नव्या भारताचा जोरदार तडाखा

विवेक मराठी    28-Feb-2019
Total Views |

 


 गेले दोन दिवस पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय हवाई दलाचे विग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची विनाअट सुटका करणार असल्याची घोषणा पंतप्रधान इमरान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत केली, हा या घटनाक्रमातला भारताचा एक महत्त्वाचा विजय आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याची भारताने केलेली कृती आणि त्याला जगभरातून मिळत असलेले समर्थन या दबावापुढे पाकिस्तानला अखेर झुकावे लागले. या कूटनीतीबद्दल आणि दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल संबंधित सर्व जण कौतुकास आणि अभिनंदनास पात्र आहेत.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जाहीर जबाबदारी जैश-ए-महम्मद या संघटनेने घेतल्यानंतरही या संघटनेच्या म्होरक्याच्या विरोधात कारवाई करण्याच्या भारताच्या सूचनेकडे काणाडोळा करत पाक सरकार थंड बसले. तेव्हा आता हे हिशेब आपले आपणच चुकते करण्याची वेळ आली आहे, हे लक्षात घेत भारताने पाकव्याप्त काश्मीरच्या पुढे पाकिस्तानात असलेले जैशचे तळ उद्ध्वस्त केले. सुमारे 300हून अधिक दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. ही कारवाई करताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली. हा हल्ला ना पाकच्या लष्करी ठाण्यावर केला, ना त्या देशाच्या नागरिकांना त्यापासून हानी पोहोचली. तरीही 'आम्ही या घटनेचा बदला घेऊ' असे म्हणत पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. तो अर्थातच यशस्वी झाला नाही. पाकिस्तानने हा बदला कोणाच्या वतीने घेतला? भारतीय सैन्याने ज्यांचे तळ बेचिराख केले, त्या जैशच्या वतीने? कारण बालाकोट हल्ल्यात फक्त जैशच्या तळाचे नुकसान करण्यात आले. भारतातर्फे तसे अधिकृत निवेदनही प्रसिध्द करण्यात आले. या दहशतवादी संघटनेसाठी पाक लष्कर जर भारताशी लढायला सज्ज झाले असेल, तर हा देश दहशतवादाचा केवळ पुरस्कर्ता नसून निर्माणकर्ता आहे, हेच या कृतीतून स्पष्ट होते.

मुस्लीम दहशतवादाला पाकिस्तानची असलेली थेट फूस दिसत असतानाही इतकी वर्षे त्याला 'पाकपुरस्कृत दहशतवाद' म्हणत, राजशिष्टाचार सांभाळण्याची भारताने पराकाष्ठा केली आहे. पण सध्याची वेळ हे शिष्टाचार सांभाळत बसण्याची नाही. या दहशतवादाचे तुम्हीच निर्माते आहात, हे पाकिस्तानच्या राजकारण्यांना, त्यांच्या लष्कराला आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगण्याची वेळ आली आहे. त्या दिशेने आपल्या सरकारचा प्रवास चालू आहे असे आता नक्की म्हणता येईल.

पुलवामा इथे सी.आर.पी.एफ.च्या वाहनावर झालेला भीषण हल्ला आणि त्यात चाळीसहून अधिक भारतीय जवानांना आलेले हौतात्म्य, त्या हल्ल्याची जैशने ताबडतोब घेतलेली जबाबदारी हा घटनाक्रम सगळया जगासमोर आहे. या संघटनेला पाकिस्तानने दिलेला उदार आश्रय आणि त्याच्या म्होरक्याला दिलेले अभय याचीही सर्व जगाला कल्पना आहे. ही माहिती असतानाही पाकिस्तानशी थेट दोन हात करण्याची हिंमत कोणी दाखवली नाही. कारण अशा विकृत, धर्मपिसाट आणि खुनशी वृत्तीच्या देशाशी शत्रुत्व घेणे म्हणजे विषारी सापाच्या शेपटावर पाय देण्यासारखे आहे, हे सर्व जाणून आहेत.

