जिद्दीचे शिखर

विवेक मराठी    05-Mar-2019
Total Views |

संघर्ष, जिद्द, चिकाटी, वेळेचे व्यवस्थापन, मेहनत यांची गोळाबेरीज ज्याला व्यवस्थित जमेल, त्याला कुठलेही क्षेत्र असो, यशाचे शिखर गाठता येते, याचे प्रत्यक्ष रूप म्हणजे 'डिजिटल प्रिंटिंग हाउस' ही स्वतःची कंपनी यशस्वीरीत्या चालवीत असलेली उद्योजिका उज्ज्वला गायकवाड.

आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धेचा चढता क्रम पाहायला मिळतो. या युगात आपला व्यवसाय टिकवून ठेवायचा आणि विस्तारायचा असेल, तर त्याची प्रसिध्दी आणि प्रसार करणे ही काळाची गरज झाली आहे. प्रसिध्दी आणि प्रचार करण्यासाठी योग्य माध्यम म्हणजे आपल्या व्यवसायाची जाहिरात होय. आजचे युग हे जसे स्पर्धेचे युग आहे, तसेच ते आता डिजिटल झाले आहे. महिला दिनाच्या अंकातील आपली ही उद्योजिका या डिजिटल क्षेत्रातीलच आहे.

कुठलीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रात येण्याचे धाडस उज्ज्वला गायकवाड यांनी केले. मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेल्या उज्ज्वला यांना शिक्षण घेण्यासाठीदेखील आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता, व्यवसाय करणे ही दूरचीच गोष्ट. ही अशक्यप्राय गोष्ट केवळ त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या आधारावर साध्य झाली. आजघडीला उज्ज्वला यांची स्वतःची 'डिजिटल प्रिंटिंग हाउस' ही कंपनी चांगलीच जोर धरू लागली आहे. वडील रिक्षाचालक, आई गृहिणी. स्वतःचे शिक्षण, लहान बहिणीचे शिक्षण अशा सर्व जबाबदाऱ्या त्यांच्यावर होत्या. त्यासाठी पार्टटाइम जॉब करून त्या या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत होत्या. नोकरी करत असल्यामुळे, मिळणाऱ्या मार्कांवर त्याचा परिणाम होत होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करत असताना खूप संघर्ष करावा लागला. एखादी नोकरी मिळालीच तर ती समाधानकारक नसायची.

कोणतेही काम करत असताना त्यातून आपल्याला समाधान मिळाले तर कामाचा दर्जाही उत्तमच राखता येतो, याचे भान उज्ज्वला यांना होते. त्यांनी वेळीच ओळखले की, आपण करत असलेल्या कामातून आपल्याला समाधान मिळत नाही. शिवाय लहानपणापासूनच नेतृत्वगुण असल्यामुळे कुणाच्याही आधिपत्याखाली काम करणे तसे अवघडच होते. त्यामुळे आपण नोकरी करू शकत नाही तर आपण स्वतःचा व्यवसाय करू, हा धाडसी निर्णय घेतला. नोकरीच्या माध्यमातून ज्या डिजिटल प्रिंटिंगच्या क्षेत्राशी ओळख झाली होती, त्याच क्षेत्रात व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

हा धाडसी निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी केली, हे सांगताना त्या म्हणाल्या, ''उद्योग करण्याचा निर्णय तर घेतला, परंतु त्या दृष्टीने लागणारी माहिती आणि भांडवल हे दोन प्रश्न माझ्यासमोर होते. भांडवलाचा विचार केला, तर माझ्या घरातील आर्थिक परिस्थिती व्यवसायाला अनुकूल नव्हती आणि घरातून माहिती मिळण्याचा प्रश्नच नव्हता. तेव्हा माझ्या हातात फक्त पार्टटाइम जॉब करताना साठवलेले पैसे आणि त्या संबंधातील काही संपर्क एवढेच भांडवल होते. घरात शिक्षणासाठीदेखील अनुकूल वातावरण नव्हते आणि त्यात मी तर स्वतःचा व्यवसाय करण्याचे स्वप्न पाहत होते. पण म्हणतात ना, इच्छा असेल तर मार्ग आपोआप दारात येऊन उभे राहतात. माझी इच्छाशक्ती आणि सुरुवातीपासूनचा माझा संघर्ष माझ्या नातेवाइकांना माहीत होता. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला आर्थिक, मानसिक अशा सगळया प्रकारचा पाठिंबा दिला.

माझे नातेवाईक सरकारी नोकरीत होते. त्यांनी मला सरकारच्या SC वर्गासाठी असलेल्या काही योजना सांगितल्या आणि बरेचसे मार्गदर्शन केले. सुरुवातीला उद्योग स्थिर करणे हा खडतर प्रवास होता. प्रिंटिंगचा व्यवसाय असल्याकारणाने त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री घेणे गरजेचे होते. त्यासाठी मी माझी सर्व साठवण खर्च करून सेकंड हँड मशीन खरेदी केले. आज माझ्याकडे माझे स्वतःचे, तेरा लाख साठ हजाराचे प्रिंटिंग मशीन आहे. या प्रकारची दोन मशीन माझ्या दोन्ही युनिटमध्ये आहेत. दिघा आणि पारसिक नगर (कळवा) अशा दोन ठिकाणी माझी युनिट्स आहेत.

