फ्ला. लेफ्टनंट विजय तांबे कधी परतणार?

विवेक मराठी    09-Mar-2019
Total Views |

विजय तांबे हे अभिनंदन वर्धमान यांच्याएवढे भाग्यवान ठरले नाहीत. तब्बल 48 वर्षे होऊनही अजून परतले नाहीत. त्यांची पत्नी दमयंती तांबे यांची वेदना 48 वर्षांनंतरही अजून शमली नाही. आता आशा एकच आहे. तांबे व त्यांच्यासम जे कुणी भारतीय पाकच्या कैदेत असतील, त्यांची मुक्तता होण्याचा मुद्दाही जोडला गेला पाहिजे. यासाठी उर्दूच्या जाणकारासह पुन्हा गरज भासली तर आधुनिक सावित्री दमयंती तांबे यांना पाकमध्ये पाठविण्याची व्यवस्था झाली पाहिजे. तर आणि तरच 48 वर्षे उराशी बाळगलेली ती वेदना निमाल्यासम  होऊ शकते.

भारतीय वायुदलातील फ्लाइट लेफ्टनंट विजय तांबे हे 'मिसिंग' आहेत, हा निरोप तांबे परिवाराला 5 डिसेंबर 1971ला मिळाला. आता त्या घटनेला जवळजवळ 48 वर्षे होत आलेली आहेत, पण त्यांचा अद्यापही पत्ता लागलेला नाही. 1971ला भारत-पाक युध्दाच्या वेळी फ्लाइट लेफ्टनंट विजय तांबे अंबाला येथे होते आणि आदेश येताच त्यांचे मिग 21 विमान अन्य विमानांबरोबर अवकाशात झेपावले. काही वेळातच त्या विमानांवर पाकी वायुदलाने व सैन्यदलातर्फे विमानवेधी तोफांनी प्रतिकार करीत हल्ला केला. त्यात फ्ला. लेफ्टनंट विजय तांबे यांचे विमान पडले. फ्ला. लेफ्टनंट विजय तांबे यांनी विमान पडण्यापूर्वी पॅराशूटचे साहाय्य घेत झेप घेतली आणि ते पाकिस्तानच्या भूप्रदेशात उतरते झाले.पाकिस्तानी वृत्तपत्रात फ्लाइट लेफ्टनंट विजय तांबे यांना अटक झाल्याची बातमी आली, त्यानंतर त्यांचा पत्ताच लागला नाही.

फ्लाइट लेफ्टनंट विजय तांबे हे नागपूरचे राहणारे. नागपूरच्या बिशप कॉटन शाळेत त्यांचे शिक्षण झाले. वायुदलात गेल्यावर काही काळाने ख्यातनाम बॅडमिंटनपटू, चारदा राष्ट्रीय अजिंक्यपद मिळविलेल्या दमयंती सुभेदार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. दमयंती सुभेदार या दमयंती तांबे झाल्या. विजय तांबे यांचे वडीलही सैन्यात होते. नंतर ते आय.ए.एस. होऊन महाराष्ट्र शासनात सचिवपदापर्यंत गेले. विजय तांबे यांचे बंधू सैन्यदलात कर्नलपदापर्यंत कार्यरत होते. निवृत्त झाल्यावर ते पुण्याला स्थायिक झाले आहेत.

1971 साली भारत-पाक युध्द बांगला देश विजयानंतर संपले. त्या वेळी भारताने पूर्व पाकिस्तानातील 93 हजार सैनिकांना, अधिकाऱ्यांना युध्दकैदी बनविले होते, तर भारताचे 54 सैनिक व अधिकारी पाक कारागृहात युध्दकैदी होते. भारत-पाक यांच्यात सिमला करार झाला. भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी व पाकचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्यातील हा करार होता. त्यानुसार 93 हजार पाकिस्तानी कैदी सन्मानाने पाकमध्ये परतले. पण त्या करारात 54 भारतीय सैनिकांबाबत काहीही नव्हते. ते त्या वेळी भारतात परतले नाहीत.

