दक्ष आणि सज्ज

विवेक मराठी    30-Mar-2019
Total Views |

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ही चाचणी घेण्याची गरज काय? खुद्द पंतप्रधानांनीच त्याची घोषणा करण्याची गरज काय? आदी कुशंका उपस्थित करून विरोधकांनी आपली 5 वर्षांची परंपरा अबाधित ठेवली. या चाचणीसाठी फक्त शास्त्रज्ञांचे अभिनंदन करून आपल्या कोत्या मनोवृत्तीचेही दर्शन घडवले आणि या चाचणीचा उगमही कसा नेहरूंच्या द्रष्टेपणातच आहे असा एक पोवाडाही काहींनी गायला. त्यांना थोडे जरी शहाणपण असते, तरी त्यांनी आपल्या कूपमंडुक वृत्तीचे दर्शन न घडवता मोकळया मनाने शास्त्रज्ञांबरोबर विद्यमान सरकारचेही कौतुक केले असते. पण तसे झाले नाही. त्यांनी आपल्या बोलण्यातून आपली योग्यता जनतेसमोर ठेवली.

उठा राष्ट्रवीरहो... सज्ज व्हा उठा चला... सशस्त्र व्हा उठा चला' हे 1961 साली प्रदर्शित झालेल्या 'हा माझा मार्ग एकला' या मराठी चित्रपटातील स्फूर्तिगीत. हे गीत संघशाखांवरही गायले जाते. अनेक स्वयंसेवकांना ते मुखोद्गतही आहे. रवींद्र भट यांच्या लेखणीतून उतरलेले आणि बाबूजींनी स्वरबध्द केलेले हे गीत आजही तितकेच प्रेरक आहे आणि कालसुसंगतही. हजारो देशभक्तांच्या, क्रांतिकारकांच्या प्राणांची आहुती देऊन देशाला मिळालेले हे स्वातंत्र्य लाखमोलाचे आहे, ते प्राणपणाने जपले पाहिजे, डोळयात तेल घालून त्याची राखण केली पाहिजे, कोणत्याही रूपातल्या शत्रूला ओळखून त्याच्याशी दोन हात करण्यासाठी सदैव सिध्द असले पाहिजे याची पुन्हापुन्हा जाणीव करून देणारे हे गीत आठवायचे कारण म्हणजे 'मिशन शक्ती' या उपक्रमांतर्गत झालेली उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. या यशस्वी चाचणीमुळे हे तंत्रज्ञान अवगत असलेल्या अमेरिका, रशिया, चीन यानंतरचा भारत हा जगातला चौथा देश बनला आहे. भारताने कोणत्याही देशाविरोधात ही चाचणी केलेली नसून स्वत:ची संरक्षणसिध्दता तपासण्यासाठी केली असल्याचे खुद्द पंतप्रधानांनी जाहीररीत्या सांगितले असले, तरी ही प्रायोगिक चाचणी शत्रुराष्ट्रांच्या काळजात धडकी भरवणारी आहे, हे नक्की. भविष्यातली युध्दे जमीन, पाणी, हवा यांच्याबरोबरच अंतराळातही लढली जातील, असा कयास असल्याने आपली संरक्षणसिध्दता त्या पध्दतीने असायला हवी हा हेतू त्यामागे आहे. उर्वरित तीन माध्यमांमध्ये आपण सक्षम आहोत याची जगाला कल्पना होतीच. 'मिशन शक्ती'च्या यशस्वी चाचणीमुळे आपल्या अंतरिक्षातील संरक्षणसिध्दतेची झलकही जगाला दिसली. संरक्षण दलाइतकीच विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही जेव्हा स्वदेशाविषयीच्या जाज्वल्य अभिमानाने भारलेली माणसे कार्यरत असतात, त्याच वेळी अशी अभिमानास्पद कामगिरी घडते. हा अभिमानाचा क्षण सर्वसामान्यांना भेट देणाऱ्या डी.आर.डी.ओ. संस्थेतील सर्व शास्त्रज्ञांचे मन:पूर्वक अभिनंदन! या प्रज्ञावंतांमुळेच भारताची मान जगात उंचावली आहे. त्यांच्या ऋणात आपण राहायलाच हवे.

तसेच, या प्रज्ञावंत शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांना या प्रयोगासाठी ज्यांनी हिरवा कंदील दाखवला, त्या ताठ कण्याच्या निडर पंतप्रधानांचेही मन:पूर्वक अभिनंदन!

