देवदुर्लभ नेत्याचा अकाली अस्त

विवेक मराठी    25-Mar-2019
Total Views |

 


तुम्ही किती वर्षं जगलात यापेक्षा कसे जगलात हे महत्त्वाचं' असं एक सुविचारवजा वाक्य आयुष्यात जितक्या वेळा ऐकायला/वाचायला मिळतं, त्यापेक्षा खूपच कमी वेळा आचरणात आणलेलं पाहण्याचा योग येतो. नुकतेच दिवंगत झालेले गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांचं आयुष्य त्याचं उदाहरण. त्यांची राजकीय कारकिर्द ही अनेक दिग्गज राजकीय नेत्यांच्या तुलनेत अल्प कालावधीची. मात्र या कालावधीतही त्यांनी भारतभरातल्या लोकांचं लक्ष वेधून घेतलं ते केवळ साध्या राहणीमानामुळे नाही, तर अनेक धाडसी निर्णयांमुळे, त्यासाठी दाखवलेल्या जोखीम पत्करायच्या त्यांच्या स्वभावामुळे आणि या सगळया वाटचालीत कायमच 'राष्ट्र प्रथम' या विचाराचं त्यांनी जे मनोहारी दर्शन घडवलं, त्यामुळे.

केवळ राजकारणातच नव्हे, तर एकूणच समाजजीवनात साध्या राहणीपेक्षा भपकेबाज आणि लक्षवेधी राहणीला आज अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामागची कारणं अनेक आहेत. अशा काळात जेव्हा एखादा राजकीय नेता स्वकर्तृत्वावर लोकांच्या मनात स्थान मिळवताना, प्रगतीचे नवे टप्पे ओलांडतानाही मूलभूत साधेपणाला सोडचिठ्ठी देत नाही, तेव्हा तो विशेष लक्षवेधी ठरतो. हे साधेपण पोशाखापुरतं सीमित नसून तो त्या व्यक्तीचा सहजधर्म आहे याची जेव्हा वारंवार प्रचिती येते, तेव्हाच ते साधेपण लोकांच्या मनाचा ठाव घेतं. पर्रिकरांच्या साधेपणाला जोड होती ती मनाच्या सच्चेपणाची, ज्याचं प्रतिबिंब त्यांच्या वागणुकीत स्पष्ट दिसत असे. साधेपणा हे त्यांच्या सच्चेपणाला लाभलेलं कोंदण होतं. यामुळेच ते सर्वसामान्यांच्या गळयातला ताईत झाले.

ज्या काळात राजकारणाकडे पाहण्याची सर्वसामान्यांची दृष्टी गढूळ झाली होती, त्या काळात पर्रिकर हे तरुणाईच्या गळयातला ताईत बनले होते. गोव्यासारख्या एका छोटया राज्यातल्या या राजकीय नेत्याचे चाहते देशभर होते ते तेव्हापासूनच. आपलं मूळपीठ रा.स्व. संघ आहे हे लपवणं तर लांबच, ते अभिमानाने मिरवणारे, इतकंच नव्हे, तर संघसंस्कारांप्रमाणे समाजहिताचं राजकारण करायची हिंमत दाखवणारे पर्रिकर म्हणजे तरुणांसाठी मोठं आशास्थान होतं.

राजकारण हे समाजकारणाचं माध्यम आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून लोकांच्या मनावर ठसवलं. संघाची इच्छा म्हणून राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या पर्रिकरांनी एक आमदार म्हणून गोवा विधानसभेत प्रवेश केला. 100 टक्के जीव ओतून काम करणं ही त्यांची खासियत. राजकारणही त्याला अपवाद ठरलं नाही. आपल्या अभ्यासपूर्ण उपस्थितीने त्यांनी सभागृहाचं लक्ष स्वत:कडे आणि पर्यायाने गोव्यात नवीन असलेल्या भाजपाकडे वेधून घेतलं. विरोधी पक्षनेता नसतानाही त्याच्याहून सरस कामगिरी करणाऱ्या पर्रिकरांनी आपल्या कामाची दिशा आमदारकीच्या पहिल्या कार्यकाळातच स्पष्ट केली.

