'पिरियड - एंड ऑॅफ सेंटेन्स'च्या निमित्ताने

विवेक मराठी    14-Mar-2019
Total Views |

 

 
 नेटफ्लिक्सवर गेले काही दिवस सातत्याने समोर येणारी ही जेमतेम 25 मिनिटांची 'शॉर्ट डॉक्यू' पाहायला मला विशेष उत्साह वाटत नव्हता. 'सॅनिटरी पॅड' या विषयावर आधारित असणारी ही शॉर्ट-डॉक्यू नेमकी कशाकरता पाहायची, असं वाटत होतं. या डॉक्यूने ऑॅस्कर पारितोषिक मिळाल्याच्या बातमीने माझं लक्ष वेधून घेतलं. सॅनिटरी नॅपकिन, मासिक पाळी, लैंगिक शिक्षण हे सगळेच विषय आजही बऱ्याच प्रमाणात टॅबू मानले जातात आपल्या समाजात. ही डॉक्यू जिथे शूट केली आहे, ते गाव भारताच्या राजधानीपासून अवघ्या दीड तासांवर आहे. 

हपूर या दिल्लीजवळ असणाऱ्या गावात शूट केलेल्या एका साध्यासुध्या डॉक्युमेंट्रीने सध्या सगळयांचं लक्ष वेधून घेतलंय. रायका जेहताबने दिग्दर्शित केलेल्या या डॉक्युमेंट्रीने ऑॅस्कर पारितोषिक पटकावलं आहे. नेटफ्लिक्सवर गेले काही दिवस सातत्याने समोर येणारी ही जेमतेम 25 मिनिटांची 'शॉर्ट डॉक्यू' पाहायला मला विशेष उत्साह वाटत नव्हता. 'सॅनिटरी पॅड' या विषयावर आधारित असणारी ही शॉर्ट-डॉक्यू नेमकी कशाकरता पाहायची, असं वाटत होतं. या डॉक्यूने ऑॅस्कर पारितोषिक मिळाल्याच्या बातमीने माझं लक्ष वेधून घेतलं. सॅनिटरी नॅपकिन, मासिक पाळी, लैंगिक शिक्षण हे सगळेच विषय आजही बऱ्याच प्रमाणात टॅबू मानले जातात आपल्या समाजात. ही डॉक्यू जिथे शूट केली आहे, ते गाव भारताच्या राजधानीपासून अवघ्या दीड तासांवर आहे. त्या गावामधल्या लोकांना आजही 'सॅनिटरी नॅपकिन' म्हणजे काय हे माहीत नाही. 'मासिक पाळी' म्हणजे काय हे माहीत नाही. या गावातले बरेचसे पुरुष मासिक पाळीला एक रोग समजतात. बऱ्याचशा मुली/महिलादेखील याला एक समस्या/प्रॉब्लेम समजतात. मासिक पाळी सुरू असताना स्वच्छता कशी राखायची, कापडाच्या घडया सोडून याकरता इतर उपायही असतात हे यांच्या गावीही नसतं. टीव्हीवर/थिएटरमध्ये जाहिराती पाहून शहरी भागात राहणाऱ्या लोकांना याविषयीची किमान माहिती होत असते. जागोजाग फोर-जी तंत्रज्ञान पोहोचलेलं आहे. प्रत्येक घरटी एक मोबाइल आहे. असं असतानादेखील आजच्या तारखेला, आपल्या भारतात, अनेक लोकांना 'सॅनिटरी नॅपकिन/हायजीन' संदर्भात माहिती नाही. एकूण लोकसंख्येच्या केवळ अठरा टक्के महिला नॅपकिन्स वापरतात, अशी धक्कादायक आकडेवारी इंटरनेटवर समोर येते.

