याची देही, याची डोळा

विवेक मराठी    18-Mar-2019
Total Views |

 डावीकडून संथ वाहत येणारा यमुनेचा विस्तीर्ण काळसर, शांत प्रवाह आणि उजवीकडून आपले जेडच्या रंगाचे पाणी मोठया डौलात मिरवत वेगात येणारी गंगा. यमुना काळीसावळी, तिच्या लाडक्या कृष्णसख्याच्या रंगात बुडून गेलेली. आपल्याच विचारात गढलेली शालीन प्रौढा. उगाच नाही दुर्गाबाई भागवतांसारख्या विदुषीने यमुनेला 'दु:खकालिंदी' म्हटलेय. गंगा मात्र कायमच अवखळ रूपगर्विता, उत्तराखंडाच्या हिमशिखरांमधून दौडत येणारी चपला. प्रयागराजला यमुनेला भेटल्यानंतरच गंगा थोडी गंभीर आणि शांत होते आणि दोघींचा प्रवाह पुढे गंगा म्हणूनच काशीला विश्वनाथ शंकराच्या भेटीला जातो.


 

प्रयागराजला ह्या दोघींच्या मिलनाच्या सीमारेषेवर उभी असलेली लाकडी बोटींची काळी कुळकुळीत चारकोलने काढल्यासारखी जाड ओळ. त्यातल्याच एका बोटीवर मी उभी, अस्तित्व आणि विनाश ह्यांच्या सीमेवर उभी असल्यासारखी. माझ्या मागे यमुनेच्या तिरावर स्नानासाठी भक्तांचा महासागर लोटलेला. पुढेही तशीच गर्दी. स्त्रिया, मुले, तरुण, म्हातारे सगळे गुडघाभर पाण्यात खांद्याला खांदा भिडवून उभे. काहींचे डोळे मिटलेले. काहींच्या हातात ओंजळभर पाणी, उगवत्या सूर्याला अर्घ्य देण्यासाठी. तर काही हात जोडून तसेच मूकपणे उभे. आतल्या त्या अनामिक 'स्व'शी अबोल संवाद साधत.

 

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

अखंड परंपरा

प्रयागराजच्या कुंभमेळयाचं हे दृश्य काही आजचे नव्हते. अनेक शतकांपासून गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती ह्यांच्या संगमावर प्रयागराजचा हा कुंभ भरतो. लाखो लोक कुणीही आवताण न धाडता ह्या पवित्र संगमाच्या ठिकाणी येतात आणि नदीच्या पात्रात स्नान करतात. भारतात ज्या सनातन परंपरा अखंड सुरू आहेत, त्यातील एक परंपरा म्हणजे कुंभमेळा. पौराणिक कथेनुसार देव आणि दानव ह्यांच्या समुद्रमंथनातून अमृताने भरलेला सुवर्णकुंभ बाहेर निघाला. दानवांच्या हातात तो कुंभ लागून ते अमर होऊ नयेत, म्हणून देव आणि दानवांमध्ये युध्द झाले. त्या वेळी गरुडाने राक्षसांच्या हाती पडू नये म्हणून अमृतकुंभ आकाशमार्गे दूर नेला. त्या उड्डाणात चार ठिकाणी अमृताचे थेंब कुंभातून हिंदकळून खाली नदीत पडले. एक थेंब हरिद्वारमध्ये गंगा नदीत, दुसरा थेंब उज्जैन येथे क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब नाशिकला गोदावरी नदीत आणि चौथा थेंब प्रयागराजच्या गंगा-यमुना-सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला. त्यामुळे ही चार स्थळे तीर्थक्षेत्रे म्हणून प्रसिध्द झाली. या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो. त्यातही प्रयागराजचा कुंभ खूप प्रसिध्द आहे.

प्रयाग म्हणजे दोन नद्यांच्या संगम. उत्तराखंडमध्ये जिथे गंगेच्या उपनद्या एकमेकींना भेटतात, तिथे कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग इत्यादी संगम प्रसिध्द आहेत. पण प्रयागराजला गंगा आणि यमुना ह्या दोन मोठया नद्या एकमेकींना भेटतात आणि भाविकांची अशी श्रध्दा आहे की शुभ्र प्रवाहाची सरस्वतीही गुप्त रूपाने इथे तिच्या ह्या दोन्ही बहिणींना येऊन मिळते. अशा ह्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर म्हणजे सर्व संगमांचा राजा, म्हणून ह्या शहराचे नाव प्रयागराज. मुघल काळात अकबराने ह्या शहराचे नाव बदलून अलाहाबाद केले होते. पण गेल्या वर्षी योगी आदित्यनाथ ह्यांच्या सरकारने ते नाव बदलून परत प्रयागराज केले. दर तीन वर्षांनंतर एकदा अशा पध्दतीने बारा वर्षांतून एकदा उज्जैन, नाशिक, हरिद्वार आणि प्रयागराज या चार वेगवेगळया तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. त्याशिवाय दर सहा वर्षांनी हरिद्वार व प्रयागराज येथे अर्धकुंभमेळा भरतो. ह्या वर्षी प्रयागराजमध्ये अर्धकुंभ होता. त्याचाच एक भाग म्हणून संस्कृत भारती आणि उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने प्रयागराजमध्ये 'विद्वतकुंभ' ह्या चर्चासत्राचे आयोजन केले होते. ह्या चर्चासत्रात वक्ता म्हणून सहभागी होण्याचे भाग्य मला मिळाले आणि एक नवीनच विश्व माझ्या डोळयांपुढे उलगडले.

