भारतीय राजकारणातील एक 'समर्पित' प्रवास

विवेक मराठी    01-Apr-2019
Total Views |

स्वत:ची प्रतिभा, बुध्दिमत्ता आणि वर्धमान कर्तृत्व राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले पाहिजे, हे आवाहन करणारी एक संघटना आणि आपल्या असामान्य गुणांनी संघटनेचा हा विश्वास सार्थ ठरवणारा एक कार्यकर्ता. काही काळापुरती भारतीय राजकारणावर स्वत:च्या कर्तृत्वाची झळाळती मुद्रा उमटवणारा हा तेज:पुंज प्रवास.

 

मनोहर पर्रीकर गेले आणि अमूलने या दिवंगत नेत्याला कलात्मक श्रध्दांजली वाहताना त्यांच्या नेहमीच्याच खुबीने केवळ एकच वाक्य लिहिले - 'Har Goan Ka Manohar' अर्थात प्रत्येक गोंयकाराचा मनोहर. अमूलचे हे वाक्य शब्दश: खरे आहे. गोंयकारांचा हा मनोहरबाब प्रत्येकाला आपल्या घरातील माणूस वाटायचा. लोकांचे आपल्या या नेत्यावर आणि या मुलखावेगळया नेत्याचेही आपल्या या विशाल कुटुंबावर जे मन:पूत प्रेम होते, त्याच प्रेमाने या नेत्याने अखेरच्या श्वासापर्यंत मृत्यूशी झुंज दिली. मरण अगदी उंबरठयावर आहे हे ठाऊक असूनही ही झुंज चालूच होती. ठरवलेल्या गोष्टीपासून सहजासहजी माघार न घेण्याचा भाईंचा स्वभावच त्यांना या 'स्थितप्रज्ञ' स्थितीत घेऊन गेला. 'मेक इन इंडिया' या भाईंनी पाहिलेल्या एका स्वप्नाचे रूप 'अटल सेतू'च्या माध्यमातून मांडवीच्या पात्रात साकार होताना दीर्घ आजारपणानंतर भाई प्रथमच लोकांमध्ये आले. नाकातील प्राणवायूच्या नळया, कमालीचे कृश झालेले शरीर आणि चेहऱ्यावर दिसणारा वेदनांचा ताण या सर्वांना पुरून उरला तो त्यांच्या मनातील अदम्य 'जोश'! भाईंचे हे दर्शन भारावून टाकणारे होते, तसे - किंबहुना त्याहीपेक्षा अधिक मन हेलावून टाकणारेही होते.

'हाऊ  इज द जोश?'

मांडवी पुलाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित जनतेला, विशेषत: तरुणांना प्राणांतील सर्व बळ एकवटून विचारलेला ''हाऊ  इज द जोश?'' हा प्रश्नच मुळात भाईंच्या अथक कार्यमग्नतेचा प्रतीक होता.

पोर्तुगीज मनोवृत्तीच्या अराष्ट्रीय दबावांना कायम बळी पडणाऱ्या काँग्रेसला गोव्यात पर्याय म्हणून नवा प्रादेशिक पक्ष न काढता राष्ट्रीय पक्षाचेच काम सुरू झाले पाहिजे, या संघाच्या भूमिकेला मनोहरभाईसकट तेव्हा संघात सक्रिय असणाऱ्या श्रीपाद नाईक, राजेंद्र आर्लेकर, संजीव देसाई यासारख्या अनेक तरुण कार्यकर्त्यांनी उचलून धरले ते हा 'जोश' असल्यामुळेच! गोव्यात भाजपाची मुहूर्तमेढ करण्यासाठी उभे राहिले, तेव्हा भाई आणि त्यांच्या या सहकाऱ्यांकडे ना पुरेशी साधने होती, ना मुबलक पैसा होता. पण डोळयांपुढचे ध्येय स्पष्ट होते. अथक परिश्रम आणि प्रचंड संघर्ष करताना त्या संपूर्ण पिढीचेच 'कार्यकर्ते'पण उजळून निघाले.

