केसरी - शौर्याला वीरगतीची झालर

विवेक मराठी    30-Mar-2019
Total Views |

‘केसरी’ हा बहुचर्चित चित्रपट दहा हजार अफगाण घुसखोरांच्या आक्रमणाविरोधात ठाम उभ्या राहिलेल्या एकवीस शिख सैनिकांच्या रोमांचकारी लढ्यावर आधारलेला आहे. ती घटना मराठी प्रेक्षकांना पावनखिंडीतील बाजीप्रभू देशपांडेची किंवा परदेशी चित्रपट पाहणाऱ्यांना स्पार्टा विरूद्ध पर्शीयन्स यांच्या पूर्वैतिहासिक लढाईवर बेतलेल्या ‘300’ या चित्रपटाची आठवण करून देईल या तऱ्हेची! ‘केसरी’ चित्रपट अक्षयकुमारचा भारदस्त वावर, साजेसे पार्श्वसंगीत आणि पूरक दृश्ये यांच्यासह मनोरंजक झाला आहे.

‘केसरी’ ज्या ऐतिहासिक लढाईवर बेतला आहे, ती भारत आणि अफगाणिस्तान यांच्या सीमारेषेवरील सारागढी गावाजवळील किल्ल्यावर १८९७ साली लढली गेली. सारागढी किल्ल्यावरील ‘छत्तीस सिंग रेजिमेंट’च्या २१ शिख सैनिकांनी हवालदार ईशर सिंग याच्या नेतृत्वाखाली तब्बल दहा हजार अफगाण घुसखोरांशी निकराचा लढा दिला. ते सारे त्या प्रयत्नात धारातिर्थी पडले, मात्र सारागढीचा किल्ला अफगाणांच्या हाती गेला नाही. सारागढीची ती लढाई जगातील मोजक्या ‘दी लास्ट स्टॅंड’ प्रकारातील लढायांमध्ये गणली जाते. त्याकाळी ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेल्या त्या परिसरामध्ये (त्यावेळेस तो प्रांत भारताचा होता. आता तो प्रदेश पाकिस्तानमध्ये आहे.) एकूण तीन किल्ले होते. गुलिस्तान, सारागढी आणि लॉकहार्ट. ) हवालदार ईशर सिंग (अक्षय कुमार) त्यापैकी गुलिस्तान किल्ल्यावर तैनात असताना तो अफगाणी लोकांचा समुदाय एका अफगाण स्त्रिला जीवे मारण्याचा प्रयत्न करताना पाहतो. ईशर सिंग वरिष्ठाच्या आदेशाला न जुमानता तिचा बचाव करतो. एका ‘सिख’ व्यक्तीने ईस्लामच्या कामामध्ये अडसर आणल्याच्या कारणावरून चिडलेले अफगाण गुलिस्तान किल्ल्यावर आक्रमण करतात. ईशर सिंग सह तेथील सर्व सैनिक तो हल्ला परतवून लावतात. मात्र ईशर सिंगची आदेश न जुमानल्याच्या कारणावरून सारागढी किल्ल्यावर बदली करण्यात येते. सारागढी हा किल्ला गुलिस्तान आणि लॉकहार्टच्या मधोमध स्थित असल्याने सारागढीकडे त्या किल्ल्यांकडून आलेले संदेश एकमेकांकडे पाठवण्याचे किरकोळ काम असते. ईशर सिंग सारागढीची सूत्रे हाती घेतो. तिथे छत्तीस सिंग रेजिमेंटचे वीस शिख सैनिक तैनात असतात. ईशर सिंग तिथे पोचून तिथल्या मनाने चांगल्या पण शिस्त नसलेल्या सैनिकांना ताळ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू करतो. पराभूत झाल्याने चिडलेले अफगाण नव्या टोळ्यांना सोबत घेऊन सारागढीवर आक्रमण करतात. सारागढीवर कमी फौजफाटा असल्याने तो दुपारपर्यंत चटकन काबिज करावा, इतर दोन किल्ल्यांमधील संदेशवहन तोडावे आणि ब्रिटीश सैनिकांची नवी तुकडी मदतीला येण्यापूर्वी इतर दोन्ही किल्लेदेखील एकाच दिवशी हस्तगत करावेत असा अफगाणांचा बेत असतो. तो बेत हाणून पाडण्यासाठी ईशर सिंग आणि त्याचे बहादूर साथीदार कसे निर्धाराने लढताता याचे चित्र ‘केसरी’ चित्रपट उभे करतो.‘केसरी’ चित्रपटाची बरीच चर्चा झाली आणि त्याला प्रेक्षकांकडून पसंतीची पावतीदेखील मिळाली. त्यातले महत्त्वाचे कारण म्हणजे अक्षय कुमारने साकारलेली ईशर सिंगची भूमिका. अक्षय हा गुणी आणि सचोटीचा कलावंत आहे. तो स्वत:च्या मर्यादीत चौकटीमध्ये प्रयोग किंवा नव्या गोष्टी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.((म्हणूनच त्याने अधूनमधून निरर्थक विनोदी सिनेमे केले तरीदेखील त्याच्याबद्दल प्रेक्षकांमध्ये आदर जाणवतो.) ‘केसरी’मध्ये अक्षयच्या डोक्यावर उंच मोठी पगडी आणि खाली तेवढीच मोठी दाढी असा संपूर्ण चेहरा झाकून टाकेल असे रूप पाहण्यास मिळते. तो अक्षयकुमार आहे हे चटकन ओळखू येत नाही. मात्र स्क्रीनवर चेहरा दिसण्यापेक्षा अक्षयने ती भूमिका, व्यक्तिरेखेची धारणा, विचार आणि त्यातील लढवय्याचा आवेश या साऱ्या गोष्टींना अधिक महत्त्व दिलेले जणवते. अक्षयने त्या पात्राच्या साऱ्या गोष्टी ताकदीने आणि प्रामाणिकपणाने उभ्या केल्या आहेत. अखेरच्या दृश्यांमध्ये लढताना त्याचा आवेश काय वर्णावा! अफगाणी हल्लेखोरांच्या गर्दीत दोन्ही हातांनी शस्त्र चालवत शत्रूवर सपासप आघात करणाऱ्या अक्षयला पाहून मुरारबाजीचीच आठवण होते. ‘केसरी’तील ईशर सिंग ही अक्षयने साकारलेल्या उत्तम भूमिकांपैकी एक आहे.

