होळी रे होळी

विवेक मराठी    19-Mar-2019
Total Views |

होळी हा रंगाचा, मांगल्याचा, आनंदाचा सण समजला जातो. संपूर्ण भारतात हा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो. प्रांतानुसार, राज्यानुसार त्यात सांस्कृतिक वैविध्यही आहे. जे जुने आहे, अमंगल आहे, त्या सर्वाचा नाश करायचा आणि नावीन्याचा, उदात्ततेचा स्वीकार करण्याचा संदेश देणाऱ्या या रंगोत्सवाविषयी.

 

भारतीय मन निसर्गत:च उत्सवांचा आणि परंपरांचा आदर करणारे आहे. निसर्गाच्या सान्निध्यात आणि कृषीशी संबंधित जीवनशैलीत पोसल्या गेलेल्या भारतीय समाजमनाला निसर्गाचा सोहळा साजरा करावासा वाटला तर त्यात नवल ते काय!

हुताशनी पौर्णिमा अर्थात होळीचा सणही याला अपवाद नाही. चला तर, होळीच्या रंगात रंगून जाऊ या.

वसंत ॠतूची चाहूल लागायला लागली की पळस, पांगारा, काटेसावरी यांच्या केशरी-गुलाबी झळा आकाशाला भिडायला लागतात. होळीचा आनंदही याच वेळी सुरू होतो.

फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशनी किंवा होळी पौर्णिमा होय. झाडांची पानगळ सुरू झालेली असते. झाडांचे खराटे नजरेत भरू लागतात, या झाडांची होळी करून थंडीचा निरोप घेतला जातो. उन्हाळयाच्या काहिलीची चुणूक दाखविणारे निसर्गाचे रूप पाहून मानवी मनालाही थंडगार पाण्यात चिंब भिजावेसे वाटते, जमिनीवरची धूळ, होळीची राख अंगाला माखून घ्यावीशी वाटते. होळीपाठोपाठ येणारे धुळवड आणि रंगपंचमी यांचे म्हणूनच महत्त्व.

रंगपंचमीला रंगात न्हाऊन निघालेले, थंडगार पाण्याने चिंब भिजलेले लोक उन्हाची वाढती काहिली सहन करायला सज्ज होतात. एकमेकांवर रंगांची उधळण करत परस्पर राग, द्वेष दूर करून प्रसन्न मनाने एकमेकांना स्वीकारतात.

अग्निमीळे पुरोहितम्

भारतीय धर्मसंस्कृतीचा आद्यग्रंथ म्हणून ॠग्वेदाकडे आदराने पाहिले जाते. ॠग्वेदाची सुरुवातच देवांचा पुरोहित मानला गेलेल्या अग्नीच्या प्रार्थनेने, अग्निसूक्ताने झाली आहे. अग्नीच्या ज्वाला वरवर जातात, त्यामध्ये अर्पण केलेली आहुती तो स्वर्गात असलेल्या देवगणांना पोहोचवितो आणि त्याद्वारे प्रसन्न होऊन देव भक्तांचे कल्याण करतात अशी धारणा यामागे आहे.

ऊब देणारा, वन्य श्वापदांपासून संरक्षण देणारा, अन्न रुचकर करणारा अग्नी हा तत्कालीन वैदिकांच्या आयुष्याचा आणि जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आणि त्यामुळे अग्नीच्या उपासनेची पध्दती प्रचलित झाली असावी. होळी प्रज्वलित करून त्या अग्नीत वाईट विचार, प्रवृत्ती जळून नाहीशा व्हाव्यात आणि सगळीकडे सुविचार, चांगल्या प्रेरणा यांचे राज्य यावे अशी भावनाही होळीच्या उत्सवामागे असावी, असे वाटते.

