बांगला देश - संस्कृती आणि राष्ट्र

विवेक मराठी    05-Feb-2019
Total Views |

पश्चिम पाकिस्तानच्या धार्मिक आणि भाषिक दडपशाहीविरुध्द क्रांती करत पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि बांगला देश या नव्या राष्ट्राचा उदय झाला. यात भारताची निर्णायक भूमिका होती. संस्कृतीच्या आधारावर निर्माण झालेला हा देश आजही मूळ हिंदुस्तानच्या सांस्कृतिक खुणा अभिमानाने मिरवतो.

1947मध्ये भारतापासून वेगळे होत पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानची निर्मिती झाली. या नवीन राष्ट्राच्या निर्मितीचा आधार होता दोन्ही प्रांतांत असलेल्या समान धर्माचा. हजारो किलोमीटर दूर असूनदेखील, या दोन प्रांतांना त्यांचा धर्म एका राष्ट्रात बांधून ठेवेल अशी श्रध्दा होती. परंतु 25 वर्षांच्या आत ती श्रध्दा फोल ठरली. या दोन प्रांतांना त्यांचा धर्म एका राष्ट्रात बांधून ठेवू शकला नाही.

स्वातंत्र्योत्तर काळात पश्चिम पाकिस्तानमध्ये प्रामुख्याने सिंधी, पंजाबी, बलुची व पठाणी या भाषा बोलल्या जात होत्या, तर पूर्व पाकिस्तानात - अर्थात पूर्व बंगालमध्ये बोलली जाणारी भाषा होती बंगाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पश्चिम पाकिस्तानने आपल्या संस्कृतीमध्ये स्वत:ची ओळख शोधण्याऐवजी परदेशातून आयात केलेल्या धर्मात शोधायला सुरुवात केली. नवनिर्मित पाकिस्तानने स्वत:च्या अनेक गोड भाषा सोडून उर्दू ही राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित केली. उर्दू ही फारसीकडे झुकणारी हिंदुस्तानी भाषा आहे. उर्दू बोलणारे केवळ 5% लोक असलेल्या पाकिस्तानने आपल्या लोकांवर उर्दू थोपवली. उर्दूमध्ये कितीही मिठास असली, तरीसुध्दा मातृभाषेची सर दुसऱ्या भाषेला कशी येणार? त्याच वेळी, पूर्व पाकिस्तानमध्ये बंगाली बोलणाऱ्या समाजावरसुध्दा उर्दू भाषा थोपवण्यास सुरुवात झाली.

... आणि इथेच माशी शिंकली. बंगाली माणूस बंगाली भाषेवर अतिशय प्रेम करणारा होता. बंगाली भाषा, बंगाली गाणी, रवींद्र संगीत, बंगाली कालीघाटी चित्रशैली आदी गोष्टी इथल्या माणसाच्या रक्तात भिनल्या होत्या. त्यानंतरच्या काळात बांगला देश स्वतंत्र झाल्यावर, 'अमार शोनार बांगला' हे रवींद्रनाथांनी रचलेले बंगाली गीत बांगला देशाचे राष्ट्रगीत झाले. तर अशा बंगालवर उर्दू भाषा लादली जाणे हा तिथल्या संस्कृतीवर केलेला आघात समजला गेला. संस्कृतीच्या रक्षणार्थ उभ्या राहिलेल्या बंगाली भाषिकांच्या संघर्षातून पडलेल्या ठिणगीने वणव्याचे रूप धारण केले. बांगला देशाच्या मुक्ततेसाठी तयार केलेली सेनासुध्दा 'मुक्तिवाहिनी' या बंगाली नावाची होती. या संग्रामाचा शेवट बांगला देशच्या मुक्तीमध्ये झाला.

संस्कृतीवर आधारित निर्माण झालेला बांगला देश आज धर्मावर आधारित निर्माण झालेल्या पाकिस्तानपेक्षा अनेक क्षेत्रांत आघाडीवर आहे.

पाकिस्तानचे विघटन व त्यामधून बांगला देशची निर्मिती हेच दर्शवते की धर्म समाजाला बांधून ठेवू शकत नाही. विविधतेने रंगलेल्या समाजाला धर्म एकत्र आणू शकत नाही. अनेकातील एकत्व जपणारी संस्कृती मात्र समाजाला बांधून ठेवते. धर्मापेक्षा संस्कृती अधिक खोलवर रुजलेली असते, याचेच हे प्रतीक. मानवाला मानवाशी जोडणारी संस्कृती - भाषा, म्हणी, गाणी, वेशभूषा, खेळ, समजुती, रूढी, परंपरा, आहार पध्दती, साहित्य, नाटक, कला, स्थापत्य, सण, उत्सव अशा अनेकानेक रूपांनी ती सजलेली असते. या कारणास्तव संस्कृतीवर झालेला धार्मिक हल्ला टिकत नाही. संस्कृतीपेक्षा धर्म वरचढ ठरू शकत नाही, हे इतिहासात ठायी ठायी प्रतीत होते.

