किर्लोस्कर ब्रदर्स : सदैव काळाच्या पुढे

विवेक मराठी    23-Mar-2019
Total Views |

 प्रगतीच्या दिशेने सदैव घोडदौड करणाऱ्या किर्लोस्कर ब्रदर्स लि. या कंपनीला 15 जानेवारी 2020 रोजी 100 वर्षं पूर्ण होत आहेत. 100 वर्षांपूर्वी ही कंपनी प्रायव्हेट लिमिटेड झाली. यानिमित्त पुण्यात नुकताच ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रमही साजरा झाला. लक्ष्मणराव किर्लोस्करांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या किर्लोस्कर ब्रदर्स लि. कंपनीचं आज मल्टिनॅशनल कंपनीमध्ये रूपांतर झालं आहे. 4000 कर्मचारी, शेकडो विक्रेते आणि लाखो ग्राहक असलेल्या या कंपनीचा भारताच्या आर्थिक विकासात मोठा वाटा आहे. आर्थिक प्रगती साधतानाच कंपनीने सामाजिक बांधिलकीचा विसर पडू दिलेला नाही. स्वच्छता, शिक्षण, शाळा सुधारणा, रुग्णसेवा अशा गोष्टींमध्येही किर्लोस्कर समूह नेहमीच अग्रेसर असतो. विकासाची दृष्टी, कार्यक्षमता आणि सचोटी या निकषांवर जगभरच्या ग्राहकांचा कंपनीवरचा विश्वास अधिकाधिक दृढ होत आहे. कंपनीच्या गेल्या 100 वर्षांच्या वाटचालीचा हा आढावा.

  

संकटं ही अडथळा नसतात, तर ती असते पुढे जाण्याची संधी. ही संकटंच तुम्हाला त्यातून मार्ग काढण्याची व त्यांच्याशी दोन हात करून त्यांना चारीमुंडया चीत करण्याची संधी देतात. त्यामुळे एखादा अडथळा हा पुढच्या उडीची तयारी करण्यासाठीचा मध्यंतर मानला पाहिजे. अनेक अडथळयांवर मात करून उद्योगाचं साम्राज्य उभं करणाऱ्या कोणत्याही उद्योजकाला या संघर्षाला तोंड द्यावंच लागतं. पण व्यवसायावरील निष्ठा आणि सचोटी कायम राखली की मग पुढचं सारं आकाश त्याचं असतं. किर्लोस्करांची कथाही अशीच संघर्षातून प्रगतीकडे झेपावणारी आहे.

किर्लोस्करांच्या लढाऊ बाण्याचा सर्वप्रथम गौरव केला तो खुद्द लोकमान्य टिळकांनी. लोकमान्यांनीच देशात प्रथम स्वदेशीचा हुंकार भरला. देशाला स्वातंत्र्य मिळालं, तरी आर्थिक स्वातंत्र्यासाठी स्वदेशी उद्योग निर्माण झाले पाहिजेत असं त्यांना वाटत होतं. त्यांना किर्लोस्करांच्या उद्यमशीलतेचा लौकिक समजला, तेव्हा त्यांच्या बेळगाव येथील ठळकवाडीच्या कारखान्यात ते गेले होते. 1905मधली ही घटना आहे. किर्लोस्करांचं कौतुक करताना लोकमान्य म्हणाले होते, ''किर्लोस्कर, तुम्ही करत आहात हे एक मोठं राष्ट्रकार्य आहे. उद्या हिंदुस्थानला स्वराज्य मिळालं, तरी उद्योगधंद्याच्या वाढीशिवाय त्याला तरणोपाय नाही. तेव्हा कुठल्याही संकटाला न जुमानता पुढील काळावर नजर ठेवून आपलं काम तुम्ही नेटानं चालवा. त्यातून योग्य वेळी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.''


किर्लोस्करांच्या विविध कंपन्यांनी प्रगतीचे नवनवे विक्रम केले असले, तरी त्यांनी केलेल्या लोखंडी नांगराच्या निर्मितीचा उल्लेख सुवर्णाक्षरांनीच करायला हवा. इतिहासकाळात बाल शिवबांनी सोन्याचा नांगर फिरवून पुण्याची भूमी पवित्र केल्याचा उल्लेख आहे. किर्लोस्करांनी शेतकऱ्यांना लोखंडी नांगर देऊन शेतीला समृध्दीची जोड दिली. जाणता राजा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना किर्लोस्करांचा हा मानाचा मुजराच म्हणावा लागेल.