कामाची आखणी

गोवा भारतात विलीन झाला तोच मुळात उशिरा, म्हणजे 1960 साली. 1967च्या सार्वमतात गोवा हा महाराष्ट्रात विलीन न होता स्वतंत्र राज्य म्हणून राहावा, याविषयी गोव्यातील जनतेने आपला कौल दिला आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगोप) व काँग्रेस यांच्याकडे पुढील तीन दशके आलटून पालटून या छोटया राज्याची सत्ता येत गेली. भाऊसाहेब बांदोडकरांच्या निधनानंतर मगोप क्षीण होत चालला आणि नेमका याचाच फायदा उठवीत पोर्तुगीज मनोवृत्तीच्या काही धार्मिक व निव्वळ अराष्ट्रीय गटांनी काँग्रेसवर कब्जा मिळवायला सुरुवात केली. गुंडगिरी, अवैध उद्योगधंदे, तस्करी, धर्मांतरण अशा जाळयात भारताच्या पश्चिम समुद्रतटावरचे हे चिमुकले राज्य अडकणे हे त्या राज्याच्या आणि संपूर्ण देशाच्या दृष्टीनेही सोयीचे नव्हते. भारतीय जनता पक्षाचे काम ऐंशी-नव्वदच्या  दशकात गोव्यात सुरू झाले ते या पार्श्वभूमीवर!

आपले राज्य छोटेखानी असले, तरी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते संवेदनशील आहे, या राज्यात राष्ट्रवादी विचारांच्या 'राष्ट्रीय' पक्षाची संघटना मजबूतच असली पाहिजे हे आव्हान समर्थपणे स्वीकारत भाई आणि सहकाऱ्यांची टीम उभी राहिली. 'शिंव्ह आयलो' असे म्हणत परंपरागतपणे मगोपच्या सिंह या निवडणूक चिन्हावर शिक्का मारणारा गोंयकार मतदार आपल्याला प्रथम आपल्या पक्षाकडे खेचून आणला पाहिजे, या दृष्टीने कामाची आखणी केली गेली.

रामजन्मभूमी आंदोलनासारखे राष्ट्रीय विषय आणि कोकण रेल्वेसारखे स्थानिक विषय भाईंनी तितक्याच ताकदीने उचलले. आपल्या या लढयांमागे कर्तृत्वाने मोठे जनसमर्थन उभे केले. कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभारली. अनेक योजनांचा अचूक अभ्यास केला. जुन्या प्रश्नांवर नवीन उपाय शोधले. विधानसभेतील संख्याबळ टप्प्याटप्प्याने वाढवीत नेले आणि 2000मध्ये पक्षाला थेट सत्तास्थानी नेले. संघर्ष आणि चळवळी यांनी भारलेले हे दशक. या मंतरलेल्या काळावर मनोहर पर्र्रिकर या नावाचा जो ठसा उमटला आहे, तो या दरम्यान गोव्यातील समाजजीवनात सक्रिय असणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना कधीच विसरता येणार नाही.  

कर्तृत्ववान स्वयंसेवक

भाई मुळात संघ स्वयंसेवक. दुर्गानंदजी नाडकर्णींसारख्या काही ज्येष्ठ प्रचारकांनी साठ-सत्तरच्या दशकात, म्हणजे गोवा स्वतंत्र होताच तेथे संघशाखांचे जाळे विणायला आणि त्यातूनच कार्यकर्ते जमवायला सुरुवात केली. जमलेले कार्यकर्ते याच संघसंस्कारांत घडूही लागले. मनोहर पर्रिकर आणि संजय वालावलकर यांच्यासारखे त्यांचे जिवलग मित्र याच दरम्यान संघाशी जोडले गेले. हा बंध अखेरच्या श्वासापर्यंत भाईंनी प्राणपणाने जपला.

उत्तम बुध्दिमत्तेच्या जोरावर मुंबईच्या आय.आय.टी.मध्ये शिक्षण पूर्ण करून देशाच्या इतर मोठया शहरात वा परदेशात भल्या मोठया पगाराची नोकरी न करता तेविशीतील हा तरुण पुन्हा गोव्यात येतो आणि म्हापशाजवळील औद्योगिक वसाहतीत स्वत:चा उद्योग सुरू करतो, हेच मुळात विशेष होते. थोडे स्थिरस्थावर होत असतानाच अगदी तरुण वयात म्हापसा शहर संघचालक अशी जबाबदारी या तरुणाकडे दिली गेली. आजूबाजूचे वातावरण, संघकामापुढील आव्हाने आणि संघविचारांचा विस्तार याबद्दल भाईंची मते याच काळात स्पष्टपणे आकार घेत गेली. भाई आणि त्यांच्या समवयस्क मित्रांचा हा समूह सर्व शक्तीने गोव्यात याच काळात अनेक क्षेत्रांत कार्यरत होत होता. संघाच्या बरोबरीनेच अभाविप, विश्व हिंदू परिषद अशा संघविचारांच्या संघटनांचेही काम एव्हाना सुरू झाले होते आणि भाईंसारखे कर्तृत्ववान स्वयंसेवक या कामाची धुरा समर्थपणे वाहू लागले होते.

