'लग जा गले'

विवेक मराठी    20-Mar-2019
Total Views |

 काही गाणी रसिकांच्या मनात घर करून राहतात, काळाच्या ओघात अजरामर ठरतात. असेच एक गीत म्हणजे 'लग जा गले के फिर ये हसीं रात हो ना हो'. या सादेत मिठीची मिठास आहे, भुरळ पाडणारा मोह आहे, अनावर आकर्षण आहे आणि या सर्वाला क्षणभंगुरतेच्या दु:खाची किनार आहे. हे जे काही अमूल्य आहे, ते कदाचित येणाऱ्या सूर्योदयाबरोबर लोप पावणार आहे, ही भयाची छटासुध्दा आहे.

1997मध्ये प्रदर्शित झालेल्या टायटॅनिक या चित्रपटातले शेवटचे दृश्य आठवत असेलच. बोट बुडणार हे निश्चित आहे. मृत्यू काही पावलांवर उभा आहे. वाचण्याची शक्यता जवळजवळ शून्य.

हा विलासी प्रवास सुरू करताना, आपल्या आयुष्यातला हा शेवटचा प्रवास असेल याची कल्पना तिथे कुणाला असणार! स्त्रियांना, लहान मुलांना वाचवायचे प्रयत्न सुरू होतात. सर्व आयुष्य एकमेकांच्या संगतीत सुखाने घालवल्यावर आता हा विरह कसा सोसणार? हा प्रश्न पुढे ठाकलेल्या मृत्यूएवढाच भयावह. बोटीतून प्रवास करणारे एक वयस्कर जोडपे, मृत्यूला एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय घेते. जीवनाच्या या अंतिम क्षणी, जलसमाधी मिळत असताना एकमेकांच्या मिठीत आधार शोधणाऱ्या त्या दोघांच्या मनात काय विचार असेल?

लग जा गले के फिर ये हसीं रात हो ना हो

शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो

जगात सर्वात भीतिदायक असे काय असू शकते? 'स्वत:चा मृत्यू' असे अनेकांचे उत्तर असू शकेल. खरे तर त्याहून भीतिदायक आहे अंतिम क्षणी कुणाचीही सोबत नसणे.

सुधीर मोघे लिहून गेले आहेत,

बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे

थांबेल तोही पळभरी, पण सांग तू येशील का?

राजा मेहंदी अली खान यांनी लिहिलेल्या 'शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो' या ओळीतही आयुष्याची  क्षणभंगुरता आहेच, पण त्याचबरोबर जीवनाबद्दलची असोशीही दडली आहे.

1964मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वो कौन थी' या चित्रपटातील हे गीत. गाणारी आहे नायकाची पत्नी. एवढे जवळचे, जन्मोजन्मीचे नाते असूनही नायक बेचैन आहे, साशंक आहे. ही नक्की कोण असावी हा प्रश्न हे त्यांच्यातील दुराव्याचे कारण आहे. आपल्याच पत्नीविषयी अशी दोलायमान अवस्था का झाली असावी? याचे उत्तर त्याच्या भूतकाळात दडले आहे.

काही महिन्यांपूर्वी अशाच एका पावसाळी रात्री हॉस्पिटलमधून नायक घरी येत असताना तुफानात सापडतो. छातीत धडकी भरवणारी वळणे, मिट्ट काळोख, पावसाच्या वेगाला रोखून धरण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारे वायपर्स आणि निर्मनुष्य रस्ता. या निरव शांततेत सोबत आहे ती फक्त ओल्याचिंब झाडांची. अचानक त्याच्या गाडीसमोर एक सुंदर युवती येते.

''कुठे जायचे आहे?'' या प्रश्नाला तिचे उत्तर असते, ''जहाँ मुझे जाना है, वहाँ तुम नहीं पहुंचा सकते।'' मनातील शंकेला बाजूला सारून तो तिला लिफ्ट देऊ करतो. ती आमंत्रण स्वीकारते, पण कोणतेही प्रश्न न विचारायच्या अटीवरच. बाहेरचे दृश्य अंधुक, पुसट, पण तिच्या नजरेला मात्र सारा रस्ता लख्ख दिसत असतो. ती गाडीत बसल्यापासून अनेक विचित्र गोष्टी घडत राहतात. जिथे कोणीही जात नाही, तिथे तिचे शेवटचे स्थानक असते. ती पोहोचते आणि तिचे जणू स्वागत करावे तसे स्मशानाचे दरवाजे उघडतात. हळूहळू आतला काळाकुट्ट अंधार तिला गिळून टाकतो. ही जिवंत, हाडामांसाची स्त्री आहे की आत्मा की भूत? कोण असेल ही? हा प्रश्न गोंधळात पाडणारा. त्यात योगायोगाने अनेक अकल्पित गोष्टी घडतात. प्रत्येक वेळी त्या मुलीचा चेहरा कोणत्या न कोणत्या निमित्ताने नायकाच्या समोर येतो. आभास आणि सत्य याच्या सीमारेषेवर रेंगाळणारे हे प्रसंग नायकाला संभ्रमात पाडतात. त्यात भर म्हणून की काय, जिच्याशी लग्नगाठ बांधली गेली आहे, तिचा चेहराही या मुलीशी मिळताजुळता. हे सत्य की स्वप्न?