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

 लोकमान्यांच्या आशीर्वादाने बळ चढलेल्या किर्लोस्करांनी आपलं व्रत अधिक जोमाने चालू ठेवलं आणि त्याचं खणखणीत प्रमाणपत्रही लोकमान्यांचा उजवा हात असलेल्या तात्यासाहेब केळकरांकडून त्यांना जाहीरपणे मिळालं.

तो दिवस होता 13 ऑॅगस्ट 1925.

त्या दिवशी किर्लोस्करांनी बनवलेल्या पंपांच्या मुंबईतील शो रूमचं उद्धाटन साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकरांच्या हस्ते झालं. त्या वेळी बोलताना केळकर म्हणाले, ''परदेशी पंपामुळे हिंदुस्थानातून जाणाऱ्या पैशाच्या ओघाला बांध घालण्याचं काम स्वदेशी पण सर्वोत्कृष्ट असे किर्लोस्कर पंप करू लागल्याचे पाहून प्रत्येकाला खात्रीने आनंद होईल. या किर्लोस्कर पंपांचा लौकिक किर्लोस्कर नांगराप्रमाणेच चोहोकडे होईल, यात शंका नाही. लक्ष्मणराव किर्लोस्कर हे आमचे हेन्री फोर्ड आहेत. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल मी सर्वांतर्फे त्यांचे अभिनंदन करतो.''
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या हेन्री फोर्ड यांची उपमा लक्ष्मणराव किर्लोस्करांसाठी अगदी सार्थ होती. किर्लोस्कर उद्योग समूहाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचं सगळं जीवनच या उद्योग समूहाच्या कार्याला समर्पित होतं.

 


एकेका घराण्याचं एकेक पिढीजात वैशिष्टय असतं. किर्लोस्कर घराण्यातले सर्वच जण उद्योगाच्या विचारांनी झपाटलेले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उद्योग सुरू करणाऱ्या लक्ष्मणराव किर्लोस्करांनी तर हे जणू जीवनव्रतच मानलं होतं. लक्ष्मणरावांनी व नंतर किर्लोस्कर समूहाने एकूण किती प्रकारची कामं केली व विविध वस्तूंचं उत्पादन केलं, याची माहिती रंजक तर आहेच, तशीच थक्क करणारीही आहे.

'किर्लोस्कर ब्रदर्स'चा पाया

कर्नाटकातील धारवाडजवळच्या गुर्लहोसूर इथल्या काशिनाथपंत किर्लोस्करांचा हा सर्वात धाकटा मुलगा. काहीतरी वेगळं करण्याची वृत्ती अंगी असलेला. यामुळे लहानपणीच चित्रकलेचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईला जाण्याचं त्यांने ठरवलं. भविष्याशी दोन हात करण्याची मनातली जिद्द एवढंच काय ते भांडवल. मुंबईत हर प्रकारे कष्ट करत स्वत:च्या पायावर उभं राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छोटी नोकरी केली. पण मनातली ऊर्मी काहीतरी वेगळं करण्याची. देश-परदेशातल्या वेगवेगळया उद्योगांचे कॅटलॉग जमवून त्यांचा संग्रह करणं, रात्रंदिवस त्याचा अभ्यास करणं हा त्यांचा छंद. यातून त्यांना अनेक उद्योगांची इत्यंभूत माहिती झाली होती. त्यामुळेच मुंबईतल्या व्हिक्टोरिया जुबिली टेक्निकल इन्स्टिटयूटमध्ये चित्रकला शिक्षकाची नोकरी करतानाच एका मशीनचं मेकॅनिकल ड्रॉइंग त्यांनी काढून दाखवलं आणि तिथं तंत्रशास्त्र विभागात नोकरी मिळवली. संस्थेच्या अडचणीच्या काळात 'स्टीम' हा विषय शिकवण्याचं आव्हान स्वीकारलं. स्वभिमान एवढा तेज की मतभेद झाले, तेव्हा क्षणार्धात नोकरी सोडून दिली. एका लिथो प्रेसला जर्मनीतून आणलेलं मशीन बसवून दिलं. एका पारशी माणसाला सायकल चालवताना पाहून आपणही तशीच सायकल बनवावी असं त्यांना वाटलं. परदेशातून सुटे भाग मागवून तशी सायकल बनवली. एवढंच नव्हे, तर तशी सायकल बनवून बेळगावला आपल्या भावाला पाठवली आणि 1888मध्ये सायकलचे विक्रेते म्हणून व्यवसाय सुरू केला. आज ज्याचा वेलू गगनावरी गेला आहे, त्या 'किर्लोस्कर ब्रदर्स'चा पाया या सायकलच्या दुकानाने घातला.
 

