श्रीलंकेशी जोडणारा सांस्कृतिक सेतू

विवेक मराठी    13-Mar-2019
Total Views |

रामायणामुळे श्रीलंका हा देश आपल्याला सांस्कृतिकदृष्टया कायमच जवळचा वाटतो. रामायणोत्तर कालखंडातही भारत-श्रीलंका यांच्यातील सांस्कृतिक सेतू जोडणाऱ्या अनेक घटना, व्यक्ती आणि स्थळे होती. त्याविषयी या लेखात जाणून घेऊ या.

 

श्रीलंकेची कथा बौध्द साहित्यातून आणि जातक कथांमधून आपल्यासमोर येते. प्रत्येक कथेत थोडेफार फरक आहेत. काही कथांमध्ये नरभक्षक यक्षी, आकाशातून उडणारा व समुद्रात बुडणाऱ्यांना वाचवणारा घोडा, रत्नांचे डोंगर अशा अद्भुत गोष्टी डोकावतात. सर्वसाधारणपणे सांगितली जाणारी कथा अशी आहे - इ.स.पूर्व सहाव्या शतकात भारतात सिंहबाहू नावाचा एक राजा होता. त्याने आपला पुत्र विजय याला रत्नद्वीपला पाठवले. त्या वेळी विजयने अनेक जहाजे सज्ज केली व त्यांमधून कैक शेकडो कुटुंबे बरोबर घेऊन तो समुद्रमार्गाने श्रीलंकेत पोहोचला. त्याने श्रीलंकेत आपले राज्य स्थापन केले. 'सिंहबाहू' राजावरून 'सिंहली' असे नाव या लोकांनी धारण केले. काही कथांमध्ये सिंहबाहू कलिंगचा किंवा बंगालचा राजा होता असे म्हटले आहे, तर काही कथांमध्ये सिंहबाहू गुजरातचा व्यापारी होता असे सांगितले आहे. काही कथांमध्ये राजाने विजयला पाठवले नाही तर हद्दपार केले, असे चित्र आहे. काही कथांमध्ये श्रीलंकेतील नरभक्षक यक्षी विजयच्या अनेक सैनिकांना खाऊन टाकतात, तर काही कथांमध्ये राजपुत्र विजय एका यक्षीशी विवाह करतो.

 

 सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

अजिंठा येथील 17 क्रमांकाच्या गुहेत राजपुत्र विजयचा प्रवास, त्याच्या अडचणी, त्यामधून त्याला सोडवणारा उडणारा घोडा, त्याचा राज्याभिषेक या प्रसंगांचे भिंतभर चित्र पाहायला मिळते. हे चित्र 'सिंहलअवदान' या जातकावर आधारित आहे.

सिंहली लोक उत्तर भारतातून आले असल्याने, त्यांची सिंहली भाषा प्राकृतच्या धर्तीची आहे. गुजराती व मराठीच्या जवळची भाषा आहे. या भाषिक नात्यामुळे, आपल्याला येथील अनुराधापूर, रत्नपूर, जयवर्धनपूर ही गावांची नावे उगीच ओळखीची वाटतात. किंवा तिलकरत्ने, जयवर्धने, जयसूर्य, प्रभाकरन्, महानामा अशा ओळखीच्या नावांचे लोक भेटतात.

भारतीय लोक जिथे गेले, तिथे त्यांनी परमपावनी, पापनाशिनी गंगा नदीचे प्रेमसुध्दा नेले. हे प्रेम आपल्याला दूर दूरपर्यंत पोहोचलेले दिसते. इथल्या इथे महाराष्ट्रात गोदावरीला गंगा म्हटले जाते. वैनगंगा, पेनगंगा, बाणगंगा, पाताळगंगा, ज्ञानगंगा या नावाच्या नद्या महाराष्ट्रात आहेत. अलीकडच्या काळात दक्षिण ध्रुवावरील भारताच्या कॅम्पचे नावसुध्दा 'दक्षिण गंगोत्री' ठेवले आहे! श्रीलंकेत हेच चित्र दिसते. इथे मोठया नदीला 'गंगा' म्हणायची पध्दत आहे. कालूगंगा ही काळया रंगाचे पाणी वाहणारी नदी, तसेच जिनगंगा आणि मेनिकगंगा या गंगेचे उपनाव धारण करणाऱ्या नद्या आहेत. मेनिकगंगा किंवा माणिकगंगा नदीच्या काठावर कातरगाम येथे कार्तिकेयाचे व गणपतीचे जुने मंदिर आहे. इथे गंगेत स्नान करायची पध्दत आहे.

