युध्द आणि युध्दाचे दडपण

विवेक मराठी    09-Mar-2019
Total Views |

पुलवामा हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान सैनिकी तणावाचा आणि या तणावाचे पाकिस्तानवर होणारे संभाव्य आर्थिक, भौगोलिक, राजकीय आणि सैनिकी परिणाम यांचा थोडक्यात आढावा.

 


71 साली बांगला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याचा सूड म्हणून काश्मीर स्वतंत्र करण्यासाठी किंवा त्याचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा चालू झाला. पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज झाल्यावर त्यात आणखीनच भर पडली. आपण काश्मीरमध्ये आपल्याला वाटेल तशा कारवाया केल्या तरी अण्वस्त्राच्या भीतीने भारत प्रतिहल्ला करणार नाही, अशी पाकिस्तानने समजूत करून घेतली होती व भारताच्या राज्यकर्त्यांवरही त्याचे मोठे दडपण होते. परंतु बालाकोटवर हवाई हल्ला केल्यामुळे या परिस्थितीत आमूलाग्र बदल घडला आहे. भारताने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भारत-पाकिस्तान युध्द पेटते की काय अशी भीती निर्माण करून भारतातील अनेक तथाकथित शांतिदूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांतीचा सल्ला देत आहेत. तो देत असताना या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधात जो आमूलाग्र बदल झाला आहे, त्याच्याकडे ते लक्ष द्यायला तयार नाहीत. यासाठी पुलवामा हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेला सैनिकी तणाव व या तणावाचे संभाव्य आर्थिक परिणाम यांचा थोडक्यात आढावा घेतला पाहिजे.

बालाकोट हवाई हल्ले

पाकिस्तानच्या मुख्य भूमीवर खैबर पख्तुनख्वा प्रांतात असलेल्या बालाकोट या डोंगराळ भागात जैश-ए-मोहम्मदच्या आतंकवादी प्रशिक्षण केंद्रावर भारतीय वायुसेनेने केलेल्या हवाई हल्ल्याने आशिया खंडातील सामरिक समीकरणे आमूलाग्र बदलली आहेत. 1971नंतर प्रथमच भारतीय लढाऊ  विमाने नियंत्रण रेषा - LoC आणि आंतरराष्ट्रीय सीमा पार करून पाकिस्तानात दाखल झाली. कोणत्याही प्रकारच्या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ल्याला पाकिस्तानच्या आण्विक शस्त्रांच्या भीतीने सैनिकी उत्तर न देण्याचे भारताचे धोरण या हल्ल्यांनी मोडीत निघाले.

2016मधील उरी हल्ल्यानंतर भारतीय स्पेशल फोर्सेसनी LoC पार करून अतिरेकी तळांवर हल्ले केले होते. पण त्यामुळे भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई करून शकतो, ही भीती पाकिस्तानच्या मनात बसली, या व्यतिरिक्त आतंकवादाचा बंदोबस्त यात झाला नाही. LoC पार एका कारवाईने आतंकवादाचा बंदोबस्त होईल असे मानणे हा शुध्द भोळेपणाही होता. स्पेशल फोर्सेसच्या कारवाईने आयएसआय अतिरेकी तळ सतत हलवत राहिली आणि पाकिस्तानी सेनाप्रमुख जनरल बाजवा यांचे LoCचे दौरे मोठया प्रमाणात वाढले, जेणेकरून भारत सीमापार परत छापेमारी करू शकणार नाही.

पण यापलीकडे जाऊन भारत पाकिस्तानी अतिरेकी संघटनांवर, पाकिस्तानच्या मुख्य भूमीवर हवाई हल्ले करेल ही शक्यता पाकिस्तानी सेना, आयएसआय आणि अतिरेकी संघटना यांनी कधीही विचारात घेतली नाही. त्यामुळेच बालाकोट हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ता ले.जन. असिफ गफूर यांनी स्वत:च घोषित करून टाकले की, भारतीय विमाने पाकिस्तानच्या हद्दीत येऊन गेली आणि निर्जन जागी काही 'पेलोड्स' टाकून पळाली! संध्याकाळी भारतीय परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी जगाला या कारवाईची अधिकृत माहिती दिली. यामुळे पाकिस्तानच्या आण्विक दहशतवादाची अखेर झाली. आण्विक शस्त्रांच्या आडोशाने आपण भारताला दबावात ठेवू, ही पाकिस्तानची कल्पना कायमसाठी मोडीत निघाली आहे.