'जागतिक सांस्कृतिक वारसा'

कुंभमेळा म्हणजे भक्तांची मांदियाळी. कोणतेही औपचारिक निमंत्रण नसताना देशभरातले हिंदू भाविक या सोहळयाला उपस्थित राहतात. मिळेल त्या वाहनाने, प्रसंगी पायी लाखो लोक कुंभस्नानाला येतात. शांतपणे आपापले स्नान उरकून आपापल्या गावी परत जातात. इतके मोठे धार्मिक संमेलन जगात दुसरीकडे कुठेच नाही. म्हणूनच युनेस्कोने कुंभमेळयाला 'जागतिक सांस्कृतिक वारसा' म्हणून घोषित केले आहे. प्रयागराजला संगमावर कुंभस्नानाची परंपरा आजची नाही. कॉमन ईराच्या सातव्या शतकात राजा हर्षवर्धनाच्या कारकिर्दीत चिनी प्रवासी हुएनत्सांग भारताच्या प्रवासावर आला होता. आपल्या प्रवासवर्णनात त्याने लिहून ठेवले आहे की पोरोग्या ह्या ठिकाणी दोन नद्यांच्या संगमावर हजारो भाविक आणि साधू पवित्र स्नानासाठी जमले असताना राजा हर्षवर्धनाने त्यांना दान देण्यासाठी म्हणून आपली तिजोरी रिकामी केली होती. प्रयागराजच्या कुंभमेळयाचा हा आज ज्ञात असलेला पहिला ऐतिहासिक उल्लेख. पण मेळयाची आणि संगमस्नानाची परंपरा ह्याहूनही जुनी. कुंभमेळयाला स्नान करणाऱ्या लोकांची संख्या दर कुंभागणिक वाढतेच आहे.

संस्कृति विद्वत कुंभाच्या व्यासपीठावर शेफाली वैद्य आणि अन्य मान्यवर

मेळयाची व्यवस्था

2013च्या कुंभमेळयामध्ये मौनी अमावास्येच्या दिवशी तीन कोटीहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केले होते. प्रयागराजच्या ह्या कुंभमेळयात ही संख्या सात कोटीवर गेली. प्रयागराजचा हा 2019चा कुंभ सर्वार्थाने एकमेवाद्वितीय होता. जानेवारी 2019मध्ये मकर संक्रांतीला पहिल्या शाही स्नानाने सुरू झालेला ह्या अर्धकुंभाची सांगता चार मार्चला महाशिवरात्रीच्या महास्नानाने झाली. आठ आठवडयांच्या ह्या कालावधीत अगदी भारताच्या पंतप्रधानांपासून ते मॉरिशसच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत अनेक महनीय व्यक्ती स्नान करून गेल्या. वेगवेगळया साधूंचे आखाडे येऊन शाही स्नान करून गेले. त्याशिवाय परदेशी पर्यटक, हिंदू भाविक, शहरी हौशे नवशे गवशे असे करोडो लोक गेल्या दोन-अडीच महिन्यांत प्रयागराजची वारी करून गेले, तेही कुठलीही लहान-मोठी दुर्घटना न घडता. योगी आदित्यनाथ ह्यांच्या उत्तर प्रदेश सरकारने मेळयाची व्यवस्था इतकी उत्तम केली होती की तक्रारीला कुठेच जागा नव्हती.

स्वच्छतागृह आणि निवासाची सोय

ह्या वर्षीच्या कुंभमेळयाची सगळयात मोठी खासियत होती ती म्हणजे डोळयात भरणारी स्वच्छता. पंतप्रधान मोदींच्या लाडक्या 'स्वच्छ भारत अभियाना'चा भाग म्हणून ह्या वर्षीच्या प्रयागराजच्या कुंभमेळयात न भूतो अशी स्वच्छता प्रशासनाने ठेवली होती. संगमाजवळ जी मेगा सिटी उभारली होती, त्यात सरकारने भाविकांच्या निवासासाठी म्हणून चार हजाराहून अधिक तंबू उभारले होते. त्याशिवाय ज्यांना तंबूत राहणे परवडत नाही, अशा लोकांसाठी मोठमोठया डॉर्मिटरीज होत्या. अत्यंत माफक दरात तिथे राहण्या-खाण्याची सोय होती. मेळा परिसरात एक लाख वीस हजाराहून जास्त पोर्टेबल स्वच्छतागृहांची व्यवस्था केली होती. त्यातही पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी वेगळी व्यवस्था होती. स्नान करून आलेल्या स्त्रियांना कपडे बदलण्यासाठी पंधरा हजारापासून अधिक चेंजिंग रूम होत्या. बायका-मुली निर्धास्त होऊन संगमावर स्नान करून तशाच ओलेत्या अंगाने चेंजिंग रूमकडे जात होत्या. आजूबाजूला पुरुषही होतेच. सर्व वयांचे, सर्व रंगांचे, पण कुणाच्याही डोळयात वखवख नव्हती. आपण धार्मिक स्नानासाठी आलोय ही जाणीव सर्वांनीच होती.

