नव्या पिढीबरोबर...

विवेक मराठी    30-Mar-2019
Total Views |

ते बिघडलेले नाहीत किंवा मी फार सुधारलेली नाही. मूल्यव्यवस्था बदललीय, पण माझ्या मनाने सगळे दरवाजे इतके घट्ट लावून घेतलेत की काही वेगळं प्रवेश करायला जागाच नाही. 'मला बदललं पाहिजे'. 'मला फक्त टीकाटिपण्णी नाही करायची.' असं या वयात मानायची गरज आहे. खरं तर गप्प बसणं, भारीत भारी काहीसं सुचवणं एवढंच पुरेसं आहे. म्हणजे दोन पिढयांना आनंदात जगता येईल.

आता काहीच काम नाही राहिलं तसं - काम करायला गेलं तर झेपत नाही. मग वेगाने काम करणाऱ्यात मध्येमध्ये होऊ लागलं. तसा पेशन्सही कमी होऊ लागला. मनोरंजनाची साधनं बदलली. त्यातला आशय बदलला. जे गाणं तरुण असताना मनापासून गुणगुणलं जायचं, तशी गाणी ऐकू येईनात! जे पडद्यावर पाहून बरं वाटायचं, आता पडद्यावरची दृश्यं पाहणं सहज होत नाही. पण पर्याय काय? सोबत कुणाची? जो-तो आपापल्या व्यापात. आणि कधीतरी वय होणार, हा तेव्हा विचारही केला नाही. कसा करणार? काय करणार? तेव्हा इतकी कामं पडलेली असायची, पण झोप आवरता आवरायची नाही. आता वेळ आहे तर झोप नाही. आढयाकडे पाहून उलट नको ते विचारच मनात येतायत. कुणी म्हणतं - वाचत बसा, जप करा! आधी कधी कुठला छंद जोपासता आला नाही. मग आता हे सगळं नाही जमत. तात्पर्य काय, 'वृध्द होणारच' 'वय होणारच' अशी तयारीच झाली नाही मनाची. स्वत:ला गुंतवून कसं घ्यायचं हेही समजेना.

आपण असा विचार करू या ना की आपण तरुण असताना आधीची पिढी होतीच ना! तिला सैगल आवडत होता. आपल्याला महंमद रफी. आताच्या पिढी आणखी कोणी वेगळं आवडणारच ना! जवळजवळ दहा पिढयांतले बदल आपण बघत आलोय. मला कसं बदललं पाहिजे? केवळ दिसणं बदलून चालणार नाही. ते पटकन बदलता येतं. पण असणं बदलावं लागणार आहे. बदलांचा विचार होकारात्मक होता यायला हवाय. मी फक्त बदलाबदलात तुलना करत राहते. (आमच्या वेळी असं नव्हतं हं. हे तुमच्या वेळी आता काहीतरीच. तुम्ही बाळंतीण झालात, सगळं किती बंधन होतं - खाणं, राहणं, उजेड आणि आता बाळ झाल्यावर काही क्षणातच ते पंख्याखाली असतं. टयूबच्या प्रकाशात असतं नि मोबाइलवरही येतं. काय बाई हल्ली! असं येतंच तोंडातून...) बरेच वेळा दोन काळात, दोन वेळच्या तरुणपणातल्या जगण्याची तुलना होते. हे करताना आमच्या पिढीतल्या गोष्टीच चांगल्या नि नव्या पिढीतले बदल वाईट, टाकाऊ मानल्या जाऊ लागतात. याचा परिणाम काय?

नव्या पिढीबरोबर मला चालता येत नाही. विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा जगण्यातला प्रवेश-संचार मला चालत नाही. एका अर्थाने विचाराने मी मागास असते. नव्या पिढीची जीवनशैली नि आपली जीवनशैली यात फरक असतो. मला लवकर जेवायची सवय असते. नवी पिढी घरीच उशिरा येते. मग सगळयाला उशीर. अशा वेळी मला ताटकळायची गरज नाही किंवा माझ्या वेळेला जेवलं तर खटकायची गरज नाही. किंवा 'काय ही जेवण्याची वेळ' असा शेरा मारायची गरज नाही. कदाचित फायदे-तोटे लक्षात आल्यावर होईल बदल यात. ते बिघडलेले नाहीत किंवा मी फार सुधारलेली नाही. मूल्यव्यवस्था बदललीय, पण माझ्या मनाने सगळे दरवाजे इतके घट्ट लावून घेतलेत की काही वेगळं प्रवेश करायला जागाच नाही. 'मला बदललं पाहिजे', 'मला फक्त टीकाटिपण्णी नाही करायची' असं या वयात मानायची गरज आहे. खरं तर गप्प बसणं, भारीत भारी काहीसं सुचवणं एवढंच पुरेसं आहे. म्हणजे दोन पिढयांना आनंदात जगता येईल. Space फक्त जागेची नसते, विचारांतही द्यायची-घ्यायची असते. गोष्टी छोटया असतात, पण अनेक छोटया छोटया गोष्टींची एक मोठी गोष्ट तयार होते.