बालाकोटनंतर जैशचे काय झाले?

पाकिस्तानमधून येणाऱ्या बातम्यांवरून असे सिध्द होतेय की, बालाकोट हल्ल्यानंतर आयएसआयने पाकिस्तानच्या पश्तून बेल्टमधील खैबर पख्तुनख्वा आणि फाटा प्रदेशात हे सर्व शिल्लक अतिरेकी हलवले आहेत. या अतिरेक्यांना त्यांनी डयुरँड लाइनच्या जवळ असलेल्या पाकिस्तानी सेनेच्या वेगवेगळया तळांवर आणि किल्ल्यांवर लपवून ठेवले आहे. याच प्रदेशात अफगाणिस्तानमधील तालिबान आणि इराणविरोधी सुन्नी अतिरेकी गट जैश उल अदल यांचे तळ आहेत. आणि इथेच सोव्हिएट विरोधात अमेरिकेची सीआयए आणि पाकिस्तानची आयएसआय यांनी मुजाहिदीनांना प्रशिक्षण दिले होते. इथले मिरानशाह हे शहर हक्कानी नेटवर्कचा संस्थापक जलालुद्दीन हक्कानीचे जन्मस्थान आहे आणि मौलाना सामी उल हक (तालिबानचा पितामह) याने सुरू केलेला मदरसा हक्कानीया इथूनच चालतो.

 


पश्तून या वेळी पाकिस्तानला मदत करतील?

1948च्या पहिल्या भारत-पाकिस्तान युध्दापासून कट्टर सुन्नी मुस्लीम असलेले पश्तून हे पाकिस्तानी सैन्यासोबत सतत भारताविरोधात उभे राहिले आहेत. परंतु गेल्या एक वर्षात यात आमूलाग्र बदल झाला आहे. मंजूर अहमद पशतीन या युवा पश्तून कार्यकर्त्याने नकिबुल्लाह मेहसूद नावाच्या युवा गायकाच्या हत्येनंतर पश्तून तहफ्फुज मूव्हमेंट (पीटीएम) नावाची चळवळ सुरू केली. नकिबुल्लाह हा युवा पश्तून गायक अतिरेकी असल्याचा शिक्का मारून बदनाम पोलीस अधिकारी राव अन्वर याने एका खोटया चकमकीत त्याला ठार मारले. त्यानंतर सुरू झालेली ही लोकशाही चळवळ पश्तून प्रदेशात मोठा जनाधार मिळवत आहे. एकेकाळी हेच पश्तून युवक अफगाणिस्तानमधील जिहादमध्ये शहीद झालेल्या मुजाहिदीनांची शौर्यगीते गात होते. परंतु आता त्यांच्या तोंडावर 'दा संगा आझादी दा?' (हे स्वातंत्र्य काय कामाचे?) हे पीटीएमचे गीत गात आहेत. कारण पाकिस्तानी सत्ता पंजाब्यांच्या हातात एकवटलेली आहे आणि त्यात बलुच, पश्तून, मुहाजिर, सिंधी यांना काडीची किंमत नाही.

पश्तून नेत्यांचा पाकिस्तानी सैन्याला ठेंगा!

या वेळी ही परिस्थिती लक्षात घेऊन पाकिस्तानी सैन्याने वझिरिस्तानमधील जानीखेल येथे पश्तून ट्रायबल नेत्यांची एक बैठक बोलावून त्यांना भारतविरोधी युध्दात सैन्याला साथ देण्याची विनवणी केली. पण ही विनंती त्यांनी साफ साफ फेटाळून लावली. काही महिन्यांपूर्वी वझिरिस्तानमधील संसद सदस्य अली वझीर यांनी सोशल मीडियावर या भूमिकेचा जाहीर उच्चार केला होता. त्यांनी म्हटले होते, 'पश्तून्स यापुढे 1971ची चूक करणार नाहीत, सैन्याने पाठिंबा गृहीत धरू नये!'