याच दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या कामासाठी संघाने आपल्या पहिल्या फळीतील काही स्वयंसेवकांना संघकामातून मोकळे करीत राजकीय क्षेत्रात पाठवले. गोव्याची सुरक्षा आणि  सांस्कृतिक ओळख हा केवळ गोव्यापुरता मर्यादित विषय नसून राष्ट्रीय सुरक्षेशी आणि संस्कृतीशी त्याचा थेट संबंध आहे. त्यामुळे निवडणुका लढवायच्या, जिंकायच्या त्या स्वार्थासाठी नाही, तर साधन म्हणून आणि सत्ता मिळवायची ती हव्यास म्हणून नाही, तर राष्ट्रीय काम म्हणून हा संस्कार घेऊनच ही फळी राजकीय क्षेत्रात उतरली.

प्रचंड संपर्क

गोव्यातील औद्योगिक आणि बुध्दिजीवी वर्गाशी भाई त्यांच्या विलक्षण बुध्दिमत्तेमुळे सहजपणे संपर्क साधू शकले. अंगभूत साधेपणामुळे कार्यकर्त्यांच्या स्तरावर काम करताना ते कधीच अवघडल्यासारखे झाले नाहीत. गोव्याच्या विकासाविषयी डोळयांपुढे असणाऱ्या स्पष्ट कल्पनांमुळे गोव्यातील समाजकारणात सक्रिय असणाऱ्या पर्यावरणवादी संघटनांचे आग्रह ते समजून घेऊ शकले. कशातही कोणतेच स्वार्थ गुंतले नसल्याने सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुध्द आवाज उठवू शकले. जनमानसाचा नेमका अंदाज असल्याने आंदोलनांची प्रभावी आखणीही ते करू शकले. सततचा प्रवास करून गोव्यातील गाव न् गाव पिंजून काढत असताना नव्या, दमदार कार्यकर्त्यांना हेरून ते पक्षात आणू शकले आणि या सर्वाच्या जोरावर अवघ्या दहा वर्षांत आपल्या पक्षाला ते सत्ताधारीही बनवू शकले. 

सामाजिक काय किंवा राजकीय काय, सर्व समाजघटकांना बरोबर घेऊनच कोणतेही काम केले पाहिजे हा भाईंचा स्वाभाविक आग्रह असायचा. गोव्यातील ख्रिश्चन समुदायांत त्यांनी सहजपणे अनेक मित्र आणि कार्यकर्ते जोडले. हिंदुत्वाचा विचार हा एका धर्माचा वा उपासनापध्दतीचा विचार नसून समग्र राष्ट्राचा आणि राष्ट्रीय संस्कृतीचा विचार आहे, हा विश्वास त्यांनी आपल्या कार्यपध्दतीद्वारे भिन्न धर्मीयांच्या मनातही जागवला. हे केवळ मते मिळावीत या संकुचित जाणिवेने केलेले आचरण नव्हते, तर त्यात त्यांच्या स्वभावाला अनुसरून असणारी कमालीची सहजता होती. संघाचा हा विचार इतक्या नेमकेपणाने सर्व समुदायांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक साधन म्हणूनच भाई राजकारणाकडे पाहत होते. हा आंतरिक स्नेह जाणवल्यानेच दक्षिण गोव्यासारख्या ख्रिश्चनबहुल मतदारसंघाने ऍड. नरेंद्र सवाईकरांसारख्या भाजपाच्या तरुण कार्यकर्त्याला खासदार म्हणून निवडून दिले. या विजयाचे श्रेय नरेंद्रच्या नेतृत्वगुणांना, संघटनेच्या कामाला आहे, तसेच ते भाईंच्या खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक विचारांना आणि त्याप्रमाणे केलेल्या कार्यालाही आहे. 

भाईच्या व्यक्तित्वाची त्रिसूत्री

संघाच्या, अभाविपच्या कामासाठी गोव्यात प्रचारक वा पूर्णवेळ म्हणून काम केलेल्या आम्हां अनेकांना मनोहरभाईचा हा म्हापसा-पणजीपासून दिल्लीपर्यंत झालेला प्रवास अगदी जवळून पाहता आला. या दर्शनाने ना कधी डोळे दिपले, ना कधी हबकल्यासारखे झाले. याचे एकमेव कारण म्हणजे तो एका 'कार्यकर्त्या'चा प्रवास होता. अत्यंत साधेपणा, अकृत्रिम जिव्हाळा आणि पदाकडे 'जबाबदारी' म्हणून पाहण्याची, ती जबाबदारी यशस्वी करण्यासाठी झोकून देण्याची आणि प्रसंगी धाडसी निर्णय घेण्याची संघटनेची शिकवण ही मनोहरभाईंच्या व्यक्तित्वाची त्रिसूत्री होती.