उदाहरणार्थ, मध्ययुगीन भारतातील इस्लामचे राज्य असलेला काळ. त्या वेळी संगीताला इस्लाम धर्मात विरोध असूनसुध्दा मुघल दरबारात भारतीय संगीताला राजाश्रय मिळाला. हिंदुस्तानी संगीत मुघल दरबारात बहरले खरे, पण त्याचा आशय पुरवला होता भारतीय संस्कृतीने. त्यामुळे हिंदुस्तानी रितीत वैदिक सरगम आणि कृष्णाच्या लीला गायल्या गेल्या. तसेच कथ्थक या नृत्यशैलीला मुघल दरबारात जरी वाव मिळाला, तरी त्या नृत्यप्रकारातील कृष्णभक्तीची सांस्कृतिक परंपरा अखंड राहिली. मुघल काळात पर्शियन व हिंदुस्तानी चित्रशैलींचा संगम होऊन तयार झालेल्या मुघल शैलीत राधा-कृष्णाची अनेक चित्रे काढली गेली. एकूण, नवीन धर्माने विकसित केलेल्या कलेत स्थानिक संस्कृतीच उमटली. 

विविध भाषा, अनेक गायनप्रकार, शेकडो नृत्यप्रकार, असंख्य चित्रशैली, वेगवेगळया स्थापत्यशैली, शेकडो सण, विविध खाद्यसंस्कृती, वेशभूषा, केशभूषा, खेळ, रांगोळया अशा कित्येक गोष्टींतून भारतीय संस्कृती प्रकट होत असते. ही संस्कृतीच समाजाला व राष्ट्राला एकत्र आणते. केवळ राष्ट्रकार्य म्हणून संस्कृती जतन करायला हवी असे नाही. कीर्तन, भारूड किंवा गोंधळ या  लोककला टिकवण्यासाठी संस्कृतीचे जतन करायला हवे असेही नाही, तर आपले 'असणे' हे संस्कृतीवर अवलंबून आहे, म्हणून संस्कृतीचे जतन करणे अनिवार्य आहे.  

मातृभाषेत बोलणे, लिहिणे, वाचणे, आणखी एखादी भारतीय भाषा बोलता येणे, या मातीतील कलाविष्कारांचे रसग्रहण करणे, उत्साहाने, आनंदाने व सर्वांना बरोबर घेऊन आपले सण साजरे करणे अशा सर्व गोष्टींमधून संस्कृतीचे जतन होते. ही संस्कृतीच आपली नाळ मातीशी जोडते, आपल्याला समाजाशी एकरूप करते, अखंड राष्ट्रात बांधते, आपल्याला स्वत:ची ओळख देते, आणि 'मी कोण?' या प्रश्नाच्या उत्तराकडेही घेऊन जाते.

बांगला देशमधील भारतीय संस्कृती पुढील लेखात ...

बांगला देश - संस्कृती आणि राष्ट्र

पश्चिम पाकिस्तानच्या धार्मिक आणि भाषिक दडपशाहीविरुध्द क्रांती करत पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि बांगला देश या नव्या राष्ट्राचा उदय झाला. यात भारताची निर्णायक भूमिका होती. संस्कृतीच्या आधारावर निर्माण झालेला हा देश आजही मूळ हिंदुस्तानच्या सांस्कृतिक खुणा अभिमानाने मिरवतो.

47मध्ये भारतापासून वेगळे होत पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानची निर्मिती झाली. या नवीन राष्ट्राच्या निर्मितीचा आधार होता दोन्ही प्रांतांत असलेल्या समान धर्माचा. हजारो किलोमीटर दूर असूनदेखील, या दोन प्रांतांना त्यांचा धर्म एका राष्ट्रात बांधून ठेवेल अशी श्रध्दा होती. परंतु 25 वर्षांच्या आत ती श्रध्दा फोल ठरली. या दोन प्रांतांना त्यांचा धर्म एका राष्ट्रात बांधून ठेवू शकला नाही.