पाकिस्तानशी 'अयुध्द' हेच खरे युध्द!

2001च्या संसद हल्ल्यानंतर भारताने सीमेवर सैन्याची प्रचंड मोठी तैनात केली होती. जवळपास एक वर्ष दोन्ही देशांचे सैन्य प्रत्यक्ष युध्द करण्याच्या स्थितीत तैनात होते. या तैनातीत दोन्ही देशांचे अब्जावधी रुपये खर्च झाले. पुलवामानंतरही अशाच प्रकारची सैन्य तैनात दोन्ही बाजूंनी सुरू आहे. पण या वेळी त्यात थोडा फरक आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे पाकिस्तान या वेळी अत्यंत द्विधा मनःस्थितीमध्ये आहे, आणि यापुढे भारत काय कारवाई करेल याचा पाकिस्तानला अजूनही अंदाज आलेला नाही. पण एक गोष्ट पक्की आहे, की भारत सध्या कोणतीही मोठी सैन्य कारवाई करणार नाही!

असे का?

सध्या पाकिस्तानी अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. सरकारी पगार भागवण्यासाठी इम्रान खान जगभरातून पैसे जमवून आणत आहे. अमेरिकन सैन्य साहाय्यता केव्हाच थांबली आहे आणि सिपेकसाठी काढलेले चिनी कर्ज पाकिस्तानच्या गळयापर्यंत आले आहे. अरब देशांनी दिलेले कर्ज पाकिस्तानला आर्थिक सर्वनाशातून बाहेर काढायला अजिबात उपयोगाचे नाही.

भारताने सीमेवर केलेल्या आक्रमक सैन्य तैनातीमुळे पाकिस्तानला तशीच तैनात करणे अत्यावश्यक आहे. यामुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्था अब्जावधी रुपये रोज जाळत आहे. भारतीय हल्ल्यांमुळे पाकिस्तानची प्रवासी आणि व्यापारी विमान वाहतूक काही दिवस (हा लेख लिहीपर्यंत) पूर्णपणे बंद होती. चीनसह अनेक देशांनी पाकिस्तानमध्ये विमानसेवा बंद केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाकिस्तानवरील विश्वास पूर्ण उडत चालला आहे.

अशीच सैन्य तैनात दीर्घकाळ चालू ठेवावी लागली, तर पाकिस्तानात महागाई कळस गाठेल आणि अंतर्गत अशांतता वाढत जाईल. एक वेळ अशी येईल की सैन्यसुध्दा सामाजिक उद्रेक थांबवू शकणार नाही.

पाकिस्तानला युध्द फायदेशीर ठरेल?

होय, प्रत्यक्ष युध्द झाल्यास पाकिस्तानला ते फायदेशीर ठरेल. पाकिस्तानी सैन्य अधिकारी कोणत्याही भारत-पाक युध्दाला धार्मिक रंग देण्यात कसूर ठेवत नाहीत. भारताची पाकिस्तानवर केली जाणारी सैन्य कारवाई पाकिस्तानला पैसे कमावण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून देईल. अरब देशातील कट्टर वहाबी आणि सलाफी अब्जाधीश हिंदू भारताचे इस्लामिक पाकिस्तानवर आक्रमण परतवून लावण्यासाठी आपली तिजोरी पाकिस्तानवर उधळू शकतात. त्याशिवाय आशिया खंडात आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी आतुर चीन, भारताविरोधात पाकिस्तानला मुबलक शस्त्रपुरवठा करू शकतो.

पाकिस्तानात सध्या पश्तून लोकांमधील अस्वस्थता दाबण्यासाठी पाकिस्तान युध्दाचा खुबीने वापर करू शकतो. पराकोटीचे कट्टर सुन्नी मुस्लीम असलेले पश्तून 'अल्लाहू अकबर'च्या एका नाऱ्यावर पाकिस्तानी सेनेच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू शकतात.

म्हणूनच एकही गोळी न झाडता केलेले युध्द पाकिस्तानला नामोहरम करण्यासाठी पुरेसे आहे. अर्थात भारतालाही याची आर्थिक किंमत मोजावीच लागेल, पण प्रत्यक्ष युध्दापेक्षा ती कितीतरी कमी असेल आणि यात भारतीय सैनिकांची होणारी अपरिमित हानी वाचू शकेल.