त्यापूर्वी 1965च्या युध्दाच्या वेळी भारतातील नंद करिअप्पा हे पाकच्या तावडीत सापडले होते. त्या वेळी पाकचे अध्यक्ष आयूब खान होते. आयूब खान हे जनरल करिअप्पा यांच्याबरोबर अखंड भारताच्या सैन्यात होते. करिअप्पा हे आयूब खान यांचे वरिष्ठ अधिकारी होते. या नात्याला जागून आयूब खान यांनी करिअप्पांना फोन लावला व सांगितले, ''Dont worry. yours son is in my custody. He is PoW'' करिअप्पा लगेच भारतातून उद्गारले, ''Which Son? All boys are my son. Take care of them.'' स्वत:च्या मुलाला शत्रूच्या ताब्यात असताना व त्याला विशेष वागणूक मिळेल अशी ग्वाही मिळत असतानाही जनरल करिअप्पा यांनी ''नंदसह सर्वांची काळजी घ्या, ती सर्व माझीच मुले आहेत'' हे सांगितले. या महान सैनिकाला लाख लाख सलाम. पुढे नंद करिअप्पा भारतात परतले आणि एअर मार्शलपदावरून निवृत्त झाले.

1971च्या युध्दात फ्लाइट लेफ्टनंट विजय तांबेंबरोबर फ्लाइट लेफ्टनंट असलेले दिलीप परुळेकर (ग्रूप कॅप्टनपदावरून निवृत्त) एम.एस. गरेवाल, हरीशसिंगजी यांनाही पाकने युध्दकैदी बनविले होते. या तीन जणांनी पाकच्या कैदेतून पळ काढण्याची योजना तयार केली. त्या वेळी विद्याधर चारीही त्यांच्यासमवेत होते. परुळेकर, गरेवाल, हरीशसिंगजी पलायन करण्यात यशस्वीही झाले. (विद्याधर चारी हे पुढे विंग कमांडरपदावरून निवृत्त झाले.) आपण भारतात परतत आहोत ही कुणाला शंका येऊ नये, म्हणून त्यांनी अगदी विरुध्द रस्ता पकडला. ते अफगाणिस्तानकडे जाऊ लागले. पण अफगाण लोकांपेक्षा वेगळे दिसल्याने त्यांना जमावाने चोर समजून मारण्याचाही प्रयास केला. त्या वेळेला त्यांनी आपली ओळख जमावाला सांगितली व ते पुन्हा पाकच्या ताब्यात गेले. या सर्वांची पुढे मुक्तता झाली, पण फ्लाइट लेफ्टनंट विजय तांबे यांचा मात्र पत्ता लागला नाही. ते मुक्तही झाले नाहीत.

1979 साली मात्र दमयंती तांबे यांना निरोप आला की, विजय तांबे यांना पाकच्या एका कारागृहात त्यांच्या एका नातेवाइकाने बघितले. विजयचे चुलत काका जयंत जठार हे पाकिस्तानला गेले होते. त्यांनी एका बडया जनरलमार्फत विजय तांबे यांचा शोध घेण्याचा प्रयास केला. एका कारागृहात ते गेले, त्या वेळी काही जण पाठमोरे बसले होते. त्यांनी ''विजय'' म्हणून आवाज दिला. एका व्यक्तीने मागे वळून बघितले, पण त्याच्या नजरेत ओळख नव्हती. मात्र जठारांनी विजय तांबे यांना ओळखले होते. त्या वेळीही विजय तांबे यांना परत आणता आले नाही. दमयंती तांबे यांनी मधल्या काळात त्यांच्या सासऱ्यांच्या सल्ल्यानुसार नोकरी पत्करली. त्या दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात क्रीडा अधिकारी झाल्या.