उत्पादनांची यादी - कोटाची बटनं, 2. औषधी गोळया ठेवण्याचा कागदी डब्या, 3. सायकल, 4. पवनचक्क्या बनवणं, 5. कडबा कापण्याचं यंत्र, 6. इलेक्ट्रोप्लेटिंग, 7. मंडप उभारणी, 8. उसाचा चरक, 9. बिडाचे तवे, 10. लोखंडी नांगर, 11. बैलगाडयांच्या चाकजोडया, 12. रंग, 13. छापखाना, 14. नट-बोल्ट, 15. फर्निचर, 16. मोटारीच्या बॉडया, 17. चरखे, 18. पंप, 19. पेरणी यंत्र, 20. डिझेल इंजीन, 21. इलेक्ट्रिक मोटर, 22. विजेचा पंप, 23. कॉम्प्रेसर, 24. सौर पंप, 25. ट्रॅक्टर, 26. टर्बाइन्स, 27. वॉल्व्ह्ज आणि अन्य उत्पादने.


एखाद्याच्या मनात कोणती ऊर्मी दाटलेली आहे, त्यावरच त्याची जीवनधारणा ठरत असते. उद्योग ही कृती आहे असा सर्वसाधारण समज आहे. पण थोडया विचारांती आपल्या लक्षात येईल की उद्योग ही कृती नसून वृत्ती आहे. कोणत्याही उद्योगाच्या संदर्भात कृती ही नंतरची पायरी आहे. ही कृती करण्यापूर्वी उद्योग तुमच्या मनात भिनलेला असायला हवा. जन्मजात देणगी म्हणून काहींना अशी वृत्ती लाभलेली असते. उद्योग हा त्यांच्या रक्तातच असतो. भीमसेन किंवा कुमार गंधर्व यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न गायकांना एकाहून एक बहारदार अशा ताना उत्स्फूर्तपणे सुचत जातात, तशा उद्योगाविषयीच्या नवनवीन कल्पना अशा व्यक्तींच्या मनात आपोआप उलगडत जातात.

किर्लोस्कर उद्योग समूहाचे पितामह लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्यात ही अद्भुत वृत्ती जन्मजात वास करत होती. त्यातूनच त्यांना नवनव्या कल्पना सुचत असत. मग कोटाची बटनं बनवण्याचा विषय असो किंवा औषधी गोळयांसाठी कागदाची डब्या बनवण्याचा विषय असो. पवनचक्क्या उभारण्याचा विषय असो की मंडप उभारणीचा. एखादं आव्हान समोर आलं आणि लक्ष्मणराव एक पाऊल मागे सरकले असं कधी झालंच नाही. मंदिरावरच्या कळसांना चांदीचा मुलामा देण्याचं आव्हान पुढे आलं, तेव्हा पूर्वी वाचलेल्या इलेक्ट्रोप्लेटिंग विषयीच्या एका कॅटलॉगच्या आधारावर त्यांनी ते काम पूर्ण केलं. ब्रिटिश रेंज फॉरेस्ट ऑॅफिसरची मोटार आडरानात बंद पडली, तेव्हा त्याला आठवण झाली ती हरहुन्नरी लक्ष्मणरावांचीच. आणि लक्ष्मणरावांनीही एवढया दूरवर तत्परतेने जाऊन बंद पडलेली मोटार सुरू करून दिली. सायकलीच्या धंद्याला जोडून कडबा कापण्याचं यंत्र बनवलं. औंध इथे 73 फूट लांब, 50 फूट रुंद आकाराचा मंडप बांधून दिला. अगदी लोखंडाचे तवे आणि नट-बोल्ट बनवले. कुठलीही नवी गोष्ट पाहिली की ती आपल्याकडे बनली पाहिजे, या विचाराने झपाटले जात.