हे 'वॉर ऑॅफ ऍट्रीशन' स्वतंत्र बलुचिस्तान, सिंधुदेश आणि मुहाजिर राष्ट्र निर्माण करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करून देईल.

भारताची सैन्य तैनात सुरू झाल्या झाल्या पाकिस्तानने बलुचिस्तान आणि पश्तून भागातून घाईघाईने सैन्याची हलवाहलव सुरू केली आहे. सध्या पाकिस्तानी सैन्य अफगाणिस्तान आणि इराण सीमेवरून भारतीय सीमेवर नेले जात आहे. यामुळे बलुच गटांचे पाकिस्तानी सैन्यावर हल्ले मोठया प्रमाणात वाढले आहेत. शिवाय सैन्याने रिकाम्या केलेल्या 200च्या आसपास पाकिस्तानी चौक्या आणि ठाणी बलुच योध्दयांनी आपल्या ताब्यात घेतली आहेत. गेल्या एक महिन्यात बलुच हल्ल्यामध्ये दीडशेपेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.

एका वरिष्ठ बलुच कमांडरच्या म्हणण्यानुसार भारताची आक्रमकसैन्य तैनात दीर्घकाळ पाकिस्तानी सीमेवर राहिल्यास पाकिस्तानी अर्थव्यवस्था रसातळाला जाईल आणि बलुच, सिंधी, मुहाजिर स्वातंत्र्य आंदोलनाला यातून मोठे बळ मिळेल

बलुचिस्तान स्वातंत्र्यात इस्रायलची भूमिका

पुलवामा हल्ल्यानंतर भारताला सर्वात आधी आणि जाहीर समर्थन इस्रायलने घोषित केले. भारतीय विमानांनी इस्रायलनिर्मित स्पाईस 2000 हे स्मार्ट बाँब बालाकोट हवाई हल्ल्यात जैशविरुध्द वापरले. शिवाय इस्रायलने भारताला बालाकोट हल्ल्यासाठी ताजी आणि अचूक गुप्तचर सूचना दिली असण्याची शक्यता खूप जास्त आहे. इस्रायलचे इराणशी असलेले पराकोटीचे शत्रुत्व स्वतंत्र बलुचिस्तानसाठी एक मोठी संधी आहे. इराणची वैश्विक-इस्लामी महत्त्वाकांक्षा ठेचण्यासाठी अमेरिका, इस्रायल आणि सौदी सध्या एकत्र काम करत आहेत. आणि पाकिस्तान-इराण संबंध सध्या चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे इराणला दाबण्यासाठी अगदी खेटून असलेला बलुचिस्तान स्वतंत्र देश असणे इस्रायलसाठी सध्याची तत्काळ गरज आहे. इराणचा सीस्तान-बलुचिस्तान प्रांत बलुचिस्तानचा भाग असल्याचा बलुची दावा करतात आणि इराणी सत्ता बलुच लोकांवर अत्याचार करत असते. याचा फायदा उठवून इस्रायल स्वतंत्र बलुचिस्तानसाठी आपली शक्ती लावेल किंवा सध्या लावत आहे असे मानायला भरपूर जागा आहे.

भारत-पाकिस्तान संघर्षाने बलुचिस्तानसाठी ही अद्वितीय संधी दरवाजात आणून ठेवली आहे.

भारत-पाकिस्तान तणावात चीनची भूमिका

चीनने पाकिस्तानात CPECअंतर्गत 76 अब्ज डॉलर्सची अवाढव्य गुंतवणूक केली आहे. बलुचिस्तानमधील ग्वादर बंदर चीनने आपल्या ताब्यात घेऊन त्याचा विकास करण्याचे काम जोरात सुरू आहे. याशिवाय बलुचिस्तानमधील अनेक खाणी उत्खननासाठी चीनच्या ताब्यात आहेत. चीन पंजाबी पाकिस्तानशी हातमिळवणी करून आमची साधनसंपत्ती लुटत आहे असा बलुच नेत्यांचा आक्षेप आहे. त्यामुळे सर्व प्रमुख बलुच सशस्त्र संघटना चीनच्या प्रकल्पांवर सतत हल्ले करत असतात. विद्रोही नेते डॉ. अल्लाह नजर बलुच आणि दिवंगत नेता उस्ताद अस्लम चीनला बलुचिस्तान सोडून जाण्याबद्दल सतत इशारे देत असतात. काही महिन्यांपूर्वी उस्ताद अस्लमने आपला मुलगा रेहान याला एका चिनी कंपनीच्या बसवर आत्मघातकी हल्ला करण्यासाठी पाठवून त्याचा व्हिडिओ त्यांनी प्रकाशित केला होता.