त्याला तिच्याविषयी आकर्षण आहे. स्वत:च्या संसाराची सप्तपदी चालायची स्वप्ने त्याच्याही नजरेत तरळत आहेत. तो पाऊल उचलतोही, पण या जगाच्या सीमारेषेवर रेंगाळणारे तिचे अस्तित्व त्याला पुढे जाऊ देत नाही. तिचा भूतकाळ त्याला माहीत नाही आणि स्वत:च्या भविष्याची तिला खात्री नाही. अशा वेळी त्या दोघांच्या हातात काय असणार आहे? तिनेच मागून घेतलेला हा एकांतातील क्षण. या जन्मात परत गाठभेट होईल की नाही त्याची खात्री नाही, मग सर्वार्थाने हा क्षण का भोगू नये? असा बेधडक सवाल आहे तिचा.

हम को मिली हैं आज ये घडियाँ नसीब से

जी भर के देख लीजिये हमको करीब से

फिर आप के नसीब में ये बात हो ना हो

आजूबाजूला निरव शांतता. समुद्राच्या लाटांशिवाय कोणाची सोबत नाही आणि त्या लाटाही किनाऱ्यालाच मिळायला धडपडत आहेत. वाऱ्याने हलणाऱ्या झावळया ही फक्त जिवंतपणाची खूण. सारे वातावरणच भारलेले आणि साथीला फक्त हाताच्या अंतरावर असलेले धगधगते सौंदर्य.

आपण जन्माला येण्याचा सोहळा करतो. खरे तर त्याच क्षणापासून नियती श्वास मोजायला सुरुवात करते. जगण्याच्या धुंदीत हे लक्षात येत नाही की याचा अंत निश्चित आहे आणि तो कधी असणार हे आपल्या हातात नाही.

आपल्याकडे आहे तो फक्त आपण जगत आहोत तो क्षण. या क्षणाचे महत्त्व जाणून आहे ती. कदाचित पुढे घडणाऱ्या अघटिताची तिला जाणीव आहे. 'लग जा गले' ही साद तिची आहे की दबा धरून बसलेल्या मृत्यूची?

पास आईये के हम नहीं आयेंगे बार-बार

बाहें गले में डाल के, हम रो लें जार-जार

ऑंखों से फिर ये प्यार की बरसात हो ना हो

शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो

प्रवास नक्की कुठे संपणार आहे, कसा संपणार आहे याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. पण आयुष्याची उत्तरे एवढी सोपी नसतात. या प्रवासात वळणे असतात, खाचखळगे असतात. कधी त्यांना चुकवावे लागते, कधी स्वत:ला बदलावे लागते. प्रत्येक क्षण काहीतरी नवीन घेऊन येतो. त्याचा आस्वाद घेणे, त्याला धीराने सामोरे जाणे यातच जीवनाची सार्थकता असते, हा संदेश हे गीत देते.

'लग जा गले' या सादेत मिठीची मिठास आहे, भुरळ पाडणारा मोह आहे, अनावर आकर्षण आहे आणि या सर्वाला क्षणभंगुरतेच्या दु:खाची किनार आहे. हे जे काही अमूल्य आहे, ते कदाचित येणाऱ्या सूर्योदयाबरोबर लोप पावणार आहे, ही भयाची छटासुध्दा आहे.

चित्रपटाची रहस्यमय कथा, तिला साथ देणारी साधनाची अलौकिक सुंदरता आणि लताबाईंचा स्वर्गीय, मोहात पाडणारा आवाज अशा सर्वच गोष्टी इथे जुळून आलेल्या आहेत. हे गीत पहाडी रागात बांधलेले आहे. या रागाच्या स्वरावलीत गूढतेचे वलय आहे. रागाचा करुण आणि शांत रस चित्रपटाच्या थीमशी जुळतो. मदनमोहनजींना ह्या चित्रपटासाठी फिल्मफेअरचे नामांकन मिळाले होते. त्या वर्षीचा पुरस्कार जरी या चित्रपटाला मिळाला नाही, तरीही रसिकांच्या मनात हे गीत अजरामर आहे.

 प्रिया प्रभुदेसाई

9820067857