दुनिया में हम आये हैं तो जीनाही पडेगा

विवेक मराठी    07-Mar-2019
Total Views |

 

कहाणी एका मनस्वी, कणखर स्त्रीच्या लढयाची आणि तिच्या जिद्दीची. तिच्यासाठी हा लढा सोपा नाही. पण एकदा का या जगात प्रवेश झाला की स्वत:च्या मर्जीने हे जग सोडता येणे अशक्य. तो पळपुटेपणा आहे. जगणे निश्चित होते, तेव्हा येणाऱ्या अडचणींना तोंड देत जगणे हेच ध्येय असले पाहिजे, हा संदेश हे गीत देते.

 चित्रपट हा समाजाचा आरसा आहे. ते केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर प्रबोधनाचे माध्यमही आहे. पुरुषप्रधान समाजाला अनुसरून येथील चित्रपटसुध्दा बहुतांशी नायकप्रधान आहेत. नायिकांची भूमिका मात्र भारतीय संस्कृतीला अनुसरून, नायकातील पुरुषत्वाला प्रेरणा देणे एवढीच मर्यादित राहिली आहे. असे असतानाही आपले सौंदर्य, अभिनय, संगीत आणि नृत्यकौशल्य यांच्या जोरावर अनेक नायिकांनी रसिकांच्या मनात स्थान पटकावले. संस्कार आणि नात्यातील संबंध समृध्द करण्याचे कार्य त्यांनी रंगवलेल्या व्यक्तिरेखांनी केले, हे खरेच उल्लेखनीय आहे.

एकविसाव्या शतकातील स्वतंत्र, कणखर स्त्री जुन्या चित्रपटात नसेलही, पण पितृसत्ताक समाजाचा अनिवार्य भाग असलेल्या आपल्या चित्रपटात कुटुंबाच्या मर्यादा सांभाळून अनेक नायिकांनी आपले स्वतंत्र अस्तित्व जपले. आपला ठसा उमटवला. नायिकेला नायकाचे प्रथम स्थान देणारा चित्रपट बनायला मात्र 1957 साल उजाडावे लागले. हा चित्रपट होता 'मदर इंडिया'. याची नायिका होती नर्गिस.

भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात,

मृत्यु: सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम्।

कीर्ति: श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृति: क्षमा ॥

'सर्वांचा नाश करणारा आणि सर्वांचे भविष्य घडवणाराही मीच आहे. स्त्रियांमध्ये असलेल्या कीर्ती, सौंदर्य, मधुर वाणी, स्मरणशक्ती, बुध्दी, धारणा आणि क्षमा या गुणांचाही मी धारक आहे.' स्त्रियांमध्ये या सुप्त सप्तशक्ती वास करतात, हे भगवान श्रीकृष्णांनीही मान्य केले आहे. मदर इंडियाची नायिका राधा हिच्यात हे सर्व गुण आहेत. दिग्दर्शक मेहबूब खान यांनी राधाचे पात्र आणि धरतीमाता यांची सांगड घातली आहे. रामायणातील सीतेचे प्रतिबिंबसुध्दा तिच्यात दिसते. तशी सीताही धरतीची कन्याच. पती कुटुंबाला त्यागून परागंदा होतो आणि सर्वांच्या पालनपोषणाची जबाबदारी राधावर येते. जमीन नांगरणे हा पुरुषाच्या कामाचा भाग आहे. पण नांगराचा फाळ स्वत:च्या खांद्यावर घेणे हे तिचे प्राक्तन ठरते. उरावर कर्जाचा बोजा, पदरी दोन मुले, उपासमारी आणि दरिद्री माणसाला सोसावी लागणारी अवहेलना अशा कठीण परिस्थितीत आपले चारित्र्य महत्त्वाचे की मुलांचे अस्तित्व, ह्याचाही विचार करायची पाळी ह्या करारी स्त्रीवर येते. शोषितांच्या या कठीण संघर्षात आपले पावित्र्य आणि कर्तव्य यावर मात्र ती अढळ राहते. स्वत:ला सावरून ती खंबीरपणे दुर्दैवाशीही लढा देते. पण ज्या वेळी पोटचा गोळाच तिने जपलेल्या मूल्यांचा गळा घोटतो, त्या वेळी मात्र तिच्यातली स्त्री तिच्यातल्या आईवर मात करते. मदर इंडियाच्या उत्कट शोकांतिकेची तीव्रता या विरोधाभासात दडलेली आहे.

हिंदी चित्रपटात येणारी गाणी केवळ मनोरंजनासाठी येत नाहीत. ती कथेला उठाव देतात. चित्रपट पुढे नेण्यास मदत करतात. मदर इंडियाच्या यशात नौशाद यांच्या संगीताचा आणि शकील बदायुनी यांच्या गीतांचा मोठा वाटा आहे.