स्वानुभव हा या क्षेत्रातील माझा गुरू. त्याचबरोबर इथे मी आवर्जून उल्लेख करू इच्छिते, ते माझे नातेवाईक रवींद्र जाधव यांचा. या क्षेत्राशी तसे पाहिले तर त्याचा प्रत्यक्ष काही संबंध नव्हता. परंतु माझी इच्छाशक्ती, जिद्द आणि संघर्ष करण्याची तयारी पाहून तो त्याच्या परिवाराच्या विरुध्द जाऊन माझ्या पाठीशी खंबीर उभा राहिला. 'अपयश आले तर खचू नकोस, पुढे झेप घेत राहा आणि तशी वेळ आलीच तर मी तुझ्यासोबत कायम आहे, हे विसरू नकोस' या त्याच्या शब्दांनी मला कायमच ऊर्जा दिली, बळ दिले.

आर्थिक संस्थांची मदत कशी मिळते? बँकाचे वा पतसंस्थांचे नियम जाचक वाटतात का? यावर उज्ज्वला म्हणतात, ''या व्यवसायाची सुरुवात करताना या बाबतीत मला खूप कटू अनुभव आले. नवउद्योजकांसाठी असलेल्या मुद्रा योजनेचा लाभ घेण्यासाठी जेव्हा मी बँकेत गेले, तेव्हा क्षुल्लक कारणासाठी त्यांनी कर्ज देणे नाकारले. कर्जासंबंधीच्या बऱ्याच अटी व नियम जाचक असल्यामुळे बऱ्याच नवउद्योजकांना याचा सामना करावा लागतो. जो तग धरू शकेल तोच पुढे जाऊ शकतो. परंतु या अटी व नियम शिथिल करणे गरजेचे आहे. आता मी या योजनेची लाभार्थी आहे. पण त्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला.

हा उद्योग सुरू होऊन आता सहा वर्षे होत आली आहेत. या सहा वर्षांत असा एकही दिवस गेला नाही की मला संघर्ष करावा लागला नाही. माझा उद्योग थोडा स्थिर असतानाच एक प्रसंग माझ्यावर ओढवला, तो म्हणजे 10 ते 12 लाखांची एक ऑर्डर मला मिळाली. बोलणे झाल्याप्रमाणे कंपनी 50% रक्कम आगाऊ देणार होती. परंतु ऐन वेळेस पूर्ण काम झाल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत असे सांगण्यात आले. ऑर्डर पूर्ण करण्यासाठी पैसे उभे करणे ही माझ्यासाठी कसोटी होती. वेळेत काम पूर्ण नाही झाले, तर मला प्रचंड तोटा सहन करावा लागणार होता. सगळया बाजूंनी माझी कोंडी झाली होती. पण दुसऱ्याच क्षणी आपण हा मार्ग स्वतःहून निवडला आहे आणि आता माघार घेणे सोयीचे नाही, हे स्वत:ला बजावले. त्या वेळी मी स्वतःच्या कष्टाने घेतलेले छोटे घर गहाण ठेवले आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देत पूर्ण ताकदीनिशी या संकटावर मात केली.''

उज्ज्वला यांनी निवडलेले क्षेत्र जाहिरातीशी निगडित आहे. या क्षेत्रातील आव्हाने इतर क्षेत्रांपेक्षा अधिक आहेत. एखादी ऑर्डर घेतली आणि तुमच्यावर कोणते संकट आले, तरी माघार घेता येत नाही, हे मुख्य आव्हान या क्षेत्रात आहे. वेळेची मर्यादाही या क्षेत्रात कटाक्षाने पाळली जाते. थोडा जरी विलंब झाला तरी प्रचंड नुकसान पदरात पडते, याचा अनुभव उज्ज्वला यांनी त्यांच्या पहिल्याच ऑर्डरमध्ये घेतला होता. असे झाले तर कंपनी आपल्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकते आणि इतर कंपन्याकडूनही ऑर्डर मिळवितानाही त्याचा त्रास होतो.

उज्ज्वला यांनी जे क्षेत्र निवडले आहे, ते बहुतांश पुरुषप्रधान आहे. एखाद्या कंपनीत मीटिंगसाठी वेळ घेण्यासाठी जरी फोन केला, तर पहिला प्रश्न येतो, ''तुम्ही कोण?'' पहिली गोष्ट त्यांचा विश्वास बसत नाही की, या क्षेत्रात कुणी स्त्री काम करत आहे. सर्व बाजू पटवून सांगितल्यानंतरदेखील एक स्त्री म्हणून या क्षेत्राचा अवाका तिला आहे का, असे प्रश्नार्थक संभाषण होऊन कित्येक वेळा मीटिंगरद्द होत असते. पण हळूहळू कामाचा अनुभव वाढला, चांगल्या कामामुळे मार्केटमध्ये स्वत:ची ओळख निर्माण झाली आणि त्यातून विश्वासार्हता निर्माण झाली.