हे तंत्रज्ञान सर्वप्रथम विकसित झाले ते अमेरिका आणि रशिया दरम्यानच्या शीतयुध्दाच्या काळात. 2007 साली चीनने स्वत:चा हवामानशास्त्रीय उपग्रह क्षेपणास्त्राने नष्ट करून स्वत:च्या अंतरिक्षसज्जतेची झलक जगाला दाखवली. या घटनेमुळे कावेबाज आणि धूर्त शेजारी चीनपासून भारताला असलेल्या संभाव्य धोक्यात आणखी एका आयामाची भर पडली. हा धोका लक्षात घेऊन, त्याला समर्थ पर्याय म्हणून संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान विकसित करून डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी 2012 साली उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणीची योजना तत्कालीन सरकारला सादर केली. मात्र या योजनेला परवानगी देण्याची धमक आणि इच्छाशक्ती तत्कालीन केंद्र सरकारमध्ये नव्हती. त्यामुळेच सत्तापालट होईपर्यंत ती योजना संस्थेला बासनात गुंडाळून ठेवावी लागली. 2014मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ही योजना सादर करण्यात आली, तेव्हा या प्रयोगाचे देशासाठी असलेले महत्त्व त्यांनी ओळखले आणि त्यासाठी जी जोखीम घ्यावी लागणार होती तीही हिमतीने पत्करली. (एक नोंद - पोखरण अणुचाचणीची योजना नरसिंह रावांना सादर झाली होती, मात्र ती नाकारली गेली. पुढे वाजपेयींनी तिला परवानगी दिली.) या प्रयोगाला मन:पूर्वक परवानगी देताना पंतप्रधान मोदींनी शास्त्रज्ञांना प्रोत्साहन दिले आणि सातत्याने पाठपुरावाही केला. संस्थेसाठी, देशहित डोळयासमोर ठेवून झोकून देऊन काम करणाऱ्या तिथल्या माणसांसाठी प्रोत्साहन, पाठपुरावा या गोष्टी इंधनासारखे काम करतात, याची मोदींना जाण होती. त्यांनी त्यात कसूर केली नाही. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाची नोंद संबंधित शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांनीही खुलेपणाने घेतली.

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ही चाचणी घेण्याची गरज काय? खुद्द पंतप्रधानांनीच त्याची घोषणा करण्याची गरज काय? आदी कुशंका उपस्थित करून विरोधकांनी आपली 5 वर्षांची परंपरा अबाधित ठेवली. या चाचणीसाठी फक्त शास्त्रज्ञांचे अभिनंदन करून आपल्या कोत्या मनोवृत्तीचेही दर्शन घडवले आणि या चाचणीचा उगमही कसा नेहरूंच्या द्रष्टेपणातच आहे असा एक पोवाडाही काहींनी गायला. त्यांना थोडे जरी शहाणपण असते, तरी त्यांनी आपल्या कूपमंडुक वृत्तीचे दर्शन न घडवता मोकळया मनाने शास्त्रज्ञांबरोबर विद्यमान सरकारचेही कौतुक केले असते. पण तसे झाले नाही. त्यांनी आपल्या बोलण्यातून आपली योग्यता जनतेसमोर ठेवली.

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विषयात नेहरू आग्रही होते, भारतातल्या बहुतेक महत्त्वाच्या वैज्ञानिक संस्थांची पयाभरणी त्यांच्या कार्यकाळात झाली, त्यासाठी त्यांनी भरीव आर्थिक तरतूदही केली याबाबत दुमत नसले, तरी संरक्षण हे क्षेत्र, त्याला विज्ञान-तंत्रज्ञानातील नवनव्या शोधांची जोड देणे हे विषय त्यांच्या प्राधान्यक्रमाचे नव्हते, हेही उघड गुपित आहे. पंतप्रधान या नात्याने ते देशाच्या संरक्षणासंदर्भात किती गाफील होते, याचे उदाहरण म्हणून 'हिंदी चिनी भाई भाई' ही त्यांची घोषणा आणि त्यानंतर दगाबाज चीनने पुकारलेले युध्द याकडे पाहता येईल. तरीही आत्ताच्या मिशन शक्ती चाचणीचे यशही नेहरूंच्या खात्यावर मांडण्याचा हा प्रयत्न केविलवाणा आणि हास्यास्पद आहे.

केंद्रात सरकार कोणतेही असो, युध्दखोरी ही आपली मानसिकता नव्हती आणि नाही. ते आपल्या डी.एन.ए.तच नाही मात्र देशाच्या सीमांचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. भारत जसजसा सर्वांगीण प्रगती करतो आहे, तसतशी त्याच्या शत्रूंमध्ये वाढ होते आहे. काही थेट शत्रुत्व पत्करतात, तर बहुतेक छुपेपणाने कारवाया करत राहतात. तेव्हा संरक्षणसिध्दतेला सर्वोच्च प्राधान्य देत देशाच्या अर्थसंकल्पात संरक्षण खात्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी लागते, याचे विद्यमान सरकारला भान आहे. वर्षागणिक वाढलेल्या संरक्षणविषयक आर्थिक तरतुदीतही त्याचे प्रतिबिंब दिसते. दक्ष राहणे आणि सज्ज राहणे या दोन्ही बाबी त्यांनी महत्त्वाच्या मानल्या
आहेत, याला गेल्या 5 वर्षांतल्या घटना साक्षी आहेत.