'अ'पूर्वसंचित  वारसा भाषा परंपरांचा... शोध शाश्वत समृध्दीचा

विवेक मराठी    11-Mar-2019
Total Views |

 

युनोतर्फे 2019 हे वर्ष "International Year of Indigenous Languages' या विषयासाठी साजरं केलं जाणार आहे. यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांतर्गत दापोली येथे 21-22 फेब्रुवारी रोजी 'अ'पूर्वसंचित परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. बोलीभाषांच्या संवर्धनाबरोबरच बोलीभाषांशी निगडित सांस्कृतिक परंपरा, कला, शेती, पर्यावरण, आरोग्य, मूल्य आदींच्या संरक्षण-संवर्धनाविषयीची चर्चा या परिषदेत घडली.

 

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

 आपलं मनोगत व्यक्त करायचं एक प्रभावी माध्यम म्हणजे भाषा. माणूस जे पाहतो, ते त्याच्या मेंदूचा उपयोग करून स्मृतीमध्ये साठवून ठेवतो. यात बहुतांश माहिती घेतली जाते ती डोळयांद्वारे आणि प्रतिमांच्या स्वरूपात. बाकी ज्ञानेंद्रियांचा वापर करूनही माहिती मिळतच असते, पण त्यांची क्षमता डोळयांपेक्षा कमी असते. या प्रतिमा सर्वच ठिकाणी दिसत असतात, त्यांची नोंद होत असते. अशा प्रतिमांपासून पुढे चित्रलिपी तयार झाली आणि पुढे अनेक प्रतिमा आणि प्रतीकं यांचा वापर करून भाषेची निर्मिती झाली. पुढे ही भाषा प्रगत होत गेली. जसजशी संस्कृती बहरत गेली, तसतशी भाषाही प्रगत होत गेली. त्या त्या काळातील माहिती, ज्ञान, शहाणपण त्या त्या भागातील भाषेत नोंदवलं गेलं आणि आजही नोंदवलं जातंय. 

जगामध्ये अंदाजे 7000 भाषा आहेत. आपल्याकडे भारतात 22 मुख्य भाषा 13 वेगवेगळया लिपींमध्ये व्यक्त केल्या जातात. सुमारे 720पेक्षा जास्त बोलीभाषा भारतात वापरल्या जातात. जगभरात अडीच हजारांहून अधिक भाषा धोक्यात आल्या आहेत. आपण भारताचा विचार केला, तर आपल्याकडच्या अंदाजे 14 भाषा नष्ट झाल्या असून, युनेस्कोनुसार भारतातील धोक्यात आलेल्या भाषा शंभरच्या आसपास असून 42 भाषा जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

स्थानिक भाषा, परंपरा आणि कला यांच्या माध्यमातून पारंपरिक ज्ञानाचा एक मोठा खजिना दडलेला आहे. शेती, पर्यावरण, पाणी, आरोग्य, मूल्य इत्यादी गोष्टींच्या संरक्षण-संवर्धनासाठी जाणते-अजाणतेपणे माणसाने त्या खजिन्याचा वापर चालू ठेवला आहे. जग एकत्र येत असताना स्थानिक भाषा, बोलीभाषा यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. हा पारंपरिक ज्ञानाचा खजिना वेगवेगळया कारणांमुळे नष्ट होत चालला आहे.

युनोतर्फे 2019 हे वर्ष 'International Year of Indigenous Languages' या विषयासाठी साजरं केलं जाणार आहे. यानिमित्त अनेक कार्यक्रम होत आहेत, त्यापैकी एक कार्यक्रम मिती फाउंडेशन या संस्थेच्या पुढाकाराने आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, वनराई, समग्र नदी परिवार, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी, 'BHAASHAA', 'Foundation for Biodiversity Conservation (FBC)' इत्यादी संस्थांच्या सहकार्याने 21-22 फेब्रुवारी 2019 या दोन दिवशी दापोली येथे आयोजित केला होता.

स्थानिक भाषा, माहिती, ज्ञान आणि परंपरा यांच्या माध्यमातून भाषा, पर्यावरण, शेती, पाणी, आरोग्य, कला, मूल्यं यांचं संरक्षण आणि संवर्धन कसं होईल याचा विचार करून एक कृती आराखडा तयार करण्याचं काम या सर्व संबंधित संस्थांनी हाती घेतलं आहे. यासाठी वर्षभरात चार परिषदा घेण्याचा निर्णय झाला असून ही पहिली परिषद घेण्यामागे, या विषयाचा आवाका जाणून घेणं आणि स्थानिक भाषेचं आणि त्यातील माहितीचं आणि ज्ञानाचं शास्त्रशुध्द संकलन याची आवश्यकता अधोरेखित करणं, हे उद्देश होते.

