रानपावलांना देशसेवेचे 'लक्ष्य' देणारा अवलिया

विवेक मराठी    12-Mar-2019
Total Views |

तीस वर्षे भारतीय सेनेमध्ये कर्तव्य बजावलेले सुभेदार उमाकांत बडगुजर हे सध्या आदिवासी व ग्रामीण क्षेत्रातील मुला-मुलींसाठी 'लक्ष्य ट्रेनिंग स्कूल'च्या माध्यमातून सैन्यदल व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देत आहेत. मुला-मुलींमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना प्रबळ व्हावी ह्या हेतूने स्थापन झालेल्या या संस्थेविषयी माहिती देणारा लेख.

 

 सध्याच्या स्थितीत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात आणि त्यातल्या त्यात आदिवासी/दुर्गम आदिवासी क्षेत्रात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. या क्षेत्रात हजारोंच्या संख्येने शिक्षित बेरोजगार तरुण मुले-मुली उपलब्ध आहेत. देशसेवेसाठी सशस्त्र सेनेमध्ये, प्रादेशिक सुरक्षा सेनेमध्ये, पोलीस खात्यामध्ये, वन विभागामध्ये नोकरी करण्याची त्यांची जबरदस्त इच्छा आहे. त्यासाठी वाटेल ती मेहनत घेण्याची त्यांची तयारीसुध्दा आहे आणि आजच्या परिस्थितीत देशालासुध्दा अशाच तरुण रक्ताची आवश्यकता आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की राज्यात कोठेही भरती निघाली की हे तरुण हजारोंच्या संख्येने गाडया भरून जातात, त्या भरतीमध्ये सहभागी होतात आणि केवळ बोटावर मोजण्याइतकेच तरुण यशस्वी होतात आणि बाकी सर्व जण हताश होऊन हात हलवत माघारी परततात. यामागे मुख्य कारण एकच आहे की या तरुणांना पुरेशा प्रमाणात योग्य प्रकारचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध नाही. एकदा वेळ व वय निघून गेल्यावर याच तरुणांना उदरनिर्वाहासाठी कंत्राटी कामगार, शेतमजूर यासारखे अत्यंत कमी पैशाची आणि बिनभरवशाची कामे करून दिवस काढावे लागतात. केवळ योग्य प्रकारच्या प्रशिक्षणाअभावी आणि परिपूर्ण मार्गदर्शनाअभावी या तरुणांची ही सुवर्णसंधी वाया जाते. आपले सरकार या तरुणांना हस्तकला, शिवणकाम, गॅरेजकाम व इतर अनेक कुटिरोद्योग यासारख्या दुय्यम दर्जाच्या कामासाठीसुध्दा प्रोत्साहित करते, तर देशसेवेसारख्या सर्वात प्रमुख कामासाठी कसे काय मागे राहू शकते, याचे मोठे आश्चर्य वाटते. आदिवासी तरुणांमध्ये मोठया प्रमाणावर गुणवत्ता असते, परंतु केवळ योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण उपलब्ध नसल्यामुळे त्यांना आपले कौशल्य दाखवून संधीचे सोने करता येत नाही.

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे...

https://www.facebook.com/VivekSaptahik/

आपले सरकार, विशेषतः आदिवासी तसेच ग्रामीण क्षेत्रातील तरुणांचे जीवनमान सुधारण्यासाठी विविध योजना जाहीर करत आले आहे. 'लक्ष्य ट्रेनिंग स्कूल'ची संकल्पना यापेक्षाही थोडी वेगळी आणि देशप्रेमाशी निगडित आहे. या योजनेतून आदिवासी व ग्रामीण क्षेत्रातील मुला-मुलींना स्वत: देशभक्तीसाठी झोकून देता येईल. त्यांच्यात असलेली देशभक्तीची भावना आणखी प्रबळ होईल आणि त्यांना मोठया प्रमाणावर राष्ट्रीय मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेता येईल. संस्थेचे सेवानिवृत्त सुभेदार उमाकांत बडगुजर यांनी संचालक म्हणून 'लक्ष्य ट्रेनिंग स्कूल' (भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र)ची धुरा सांभाळून या संकल्पनेचे शिवधनुष्य उचलले आहे. त्यांनी स्वत: तीस वर्षे भारतीय सेनेमध्ये कर्तव्य बजावले आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी बँकेकडून कर्ज काढून भव्य असे प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. त्यात त्यांनी आतापर्यंत सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही. त्यांचे एकच स्वप्न आहे की, आदिवासी/ग्रामीण क्षेत्रातील तरुण मुला-मुलींना देशसेवेसाठी तयार करणे. त्यासाठी त्यांनी आपले प्रशिक्षण केंद्रदेखील शहरी भागात स्थापित न करता दुर्गम आदिवासी क्षेत्रात उघडले आहे, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना जवळच्या जवळ प्रशिक्षणाची आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होईल. त्यांना या प्रशिक्षण केंद्रामार्फत आदिवासी तरुणांसाठी, तसेच ग्रामीण भागातील तरुणांसाठी आणखी बरेच उपक्रम राबवायचे आहेत. सरकारच्या आर्थिक मदतीशिवाय आणि प्रभावशाली मार्गदर्शनाखेरीज हे उपक्रम पूर्णत्वास जाऊ शकत नाहीत.