होळीची आख्यायिका

होलिका ही एक राक्षसी होती, हिरण्यकश्यपूची बहीण. हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद विष्णूचे नामस्मरण करणे थांबवेना, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला मारण्यासाठी वेगवेगळे उपाय योजून पाहिले. होलिकेला वरदान होते की ती दुसऱ्याला जाळेल, पण स्वत: जळू शकणार नाही. सर्व उपाय संपल्यावर होलिकेने प्रल्हादाला जाळण्यासाठी म्हणून आपल्या मांडीवर घेतले, पण भगवान विष्णूंचा वरदहस्त असल्याने प्रल्हादाला कोणतीही इजा न होता होलिका स्वत:च जळून गेली, अशी आख्यायिका पौराणिक साहित्यात प्रचलित आहे.

कृषी संस्कृतीतील महत्त्व

भारतात आजही ग्रामीण भागात राहणारा समाज प्रामुख्याने शेतीवर उपजीविका करीत आहे. अशा समाजगटासाठी होळीचा सण हा ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. हाती आलेली नवी पिके शेतकऱ्याला दिलासा देतात आणि पुढील हंगामातही भरघोस पीक यावे अशी त्याला आस असते. यासाठी ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी पूजा, होम-हवन करणे असे विधी होळीच्या निमित्ताने ग्रामीण भागात श्रध्देने केले जातात.

पुढील नवे पीक घेण्यापूर्वी या दिवसात शेतकरी आपल्या शेतामध्ये भाजळणी करतो. यामुळे जमिनीतील अनावश्यक तण जळून जाते आणि पुढील पिकासाठी जमीन सुपीक व्हायला मदतच होते.

धार्मिक महत्त्व

बंगाल प्रांतात गौडीय वैष्णव उत्सव म्हणून होळीचे महत्त्व अविवाद्य आहे. भगवान कृष्ण आणि होळी यांचा एक अविभाज्य संबंध भारतीय संस्कृतीत मान्यता पावलेला आहे. उत्तर भारतातील वृंदावन, मथुरा या ठिकाणी कृष्ण मंदिरांमध्ये होळीचा सण उत्साहाने आणि पारंपरिक पध्दतीने साजरा केला जातो.

नंदगावहून आलेले पुरुष स्वत:ला गोपजन असे संबोधतात आणि स्त्रिया या गोपी असल्याचे मानले जाते.

बरसाना येथील श्रीजी मंदिरातील 'लाठमार होळी' प्रसिध्द आहे. हातात रंगीत लाकडी लाठया घेतलेल्या महिला पुरुषांना लाठीने मारतात आणि पुरुष स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतात, असा एक सोहळा होतो. रंगांची उधळण करीत स्त्रिया आणि पुरुष एकत्र नृत्य करतात.

बलराम मंदिर परिसरातही रंगांची उधळण केली जाते. राधावल्लभ मंदिरात राधा आणि कृष्ण यांचा विवाह साजरा करून होळीचा आनंद वाढविला जातो. लोकगीते म्हणत लोकनृत्याचा आनंद घेत उत्तर भारतीय भक्त होळीचा आनंद लुटतात.

दक्षिण भारतात मात्र भगवान शंकराने कामदेव मदनाला दिलेल्या शापाचा संदर्भ होळीशी जोडला गेला आहे.

 बंगाल आणि ओडिशामध्ये या काळात 'दोलोत्सव' साजरा केला जातो.

गोव्यामधील मंदिरांमध्ये होळी पौर्णिमेनिमित्त देवांची पालखी निघते. महाराष्ट्राच्या कोकण प्रांतामध्ये शिमगोत्सव हा महत्त्वाचा सण आहे. ग्रामदेवतेची पालखी, शिमग्याची पारंपरिक सोंगे यांचे विशेष मानाचे स्थान कोकणच्या भूमीत रुजलेले अनुभवायला मिळते. महाराष्ट्रात होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. होळीला नारळ अर्पण करून तो खरपूस भाजलेला नारळ प्रसाद म्हणून स्वीकारला जातो. महिला होळीची पूजा करतात, तिला प्रदक्षिणा घालतात. काही कुटुंबात होळीच्या दिवशी घरातील देवघरासमोर छोटीशी होळी प्रज्वलित करण्याचीही पध्दत आहे.