या दोन दिवसांच्या परिषदेमध्ये पारंपरिक बियाणं आणि प्रजाती संरक्षण आणि संवर्धन, जीवविविधता संवर्धन, जलव्यवस्थापन, बोलीभाषांचं संवर्धन, आदिवासी चित्रकला आणि शिल्पकला इत्यादी गोष्टींचा आवाका आणि आवश्यकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला.

डॉ. वरद गिरी यांनी जीवविविधता क्षेत्रात स्थानिक लोकांच्या सहभागातून संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करताना ज्ञात पारंपरिक पध्दती कशा उपयोगी पडू शकतील यासंबंधी सादरीकरण केलं. अनेक दुर्लक्षित जिवांचा अभ्यास न केल्याने आपण किती महत्त्वाची माहिती गमावतोय, याकडे त्यांनी सगळयांचं लक्ष वेधलं. रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी सागरी जीवसृष्टीबद्दल असलेल्या पारंपरिक ज्ञानाबद्दल आणि महाराष्ट्र जनुक कोशाबद्दल माहिती देणारं सादरीकरण केलं. कला अभ्यासक आणि चित्रपतंग संस्थेच्या श्रीनिवास आगवणे यांनी कला या विषयाचा, चित्रांचा उपयोग करून चित्रलिपी आणि चित्र आणि प्रतीकं वापरून निर्माण झालेल्या आणि समृध्द झालेल्या लिपीबद्दल मूलभूत माहिती दिली. कोणत्याही नवीन गोष्टीची नोंद करणं किती महत्त्वाचं आहे, हे त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी वनराई संस्थेच्या अमित वाडेकर यांनी शेती, स्थानिक बियाणं, त्याचं संरक्षण आणि संवर्धन पारंपरिक पध्दतीने कसं केलं जातंय, याबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत आदिवासी करत असलेल्या प्रयत्नांच्या आणि प्रयोगांच्या आधारे माहिती दिली.

आदिवासी शिल्पं आणि त्यातून समृध्द झालेली संस्कृती आणि या शिल्पांमध्ये जपून ठेवलेलं ज्ञान याबद्दल डेक्कन महाविद्यालयाचे पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. सचिन जोशी यांनी सहज सोप्या भाषेत माहिती दिली. तर Bombay Natural History Societyचे उपसंचालक डॉ. राहुल मुंगीकर यांनी शास्त्रीय पध्दतीने माहिती संकलन कसं करावं, त्यासंबंधी कायदे काय आणि कसे आहेत, त्यांचं संरक्षण कसं मिळतं, याबद्दल उत्तम माहिती दिली.

डॉ. उमेश मुंडल्ये यांनी पर्यावरण आणि जलव्यवस्थापन या क्षेत्रांत पारंपरिक ज्ञानाचा वापर करून नैसर्गिक स्रोतांचं व्यवस्थापन लोकसहभागातून कसं केलं जात होतं, आणि त्याचा वापर करून आजही हे कसं सहज शक्य आहे हे स्वत:चे प्रत्यक्ष अनुभव आणि काम यांच्या आधारे सादर केलं.

एकूणच, या परिषदेत विविध क्षेत्रांत भाषेबरोबर लुप्त होत चाललेल्या माहितीच्या खजिन्याचं संवर्धन आणि सध्याच्या आधुनिक जीवनशैलीशी त्याची सांगड घालून शाश्वत समृध्दीच्या मार्गाने कसं पुढे जाता येईल, यावर ऊहापोह केला गेला.

या वारशाला असलेल्या धोक्यांचा आढावा घेऊन त्यावर शक्य असलेल्या उपाययोजनांवर चर्चा झाली. कोणत्याही परिषदेमध्ये विचारमंथन होतंच. पण त्याचा वापर करून, त्यात लोकसहभाग मिळेल याबद्दल प्रयत्न करून प्रत्यक्ष कृती करण्याबद्दल मात्र आपण बरेचदा उदासीन असतो. आणि मग सगळी चर्चा आणि मेहनत फक्त कागदोपत्रीच राहते. 

या परिषदेचा मुख्य हेतू हा होता की हे प्रयत्न केवळ माहिती आणि चर्चा यापुरतेच न ठेवता, या सगळया घटकांचा अभ्यास करून सर्वंकष कृती आराखडा तयार करून त्याचा वापर करण्याच्या दृष्टीने विचार होऊन वाटचाल सुरू व्हावी.

स्थानिक भाषा, संस्कृती यांचा अभ्यास करून, संवर्धन करून आपण त्यात जपून ठेवलेलं ज्ञान आजही उपयोगात आणू शकतो. या गोष्टी करण्यासाठी या सर्व प्रयत्नांमध्ये स्थानिक लोकांचा सहभाग आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने आराखडा तयार करून कामाला सुरुवात झाली आहे. वर्षभरात, विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या आणि लोकसहभागातून काम करणाऱ्या आणि यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत आहे.

9967054460