कराचीच्या चिनी दूतावासावर 3 बलुच विद्रोह्यांनी हल्ला केल्यानंतर उस्ताद अस्लमने एक मोठा व्हिडिओ प्रकाशित करून चीनला परत इशारा दिला होता की त्यांनी बलुचिस्तानची लूट तत्काळ थांबवावी.

अशा परिस्थितीत चीन आपली अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक सुरक्षित राखण्यासाठी पाकिस्तानच्या विभाजनाला मूक संमती देईल का? की वाटेल त्या स्थितीत तो पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील? पाकिस्तानबरोबर उभा राहून चीन मलाक्का स्ट्रेटमधून होणारी स्वत:ची क्रूड ऑॅइल वाहतूक धोक्यात घालून घेईल का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहेत आणि याची उत्तरे येणार काळ देऊ  शकेल

निष्कर्ष

अनेक विरोधाभासांनी भरलेले आणि सतत वांशिक हिंसाचाराने व्यापलेले पाकिस्तान ही एक अस्थायी राजकीय व्यवस्था होती. 1947मध्ये ब्रिटिशांची भूराजकीय गरज भागवण्यासाठी 'पाकिस्तान' नावाची हंगामी व्यवस्था निर्माण करण्यात आली. सध्याच्या वैश्विक राजकारणात ती पूर्वीएवढी प्रासंगिक आणि उपयुक्त राहिलेली नाही. 1971मध्ये तिचे पहिले विभाजन झाले आणि आता आणखी तीन विभाजने होण्याच्या मार्गावर आहेत.

म्हणून....

भारताने सध्याच्या स्थितीत मोठा सैनिक संघर्ष स्वत:होऊन सुरू न करता, आणि सध्याची आक्रमक सैनिकी तैनात जराही कमी न करता पाकिस्तानवर जीवघेणा सैनिकी दबाव कायम ठेवला पाहिजे, जेणेकरून पाकिस्तानी अर्थव्यवस्था धाराशायी होईल आणि बलुच, पश्तून, सिंधी, मुहाजिर ही वांशिक राष्ट्रवादी आंदोलने जोमाने मान वर काढू शकतील.

अफगाणिस्तानातील रक्तरंजित तालिबानी आतंकवाद आणि काश्मीरमधील रक्तपात याची मुळे पाकिस्तानात खोलवर रुजलेली आहेत. त्यामुळे पाकिस्तान पूर्णपणे खंडित केल्याशिवाय यावर कोणताही उपाय नाही. पुलवामाच्या दुर्दैवी घटनेने आपल्याला हेच कटू सत्य पुन्हा एकदा सांगितले आहे आणि त्यावर कायमस्वरूपी उपाय करण्याची संधीही दिली आहे. आपण त्या दिशेने पुढे जात आहोत असेच सध्या दृश्य आहे.

असा दीर्घकाळ लढा लढण्याची मानसिकता असलेलेच राजकीय नेतृत्व या परिस्थितीत मार्ग काढू शकते. जे नेतृत्व स्वत:च संभ्रमित अवस्थेत आहे, असे नेतृत्व कधीच पाकिस्तानशी यशस्वी मुकाबला करू शकणार नाही. प्रश्न हा भारत-पाकिस्तान यांच्यामधील युध्दाचा नसून पाकिस्तानवर सातत्याने मानसिक व आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्याचा आहे. जेव्हा जेव्हा असा दबाव वाढत जाईल, त्या वेळी त्या देशांपाशी अण्वस्त्रे असली, तरी ती त्या देशाचे विघटन थांबवू शकत नाहीत याचा अनुभव रशियाने घेतला आहे. पाकिस्तान त्या दिशेने पुढे जात आहे.