चौकीदारांएवढाच गृहविमाही महत्त्वाचा

विवेक मराठी    01-Apr-2019
Total Views |

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षातील संवत्सराचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तापैकी एक. या मुहूर्तावर अनेक जण गृहखरेदी करीत असतात. आयुष्याची जमा पूंजी गृहखरेदीसाठी खर्च करीत असतात. कुटुंबातील प्रत्यकाचे आपल्या घराशी एक वेगळेच नाते असते. आपले घर अधिक सुंदर, आकर्षक दिसावे म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करीत असतो. गृहखरेदी, गृहसजावट या गोष्टींच्याही आधी गृहसंरक्षणाचा विचार केला तर खऱ्या अर्थाने आपण सुखी होऊ. त्यानिमित्त यंदाच्या घरकूल विशेषांकात आपण गृहसंरक्षण हा विषय घेतला आहे. यात आपण गृहसंरक्षणाच्या विविध आयामांचा विचार करणार आहोत.

 

कोणीही शहाणी व्यक्ती स्वत:चे नुकसान टाळायला बघते. नुकसानीची कारणे प्रामुख्याने दोन प्रकारची असतात. एक प्रकार म्हणजे निसर्गनिर्मित व दुसरा म्हणजे मानवनिर्मित. पहिल्या प्रकारात भूकंप, वादळे, पूर, गारपीट, आगी, वणवे असे प्रसंग येतात, जे विश्वाच्या निर्मितीपासून आहेत व शेवटपर्यंत असणार. दुसऱ्या प्रकारात दरोडे, चोरी, खून, दंगली, लढाया इथपासून ते अलीकडच्या सायबर क्राइम्सपर्यंतचे प्रसंग येतात. माणूस पहिला प्रयत्न करतो तो हे धोके टाळण्यासाठी. निसर्गनिर्मित नुकसान रोखण्यासाठी भूकंपरोधक बांधकामे, अग्निशमन यंत्रणा, अतिरुंद नाले व्यवस्थेपासून नद्यांचे प्रवाह बदलणे असे अनेक प्रयत्न माणूस करत आला. मानवनिर्मित धोक्यांतील चोरीचा धोका टाळण्याकरता खूप काही झाले व होत आहे. कडीकुलपे, रखवालदार, Watch dogs इथपासून ते सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, Burglary Alarms, ठरावीक माणसाच्या, बोटाचा ठसा/बुब्बुळे बघूनच उघडणारी कुलुपे (Safety Latches) असे अनेक सुरक्षा उपाय विकसित होत आले आहेत.

तरीही कुठलेच धोके पूर्णपणे टाळता येत आहेत असे झाले नाही. त्यांची वारंवारिता किंवा शक्यता कमी करणे एवढेच यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे धोके निर्माण होणारच, नुकसान हे होणारच. त्या त्या धोक्यांप्रमाणे प्रमाण कमी-अधिक राहील, एवढाच काय तो फरक. उदा. प्रत्येकाला मृत्यूचा धोका जेवढा अटळ आहे, तसे भूकंप, पूर, आग वा चोरी हे धोके प्रत्येकासाठी अटळच आहेत असे नाही. मात्र शहाण्या, व्यवहारी माणसाने जसे सर्व संभाव्य धोके टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तसे ते धोके उद्भवलेच तर त्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठीसुध्दा प्रयत्न केले पाहिजेत व त्यातील एक (एकमेव) सरसकट उपाययोजना म्हणजे त्या नुकसानीचा विमा/इन्शुरन्स उतरविणे (घेणे).

सध्या अस्तित्वात असलेल्या संस्थात्मक विमा व्यवसायाची सुरुवात सुमारे 400 वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. आत्म्याचे किंवा प्राणाचे घर म्हणजे देह. मात्र या देहरूपी घराचा विमा काढणे जेवढे आवश्यक मानले जाते, तेवढेच हा देह ज्या घरात राहतो त्या घराचा विमा घेणे आवश्यक वाटत नाही असे दिसते. (खरे म्हणजे घराचा आगीपासूनचा विमा देणारी संस्थात्मक रचना ही आयुर्विमा देणे सुरू व्हायच्या काहीशी आधीच आली, असे मानले जाते.)

घराचा विमा प्रामुख्याने दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे भूकंप, प्रलय, आग इ.पासून घराचे (इमारतीचे) जे नुकसान होऊ शकते, त्या नुकसानीचा विमा. हा प्राय: निसर्गनिर्मित धोक्यांशी संबंधित असतो. पण घर म्हणजे नुसती इमारत नसते, त्यात अनेक प्रकारच्या किमती, मौल्यवान चीजवस्तू - उदा. दागिने, उंची फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वस्त्रप्रावरणे इ. असतात. यांच्यासाठी उपरोक्त धोक्यांशिवाय एक मोठा मानवनिर्मित धोका असतो व तो म्हणजे चोरी. चौकीदारांची संख्या कितीही वाढली वाढविली, तरी चोरीचा धोका व त्यातूनचे नुकसान हे संभाव्य राहतेच. यातील वस्तू नुकसानीचाही विमा अंतर्भूत असलेल्या विमा पॉलिसीज या दुसऱ्या प्रकारच्या विम्यात येतात.

