागरिकांचीही. असं संयमशील वर्तन ठेवलं, तर सव्वाशे कोटी भारतीयांसाठी व्यक्तिगत सुखाला तिलांजली देणाऱ्या लष्करालाही आपला अभिमान वाटेल. देशाच्या शत्रूविरोधात लढायला बळ मिळेल. ते त्यांचं कर्तव्य बजावत असताना आपण आपली जबाबदारी पार पाडू या.