1979पासून त्यांनी विजय तांबे यांच्या मुक्ततेसाठी प्रयास सुरू केले आहेत. भारताचे जे वॉर विडो असोसिएशन (War Widow Association) आहे, त्याच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यामुळे शोधाला एक वजन प्राप्त झाले. त्यानंतर त्या आधुनिक सावित्रीचा आपल्या पतीला मरणाच्या दारातून परत आणण्याचा संघर्ष सुरू झाला. पत्रव्यवहार, निवेदने, भेटीगाठी परदेश मंत्रालय, संरक्षण खाते, वायुदलाचे मुख्यालय असा प्रवास सुरू झाला. तो काळ आजच्या तुलनेत विचार करायला गेले, तर फार वेगळा होता. सैनिक, सैनिकी पेशा याबाबत खूप जिव्हाळा नव्हता. भारतीय मानसिकता (कदाचित ती जगात सर्वत्रही असेल) वेगळी आहे. युध्द वा युध्दजन्य वातावरण असले की देशप्रेमाचा विलक्षण उमाळा येतो, अन् काही काळात तो सरून जातो. देशभक्तीची ती लाट ओसरून जाते व देशभक्तीला ओहोटी लागते. युध्दकाळात देशभक्तिभर साहित्य, कविता, नाटक, कादंबऱ्या, चित्रपट यांना उधाण येते.


सदन शिवाचे कोसळते


1962 साली चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा कुसुमाग्रजांनी लिहिले,बर्फाचे तट पेटून उठते

रक्त आपुल्या प्रिय आईचे

शुभ्र हिमावर ओघळते

लतादीदींच्या 'ए मेरे वतन के लोगो'ने खुद्द पंडितजींच्या डोळयात पाणी आले. कवी प्रदीपच्या काव्यावर सी. रामचंद्र यांनी स्वरसाज चढविला होता. ही गीते वाजतात ती देशभक्तीला भरती आली असताना, पण एकदा ती लाट ओसरली की मग फक्त 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या दिवशी या गीतांचे गायन होते. अशा वातावरणात या आधुनिक सावित्रीचा पतिशोध सुरू होता. आशा बाळगावी अशी अवस्था क्वचित वाटेला येत असे, याउलट निराशेच्या लाटाच्या लाटा उधाणलेपणाने अंगावर येत होत्या.

आशा-निराशेच्या या खेळातच एक दिवस पाकला जाण्याची संधी मिळाली. आता पाकमधील तुरुंगात जाऊन कैद्यांना भेटू, असा निर्धार झाला. पाकला दमयंती तांबे गेल्या, ती 'गाइडेड टूर' होती. ज्या कारागृहात जायचे होते, त्या कारागृहात त्यांना नेण्यातच आले नाही. पाकने ठरविलेल्या कारागृहात जाता आले, पण त्या ठिकाणीही कैद्यांची भेट घेताच आली नाही. कारागृहातील जेलरच्या कक्षात बसावे लागले. त्यांनी रेकॉर्ड समोर ठेवले, पण ते सर्व उर्दू भाषेत व लिपीत होते. सोबतच्या कुणालाही त्याचे ज्ञान नव्हते. त्यामुळे फक्त पाक वारी झाली, पण हाती फक्त निराशाच आली.

भारतात जे सत्ताधारी होते, त्यांनीही हा विषय पाहिजे तेवढा गांभीर्याने घेतला नाही. माध्यमेही आजच्यासारखी प्रभावी व परिणामकारक नव्हती. त्यांनाही हा विषय त्या वेळी वृत्तमूल्य असणारा आहे असे वाटले नसावे. पाककडून वारंवार सांगितले जात होते की, आमच्या कारागृहात कुणीही भारतीय कैदी नाही. भारताचे पंतप्रधान अटलजी व पाकचे प्रेसिडेंट जनरल परवेझ मुशर्रफ यांची आग्रा भेट झाली, तेव्हा मुशर्रफ यांनी स्पष्ट केले की पाकमध्ये कुणीही भारतीय कैदेत नाही व नंतर कारगिल संघर्षातील 2 भारतीय भारतात परत आले होते. त्यामुळे फ्लाइट लेफ्टनंट विजय तांबे हेदेखील परत येतील हा विश्वास वाढीला लागला.