माझी मैत्रीण मला काही सांगत होती. मी तिला म्हणाले, ''अगं! हे दोघे सकाळी उठतात. निवांत गप्पा मारत चहा पितात. मग धावाधाव. मी ओरडते. आधी आवरा. नंतर गप्पा मारा. सकाळचं कसलं वेळ घालवणं..'' ती फक्त हसली. मी म्हणाले, ''तुझ्याकडेसुध्दा हेच वाटतं!'' ''हं! पण मी तुझ्यासारखं करत नाही.'' ''म्हणजे? तूसुध्दा गप्पा मारायला बसतेस?'' ''ते दोघं उठतात. मी फक्त सुचवते की मी जागी आहे. काही लागलं, करायचं असेल तेव्हा सांग... पुन्हा मी माझी होते. ना त्यांना काही सांगत, ना त्यांच्यात काही गप्पा मारायला जात. त्यांनी बोलावलं तर भाग घेते. बाजू घेत नाही. बरेच वेळा ऐकून घेते...'' पुन्हा ती हसली. तेवढं मला समजायला पुरे होतं. यालाच स्वत:ला बदलणं म्हणत असावेत. मी आहे, पण नि नाहीही ही भूमिका मला माझ्यात बदल करायला लावते. यामुळे सगळेच आनंदात.

इथे मला दादांची आठवण होते. 1956ला त्यांनी दोन भावगीतं लिहिली, जी लताबाईंनी गायली (घरात हसरे तारे, प्रतिमा उरी धरोनी) ते लिहीत होते, पण प्रसिध्दी थांबली. ते सत्तरीत असताना नवी गाणी ऐकत होते, समजून घेत होते. बदलत होते स्वत:ला! तेव्हा मी पन्नाशीजवळ आले होते. मी त्यांना म्हणत होते, ''दादा, या कसल्या कविता! कुठे तुमची ती भावगीतं आणि कुठे ही उथळ कविता!'' ते एवढंच म्हणाले, ''मला बदलायला हवं, नाहीतर माझ्या मनाप्रमाणे बदलवायची ताकद माझ्यात हवी.'' त्यांनी काळाचा विचार करून पहिला पर्याय स्वीकारला. मी आत्ताच्या विशी-पंचविशीतल्या तरुणाईसाठी लिहितोय असं म्हणताना सत्तरीत हा बदल करणं ही वेगळी गोष्ट होती. गाणी कशी निर्माण झाली यापेक्षा ते आनंदात जगले नि तरुणाईबरोबर त्यांचे धागे जुळले. ते म्हणत, ''सत्तरी बुध्दी अत्तरी.''

मनाने तरुण असणाऱ्या अशा कितीतरी व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांचं वय वाढलंय, पण कामाची उमेद, कामाबद्दल विचार करण्याची पध्दत नावीन्यपूर्ण आहे. शरीराचं वय होणं त्यांनी स्वीकारलंय. आदरणीय नानाजी जेव्हा 90 वर्षांचे होते, तेव्हा मी म्हणायचे, ''कसे आहात?'' ते हसत उत्तर द्यायचे, ''आयु बढती जा रही है। वो तो बढेगी। काम तो जोर से चल रहा है।'' अशी अनेक उदाहरणं जरी समजून घेतली तरी आपल्या लक्षात येईल. रडत बसण्याचा काहीच अधिकार नाही आपल्याला! निवृत्तीचं वय हे नोकरशाहीने ठरवलं. त्या व्यतिरिक्त इतर माणसांना रिटायरमेंट कुठे असते? कारण त्यांना पेन्शन नसते. शेतकऱ्याने रविवारीही सुट्टी न घेता शेती करत राहणं ही त्याची पेन्शनच असते. उलट आपण आपल्यातल्या क्षमतांना मर्यादा नाही घातल्या, तर त्या वाढतात. जोपर्यंत आपण कामात आहोत, काम करताना आनंदाने करत असतो तोपर्यंत आपण टाकाऊ नसतो. म्हणूनच पन्नाशीनंतर समजून घेऊन (नोकरीत असू तर अधिकच) आता थोडया वर्षांनंतर आपण स्वत: काही करणार आहोत. तसं म्हटलं तर केव्हापासून वृध्दत्व सुरू होतं? पन्नाशीनंतर उत्तरार्ध सुरू होतो. साठीनंतर लोक बुध्दीची किंमत करू लागतात नि सत्तरीनंतर 'लाकडं गेली स्मशानात' असं ऐकू येऊ लागतं. त्यापेक्षा 'वय वाढलं तर वाढू दे, मी अगदी मजेत जगेन नि इतरांना आनंदात ठेवेन' असं म्हणू या.

renudandekar@gmail.com