अंधार विकणारे नि अंधार पिणारे!

विवेक मराठी    05-Feb-2019
Total Views |

 

 

ज्याला अंधार दूर करायची आस आहे, अशी वेडी माणसं फार थोडी! पद्म पुरस्कारांचे मानकरीही अशीच ध्येयवेडी माणसं असतात. त्यांचे कर्तृत्व पाहून मनात घोळणाऱ्या म.म. देशपांडे यांच्या या प्रेरणादायक कवितेचे केलेले विश्लेषण. 

व्यवस्थेचे सर्व फायदे घेऊनही काहींना व्यवस्थेत फक्त अंधारच दिसतो, कारण त्यांना फक्त अंधारच पाहायचा असतो. तो ओरडून ओरडून विकायचा असतो. म्हणून मग ते डोळयावर स्वत:च पट्टया बांधून घेतात व अंधार अंधार म्हणून गळे काढतात.

कुणी निर्भयतेने अंधारात घुसतात आणि विलक्षण धैर्याने, निष्ठेने, चिकाटीने, मुख्य म्हणजे काहीही आक्रोश वा गवगवा न करता घोटाघोटाने तो अंधार पीत राहतात. वर्षानुवर्षं...

सारा अंधारच प्यावा

अशी लागावी तहान,

एका साध्या सत्यासाठी

देता यावे पंचप्राण

 

व्हावे इतुके लहान

सारी मने कळो यावी

असा लाभावा जिव्हाळा

पाषाणाची फुले व्हावी

 

फक्त मोठी असो छाती

दु:ख़ सारे मावायाला

गळो लाज गळो खंत

काही नको झाकायला

 

सर्व काही देता यावे

श्रेय राहू नये हाती

यावी लावता कपाळी

भक्तिभावनेने माती

राहो बनून आकाश

माझा शेवटचा श्वास

मनामनात उरावा

फक्त प्रेमाचा सुवास

- म.म. देशपांडे

 

दर वर्षी एक जानेवारीला केलेले संकल्प महिनाअखेरीला विझू पाहत असताना सव्वीस जानेवारी येते नि परत मनाला स्फुरण चढतं. सरकारी पुरस्काराची कमळतळी फुलतात नि त्यातल्या मानकऱ्यांची कर्तृत्वं पाहताना आपलाही ऊर भरून येतो. एका एका ध्येयासाठी गाडून घेणारी नावं पाहिली की ही म.म. देशपांडेंची कविता आठवते!

अंधार हा निसर्गनियमाने दररोज भेटीला येतोच. प्रकाश रोज आपले दूत पाठवत असला, तरी तोही रोज जन्माला येतो. त्याची मुळं फार खोलवर असतात. अनेकदा ती प्रकाशाच्या पोटातही असतात. त्यामुळे अंधार अनादि, अनंत आहे. तो समाजात, राजकारणातच काय, कुटुंबातही अनुभवाला येऊ शकतो.

साध्या सरळ माणसांना, निरागस लहान मुलांना वा कुठल्याही प्रकारच्या लुटीची ज्यांना भीती आहे अशांना अंधाराचं भय वाटणं साहजिक आहे. याउलट चोराचिलटांना, कृष्णकृत्यं करणाऱ्यांना अंधार आवडणंही स्वाभाविकच.

पण ज्यांना सामान्य माणसाच्या या अनिश्चिततेच्या भीतीचा फायदा उचलायचा आहे, अशा बुध्दिवंत म्हणवणाऱ्या मंडळींनाही अंधार आवडतो. तो तसा राहावा, नसला तरी भासावा, यावर त्यांचं बरंच काही अवलंबून असतं. पण अंधाराबद्दल नुसतं बोलणं निराळं आणि त्याची अपरिहार्यता समजून आपल्या परीने तो दूर करण्यासाठी धडपडणं निराळं.

ज्याला अंधार दूर करायची आस आहे, अशी वेडी माणसं फार थोडी! ती माणसंही अंधार पाहत असतात.

अभावांचा, गैरसोयींचा, अज्ञानाचा.

त्यांच्याही मनाला हा झाकोळ अगदी सहन होईनासा होतो. पण इथे ते वेगळे ठरतात. ते पुढे सरसावतात. प्रश्नांच्या मातीत उत्तरं शोधण्यात गुंतलेल्या आपल्या धूळमाखल्या हातांची ओंजळ करतात अन घटाघटा सारा अंधारच पिऊ लागतात! त्यांची तहान विलक्षण असते. ती शास्त्रापुरता, फोटोपुरता, बातमीपुरता, पुरस्कारापुरता अंधार चघळत नाही.

बाळकृष्णाने पूतनेच्या विष लावलेल्या स्तनांना तोंड लावून चोखून आख्खी पूतनाच शोषून संपवावी, तशी त्यांची तहान असते. भुकेल्याला अन्न, पीडिताला सांत्वन, अज्ञानाला ज्ञान असल्या साध्या मूलभूत हक्कांसाठी तळमळणारे हे पुण्यात्मे आपलं सगळं जगणं एखाद्या व्रतासाठी उधळून देतात. आभाळाएवढं मन असलेली ही माणसं तिथल्या कणाकणात, मनामनात मिसळून जातात. जिथे हे आपले प्राण उधळतात, तिथल्या पाषाणांवरही फुलं उगवतात. यांचे हात पुढे येतात ते श्रेयासाठी नाही, तर आपल्या कर्मभूमीच्या, मातृभूमीच्या मातीचा टिळा रोज कपाळाला लावण्यासाठीच. यांची छाती विशाल होते सारं दु:ख सामावून घेता येईल इतकी, अन कशाचीच लाज, खंत न बाळगता त्यांचा श्वासन् श्वास धपापत राहतो त्या एका ध्यासासाठीच. त्यांना नकोच असतात सन्मान, कुणाची मोहर. ते ज्यांचा अंधार दूर करत असतात, त्या लाखो मनांतून ते कधीच दरवळू लागलेले असतात...

सर्व पद्म पुरस्कार मानकऱ्यांना वंदन!