असाही एक अनुभव

माझे स्नान आटोपून मी तशीच संगमावर निरुद्देश फिरत होते. आजूबाजूची माणसे वाचत. तिथेच मला तिलकराज भेटला. शहरातून दिसणाऱ्या कुठल्याही पंचविशीच्या तरुणासारखाच दिसत होता तो. तंग जीन्स, 'पॅरिस' असे इंग्लिशमध्ये लिहिलेला टी-शर्ट, कानात मोबाइलचा हेडफोन आणि पायात स्पोर्ट शूज. फक्त फरक इतकाच होता की, तो डोक्यावरून पदर घेतलेल्या आपल्या आजीचा हात धरून सावकाश, काळजीपूर्वक तिला संगमाकडे नेत होता. तिला नीट गुडघाभर पाण्यात नेऊन उभी केल्यावर तो आजीचा हात सोडून अदबीने बाजूला उभा राहिला. नजर खाली पाण्याकडे वळलेली. त्याच्या शेजारीच तरुण मुलींचा एक घोळका किलकिलाट करत स्नान करत होता. त्यांचे ओलेते कुर्ते त्यांच्या शरीराला चिकटले होते, पण तिलकराज निग्रहाने नजर खाली लववून उभा होता.

त्याच्या आजीचे स्नान झाल्यावर परत तिचा हात धरून तिला वर किनाऱ्यावर आणताना त्याची माझी दृष्टिभेट झाली. त्याने चटकन आपली नजर बाजूला करायच्या आत मी त्याच्याकडे बघून हसले. किंचित हो-ना करत तोही हसला. ''कहाँ से आये हो?'' मी त्याला विचारले. ''बिहारसे'' तो म्हणाला.

पाटणामध्ये इंजीनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होता तो. त्याच्या आजीची खूप इच्छा होती, म्हणून तिला घेऊन प्रयागराज कुंभस्नानासाठी आला होता. खूप कौतुक वाटले मला त्याचे, त्याच्या शालीनतेचे.

प्रयागराजचा हा कुंभ यशस्वी व्हावा म्हणून योगी सरकारने केलेले अथक प्रयत्न दिसतच होते. संगमावर सगळीकडे कचऱ्याच्या कुंडया होत्या. पिण्याचे पाणी भरून घ्यायला जागोजागी नळ होते. पंधरा हजाराहून सफाई कर्मचारी रात्रंदिवस मेगा सिटीची सफाई करत होते. संगमावर चाळीस हजाराहून जास्त एलईडी लाईटस् होते. कुठेही फिरायला भीती वाटत नव्हती. मी रात्रीची अकरा वाजेपर्यंत संगमावर एकटीच फिरत होते. पण एकदाही भीतीचा स्पर्श माझ्या मनाला झाला नाही. सारख्या पोलिसांच्या गस्त व्हॅन दिसायच्या.

एका रात्री मी अशीच नदी किनाऱ्यावर एकटीच फिरताना पोलिसांची एक जीप थांबली. आतल्या पोलिसाने अत्यंत नम्रतेने मला विचारले, ''आप ठीक है ना? आपको कहीं जाना है तो हम छोड देंगे।'' त्या अधिकाऱ्यांचे आभार मानत मी त्याच्याशी थोडा वेळ बोलले. इतकी चांगली व्यवस्था केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तर तो हसून म्हणाला, ''मैं सतरा साल सेपुलीस मेंहूँ, इससे पेहले भी मैंने मेला व्यवस्था में काम किया है, लेकीन इस बार जैसी व्यवस्था है के हमने भी आजतक नही देखीं।''

त्याचा निरोप घेऊन मी नदीकिनारी होडया लावलेल्या होत्या, त्यातल्या एका होडीवर निवांत, स्तब्ध बसून राहिले. माझ्या अगदी पायाशी यमुनेचा शांत प्रवाह आवाज न करता वाहत होता. पलीकडच्या किनाऱ्यावर प्रयागराजच्या किल्ल्याची मजबूत तटबंदी होती. दूर उजवीकडे संगमावर अजूनही लोकांची वर्दळ दिसत होती, पण मी जिथे होते त्या ठिकाणी मात्र शांतता होती. खालून वाहणाऱ्या यमुनेच्या प्रवाहाकडे बघता बघता माझ्या मनात विचार आला - कितीक काळ ही नदी अशीच वाहतेय, माझ्या देशाच्या संस्कृतीसारखी नित्यनूतन तरीही चिरंतन. आपण असू नसू पण गंगा, यमुना मात्र अशाच अविरत वाहत राहतील आणि त्यांच्याचप्रमाणे लाखो-करोडो भारतीयांच्या भक्तीचा प्रवाहही!