गोव्याचे मुख्यमंत्री होण्याअगोदर विरोधी पक्षनेते म्हणून लोकांचे प्रश्न मांडणारे, त्याची तड लावण्यासाठी झटणारे पर्रिकर गोंयकरांनी पाहिले होते. सत्ताधाऱ्यांपेक्षाही हा आपल्या कामाचा माणूस आहे, हा विश्वास त्यांनी संपादन केलातो याच कालावधीत. हा कामाचा माणूस मुख्यमंत्री झाल्यानंतर जनतेच्या प्रश्नांना विसरला नाही की ते आपल्या राजकीय सोयीसाठी मागे ठेवले नाहीत. त्यातल्या प्रश्नांवर व्यावहारिक उत्तरं शोधायचं काम त्यांनी लोककल्याणकारक योजनांच्या माध्यमातून केलं. 

राजकीय नेता म्हणून वागण्यातला खुलेपणा हेही त्यांचं आवर्जून नोंदण्याजोगं वैशिष्टय. राजकीय तडजोड म्हणून जेव्हा अन्य पक्षीयांशी वाटाघाटी कराव्या लागल्या, त्याही त्यांनी खुलेपणाने केल्या. नंतर लोकापवादाला जागा राहील असं त्यांचं वर्तन या विषयातही नव्हतं. तसंच, विचारपूर्वक घेतलेल्या एखाद्या निर्णयासाठी संघर्ष करायची वेळ आली तर तोही करायचा, मग समोरचा विरोधी विचारांचा असो की समविचारी, हेही एक उल्लेखनीय वेगळेपण.

गोवा काँग्रेसच्या भ्रष्टाचारी राजवटीनंतर भाजपाला बहुमतात निवडून आणायचं स्वप्न पर्रिकरांनी अथक परिश्रमांनी सत्यात आणलं. बहुमतावर स्वार होत मुख्यमंत्रिपदावर आरूढ झाल्यानंतर त्यांची जबाबदारी आणखीनच वाढली. आर्थिक अरिष्टांतून गोव्याला बाहेर काढताना अनेक कटू निर्णय घेण्याची वेळ आली. मात्र विचारपूर्वक घेतलेल्या कटू निर्णयांशी ठाम राहताना त्यांनी लोकाग्रहास्तव कोणतीही तडजोड केली नाही. हळूहळू गोवा संकटातून बाहेर येऊ लागला आणि 'सुखी, समाधानी गोवा' या स्वप्नपूर्तीच्या दिशेने प्रवास सुरू झाला. सरकारी निवासस्थान हे लोकांच्या पैशातून उभं राहिलेलं असल्याने त्याचा वापर लोकांच्या कामासाठीच व्हायला हवा, या विचारातून सरकारी निवासस्थानात कार्यालय थाटणारा हा मुख्यमंत्री गोंयकरांच्या गळयातल्या ताईत झाला होता.

देशाचे संरक्षण मंत्री म्हणून गोव्याची वेस ओलांडून ते नवी दिल्लीत दाखल झाले, त्या वेळीही वर्तणुकीतला सच्चेपणा आणि राहण्यातला साधेपणा ही कवचकुंडलं त्यांच्यासोबत होतीच. दिल्लीची दरबारी हवा त्यांना मानवली नाही, तरी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यात त्यांनी कोणतीही कसूर होऊ दिली नाही, हे आवर्जून नोंदवण्याजोगं. संरक्षण मंत्रालयाशी संबंधित अनेक वर्षं दुर्लक्षिल्या गेलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची तड  लावली आणि सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून संरक्षण दलांमध्ये नवा जोश, नवा विश्वास जागवला. भारताकडे पाहायचा जगाचा दृष्टीकोन बदलण्यात या निर्णयाचं, त्याच्या यशस्वी अंमलबजावणीचं योगदान मोठं आहे. संरक्षण मंत्री म्हणून वाटयाला आलेल्या जेमतेम अडीच वर्षांच्या कारकिर्दीतही, कधीही न पुसणारा ठसा उमटवून पर्रिकर पुन्हा गोव्यात परतले तेही राजकीय अपरिहार्यता म्हणूनच.

अकस्मात समोर उभ्या ठाकलेल्या कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीचा सामना करताना त्यांच्यातला लढवय्या अखेरच्या श्वासापर्यंत निकराने लढला. त्यांची ती झुंजार वृत्ती पाहूनच दरवाजाशी उभा असलेला मृत्यूही काही काळ उंबऱ्याबाहेरच थबकला असावा.

केवळ जगायचं कसं, इतकंच नव्हे, तर अखेरपर्यंत लढायचं कसं, याचा वस्तुपाठ समोर ठेवून त्यांनी जगाचा निरोप घेतला. या देवदुर्लभ नेत्याला मन:पूर्वक अभिवादन!