अंगभूत स्वभाव

पणजीच्या दादा वैद्य मार्गावरील डॉ. हेडगेवार शाळेची इमारत. शाळा सुरू होऊन अवघी दोन-तीनच वर्षे झालेली. त्याच इमारतीत काही प्रचारक-पूर्णवेळ कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्था. आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी 'मोपेड'वर येणारे भाई, आसपास आमच्यापैकी कोणी असेल तर खास त्यांच्या स्टाइलमध्ये मारलेल्या गप्पा, त्या त्या वेळच्या परिस्थितीवरचे त्यांचे असे खास भाष्य, आमच्या कामाच्या वेगवेगळया पध्दतींचे बारीक निरीक्षण आणि त्यावर विचार करायला लावणाऱ्या खास त्यांच्याच अशा 'कॉमेंट्स'... आपोआपच एक अनौपचारिक नाते भाईंशी जोडले गेले. मग उत्तर गोव्याच्या प्रवासात - विशेषत: पेडण्याला जाताना घराच्या खाली उभे असलेले भाई दिसले की आवर्जून थांबणे व्हायचे. थोडयाफार गप्पा व्हायच्या. अभाविप काय किंवा संघ काय, सर्वच संघटनांची कामे अत्यंत काटकसरीने चालायची आणि अजूनही चालतात. या काटकसरीमुळे कार्यकर्त्यांच्या प्रवासावर व प्रकृतीवरही कधीकधी परिणाम होऊ  शकतो, याची भाईंना चांगलीच जाण असायची. पूर्णवेळांच्या खिशात जेमतेम कामापुरतेच पैसे असतात, हेही त्यांना ठाऊक होतेच. त्यामुळेच कार्यालयातून निघताना काही खाल्ले आहे की नाही आणि पुढच्या प्रवासाला लागेल इतके पेट्रोल स्कूटरमध्ये आहे की नाही याची तिरकस तरीही प्रेमळ अशी 'तपासणी' झाली की भाई खऱ्या अर्थाने भेटल्यासारखे वाटायचे!

विद्यार्थी परिषदेने विद्यापीठातील निवडणुकाही जिंकल्या पाहिजेत आणि कोकण रेल्वेच्या समर्थनासाठी रस्त्यावर येऊन संघर्षही केला पाहिजे, हे भाई आम्हाला आग्रहाने सांगायचे. 'लढा' असे सांगताना लढणाऱ्या सैनिकांची जी काळजी घ्यावी लागते, ती काळजीही घ्यायचे. गोव्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नामकरणप्रसंगी आम्ही जोरदार निदर्शने केली. आमच्यापैकी अनेक नव्या कार्यकर्त्यांना अनपेक्षितपणे जेलची हवा खावी लागली. अशा कार्यकर्त्यांना धीर देणे, त्यांच्या पालकांशी बोलून या राजकीय अटकेचे काही दुष्परिणाम होणार नाहीत याची त्यांना खात्री देणे आणि तसे ते खरोखरच होणार नाहीत याचीही काळजी घेणे... हे सर्व करणारे भाई पुढे केंद्रीय नेते झाले, तरी या अंगभूत स्वभावामुळे कायम कार्यकर्तेच राहिले.