केंद्र सरकारच्या 'कौशल्य विकास योजना'मध्ये किंवा आदिवासी विकास विभागाच्या 'न्युक्लिअस बजेट'सारख्या वा तत्सम योजनेमध्ये हे प्रशिक्षण लवकरात लवकर समाविष्ट करण्यात येण्याची आवश्यकता आहे, कारण, सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणावर विविध क्षेत्रांत भरती निघत आहे. आदिवासी व ग्रामीण क्षेत्रातील तरुण मुला-मुलींना या भरतीचा भरपूर थेट लाभ घेता येईल. आपल्या सरकारच्या या विषयावरील पुढाकाराने या तरुणांसाठी सप्नातून सत्याकडे जाण्यासाठी संजीवनी बुटीचे काम करेल.

'उडान फाउंडेशन' ही एक सेवाभावी संस्था नाशिक येथे नोंदणीकृत असून त्यात भारतीय लष्करातील माजी सैनिक आणि त्यांचा परिवार असे विश्वस्त आहेत. मुख्यत: ग्रामीण, आदिवासी क्षेत्रातील होतकरू तरुण मुले/मुली यांना योग्य ते सैनिकी, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर - मग ती भारतीय सशस्त्र सेना, प्रादेशिक सेना, पोलीस विभाग, वनविभाग तसेच अग्निशमन दल असेल, या प्रकारच्या विविध खात्यांतील कोणत्याही भरतीसाठी पूर्णपणे तयार करणे हा या संस्थेचा मूळ उद्देश होय.

याच पार्श्वभूमीवर गीताई नगर, अभोणा तालुका, कळवण जिल्हा नाशिक येथे 'लक्ष्य ट्रेनिंग स्कूल' नावाने एक सैन्य, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली आहे आणि भारतीय सेनेचे सेवानिवृत्त सुभेदार उमाकांत देवनंद बडगुजर यांची या प्रशिक्षण केंद्राच्या संचालकपदी नियुक्ती केलेली आहे. सुभेदार उमाकांत बडगुजर यांनी भारतीय लष्करात 28 वर्षे हेडक्लार्क म्हणून काम पाहिले होते. ते स्वत: पॅराट्र्रूपर असून शारीरिक प्रशिक्षणाबद्दल ते फार निष्णात आहेत.

हे प्रशिक्षण केंद्र संपूर्णपणे निसर्ग, डोंगर, टेकडयांच्या सान्निध्यात स्थापित असून अभोणा गावापासून 2 कि.मी., सप्तशृंग गडाच्या पायथ्यापासून (नांदुरी गावापासून) 10 कि.मी., नाशिक शहरापासून 61 कि.मी. अंतरावर अतिदुर्गम आदिवासीबहुल क्षेत्रात हे ठिकाण आहे. प्रशस्त लेक्चर हॉल, विविध विषयांवरील पुस्तके, अनेक प्रश्नपत्रिका संच, सामान्य ज्ञानाची पुस्तके अशा प्रकारच्या वाचनीय साहित्याने परिपूर्ण अशा प्रकारची अभ्यासिका उपलब्ध आहे. लेखी परीक्षेचा सराव करून घेण्यासाठी दोन उत्कृष्ट शिक्षकसुध्दा आहेत. या प्रशिक्षण केंद्राचा एक मुख्य उद्देश आहे की, येथे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला

1) शारीरिक चाचणीमध्ये पूर्ण गुण मिळाले पाहिजेत.

2) लेखी परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळाले पाहिजेत, जेणेकरून तो संबंधित भरती प्रक्रियेत स्वत:च्या बळावर यशस्वी होऊन त्यांचे स्वत:चे स्वप्न पूर्ण करेल.

सैन्य दलातील प्रशिक्षण केंद्राचा आराखडा डोळयासमोर ठेवून त्यानुसार हे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आलेले आहे. यात विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढयाच आणि त्याच सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. तसेच विद्यार्थ्याला एकटयाला केंद्राबाहेर कोणत्याही आवश्यक कामासाठी जाता येत नाही. सुरक्षा केबिनमध्ये एक सुरक्षारक्षक 24 तास उपलब्ध असतो.

एकंदरीत ग्रामीण/आदिवासी होतकरू तरुणांच्या सुवर्णमयी भविष्याचा विचार करता हे 'लक्ष्य ट्रेनिंग स्कूल' (सैन्य/पोलीस भरतीपूर्व प्रशक्षिण केंद्र) महाराष्ट्र सरकारच्या 'कौशल्य विकास योजने'अंतर्गत समाविष्ट करण्यात यावे.

संपर्क :

 उमाकांत बडगुजर

 7588071009

 

प्रमोद मुळे

& 9421509242