रुग्णोपचारातील मार्गदर्शक सारथी - डॉ. सचिन मोपकर

विवेक मराठी    02-Mar-2019
Total Views |

 आजारावरची उपाययोजना जेवढी महत्त्वाची असते, तेवढेच महत्त्वाचे असते आजाराचे नेमके निदान होणे. आज अनेक गावांमध्ये पॅथॉलॉजीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. नालासोपारासारख्या पुरेशा सुविधा नसलेल्या ठिकाणाची हीच अडचण ओळखून डॉ. सचिन मोपकर यांनी आपली पॅथॉलॉजी लॅब सुरू केली. विरार, नालासोपारा भागात आज या पॅथॉलॉजी लॅबच्या अनेक ब्रँचेस यशस्वीरीत्या सुरू असून परिसरातील रुग्णांना यामुळे दिलासा मिळत आहे. मोपकर लॅब ही आज उत्तम सुविधा देणारी या परिसरातील एकमेव लॅब ठरली आहे. 

 

 

 साधासा ताप असो वा एखादी दुर्धर व्याधी, आपण आजारी पडलो की योग्य निदानासाठी सर्वात आधी पॅथॉलॉजीला भेट द्यावी लागते. योग्य निदानानंतर उपाययोजनेची वाट मोकळी होते. मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरांत अशा अनेक पॅथॉलॉजी प्रयोगशाळा आणि पॅथॉलॉजिस्ट रुग्णांच्या सुविधेसाठी उपलब्ध आहेत. पण मुख्य शहरापासून थोडे दूर गेले की या सुविधांचा प्रकर्षाने अभाव जाणवू लागतो आणि याच त्रासात भर पडते ती भारनियमन, जलप्रदूषण, दळणवळणाची कमतरता, अपुरा पाणीपुरवठा याची. मुंबईजवळील नालासोपारा शहरात या सर्व अडचणी गेली अनेक वर्षे भेडसावत होत्या. अडचणी जाणवूनही डॉ. सचिन मोपकर यांनी येथेच आपली पॅथॉलॉजी लॅब सुरू केली. परिसरातील नागरिकांची खूप मोठी सोय झाली. रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या मोपकर पॅथॉलॉजी लॅबच्या प्रवासाविषयी आम्ही डॉ. सचिन मोपकर यांच्याशी संवाद साधला.

ते सांगत होते, ''1988मध्ये एम.बी.बी.एस. झालो. मला मुळातच शल्यचिकित्सेची आवड नसल्याने व मेडिसिन ब्रँच न मिळाल्याने त्यावेळी मी पॅथॉलॉजीचा पर्याय निवडला. 1995मध्ये डी.पी.बी (डिप्लोमा इन पॅथॉलॉजी ऍंड बॅक्टेरिऑलॉजी) केला. 1996 साली मुंबईच्या टोपीवाला नायर वैद्यकीय महाविद्यालयातून एम.डी. पॅथॉलॉजी झालो. सोमय्या हॉस्पिटलमध्ये अधिव्याख्याता म्हणून एक वर्ष काम केल्यानंतर मी ताडदेव येथील भाटिया रुग्णालयात दोन वर्षे नोकरी केली. तिथे या क्षेत्रातील माझ्या गुरूंची भेट झाली. डॉ. प्रभू यांनी मला या क्षेत्रात येण्यासाठी पक्के तयार केले. माझी खरी जडणघडण त्यांच्या हाताखाली झाली. पॅथॉलॉजी लॅब कशी असायला हवी, त्यातील सुविधांची योजना कशी करावी हे त्यांनीच मला शिकवले. दरम्यान माझ्या पत्नीला, डॉ. प्रीती यांना विरारच्या संजीवनी रुग्णालयात पॅथॉलॉजिस्ट म्हणून नोकरी लागली. मात्र नालासोपारा परिसरात पॅथॉलॉजी लॅबची नितांत आवश्यकता असल्याचे आमच्या लक्षात आल्याने आम्ही नालासोपारा येथे लॅब सुरू करायचे ठरवले.''

डॉ. मोपकर दांपत्य मीरा रोडला राहते. त्यामुळे नालासोपारा येथील लॅबच्या जागेसाठी कर्ज मिळण्यापासून प्रश्नचिह्न उभे राहिले.  1998-99च्या सुमारास कर्जाची प्रक्रिया आताइतकी सोपी नव्हती. राहण्याचे ठिकाण वेगळे, व्यवसायाचे वेगळे. त्यामुळे सर्वच बँकांनी त्यांना परत पाठवले. संजीवनी रुग्णालयाचे सर्वेसर्वा अप्पा सामंत यांच्या पुढाकारामुळे ही कर्जप्रक्रिया सुकर झाली आणि 25 एप्रिल 1999 मध्ये सुमारे 200 चौ.फू. जागेत मोपकर लॅबच्या प्रवास सुरू झाला.