भाईंचा मोठेपणा

मनोहरभाईंचे मोठेपण नेमके कशाकशात आहे? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून जसे उमगते, तसेच ज्या वैचारिक वातावरणाने त्यांना घडवले त्या वातावरणातही सापडते. जात, धर्म, भाषा, प्रांत यांसारख्या भेदांपलीकडे जाऊन संपूर्ण राष्ट्र आणि समाजबांधणीसाठी कटिबध्द असलेला संघ हा जेव्हा त्यांच्या स्वयंसेवकांच्या आयुष्याचाच भाग बनतो, तेव्हा व्यक्ती प्रथम संघटनेशी आणि नंतर आपोआपच समग्र समाजाशीच एकरूप पावते. जसा समाज आपल्याला घडवायचा आहे तसे प्रथम आपण स्वत: बनले पाहिजे, ही खूणगाठ मनाशी बांधली जाते. व्यक्ती, संघ आणि समाज हे तीन बिंदू सहजपणे जोडले जातात आणि एकाच व्यक्तिमत्त्वाचे ते भाग बनतात. मी, माझी क्षमता, माझी बुध्दिमत्ता आणि माझे पद ही सर्वच समाज परिवर्तनाची साधने आहेत याचे भान येते. वैयक्तिक उत्कर्ष महत्त्वाचा असला, तरी सामाजिक उत्कर्षाच्या भव्यतेपुढे त्याच्या मर्यादा ओळखता येऊ  शकतात. आपल्या अतिसामान्य, सामान्य आणि असामान्य अशा सर्वच स्तरांवरील स्वयंसेवकांच्या आयुष्यात संघाने हा बदल घडवून आणला आहे. या संस्कारांतून  केवळ राजकीयच नव्हे, तर समाजाच्या विविध क्षेत्रांतील नेतृत्व आज उभे राहिले आहे. काळाच्या ओघात संघ हाच समाजरूपात विलीन पावेल, तेव्हा अशा व्यक्तिनिर्माणासाठी वेगळया संघटनेची आवश्यकताच राहणार नाही. त्या आदर्श स्थितीकडे समाजाला घेऊन जाणे हेच तर संघकाम आहे. मनोहर पर्रिकरांच्या दर्शनाने भारावलेल्या समाजाचा या संघकामावरचा विश्वास आणखीनच अढळ होतो, तो याच एका गोष्टीमुळे!

आपल्या आजारपणाच्या केवळ काही काळ आधी भाईंनी एका कोकणी तरुण पत्रकाराला मुलाखत दिली होती. या मुलाखतीतील भाईंचे भाष्य हे त्यांच्या प्रगल्भतेचे निदर्शक तर आहेच, तसेच भारतीय राजकारणाचाच पोत बदलण्याचे सुप्त सामर्थ्य त्यात आहे. 'राजकारणात आपण आलो ते मुळातच संघटनेने दिलेली एक जबाबदारी म्हणून. मला वाटते ती जबाबदारी मी आता जवळपास पूर्ण केली आहे. 2022नंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. सक्रिय राजकारणाला वयाची मर्यादा असलीच पाहिजे. वयाच्या पासष्टीनंतर मला या निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त व्हायचे वेध लागले आहेत. पक्षाने आग्रह केला तरी मी पुढील निवडणूक लढवणार नाही. 30 वर्षे हा बराच मोठा काळ मी राजकारणात घालवलाय. आता पुरे. नवीन मंडळींना, विशेषत: तरुण मुलांना संधी दिली पाहिजे. आमच्यासारख्या नेत्यांनी अशा तरुणांना प्रशिक्षित करून त्यांच्याकडे कारभार सोपवला पाहिजे. सगळे काही, सर्व काळ मीच करणार ही भूमिका बरोबर नाही. संघटनेनेही किती काळ एका व्यक्तीवर अवलंबून राहायचे याला मर्यादा असतात. नवीन माणसे उभी राहिली पाहिजेत, ती उभी केली पाहिजेत. एखाद्या व्यक्तीचे मर्यादेपेक्षा जास्त काळ राजकारणात सक्रिय असणे म्हणजे त्यात पक्षाचे व संघटनेचे नुकसानच अधिक असते. मोठया वृक्षाच्या छायेचे फायदे असले, तरी त्या सावलीत छोटी झाडे कधीच वाढत नाहीत हे लक्षात घेऊन मी बाजूला होणार आहे. आयुष्यात स्वत:साठी म्हणून करायच्या कितीतरी गोष्टी आजवर राहून गेल्या आहेत. आता उरलेला काळ हा अशा गोष्टींसाठी देणार आहे ..'

स्वत:ची प्रतिभा, बुध्दिमत्ता आणि वर्धमान कर्तृत्व राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले पाहिजे, हे आवाहन करणारी एक संघटना आणि आपल्या असामान्य गुणांनी संघटनेचा हा विश्वास सार्थ ठरवणारा एक कार्यकर्ता.

काही काळापुरता भारतीय राजकारणावर स्वत:च्या कर्तृत्वाची झळाळती मुद्रा उमटवणारा हा तेज:पुंज प्रवास.

मनोहर पर्रिकर हे या तेजस्वी पांथस्थाचे आणि 'समर्पण' हे त्या प्रवासाचे नाव होते!

उप-प्राचार्य, विज्ञानभारती इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, हैदराबाद

डॉ. जयंत कुलकर्णी

& 9989395570