1965च्या युध्दकैदी झालेल्या विंग कमांडर धीरेंद्र जफा यांनी 'डेथ वॉज नॉट पेनफुल' हे पुस्तक लिहिले आणि ग्रूप कॅप्टन परुळेकर यांनी वीर भरारी हे स्वानुभवावरचे पुस्तक प्रसिध्द केले. त्यातून विश्वास वाढत होता, आशा वाटत होती की, फ्लाइट लेफ्टनंट विजय तांबे परत येतील. अटलजी पंतप्रधान असताना खासदार असलेले राम नाईक यांनी हा प्रश्न लावून धरला होता, पण त्यातून काहीही फारसे हाती लागले नाही.

पूर्वी सीमेवर शहीद झालेल्या वीरांची मृत शरीरेही अंत्यसंस्कारासाठी घरी पाठविली जात नसत. त्यांचा युनिफॉर्म तेवढा यायचा. पण अटलजींच्या काळात जॉर्ज फर्नांडिस संरक्षण मंत्री झाले. त्यांनी शहीदांचे पार्थिव त्यांच्या त्यांच्या गावी पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वातावरण बदलण्यास हातभार लागला. गावोगावी शहीदांची मोठी अंतिम मिरवणूक निघू लागली. सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील त्यागाचे हे अत्युच्च पर्व टी.व्ही.च्या माध्यमातून गावोगावी दिसू लागले. 26/11च्या घटनेनंतर मेणबत्त्या प्रज्वलित करून आदरांजली वाहणाऱ्या पंथाचा उदय झाला. या सर्व कालावधीत दमयंती तांबे यांचा आपल्या पतीच्या शोधासाठीचा प्रयास जारीच होता.

या युध्दकैद्यांत भारतीय हवाई दलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सर्वात भाग्यवान मानला पाहिजे. कारण अवघ्या 72 तासांत तो भारतात सुखरूप परतला होता. अभिनंदनचे मिग विमान ज्या एफ-16व्या पाकी विमानाच्या मार्गात गेले होते, त्या विमानाचा पायलट पाकिस्तानच्या हद्दीत पडूनही भारतीय वैमानिक समजून जनतेच्या हातून मार खाऊन मरण पावला, पण पाकी हद्दीत पडलेला अभिनंदन मात्र पाकच्या ताब्यात गेला आणि जगाच्या वाढत्या दडपणामुळे मुक्त झाला. याचे श्रेय काही प्रमाणात भारताच्या वाढत्या दबावाला व यशस्वी जागतिक मुत्सद्देगिरीला आहे. त्याच्या प्राक्तनाचा भागही त्यात मोठा आहे. विजय तांबे हे तेवढे भाग्यवान ठरले नाहीत. तब्बल 48 वर्षे होऊनही अजून परतले नाहीत. दमयंती तांबे यांची वेदना 48 वर्षांनंतरही अजून शमली नाही. आशा-निराशाच्या हिंदोळयावर तिचे नर्तन सुरू आहे. आता आशा एकच आहे की, नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान आहेत. वीरमातेला अभिवादन करण्यात, त्यांच्या पाया पडण्यात धन्यता मानणाऱ्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आहेत. त्यामुळे अजहर मसूद, त्याचे साथीदार आणि भारताचा गुन्हेगार असणारा दाऊद इब्राहिम यांना भारताच्या ताब्यात दिल्याशिवाय भारताने उघडलेली आघाडी शांत होणार नाही. त्याला जोडूनच फ्लाइट लेफ्टनंट विजय तांबे व त्यांच्यासम जे कुणी भारतीय पाकच्या कैदेत असतील, त्यांची मुक्तता होण्याचा मुद्दाही जोडला गेला पाहिजे. यासाठी उर्दूच्या जाणकारासह पुन्हा गरज भासली तर आधुनिक सावित्री दमयंती तांबे यांना पाकमध्ये पाठविण्याची व्यवस्था झाली पाहिजे. तर आणि तरच 48 वर्षे उराशी बाळगलेली ती वेदना निमाल्यासम होऊ शकते.  

8888397727