प्रेक्षकांना ‘केसरी’ आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याची मूळ घटना. ती घटना म्हणजे अभिमानाने मिरवावी अशी शोकांतिका आहे. शौर्याला विजयापेक्षा वीरगतीचे कोंदण अधिक प्रभावी दिसते. कर्तव्यभावना निभावत धारातिर्थी पडण्यामध्ये समाधान आणि दु:ख असे भाववेधक मिश्रण असते. म्हणूनच बाजीप्रभू, तानाजी मालुसरे यांचे बलिदान अधिक स्मरणात राहतेच, मात्र त्याविषयी सांगता-बोलतानादेखील एक वेगळा अभिमान जाणवतो. विजयश्री मिळवलेल्या इतर कोणत्याही लढायांपेक्षा पानिपतचा पराभव अधिक अभिमानास्पद भासतो तो त्यामुळेच! चित्रपटात एकवीस शिखांचा दहा हजार अफगाण सैनिकांविरोधात लढण्याचा निर्णय घेतात आणि तत्क्षणी पाहणाऱ्यांची मने जिंकतात.




सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/



 पण ‘केसरी’ सिनेमा मार खातो तो इथेच! दहा हजार विरूद्ध एकवीस हे प्रमाण अशक्य कोटीतील आहे. ते पाहण्यासाठीच प्रेक्षक चित्रपटगृहात येतात. मात्र पडद्यावरील त्या लढाईमध्ये युद्धनितीचा अभाव आहे. त्या समरप्रसंगात सैनिकांची कल्पकता, योजना, शिस्त अशा अनेक बाबींचा समावेश करता आला असता. ते एकवीस सैनिक ती लढाई केवळ आवेशाच्या जोरावर लढताना दिसतात. मात्र कलाकारांचा परफॉर्मन्स, अनुरूप पार्श्वसंगीत आणि अक्षयचा पडद्यावरील वावर चित्रपट पाहताना त्या गोष्टींची कमतरता जाणवू देत नाही.
ते एकवीस शिख एकदिलाने, एकत्र लढले असले तरी त्यातील अक्षय आणि एकोणीस वर्षांचा तरणा शिख सैनिक असे दोघे वगळता इतर पात्रांच्या मृत्यूसमयी वीरमरणाची भावना निर्माण होत नाही. ते किंचित दुर्लक्षित राहिल्यासारख्या वाटतात.



अफगाण लोकांनी गुलिस्तानवर हल्ला केल्यानंतरही अक्षयकुमार सारागढी या अफगाणांच्या गावातील मशिद सैनिकांसोबत दुरूस्त करतो, अफगाणांच्या हल्ल्यात एकीकडे मुसलमान तरूण शिख सैनिकांवर धावून जाताना दुसरीकडे त्याच वयाचा शिख सैनिक अफगाणांवर धावून जातो असे काही चांगले कॉन्ट्रास्ट चित्रपटात पाहायला मिळतात. चित्रपट धर्माच्या पातळीवर काही विचारप्रवर्तक गोष्टी सांगू पाहतो. त्या साधारण असल्या तरी त्यांचे पटकथेतील स्थान चांगले आहे. ईशर सिंग आणि त्याचे साथीदार स्वातंत्र्याचा खरा अर्थ उमगल्यामुळे ब्रिटीशांच्या आदेशानुसार नाही तर स्वत:हून अफगाणांशी लढण्यास तयार होतात. हे त्यांच्या ‘स्टॅंड’ घेण्यामागचे तत्व पटकथा सांगू पाहते. मात्र शेवटाकडे शिख समाजाचा अभिमान जोपासण्याच्या नादात ‘पगडी आणि तिची प्रतिष्ठा’ अशा गोष्टी डोकावतात. त्यामुळे त्या सैनिकांनी धर्म, जात, समाज यांपासून वर उठून स्वातंत्र्यासारख्या व्यापक भावनेला घातलेली मिठी काहीशी सैल होते.
चित्रपटात लढाई मध्यंतरानंतर सुरू होते. अनेकांनी त्यामुळे मध्यंतरापर्यंतचा चित्रपट रटाळ, संथ वगैरे असल्याची टिका केली. दिग्दर्शक अनुराग सिंगने मध्यंतरापर्यंत एकवीस शिख सैनिक, त्यांची परस्परांशी भावनिक जोड, त्यांचे किल्ल्याचे नेतृत्व करणाऱ्या ईशर सिंगसोबतचे नाते, त्यांच्या विचारात होणारे बदल, त्यांना स्वातंत्र्याचा कळणारा अर्थ अशा अनेक गोष्टी पटकथेत पेरलेल्या आहेत. त्यामुळे मध्यंतरापर्यंतचा भाग हा त्यांच्या घडणीचा आणि त्यानंतरचा भाग त्यांच्या पराक्रमाचा अशी व्यवस्थित विभागणी त्यामध्ये दिसते. त्या साऱ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करण्याची किमान गरज दिग्दर्शकाला वाटली हीच मोठी गोष्ट वाटते.

किरण क्षीरसागर

9029557767

kkiran2kshirsagar@gmail.com