 महत्त्वाचा, तरीही दुर्लक्षित

गृहविमा हा 'सर्वसाधारण विमा' या प्रकारातील असूनही काहीसा दुर्लक्षित प्रकार आहे. प्रत्येकाने या विमाप्रकाराबद्दल माहिती करून घेणे गरजेचे आहे. ही विमापॉलिसी घेणे फार खर्चीक नाही व प्रामुख्याने भूकंप, आग, पूर अशा नुकसान पोहोचवणाऱ्या निसर्गनिर्मित व चोरीसारख्या मानवनिर्मित धोक्यांसाठीची तजवीज यातून करता येते. गृहविमा किंवा होम इन्शुरन्स या विमा प्रकाराबद्दल अनेक जणांचे अज्ञान तरी असते किंवा उदासीनता तरी. या विम्याबद्दल प्राथमिक माहिती दिली जावी व त्या संबंधीची जागरुकता वाढावी हा या लेखामागील मुख्य उद्देश. निरनिराळया विमा कंपन्या सदर विमा पॉलिसीज देत असतात. त्याची माहिती त्या कंपन्यांच्या वेबसाईटवर किंवा इंटरनेट सर्चमधून नक्कीच मिळवता येईल.

 वाचकांपैकी अनेक जणांचा हा स्वानुभाव असेल की त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी आयुर्विमा आणि/किंवा आरोग्यविमा घेतलेला असतो, पण घराचा आणि/किंवा घरातील मौल्यवान चीजवस्तूंचा विमा मात्र घेतलेला नसतो. आपल्या देशात तरी सामान्यत: ही परिस्थिती आहे असे म्हणतात, कारण गृहविम्याच्या ज्या योजना उपलब्ध आहेत, त्यांची खूपच कमी माहिती, त्यासंबंधी खूपच कमी जागरूकता दिसून येते.

ज्या इमारती खूप जुन्या नाहीत, अशा इमारतींचे/घरांचे मालक त्या बांधकामांना असलेल्या धोक्यासंबंधात विमा घेऊ शकतात. अर्थात, सदर घर/इमारत पक्क्या बांधकामाची असली पाहिजे. घर/इमारत कमाल किती वर्षे जुनी हवी? पक्के बांधकाम म्हणजे काय? याचे नियम त्या त्या विमा कंपनीकडून समजून घेता येतात. समजा, एखादे कुटुंब/व्यक्ती भाडयाच्या किंवा लिव्ह-लायसन्सने घेतलेल्या घरात राहत असले, तरीही त्याला घरातील चीजवस्तूंचा विमा घेता येऊ शकतो. यातील अनेक वस्तूंचा वापर घराबाहेर असतानाही होतो. (उदा. दागिने, कॅमेरे, लॅपटॉप इ.) तेथेही त्यांना चोरीचे वगैरे जे धोके असतात, त्यांच्यासाठीही विमा संरक्षण उपलब्ध असते. शहरांमध्ये फ्लॅट संस्कृती (हाउसिंग सोसायटीज्/अपार्टमेंटस् पध्दत) दिसून येते. अशा परिस्थितीत सदर सोसायटी/अपार्टमेंट संपूर्ण इमारतीचा विमा घेऊ शकते, ज्या परिस्थितीत प्रत्येक फ्लॅटधारकाने त्याच धोक्यांसाठी विमा घेणे गरजेचे राहत नाही.

सध्या भारतात राष्ट्रीयीकृत व खाजगी अशा जुन्या-नव्या मिळून सुमारे 28 विमा कंपन्या आहेत व बव्हंशी सर्वच कंपन्यांकडून वर वर्णन केलेल्या House Insurance/Home Insurance च्या पॉलिसीज उपलब्ध आहेत.

या पॉलिसीज एक वर्षाहून अधिक कालावधीसाठीसुध्दा उपलब्ध असतात. काही पॉलिसीजमध्ये तर ज्याचा विमा काढला आहे त्या घराचे नुकसान झाले, तर पर्यायी जागेचा भाडेखर्चसुध्दा दिला जातो. तपशिलातल्या अशा अनेक गोष्टी लिहिता येतील. उदा. Third Party Liabilityचा धोकाही यामध्ये समाविष्ट करता येतो.

सुमारे साठ लाखाचा घराचा विमा व घरातील वस्तूंचा पाचेक लाखापर्यंतचा विमा घ्यायला गेल्यावर वार्षिक प्रिमियम अंदाजे रु. साडेसात हजार येते व तोच नुसत्या घराचा घेतला, तर तीन -साडेतीन हजारापर्यंत येते.

इमारतीतील घराचा विमा काढताना घराचा नेमका पत्ता, अचूक क्षेत्रफळ, वापराचा तपशील, भाडेकरूंबाबतचा तपशील हा महत्त्वाचा असतो. तसेच प्रत्येक पॉलिसीजमध्ये ज्या शर्ती-अटी असतात, त्या काळजीपूर्वक वाचाव्यात. तसेच कुठल्या परिस्थितीत/कुठल्या धोक्यांचा विमा मिळणार नाही, हेही नीट समजून घ्यावे.