 पहिल्या लोखंडी नांगराचा जन्म

यातूनच किर्लोस्करांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावा असा तो दिवस उजाडला. 1903मध्ये किर्लोस्करांनी पहिला लोखंडी नांगर बनवला. तोपर्यंत सगळीकडे लाकडी नांगराने शेती केली जात असे. ते काम अतिशय कष्टप्रद आणि खूप वेळ खाणारं होतं. अनेक प्रकारे संशोधन करत किर्लोस्करांनी परदेशी नांगरांच्या स्पर्धेत सरस ठरेल असा लोखंडी नांगर बनवला. संपूर्ण देशातील शेती सुजलाम सुफलाम बनवण्याच्या दृष्टीने किर्लोस्करांनी केलेली ती एक क्रांतीच होती. विविध प्रांतातल्या जमिनींना अनुकूल असे बदल त्यांनी या नांगरात वेळोवेळी केले.

 पण उद्योजकाने नुसत्या निर्मितीत समाधान न मानता त्याच्या जाहिरातीतही लक्ष घातलं पाहिजे, हा विचार त्यांनी केला. तुम्ही माल तर चांगला बनवलाच पाहिजे, पण त्याची जाहिरातही आकर्षक आणि लोकांपर्यंत पोहोचणारी केली पाहिजे. एवढंच नव्हे, तर जाहिरात पाहून कुणी चौकशीला आलं, तर त्याच्याशी नीट बोला आणि तुमच्या उत्पादनाची सर्वंकष माहिती त्याला द्या, असा काळाच्या पुढे जाणारा मार्केटिंगचा विचारही त्यांनी दिला. एक संतुष्ट ग्राहक इतर दहा जणांना आणतो, पण नाराज झालेला एक जण इतर दहा जणांची मनं प्रतिकूल बनवतो, असं उद्योगाचं मूलतत्त्वच ते सहकाऱ्यांशी बोलताना मांडत असत.

नवी उद्योग नगरी-किर्लोस्करवाडी

'साहसे श्री प्रतिवसती' या म्हणीचा प्रत्यय त्यांच्या जीवनात कितीतरी वेळा आला. अगदी सुरुवातीला पैशांची अडचण निर्माण झाली, तेव्हा रामभाऊ गिंडे या अगदी अपरिचित गृहस्थांनी त्यांना विनाअट आर्थिक मदत केली.ठळकवाडीची जागा सोडण्याची वेळ आली, तेव्हा औंधच्या राजांनी हवी तेवढी जमीन देऊ केली. ''नकाशावर चौकोन काढा आणि ती जागा तुम्हाला घ्या'' असं राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी त्यांना सांगितलं. राजांच्या औदार्यातून कुंडल रोड रेल्वे स्थानकाजवळची सुमारे 36 एकर जागा किर्लोस्करांना मिळाली. अर्जुनाने खांडव वन जाळून तिथं इंद्रप्रस्थ नगरी उभारली, त्याप्रमाणे निवडुंग आणि बाभळीच्या झाडांचं रान माजलेल्या या बरड जमिनीवर लक्ष्मणरावांनी नवी उद्योग नगरी उभारली.

लक्ष्मणराव एवढे स्वाभिमानी होते की सातारचे त्या वेळी निवृत्तीच्या उंबरठयावर असलेले कलेक्टर मॉयसे यांनी त्यांना काहीही मागण्याची ऑॅफर दिली, तेव्हा ''आमचं ठीक चाललं आहे, मला काहीच नको'' असं लक्ष्मणराव म्हणाले. मॉयसे यांनी पराकाष्ठा करूनही लक्ष्मणरावांची निःस्पृहता ढळली नाही. शेवटी ते निघताना कामगारांनीच त्यांना कुंडल रोड स्टेशनचं नाव बदलण्याची विनंती केली आणि काही दिवसातच कुंडल रोडचं 'किर्लोस्करवाडी' झालं आणि अल्पावधीत हे गाव जगाच्या नकाशावर झळकलं.