मणिपूरमध्येही होळीचा सण उत्साहाने साजरा केला जातो.

उत्तर भारतातही होळी आणि रंगपंचमीचा सण आनंदाने साजरा केला जातो. कामानिमित्त कुटुंबापासून लांब असलेली मंडळी आवर्जून होळीला येतात. मिठाई भेट दिली जाते. आवर्जून पांढरे कपडे घालून एकमेकांवर रंगांची उधळण केली जाते. नृत्याचा आनंद घेतला जातो.

संस्कृत साहित्यात

दशकुमार चरित, मालती माधव तसेच रत्नावली (हर्षवर्धन) या संस्कृत साहित्यात 'होळीच्या' उत्सवाचे वर्णन आढळते. मृच्छकटिक या संस्कृत नाटकात होळीला 'मदनोत्सव' असेही संबोधिलेले दिसून येते. कालिदासानेही मदनोत्सव असा शब्दप्रयोग करीत प्रेमीजन आणि होळीचा सण यांचा संबंध जोडून दाखविला आहे. तामिळ भाषेत यालाच 'कामन विला' - म्हणजे वसंताच्या स्वागताचा कामाचा उत्सव असे म्हणतात.

अन्य संप्रदाय

शीख संप्रदाय होळीच्या सणाकडे व्यक्ती आणि समाजाचे जोडले जाणे या भूमिकेतून पाहतो. वसंत ॠतूची चाहूल अनुभवत माणसाने सकारात्मक ऊर्जा आत्मसात करणे अशा भूमिकेतून हा संप्रदाय होळीच्या सणाकडे पाहतो. 'होल्ला मोहल्ला' या नावातही तेच अभिप्रेत असल्याचे दिसून येते. शीख गुरू गोविंदसिंह यांनी आनंदपूर येथे साजरा केल्या जाणाऱ्या होळीच्या उत्सवाला सामाजिक एकात्मतेच्या भूमिकेतूनच पाहिले आहे, असे लक्षात येते.

या तीन दिवसांच्सा उत्सवात शीख युवकांना सैन्याचे शिक्षण दिले जाई. धनुर्विद्या, घोडेस्वारी यांच्या प्रशिक्षणाबरोबरच संगीत आणि काव्य यांच्या स्पर्धांनाही गुरू गोविंदसिंहांनी विशेष स्थान दिले. आजही याचे स्मरण म्हणून शीख सांप्रदायिक तीन दिवसांचा हा उत्सव जत्रा, स्पर्धा, मर्दानी खेळांनी साजरा करतात.

आदिम संस्कृतीत

भारतातील आदिम समाजात होळीच्या दिवशी मातृदेवतेची पूजा करण्याचा प्रघात आहे. या दिवशी शितला नावाच्या देवीची पूजा करून तिने आजार, संकटे दूर करावीत अशी तिला प्रार्थना केली जाते. या पूजेला 'मायेर पूजा' म्हणजेच मातृदेवतेची पूजा असे म्हटले जाते.

पारंपरिक वाद्यांच्या गजरात फेर धरून केली जाणारी लोकनृत्ये स्त्री-पुरुषांना उल्लसित करतात.

एकुणातच माणसाच्या शरीर मनाला उल्लसित करणारा, वसंत ॠतूचे स्वागत करणारा, वाईट विचारांची आणि प्रवृत्तींची राखरांगोळी करायला शिकविणारा होळीचा सण! निसर्ग काटेसावर, पळस, पांगारा यांनी सजलेला असतो. त्यांच्या केशरी गुलाबी रंगात होळीच्या अग्निज्वाळा मिसळत वसंताचे होणारे स्वागत अनुभवू या.. रंगात रंगू या! (लेखिका धर्मशास्त्राच्या अभ्यासक असून

मराठी विकिपीडियावर संपादिका म्हणून कार्यरत आहेत.)

डॉ. आर्या जोशी

9422059795