आज विविध चाचणी सुविधा मोपकर लॅबच्या माध्यमातून पुरवल्या जातात. त्याविषयी डॉ. सचिन सांगतात, ''आमच्याकडे सहा विभागांतील वेगवेगळया चाचण्या केल्या जातात. पहिला विभाग म्हणजे क्लिनिकल चाचणी - यात हिमोग्लोबीन, सीबीसी, प्लेटलेट मोजणी, कफ-लघवी-विष्ठा-वीर्य चाचणी या टेस्ट होतात. दुसऱ्या प्रकाराला बायोक्लिनिकल टेस्ट म्हणतात - यात रक्तातील शर्करा (ब्लड शुगर), कोलेस्ट्रॉल, लिपिड प्रोफाइल वगैरे टेस्ट होतात. तिसरा भाग इम्युनॉलॉजी - यात थायरॉइड, व्हिटामिन, एचआयव्ही, हॅपेटायटिस, कॅन्सर मार्कर समावेश होतो. चौथा भाग मायक्रोबायोलॉजी - रुग्णाला जंतुसंसर्ग झाला आहे का ते तपासले जातो. पाचवा भाग हिस्टोपॅथॉलॉजी - यात बायोप्सीचा समावेश होतो. सहावा भाग आहे सायटोलॉजी, यात पॅप स्मिअर (गर्भाशयाच्या कर्करोगासाठी केली जाणारी चाचणी), शरीरात सापडणाऱ्या गाठी, स्तनांमधील गाठी या चाचण्यांचा समावेश होतो. या सर्व चाचण्या आमच्याकडे केल्या जातात. यापैकी इम्युनॉलॉजी सुमारे सात वर्षांपूर्वी आणि मायक्रोबायोलॉजी चाचण्या सुमारे अकरा वर्षांपूर्वी सुरू झाल्या.''

सुरुवातीच्या काळात तत्कालीन उपलब्धतेनुसार मोपकर लॅबमध्येही सेमीऑॅटोमेटेड प्रकारची यंत्रे वापरली जात असत. या प्रकारात अर्धी प्रक्रिया मशीनबाहेर आणि अर्धी मशीनच्या साहाय्याने केली जाते. उदा., शर्करा तपासायची असेल तर एक विशिष्ट प्रकारचे द्रावण (याला रिएजंट म्हटले जाते) मिसळले जाते. अर्ध्या तासाने त्याचे वाचन घेतले जाते. अशा प्रकारच्या चाचण्यांना वेळ आणि कौशल्य दोन्हीची अधिक आवश्यकता लागत असे. त्याचप्रमाणे मानवी चुकांतून (human error) टेस्ट रिपोर्ट चुकण्याची शक्यता असते. परंतु आमच्या सजगतेमुळे या काळातही चुकांचा टक्का कमी होता, असे डॉ. सचिन आवर्जून सांगतात. ''सुरुवातीपासूनच आम्हाला फार चांगला प्रतिसाद मिळाला. जास्तीत जास्त चाचण्या वाजवी दरात करणे व ते करताना चाचण्यांचा दर्जा उत्कृष्ट ठेवणे हा निकष आम्ही ठेवला होता. यामुळे लोकांचा ओघ वाढल्याने आम्हाला लॅब मोठया जागेत हलवावी लागली. 2006 साली आम्ही मुख्य केंद्र असलेल्या साधारण दोन हजार चौरस फुटांच्या या मोठया जागेत शिफ्ट झालो.''

1999 ते 2010 या काळात विजेची अनियमितता आणि नियमित भारनियमन ह्या मोठया अडचणींना मोपकरांना तोंड द्यावे लागले. चाचण्यांसाठी विकत घेतलेली अतिशय महागडी यंत्रे खराब होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी प्रत्येक यंत्रासाठी स्वतंत्र यूपीएस विकत घेतला. चाचण्यांसाठी रोज सुमारे 200 लीटर पाणी लागते. नालासोपारा येथे पाणी क्षारयुक्त येते. त्यामुळे स्वतंत्र आरओ प्लांट बसवावा लागला. अशा वेळी नवीन मशीन घेणे अधिक खर्चीक होते. त्यामुळे कंपनीकडून भाडेतत्त्वावर यंत्रे घेतली. नालासोपारा पूर्वेला दोन कलेक्शन सेंटर सुरू करण्यात आली. जे रुग्ण लॅबमध्ये येऊ शकत नाहीत त्यांना होम व्हिजिट, वृध्दांना रिपोर्ट घरपोच किंवा त्यांच्या डॉक्टरकडे थेट पोहोचवण्याची मोफत सोय करण्यात आली. रुग्णालयात सँपल कलेक्शनची सोय केल्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचीही सोय झाली. विशिष्ट केसमध्ये डॉक्टरांना फोनवर रिपोर्ट पाठवण्याचीही व्यवस्था करण्यात येते. यामुळे लोकांचा त्रास वाचला व व्यवसायाचा विस्तार व्हायलाही मदत झाली. विरार व नालासोपारामधील बऱ्याच रुग्णालयांशी असा करार (टायअप) करण्यात आला. आज उत्तम सुविधा देणारी मोपकर लॅब ही या परिसरातील एकमेव लॅब आहे.