भारतासारख्या प्रगतिपथावर असलेल्या राष्ट्रासमोर गेली तीन दशके असलेली ही समस्या दिवसेंदिवस अधिकाधिक उग्र होत असतानाच, जगातल्या बहुतेक महत्त्वाच्या देशांसाठीही ती डोकेदुखी बनली आहे. शक्य तितक्या सौम्य शब्दांतल्या समजुतीपासून ते तोंडी/लेखी इशाऱ्यांचे सर्व पर्याय अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही अवलंबून झाले, तरी मातलेला पाकिस्तान बधायचे नाव घेत नाही हे आश्चर्यकारक आहे. आर्थिक विवंचनेपासून अनेक प्रश्नांनी गांजलेला पाकिस्तान कोणाच्या तरी भरघोस पाठिंब्यामुळे ही हिंमत करू धजतो आहे हे उघड आहे. आणि तो पाठिंबा कोणाचा, हेदेखील सर्वज्ञात आहे. तरीदेखील, आजवरच्या अतिसहिष्णू प्रतिमेपायी अशा तडाखेबंद प्रत्युत्तराची भारताकडून अपेक्षा कोणीच केली नव्हती. खुद्द हल्लेखोरांनी 'पुरावे मागितले', तरीही पुराव्यांची चळतच्या चळत निमूटपणे स्वाधीन करणारा हा देश, असा कधी बदला घेईल हे स्वप्नातही नसणाऱ्यांना या प्रतिक्रियेने महदाश्चर्य वाटले. सैन्याला मोकळीक देत गेली कित्येक वर्षे निद्रिस्त ठेवल्या गेलेल्या या देशाच्या पराक्रमाला जागे करण्याचे काम केले आणि सर्वसामान्यांनी दिवाळी साजरी केली.

अतिशय नियोजनबध्द आणि थंड डोक्याने एकेक पाऊल टाकत पाकिस्तानची चहूबाजूंनी कोंडी करत चाललेल्या भारताने केवळ पाकिस्तानलाच नाही, तर चीनलाही धर्मसंकटात टाकले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाण्यासारखा पैसा गुंतवणाऱ्या  व्यवहारी आणि धूर्त चीनला पाकचा हा अविचारीपणा परवडणारा नाही. त्यामुळेच स्वराज यांच्या भेटीनंतर चीननेही दहशतवादाला समर्थन देण्यावरून पाकिस्तानला फटकारले आहे. अमेरिका, जपान, रशिया यांच्यासह सर्व बलाढय देश आज भारतासमवेत आहेत. भारत हा दहशतवाद्यांची तळी उचलणारा नाही, तर त्यांची तळी उद्ध्वस्त करण्याची हिंमत बाळगणारा देश आहे याबाबत आता सर्वांचीच खात्री पटली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविषयी हा जो विश्वास निर्माण झाला आहे, त्याला सैन्याच्या पराक्रमाबरोबरच पंतप्रधान मोदी यांचे परराष्ट्रविषयक धोरण आणि परराष्ट्रमंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी युनोपासून बजावलेली चोख कामगिरी या गोष्टी कारणीभूत आहेत.

अजून युध्द पुकारलेले नसले, तरी युध्दजन्य स्थिती आहे. युध्दात होणाऱ्या अपरिमित नुकसानाची कल्पना असली, तरी जेव्हा समोरचे सारे पर्याय संपतात, तेव्हा युध्द करून समोरच्या कुटिल शत्रूला शौर्याची चुणूक दाखवणे भाग असते. 'देश प्रथम' हा विचार कोणत्याही परिस्थितीत आचारणात कसा आणायचा, याचे प्रात्यक्षिक भारतीय सैन्याने आणि त्यांना स्वातंत्र्य देणाऱ्या सत्तारूढ पक्षाने दाखवले आहे. केवळ शारीरिक शौर्यच नव्हे, तर त्याच्या जोडीला आखले गेलेले धूर्त डावपेच, आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतपणे आणि कायद्याच्या चौकटी सांभाळत बाजू मांडण्याची हुशारीही दाखवली आहे.

पाकिस्तान दिवसेंदिवस कोंडीत सापडत असताना चीन किती काळ त्याची पाठराखण करतो, हेही येत्या काही दिवसांत कळेलच. प्राणावर बेतते, तेव्हा माकडीण स्वत:ला वाचवण्यासाठी पिल्लाचाही जीव द्यायला तयार होते, ही गोष्ट आपल्याला माहीत आहेच. पाकिस्ताननिर्मित दहशतवादाची प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष झळ जेव्हा चीनला बसायला लागेल, तेव्हा तो पाकिस्तानला वाऱ्यावर सोडायलाही मागेपुढे पाहणार नाही. आणि मग स्वत:ने खणलेल्या दहशतवादाच्या कबरीत पाकिस्तान जाऊन पडेल.