'जगात शांतता नांदायची असेल, तर तलवारीची पाती मोडून त्यांचे नांगराचे फाळ बनवले पाहिजेत' असं एक प्रसिध्द वाक्य आहे. किर्लोस्करांनी लोखंडी नांगर बनवून क्रांती केली. पण काही काळातच त्यांना नांगरासाठी लोखंडाचा तुटवडा भासायला लागला. लोखंड आपण आपल्या कारख्यान्यातच बनवू असं लक्ष्मणरावांनी ठरवलं. त्यासाठी त्यांनी अनेक गावांची व डोंगरमाथ्यांची पायपीट केली. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थानातील किल्ल्यांवर खूप मोठया प्रमाणावर लोखंडी तोफा असल्याचं त्यांना समजलं. महाराजांशी त्याचा परिचय होता. त्यांनी महाराजांना विनंती केली आणि त्यांच्याकडून अनेक तोफा मिळवल्या व त्यांचं लोखंड नांगरांसाठी वापरलं. तलवारीचं पातं नव्हे, पण तोफा वितळवून नांगर बनवणारा हा जगातला पहिलाच उद्योग महर्षी असावा.


आपल्या उद्योगासाठी, म्हणजेच समाजासाठी आयुष्यातला प्रत्येक क्षण देणारा हा उद्योग महर्षी काळाच्या फार पुढे पाहणारा होता. त्यामुळेच आपला कामगार सुखाने राहावा, यासाठी त्यांच्यासाठी घरं बांधून देण्याची साम्यवाद्यांना उशिरा सुचलेली गोष्ट त्यांनी आधीच अमलात आणली. औंधच्या तुरुंगात असलेल्या पिऱ्या नावाच्या एका गुन्हेगाराला चांगलं वागण्याची शपथ घ्यायला लावून त्यांनी सुरक्षा रक्षक म्हणून कामावर घेतलं. वाट चुकलेल्यांना प्रकाशाची वाट दाखवण्याचा लोकनायक जयप्रकाशजींचा मार्ग त्यांनी शंभर वर्षांपूर्वीच हाताळला होता. याच पिऱ्याच्या मुलाचं लग्न लावायला पुरोहितांनी नकार दिला, तेव्हा दुसरा भटजी उभा करून किर्लोस्करवाडीत असले जातिभेदाचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, हे त्यांनी दाखवून दिलं. महात्मा गांधींच्या शिकवणीची एवढी मनापासून अंमलबजाणी करणारे ते एकमेव उद्योगपती असतील. 'किर्लोस्कर खबर' या मासिकातला खबर हा शब्द फारसी असल्याचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सल्ला मानून त्यांनी तो वगळला आणि भाषा शुध्दतेसाठी आपण जागरूक असल्याचं दाखवून दिलं. सकाळ दैनिकाचे संपादक नानासाहेब परुळेकर दुष्काळग्रस्तांच्या मदत फंडासाठी निधी मागायला त्यांच्याकडे आले, तेव्हा त्या दिवशी स्वत:च्या खात्यात असलेली सगळीच्या सगळी रक्कम त्यांनी त्या फंडासाठी दिली. एक ना दोन, लक्ष्मणरावांच्या देशभक्तीची आणि सामाजिक सुधारणेची शेकडो उदाहरणं देता येतील.

 प्रगतीचे शिखर

किर्लोस्करांचं घराणंच काळाच्या पुढे चार पावलं जाणारं होतं. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव शंतनूराव किर्लोस्कर अमेरिकेतल्या एम.आय.टी. विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन आले आणि त्यांनी हाच वारसा पुढे चालवला. 'Creative skills and gainful productive work alone can cure India of her poverty' असं म्हणणाऱ्या शंतनूरावांनी कंपनीला नवी दिशा दिली. त्यांचे कर्तृत्ववान चिरंजीव चंद्रकांत यांनी कंपनीच्या विस्ताराबरोबरच गुणवत्ता वाढीवरही भर दिला. किर्लोस्कर पंपांनी जवळपास सगळा देश पादाक्रांत केला होता. ऑॅइल इंजीन्सबरोबरच त्यांनी इलेक्ट्रिक मोटरही बनवली. विविध देशांत पसरलेल्या शाखांतून पंपांचं उत्पादन दरमहा दीड लाखाच्या घरात नेलं. किर्लोस्करांची निर्यात 100हून अधिक देशांपर्यंत वाढवली. N and NPT सर्टिफिकेट मिळवणारी ही भारतातली पहिली आणि जगातली 9वी कंपनी आहे.