श्रीलंकेतून भारतात आणि भारतातून श्रीलंकेत येणे-जाणे सामान्य होते. सुरुवात रामायणापासून होते. रावण, शूर्पणखा, बिभीषण लंकेतून भारतात आले होते, तर हनुमान व वानरसेनेसह राम लंकेत गेला. रामाच्या प्रवासाच्या खुणा जशा भारतात आहेत, तशा लंकेत दाखवल्या जातात. समुद्र उल्लंघन करायच्या आधी रामाने रामेश्वर येथे केलेली शिवपूजा, लंकेत पोहोचण्यासाठी बांधलेला रामसेतू इ. श्रीलंकेत कँडी येथे रामाचे सैन्य जिथे उतरले होते, त्या ठिकाणी आज श्री भक्त हनुमान मंदिर आहे. हनुमानाची मोठी मूर्ती या आधुनिक मंदिरात आहे. इथून जवळच रावणपुत्र मेघनादने तप केलेली जागा दाखवली जाते. नुवर एलिया येथे अशोकवन व हनुमान-सीता भेटीचे स्थान, तर उसनगोडा येथे लंकादहनची जागा दाखवली जाते. हनुमानाने संजीवनीसाठी महेंद्र पर्वत उचलून आणला. त्याचा एक तुकडा पडून 'उन्नावतुन' अर्थात 'इथे पडला' या नावाचा लहानसा डोंगर लंकेच्या दक्षिण टोकाला दाखवला जातो! युध्दानंतर मुन्नेश्वरम येथील मंदिरात रामाने शिवाची पूजा केली होती, असे सांगितले जाते.

मुन्नेश्वरमचे प्राचीन मंदिर 16व्या शतकात आलेल्या पोर्तुगीजांनी तोडले व त्याच्या ठिकाणी त्यांनी चर्च बांधले. साधारण अडीचशे वर्षांनी, 18व्या शतकात स्थानिक हिंदूंनी व बौध्दांनी ते चर्च पाडले आणि लवकरच कीर्ती श्री राजसिंघे या राजाने येथे पुनश्च शिवमंदिर बांधले. मुन्नेश्वरमचे हे पंचायतन मंदिर असून मुख्य मंदिर शिवाचे आहे व चार बाजूंना गणपती, काली व बुध्द आहे.

रामायणकालानंतर भारतातून लंकेत गेलेल्या विजय राजाची कथा वर आलीच आहे. तसेच इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात बौध्द प्रचारक श्रीलंकेत पोहोचले होते, हे मागे पहिले. इ.स.पूर्व पहिल्या शतकापासून चोल, पांडय, पल्लव या दक्षिण भारतातील सामर्थ्यवान राजांचा श्रीलंकेतील राजांशी संघर्ष कायम होता. पांडय व चोल राजांनी कैक वेळा लंकेवर राज्य केले.

तर, रामापासून सुरू होणारी लंकेची कथा, रामाच्या शब्दाने श्रीलंका कशी वाचली या कथेने आटोपती घेऊ. सोळाव्या शतकात मुघलांनी ओडिशा जिंकल्यावर लंकेवर स्वारी करायचे योजले होते. ते काम अकबराने सेनापती मानसिंगवर सोपवले. त्या वेळी एका साधूने मानसिंगला सांगितले -

रघुपति दिनो दान, विप्र विभीषण जानिके।

मन महिपत मन दियो दान किमी लीजिये।

रघुपती रामाने श्रीलंकेचे राज्य जिंकल्यावर बिभीषणाला दान दिले, ते दान पुन्हा काढून घेणे राजाला शोभत नाही! हे साधुवाक्य ऐकून मानसिंगने लंकेची स्वारी रद्द केली आणि श्रीलंका मुघल आक्रमणापासून सुरक्षित राहिली.

9822455650