या बाबतीत आणखी एक वेगळा अनुभव उज्ज्वला यांनी सांगितला. त्या म्हणाल्या, ''माझे लग्न झाले नाही. त्यामुळे सुरुवातीला काही जणांना वाटायचे, समजा, जर नुकसान झालेच तर ही तोटा भरून काढू शकेल का? जर का हिचे लग्न झाले असते, तर नुकसानभरपाई करण्याची तिची क्षमता नसली तरी तिच्या कुटुंबाकडून भरपाई मिळू शकते. त्यांच्या या पारंपरिक वृत्तीला मी माझ्या कर्तृत्वाने छेद दिला आणि कामात स्वत:चा ठसा उमटवला. काम करत असताना मी कुठलीही बंधने कामावर घातली नाहीत. पूर्ण देशभरातून माझ्या 'डिजिटल प्रिंटिंग हाउस'साठी काम येते.''

आता पंधरा जणांचा स्टाफ उज्ज्वला यांच्याकडे आहे आणि मुंबईच्या बाहेरही जेव्हा काम असते, तेव्हा त्यांच्या सुव्यवस्थापन कौशल्याचा त्यांना फायदा होत असतो.

भविष्यात व्यवसाय वृध्दीच्या काही संकल्पनेविषयी त्या म्हणाल्या की ''सध्यातरी नाही. ज्या पध्दतीने काम चालू आहे ते समाधानकारक आहे. विस्तार करण्यापेक्षा कामाचा दर्जा उत्तम राहील यावर माझा भर आहे. काम हाती घेत असताना मोठमोठया कंपन्यांशी टायअप करून त्यांच्या जाहिराती करणे, त्याचे वितरण करणे हे काम माझ्या व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. सहा वर्षांपासून करत असलेल्या कामातून निर्माण झालेली गुडविल, संपर्क आणि काम करण्याची क्षमता यामुळे दिवसेंदिवस काम वाढत चालले आहे.''

उज्ज्वला यांच्या उद्योगाला आता स्थैर्य आले आहे. तो अधिक मजबूत व्हावा यासाठी उज्ज्वला यांचे नातेवाईक रवींद्र जाधव यांनी एकदा मिलिंद कांबळे (DICCI) यांच्याशी त्यांची ओळख करून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक समतेचे स्वप्न साकार करण्याचा 'डिक्की'च्या माध्यमातून प्रयत्न केला जात असतो. मागासवर्गींयांचे (अनुसूचित जाती-जमातींचे) उद्योग उभारण्यासाठी 'डिक्की' सरकारच्या धोरणात्मक निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावत असते. उज्ज्वला यांच्या मते, 'डिक्की' हे असे माध्यम आहे ज्यामुळे सरकारने ज्या अनेक योजना SC वर्गासाठी निर्माण केल्या आहेत, परंतु त्यांच्या माहितीचा अभाव असल्यामुळे म्हणावा तसा लाभ घेता येत नव्हता, ते डिक्कीच्या माध्यमातून शक्य झाले आहे. 'डिक्की' ही नवउद्योजकांसाठी संजीवनी ठरली आहे.

सरकारकडून नवउद्योजकांची हीच अपेक्षा आहे की, उद्योग करतानाचा सुरुवातीचा काळ हा संघर्षाचा असतो. उद्योगाचा प्रारंभ करतानाच पहिली पायरी ही भांडवल उभरण्याची असते आणि हे भांडवल उभे करताना येणारी पहिली अडचण म्हणजे बँकांकडून, पतसंस्थांकडून मिळणारी आर्थिक मदत. त्यासाठी असलेल्या जाचक अटी व नियम थोडे शिथिल झाले तर अनेक तरुण या क्षेत्राकडे वळतील. शिवाय उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या सरकारच्या अनेक योजना असतात, त्याविषयी तरुणांना नीट माहिती दिली, तर अनेकांना प्रोत्साहन मिळेल आणि येणारी पिढी या उद्योग क्षेत्राकडे सकारात्मक दृष्टीने बघेल.

आजची तरुण पिढी उद्योगातला धोका पत्करायला तयार नाही. सुरक्षित, भरपूर पॅकेज असलेली नोकरी मिळविण्याकडे तरुण पिढीचा कल बघायला मिळतो. व्यवसाय क्षेत्रात सुरुवातीला धोक्याचा सौदा वाटत असला, तरी भविष्यात लाभदायक ठरतो, याची जाणीव तरुण पिढीला करून द्यायला पाहिजे. कष्टाच्या फळाची चव ही जीवनात माधुर्यच निर्माण करते. अनेक शिबिरांतून किंवा शालेय शिक्षणात त्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहेत.

तरुण पिढी उद्योगाकडे वळण्यासाठी कौशल्य विकासावर भर देणे गरजेचे आहे. सरकार याबाबत प्रयत्नशील आहे. काही संस्थाही हा प्रयत्न करताना दिसतात. संघर्ष, जिद्द, चिकाटी, वेळेचे व्यवस्थापन, मेहनत यांची गोळाबेरीज ज्याला व्यवस्थित जमेल, त्याला कुठलेही क्षेत्र असो, यशाचे शिखर गाठता येते.