युवा पिढीने पॅथॉलॉजीच्या क्षेत्राकडे वळावे असे डॉ. मोपकर यांना वाटते. ते सांगतात, ''आज तरुण मंडळी स्वत: काही करण्यास अनुत्सुक असतात. कोर्पोरेट लॅब किंवा मोठया डायग्नोस्टिक साखळी असलेल्या लॅबना आज जास्त मागणी असून छोटया लॅबना फारसे महत्त्व उरलेले नाही, अशी एक काल्पनिक भीती तरुणांमध्ये आहे. वास्तव तसे नाही. तुमची सेवा चांगली-अद्ययावत असेल, कामाचा दर्जा उत्कृष्ट असेल, रुग्ण-रुग्णालये यांच्याशी तुमचे चांगले संबंध असतील तर तुमच्याकडे काम आपणहोऊन चालून येते. फक्त परिश्रम करण्याची तुमची तयारी असायला हवी.''


सध्याच्या काळात पॅथॉलॉजीला खूप महत्त्व आले असल्याचे विषद करताना डॉ. मोपकर सांगतात, ''अलीकडे नवीन रोगांचा शोध लागत असून त्यांच्या चाचण्या उपलब्ध झाल्या आहेत. (उदा. डेंग्यूचा ताप). काही रोगनिदान निव्वळ चाचण्यांनीच होते. (उदा. मधुमेह). अनेक रोगांवर उपचार केल्यानंतर रोग उपचाराला प्रतिसाद देतो की नाही हे चाचण्यांद्वारे समजते. (उदा.काही कॅन्सर, विशिष्ट जंतुसंसर्ग, मेलेरिया इ.). चाचण्यांमुळे उपचाराची मात्रा कमी-कमी-अधिक प्रमाणात करण्यास मदत होते. (उदा. थायरॉइड). अनेक रोगांचे Follow Up चाचण्यांद्वारे होते. शिवाय पूर्वीच्या आणि आताच्या डॉक्टरांच्या वैद्यकीय निदानातही फरक पडला आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार रुग्णांच्या ग्राहक हक्काचा विचार करता डॉक्टरांनाही अनेकदा चाचण्या मागाव्या लागतात. त्यात मेडिक्लेमचीही भर पडली आहे.

असे असूनही अनेक रोगनिदानासाठी चाचण्या उपलब्ध नाहीत व काही रोगांसाठी चाचण्यांचा अंशत: उपयोग होतो. त्यामुळे आवश्यकता नसताना उठसूठ (विशेषत: गुगल डॉक्टरांना विचारून) चाचण्या करणे रुग्णांनीही टाळायला हवे. डॉक्टरी सल्ल्यानेच चाचण्या कराव्यात. कारण कुठलाही डॉक्टर रुग्णाचा रिपोर्ट व त्याचा आजार यांची योग्य ती सांगड घालूनच उपचार करतो. पण रुग्णांना हे अनेकदा पटत नाही.

आज आपल्या आसपास अनेक ठिकाणी लॅब सुरू होताना दिसतात. लॅब कोणी सुरू करावी याबाबत कोणतेही ठोस नियम वा निकष नसल्याबाबत डॉ. मोपकर खेद व्यक्त करतात. हल्ली सरकारने पॅथॉलॉजिस्टच्या देखरेखीशिवाय लॅब चालवता येणार नाही असा अध्यादेश काढला आहे. मात्र प्रत्यक्षात तसे घडत नाही. ते सांगतात, ''एम.डी.  पॅथॉलॉजी करणारे अनेक जण आज स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याऐवजी नोकरी करणे पसंत करतात. आणि दहावी-बारावीनंतर लॅब टेक्निशियनचा छोटासा कोर्स करून लॅब उघडणारे अनेक आहेत. ज्यांनी खरे तर व्यवसाय करायला हवा ते करत नाहीत आणि नको ते रुग्णांच्या जिवाशी खेळ करतात.''

नालासोपारासारख्या प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या ठिकाणी स्वत:ची पॅथॉलॉजी लॅबची साखळी सुरू करून डॉ. सचिन मोपकर यांनी येथील डॉक्टरांची मोठी समस्या दूर केली आहे. अर्थात या वाटचालीत त्यांच्या पत्नी, पॅथॉलॉजिस्ट डॉ. प्रीती मोपकर यांचाही सिंहाचा वाटा आहे. इथे डॉ. सचिन यांच्या गुरूंनी दिलेला कानमंत्र उद्धृत करावाच लागेल. ''डॉक्टर हा अर्जुन असेल तर पॅथॉलॉजिस्ट हा कृष्ण आहे. कृष्णाने मार्ग दाखवायचा आणि अर्जुनाने बाण मारायचा.'' आपले हे पार्थसारथ्याचे, मार्गदर्शनाचे कार्य डॉ. सचिन मोपकर गेली अनेक वर्षे निरंतर यशस्वीपणे करत आहेत. नालासोपारा पंचक्रोशीतील नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.