किर्लोस्करवाडीपाठोपाठ सोलापूर, देवास, कोंढापुरी, कन्युर, साणंद असं कंपन्यांचं जाळं पसरलं. कोलफोर्ड, दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग, बँकॉक, अमेरिकेत अटलांटा, नेदरलँड्समध्ये अलमेलो आणि व्हेल्सेन अशा परदेशातल्या शाखा आज प्रगतीची शिखरं गाठत आहेत.

सौर ऊर्जेवर चालणारे पंप निर्माण करणारी हा पहिली कंपनी आहे. पाणीपुरवठा, पूरनियंत्रण, जलसंधारण, ड्रेनेज वॉटर ट्रीटमेंट प्लँट अशा अनेक कामांसाठी कंपनीने फार मोठया क्षमतेचे पंप पुरवले आहेत.

किर्लोस्कर ब्रदर्सच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या आज 4000पेक्षा जास्त आहे.

किर्लोस्कर समूहाच्या आधाराने आपला उद्योग उभा करणाऱ्यांची संख्याही शेकडोच्या घरात आहे.

कंपनीच्या सुधारणावादी विचारसरणीला अनुसरून कोईमतूर इथला कारखाना पूर्णपणे महिलांकडून चालवला जातो.

कर्तृत्ववान माणसाची पुढची पिढीही तितकीच कर्तबगार निघणं हा दुग्धशर्करा योगच असतो. शंतनूराव आणि चंद्रकांत यांच्या पश्चात किर्लोस्करांच्या नव्या पिढीनेही हे सातत्य कायम ठेवलं आहे. चंद्रकांत यांचे चिरंजीव संजय किर्लोस्कर हे किर्लोस्कर ब्रदर्सचे CMD म्हणून धुरा सांभाळत आहेत. संजय यांचे चिरंजीव आलोक हे SPPचे MD आणि कंपनीच्या परदेशातील सर्व विभागांचे प्रमुख आहेत. संजय यांची कन्या रमा ही किर्लोस्कर इबाराची MD आहे. नव्या पिढीच्या या तितक्याच दमदार नेतृत्वाखाली किर्लोस्कर ब्रदर्सची लि.ची घोडदौड सुरू आहे.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हणतात. किर्लोस्कर घराण्यातल्या स्त्रिया नुसत्या यशस्वी पुरुषांच्या मागे राहणाऱ्याच नव्हे, तर सुधारणावादी परंपरेनुसार यशस्वी पुरुषांच्या खाद्याला खांदा लावून उभ्या होत्या. अडचणीच्या घटकेला आपल्या सोन्याच्या पाटल्या काढून देणाऱ्या लक्ष्मणरावांच्या पत्नी राधाबाई, विविध क्षेत्रांत सहज संचार असलेल्या शंतनूरावांच्या पत्नी यमूताई, चंद्रकांत यांच्या पत्नी सुमनताई, संजय याच्या सहचारिणी प्रतिमाताई आणि नव्या पिढीची रमा या 'किर्लोस्कर महिलांनी' त्या त्या वेळची आव्हानं स्वीकारत आपलं कर्तृत्व सिध्द केलं आहे. यमूताईंनीच 1958मध्ये केवळ महिलांनी चालवलेली 'महिला उद्योग लिमिटेड' ही कंपनी सुरू केली होती. तोच आदर्श पुढे ठेवून किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडने कोईमतूर इथे 2011पासून फक्त महिलांनी चालवलेला कारखाना सुरू केला आहे.

One of the most admired Engineering company अशी ओळख असलेली व Enriching Lives असं बोधवाक्य असलेली किर्लोस्कर ब्रदर्स ही मल्टिनॅशनल कंपनी आज देशाच्या अर्थव्यवस्थेतली एक महत्त्वाची घटक बनली आहे.

कोकणातल्या किर्लोसी या छोटयाशा गावातील ही किर्लोस्कर मंडळी आज जगाला गवसणी घालत आहेत. हजारो कामगार, लाखो विक्रेते आणि कोटयवधी ग्राहक त्यांच्या या कामगिरावर फिदा आहेत.

 bbhagwandatar@gmail.com

भगवान दातार

9881065892