'पिरियड - एंड ऑॅफ सेंटेन्स' या डॉक्यूमध्ये एके ठिकाणी बोलताना 'पॅडमॅन' अरुणाचलम मुरुगंथम म्हणतात की, ''आजही अनेक ठिकाणी मासिक पाळी या विषयावर बाई तिच्या नवऱ्याशी मोकळेपणाने बोलू शकत नाही, एक बाई दुसऱ्या बाईशीदेखील मोकळेपणाने बोलत नाही. हपूर गावातल्या पुरुषांना सॅनिटरी पॅड म्हणजे 'हगीजसदृश काहीतरी आहे' असं वाटतं. ते का आहे? कशाकरता वापरतात? हेदेखील माहीत नाही. ही डॉक्यू फक्त पाळीविषयी आणि या विषयाविषयी असणाऱ्या अनभिज्ञतेविषयी नाही. ही डॉक्यू आहे हपूर गावातल्या एका मूक क्रांतीविषयी. ही क्रांती केली जाते एका महिलांच्या सुधारणा गटाकडून. अनेक वर्षं इथल्या महिलांना मासिक पाळीमुळे त्रास सहन करावा लागला. काहींना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. यावर उपाय म्हणून गावातल्या काही घरांमधे सॅनिटरी पॅड बनवणारी साधीसुधी मशीनरी आणली गेली. ही मशीनरी चालवायची कशी, याची देखभाल कशी करायची, हे शिकवलं गेलं. महिला गटाने पुढाकार घेऊन 'फ्लाय' या सॅनिटरी पॅड्सची निर्मिती करायला सुरुवात केली. फ्लाय हे बाजारात मिळणाऱ्या इतर प्रसिध्द ब्रँड्सपेक्षा जवळपास निम्म्याहून कमी किमतीचं आहे. फ्लाय इतर ब्रँड्सपेक्षा अधिक इफेक्टिव्ह आहे, असा या महिला गटाचा दावा आहे. आजूबाजूला अनंत अडचणी असताना, गावात फारशा कुणालाच सॅनिटरी पॅडविषयी माहिती नसताना, अनेक टॅबूजवर मात करून या महिला गटातर्फे नॅपकिन्सची निर्मिती केली जाते. निर्मिती झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात ही पॅड्स घेऊन जाऊन त्याची उपयुक्तता समजावणं, पाळीच्या दिवसात आवश्यक ती काळजी कशा प्रकारे घ्यायची याचं मार्गदर्शन करणं, पॅड्सचं मार्केटिंग करणं, प्रत्यक्ष विपणन/विक्री करणं इत्यादी गोष्टी हा महिला गट करतो. (मार्केटिंग हा शब्द मुद्दाम वापरतो आहे. 'मार्केटिंग' आणि 'सेल्स' यामध्ये फार फरक आहे. इथे केला जातो तो निव्वळ 'सेल' नाही.)

अतिशय साधंसोपं इलेक्ट्रोन्यूमॅटिक तंत्र वापरून पॅड्स बनवायची मशीनरी बनवली गेली आहे. या कारखान्यात अतिशय शिस्तबध्दपणे काम चालतं. कुणी किती वेळात काय काम केलं याचं रेकॉर्ड ठेवलं जातं. वेळानुसार, शिफ्टनुसार तक्ते बनवले जातात. वेळ पडली तर अगदी रात्रीदेखील कारखान्यात काम सुरू ठेवलं जातं. महिलांनी महिलांकरता उभी केलेली ही चळवळ पाहून अतिशय अभिमान वाटतो. अभियांत्रिकी किंवा विक्री करायचं कुठलंही शास्त्रशुध्द स्टीरिओटाइप प्रशिक्षण नसताना, केवळ आपल्या जिद्दीवर आणि हिंमतीवर उभी केलेली ही चळवळ पाहून कमालीचं आश्चर्य वाटतं. भारतात सुरू असणाऱ्या या उपक्रमाविषयी एल.ए.मधल्या ओकवूड स्कूलच्या विद्यार्थ्यांना फिल्म बनवावीशी वाटणं हेही अतिशय कौतुकास्पद. अमेरिकन दिग्दर्शिकेने ती बनवणं हेही कौतुकास्पद. पण याचबरोबर असंही वाटलं, की आपल्या देशातल्या गोष्टी फक्त आपल्या लोकांना का बरं दिसू शकत नाहीत? फॉरेन एडची गरज का बरं भासत असेल? गुनीत मोंगा, आर बालकी आणि टि्वंकल खन्ना, अक्षयकुमार यांच्यासारखे लोक संख्येने इतके कमी का असावेत ? आजही, जेव्हा पिरियड...सारखी ही फिल्म समोर येते, तेव्हा माझ्यासारखा सुशिक्षित माणूस (?) ती पाहायचं टाळतो आणि त्याला ऑॅस्कर मिळालं म्हणून ती आवर्जून पाहतो!

