राज ठाकरे, तुम्हीसुध्दा?

विवेक मराठी    10-Apr-2019
Total Views |

वाईट वाटले, एक उमदा मराठी तरुण, मराठी बाणा जागविण्याऐवजी शरणागतीचा आणि कुर्निसात करण्याचा रिवाज स्वीकारताना, खरोखरच वाईट वाटले. स्वत:चे शिलेदार मैदानात उतरून जर मोदींवर दमदार तोफ डागली असती, तर त्या तोफेला काही अर्थ होता. तिच्या आवाजाचा काही परिणाम झाला असता, पण आज तुम्ही स्वत:लाच पवारांच्या आणि राहुल गांधींच्या तोफेच्या तोंडी दिले आहे. तुम्ही त्यांच्या तोफेचे भक्ष्य झालेले आहात. हा नक्कीच मराठी बाणा नव्हे. 

राज ठाकरे, मराठी माणसाने तुमच्यात बाळासाहेब पाहिले. त्यामुळे तुम्ही मनसेची सुरुवात केल्यानंतर बाळासाहेबांचा वारसा तुमच्याकडेच येणार, असे मराठी मनाला वाटले. निवडणुका आल्या, मराठी माणूस तुमच्या मागे उभा राहिला. पहिल्याच झपाटयात तुम्ही महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश केला, आणि नाशिकची महानगरपालिका तुमच्या हातात आली. शिवसेनेचा वारसा तुमच्या हाती येणार, असे वातावरण होत असतानाच...

अरेरे... घात झाला... नंतरच्या निवडणुकीत तुमच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. नाशिक महानगरपालिका गेली, विधानसभेत एकही आमदार नाही आणि मुंबई महानगरपालिकेत नगण्य प्रतिनिधित्व. मराठी माणसाच्या लक्षात यायला लागले की, नक्कल म्हणजे अस्सल नव्हे. बहुतांची अंतरे सांभाळावी लागतात, बहुतांचे दोष पदराखाली घ्यावे लागतात, सामान्यातील गुण हेरून त्यांना मोठे करावे लागते. ही माणसे मोठी झाली की 'मी मोठा आहे' हे सांगावे लागत नाही. हे मोठेपण स्वयंभू असते.

तुम्ही संधी गमावलीत. आता पुन्हा संधी मिळेल की नाही, काही सांगता येत नाही. आणि त्यात आता तुम्ही लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेला आहात. अजबपणे उतरला आहात. रिंगणात उतरायचे असेल तर लढावे लागते. तुम्ही लढण्यापूर्वीच पळ काढलात. आणि तरी तुम्ही रिंगणात आहात, कोणासाठी?

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासाठी. बाळासाहेबांची हयात या दोन पक्षांशी संघर्ष करण्यात गेली. शरदराव पवारांना बाळासाहेब 'कुरमुऱ्याचे पोते' असे म्हणत. आज तुम्ही त्यांच्या खिशात जाऊन बसला आहात, त्यांची सुपारी घेऊन महाराष्ट्रात सात-आठ ठिकाणी सभा घेणार आहात आणि मराठी माणसाला सांगणार आहात, 'नरेंद्र मोदींनी देश खड्डयात घातला, आता राहुल गांधींना संधी देऊन बघू या.' 'बहुमत मिळूनही मोदींनी देशाची वाट लावून टाकली.' 'मोदी आणि शहामुक्त भारत झाला पाहिजे.' 'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मला वापरून घेत आहेत, एवढा मी वेडा नाही.'

तुम्ही वेड पांघरून पेडगावला निघाला आहात. पण मराठी माणूस मात्र नक्कीचे वेडा नाही. त्याला पक्के माहीत आहे की, महाराजांचा वारसा या देशात मोदी यांनी चालविलेला आहे. महाराज शत्रूंच्या गोटात शिरत आणि वार करीत. लाल महालात ते शिरले आणि शाहिस्तेखानाची बोटे छाटली, अफजलखानाला प्रतापगडाखाली बोलावले आणि त्याचे पोट फाडले. राजापूरची इंग्रजांची वखार खणून टाकली आणि इंग्रजांना पकडून तुरुंगात टाकले. गोव्यात शिरून पोर्तुगीजांना चालते व्हा असा आदेश दिला. त्या जागेला आज फार्मागुडी असे म्हणतात. औरंगजेबाच्या कैदेतून, औरंगजेबाला लाज आणेल अशा प्रकारे पलायन केले.

नरेंद्र मोदी यांनी सतत वार करणाऱ्या पाकिस्तानला दोन जबरदस्त धडे शिकविले आहेत, एक सर्जिकल स्ट्राइक केला आणि दुसरा बालाकोटवर विमान हल्ला केला. तुम्ही आमचा एक मारला, तर आम्ही तुमचे दहा मारू, हा संदेश दिला. त्यांना तीच भाषा समजते. सैन्याला काश्मीरमध्ये मुक्त हस्त दिलेला आहे, त्यामुळे रोज दहशतवादी टिपून मारले जातात.

राज ठाकरे, तुम्ही कोणाचा वारसा घेतला आहे? बाळासाहेबांच्या शिवशाहीचा की राहुल गांधी घराणेशाहीचा? बाळासाहेबांनी कधी घराणेशाही आणलेली नाही. ते स्वत: मुख्यमंत्री झालेले नाहीत, आणि तुम्हाला किंवा मुलाला मुख्यमंत्री केले नाही. राहुल गांधी घराण्याने काश्मीरची जखम आम्हाला दिली आहे. भयानक गरिबीचा वारसा दिलेला आहे. भ्रष्टाचाराची वाहती गंगा दिलेली आहे, शेतकऱ्यामागे साडेसाती लावलेली आहे.

वाईट वाटले, एक उमदा मराठी तरुण, मराठी बाणा जागविण्याऐवजी शरणागतीचा आणि कुर्निसात करण्याचा रिवाज स्वीकारताना, खरोखरच वाईट वाटले. स्वत:चे शिलेदार मैदानात उतरून जर मोदींवर दमदार तोफ डागली असती, तर त्या तोफेला काही अर्थ होता. तिच्या आवाजाचा काही परिणाम झाला असता, पण आज तुम्ही स्वत:लाच पवारांच्या आणि राहुल गांधींच्या तोफेच्या तोंडी दिले आहे. तुम्ही त्यांच्या तोफेचे भक्ष्य झालेले आहात. हा नक्कीच मराठी बाणा नव्हे.

- रमेश पतंगे