दुनिया में हम आये हैं तो जीना ही पड़ेगा

जीवन है अगर ज़हर तो पीना ही पड़ेगा

ही कहाणी एका मनस्वी, कणखर स्त्रीच्या लढयाची आणि तिच्या जिद्दीची. तिच्यासाठी हा लढा सोपा नाही. पण एकदा का या जगात प्रवेश झाला की स्वत:च्या मर्जीने हे जग सोडता येणे अशक्य. तो पळपुटेपणा आहे. जगणे निश्चित होते, तेव्हा येणाऱ्या अडचणींना तोंड देत जगणे हेच ध्येय असले पाहिजे, हा संदेश हे गीत देते.

गिर गिर के मुसीबत में सम्भलते ही रहेंगे

जल जाएं मगर आग पे चलते ही रहेंगे

ग़म जिसने दिये हैं बही ग़म दूर करेगा

मदर इंडियाची कथा इथल्या मातीत रुजलेली आहे. मोठया कॅनव्हासवर पाहायचे झाले, तर ही एका स्त्रीची गाथा आहेच, तशीच नवीन जन्माला आलेल्या आपल्या देशाचीही गाथा आहे. देशाची प्रगती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या, त्यासाठी कष्ट करणाऱ्या, त्याग करणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कहाणी आहे.

औरत है वही औरत जिसे दुनिया की शर्म है

संसार में बस लाज ही नारी का धर्म है

ज़िन्दा है जो इज्जत से वही इज्जत से मरेगा

ही स्त्री गरीब आहे, पण सदाचारी आहे. निराधार आहे, पण निश्चयी आहे. त्यागमूर्ती आहे, पण कणखर आहे. एवढया प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढतानासुध्दा स्वप्ने पाहण्याएवढी आशावादी आहे. त्यासाठी कष्ट करायची तिची तयारी आहे. सुखीलाल, गावातील सावकार याचा तिच्यावर डोळा आहे. त्याच्याशी संबंध ठेवून स्वत:चे आयुष्य सुखी करणे तिला सहज शक्य आहे. पण तिला तिच्या चारित्र्याचा सार्थ अभिमान आहे. भोगाव्या लागणाऱ्या परिणामांची क्षिती न बाळगता ती सत्याचा आणि सत्त्वाचा मार्ग अनुसरते.

याची तिला बरीच किंमतसुध्दा मोजावी लागते.

चित्रपटच्या शेवटी राधाचा मुलगा बिरजू सावकाराच्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मूल्यांवर अटळ असलेली राधा मुलाला आडवी येते. सांगूनही तो जेव्हा घोडयावरून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मात्र तिच्यातली दुर्गा जागृत होते. मुलासाठी डोंगराएवढे दु:ख सहज सहन करणारी आई, आपल्या तत्त्वांसाठी त्याचाच प्राण घेते.

''संसार में बस लाज ही नारी का धर्म है'' हे वाक्य आज एका परंपराग्रस्त मनोवृत्तीचे वाटेलही, पण एका सामान्य गृहिणीपासून सशक्त, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व हा प्रवास निश्चितच स्तिमित करणारा आहे.

मालिक है तेरे साथ न डर ग़म से तू ये दिल

मेहनत करे इन्सान तो क्या काम है मुश्किल

जैसा जो करेगा यहाँ वैसा ही भरेगा

पुराने जेव्हा हाहाकार माजतो, तेव्हा गावकरी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतात. राधा ते अमान्य करते. गावकऱ्यांना  समजावून सांगते. इथेच कष्ट करून गावात समृध्दी आणण्याचा निश्चय करते. अपार कष्ट करून तो निर्णय तडीला नेते. या पार्श्वभूमीवर हे गीत चित्रपटात येते.

याच चित्रपटातील 'दुख भरे दिन बिते रे भैया' हे गीत आशावादी आहे. नुकत्याच स्वातंत्र्य मिळालेल्या देशाचे मनोगत व्यक्त करणारे आहे, तर 'दुनिया में हम आये हैं तो जीना ही पड़ेगा' हे गीत डोळयावरची झापडे काढून टाकून निर्धाराने आपली स्वप्ने साकार करायला शिकवणारा मूलमंत्र आहे. लता मंगेशकर यांना ह्या गीतात मीना आणि उषा मंगेशकरांनी सुरेल साथ दिली आहे. अनेक वेळा एकाच गाण्यात चित्रपटाची थीम वसलेली असते. मदर इंडियात बारा गाणी आहेत. पण 'दुनिया हम आये हैं तो...' हे गीत या चित्रपटाच्या गाभ्याला स्पर्श करते, म्हणून अतिशय महत्त्वाचे आहे.