पॅडमॅन प्रदर्शित होण्यापूर्वी किती लोकांना अरुणाचलमविषयी अथवा त्याच्या कामाविषयी माहीत होतं? पॅडमॅनही कुठल्या संस्थेने प्रोडयूस केलाय बघा. या सिनेमाला कितपत रिस्पॉन्स मिळला ते पाहा. अक्षयकुमार आणि आर बालकी यासारखी नावं याच्याशी निगडित नसती, तर हा सिनेमा इतपत तरी चालला असता का? गावोगाव मोठया प्रमाणात पोहोचला असता का?

'पिरीयड - एंड ऑॅफ सेंटेन्स'सारखी डॉक्यू कुठे प्रदर्शित केली जाते आहे तेही पाहा. नेटफ्लिक्ससारखे फॅन्सी, हाय कॉस्ट प्लॅटफॉर्म वापरणारे नेमके कोण आहेत? गावखेडयात असणारा सामान्य माणूस हे बघेल का? हे सगळं पाहायची, यावर विचार करायची गरज नेमकी कुणाला आहे? नेटफ्लिक्ससारख्या ठिकाणी ही फिल्म आणण्याचा उद्देश काय? रेव्हेन्यू जनरेशन की सोशल अवेअरनेस? नेमक्या किती टक्के जनतेपर्यंत ही फिल्म पोहोचेल? ही फिल्म पाहूनही नेमकी किती आणि कशी जनजागृती होईल? 2013 साली बनलेली 'द मेन्स्ट्रुअल मॅन' ही यू-टयूबवर सर्वांकरता उपलब्ध असणारी फिल्म साफ दुर्लक्षिली जाते, याला काय म्हणावं? आज इतक्या वर्षांनंतरही या फिल्मला मिळालेले एकूण व्ह्यूज तीनशेहून कमी आहेत. हे नेमकं काय दर्शवतं? फेसबुकवर, व्हॉट्स ऍपवर वाटेल त्या दर्जाहीन क्लिप्स / लिंक्स सक्र्युलेट करणारा आपला सगळयांचा मिळून बनलेला समाज, ही फिल्म उद्या यू टयूबसारख्या माध्यमावर 'फ्री-ऑॅफ-कॉस्ट' बेसिसवर ब्रॉडकास्ट झाली, तर तिच्या लिंक्स तितक्याच वेगाने फॉरवर्ड करणार का? लिंक केलीच फॉरवर्ड, तर ती करण्याआधी फिल्म पाहायचे कष्ट घेणार का? फिल्म पाहून विसरून जाणार की ते विचार डोक्यात ठेवून सुधारणा करणार का? या विषयाला टॅबू न मानता त्याविषयी खुलेपणाने चर्चा करणार का? किमान स्वत:च्या घरी गरज भासली, तर दुकानात स्वत: जाऊन सॅनिटरी नॅपकिन आणून देणार का? आपल्या देशाला अत्यंत समाजोपयोगी असणारं लो-कॉस्ट इनोव्हेशन करणारी अरुणाचलमसारखी माणसं हवीत? की केवळ पंचवीस-तीस मार्क पेपरमध्ये पाडून आणि बाकी इंटर्नलवर विसंबून फर्स्ट क्लास / डिस्टिंक्शन आणणारे कागदी अभियंते हवेत? एक समाज म्हणून आपण सगळे नेमके कुठे चाललो आहोत?

 

हर्षद सहस्रबुध्दे

sahasrabudheharshad@gmail.com