नव्या भारतासाठी!

विवेक मराठी    19-Mar-2019
Total Views |


 

नुकतेच आपल्या देशात 17व्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आणि आचारसंहिताही लागू झाली. सर्वच पक्ष आता प्राण पणाला लावून निवडणुकीच्या रणांगणात उतरतील. मतदारसंघ, उमेदवाऱ्या यांच्या बातम्यांच्या महापुरात एक राजकीयच, पण वेगळी बातमी आली. ही बातमी केवळ आगामी निवडणुकीवर परिणाम करणारी नसून मागील पाच वर्षांतील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे आणि आपल्या परराष्ट्र धोरणाचे योग्य आकलन करून देण्याचे काम या बातमीने केले आहे. बातमी आहे, सोनिया गांधी यांचे विश्वासू निकटवर्तीय आणि काँग्रेसच्या माध्यम विभागाचे माजी प्रमुख टॉम वडक्कन यांनी भाजपात प्रवेश करण्याची. खरे तर निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्ष अशा प्रकारची पक्षांतरे घडवून आणत आपली राजकीय गणिते जुळवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र टॉम वडक्कन यांच्या भाजपा प्रवेशाला अशा ठोकळेबाज दृष्टीने पाहणे त्यांच्या भाजपा प्रवेशावर अन्याय करणारे ठरेल. टॉम वडक्कन यांनी काँग्रेसला दिलेली सोडचिठ्ठी ही त्या पक्षाबरोबरच राजकीय विश्लेषकांना मोठा धक्का देणारी बातमी आहे. पण त्यांनी पक्ष का सोडला? त्यांनी कशासाठी काँग्रेस सोडली?

भाजपामध्ये अधिकृतपणे प्रवेश केल्यानंतर टॉम वडक्कन म्हणाले, ''जर एखादा राजकीय पक्ष देशविरोधी भूमिका घेत असेल, तर तो पक्ष सोडण्याशिवाय माझ्याकडे काय पर्याय उरतो? पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपल्या देशावर हल्ला केला, त्यानंतर आपण त्याला प्रत्युत्तर दिले. माझ्या पक्षाने (काँग्रेसने) या सर्व घटनांवरील दिलेली प्रतिक्रिया अत्यंत दुर्दैवी होती. माझ्या पक्षाने देशाच्या सैन्यदलावर शंका घेतल्याने मी आज इथे (भाजपामध्ये) आहे.'' पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने केलेल्या अतुलनीय कामग्ािरीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात जे राजकीय पक्ष सहभागी झाले, त्यांचे नेतृत्व काँग्रेस पक्षाने केले होते. राजकीय मतभेद असू शकतात. राजकीय पक्षांमध्ये अशा प्रकारचे मतभेद असतील तरच राजकारण होणार आहे. देशाची सुरक्षा, पाकिस्तानने केलेला हल्ला या बाबींकडे राजकीय दृष्टीने न पाहता देशहिताच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे, असे मत असणारे अनेक राजकीय नेते असतील. पण ते मत व्यक्त करून देशहितासाठी आणि सैन्याच्या सन्मानासाठी पक्षत्याग करणारा एखादाच असू शकतो. ते टॉम वडक्कन यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला म्हणून त्यांचे कौतुक नाही, तर टॉम वडक्कन यांनी देशहित आणि गेल्या पाच वर्षांत परराष्ट्र धोरणात जे बदल झाले आहेत आणि  पुलवामानंतर त्याचे परिणाम दिसत आहेत ते समजून घेतले आणि पक्षत्यागाचा निर्णय घेतला, म्हणून त्यांचे कौतुक झाले पाहिजे. टॉम वडक्कन हे केरळ राज्याचे प्रतिनिधित्व करतात. केरळमध्ये भाजपाचा प्रभाव फार नाही. तरीही त्यांनी हा निर्णय घेतला, यामागे केवळ पक्ष बदलण्याची भूमिका नसून व्यापक राष्ट्रहित आणि देशाने जागतिक पातळीवर निर्माण केलेला दबदबा आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. टॉम वडक्कन यांच्याप्रमाणेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षातील काही खासदारांनी, आमदारांनी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. अन्य राज्यांतही अशाच प्रकारचा ओघ भाजपाकडे चालू आहे. ज्या पक्षांनी पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर अत्यंत हीन पातळीवर जाऊन टीका केली होती, त्याच पक्षांतील दुसऱ्या फळीचे कार्यकर्ते आज भाजपामध्ये येत आहेत. ही केवळ राजकीय निवडणुकीच्या तोंडावर होणारी पक्षभरती नाही, असे म्हणायला खूप वाव आहे.

कारण गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे जगभर आपल्या देशाचे समर्थक उभे केले आणि त्यातून ज्या प्रकारची परराष्ट्र नीती विकसित झाली, त्यावर विरोधी पक्ष विश्वास ठेवायला तयार नव्हते. उलट जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा मोदींच्या परराष्ट्र नीतीवर त्यांनी टीकाच केली होती. पण पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जी भूमिका घेतली आणि कारवाई केली, एअर स्ट्राइकनंतर ज्या प्रकारे 72 तासांत अभिनंदन भारतात परत आला, त्यावरून जागतिक पातळीवर भारताचे स्थान कशा प्रकारे भक्कम झाले आहे हे लक्षात येते. आता मोदींचे पाच वर्षांचे परिश्रम फळाला येताना दिसत असून आता नव्या भारताची अनुभूती सर्वांना येत आहे. आणि हा नवा भारत सर्वसामान्य जनतेला हवा आहे. सर्वसामान्य मतदारांनी पाच वर्षांपूर्वी ज्या कारणासाठी परिवर्तन घडवून आणले होते, त्याची पोच त्यांना पुलवामानंतरच्या प्रत्येक घटनेतून मिळत आहे. इतके दिवस विरोधाचे सूर आळवणारेही आता नव्या भारताला पाठिंबा देऊ लागले आहेत.

निवडणुका होत राहतील. पण आज जागतिक पातळीवर भारताचा दबदबा निर्माण झाला आहे, भारताला विकासाचा जो सूर गवसला आहे, आणि कधी नव्हे ते आपल्या सैन्यदलांना आत्मविश्वासाने काम करण्याची संधी मिळत आहे, हे वातावरण कायम राहिले पाहिजे. हे वातावरण म्हणजेच नवा भारत आहे. नव्या भारताची आकांक्षा ही केवळ पंतप्रधान मोदींची किंवा भाजपाची नाही, तर त्या सर्वसामान्य नागरिकाची ती आकांक्षा आहे. पाच वर्षांपूर्वी सर्वसामान्य माणसाने नव्या भारताचे स्वप्न पेरले होते, त्याची गोमटी फळे पाहायला मिळाली. आता नव्या भारताचा पुढचा अध्याय लिहिण्याची ही वेळ आहे.