ऋतुराज आज वनि आला

विवेक मराठी    11-Apr-2019
Total Views |

पंचज्ञानेंद्रियांना व तनामनाला सुखवणारा ॠतुराज वसंत... जीवनोत्सव, जीवनरस, जीवनछंद, जीवनसंगीत अनुभवण्याची क्षमता राखून असणं हे आयुष्यात वसंत ॠतू अनुभवणं आहे. निसर्गाचं जतन हा एक वसंत ॠतूच आहे.

ॠतू प्राणी, वृक्ष, लता आदींना आल्हादित करतो, तो 'वसंत' ॠतू.

हवेतला गारठा कमी होऊन, वसुंधरा आपल्या नवप्रावरणात सजतेय. तरू-वेलींना नवी पालवी फुटतेय, ही वसंत ॠतूच्या आगमनाची चाहूल आहे.

 

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

 

भगवान श्रीकृष्ण म्हणतात,

'बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्।

मासानांमार्गशीर्षोऽहमृतूनांकुसुमाकर:॥

(श्रीमद्भगवदगीता, विभूति अध्याय 35-अ.10.)

'पृथ्वीवरचा 'कुसुमाकर' म्हणजेच वसंत ॠतू, तो म्हणजे मीच!'

चैत्र महिन्याची व वसंत ॠतूच्या आगमनाची द्वाही देणाऱ्या खुणा रंग, गंध, स्वर यांच्या स्वरूपात दिसताहेत.

चैत्र व वैशाख हे दोन महिने म्हणजे वसंत,ॠतुचक्रातला सर्वोत्तम ॠतू. फळांचा व फुलांचा ॠतू, संवत्सराचं द्वार.

सूर्य उत्तरायणात गेल्यावर शिशीर (माघ, फाल्गुन),वसंत व ग्रीष्म या तीन ॠतूंचा आयुर्वेदाच्या ॠतुचर्येनुसार असलेला आदान काल सुरू होतो. सूर्यकिरणांच्या तीव्रतेमुळे हवेतल्या कोरडेपणामुळे, तीक्ष्णपणामुळे पृथ्वीचा जलांश शोषला जाऊन निसर्ग, प्राणिमात्र व चराचरातलं बल खेचलं जातं, म्हणूनहा काल 'आदान काल'.

फाल्गुनात झालेल्या पानगळीने उघडे पडलेले लता, वृक्ष चैत्रात आपापला जीवनरस एकवटून बाहेर ओतायला सुरुवात करतात. या जीवनरसाचं चैतन्यात रूपांतर होऊन कोवळया पालवीची चाहूल लागते. साऱ्या सृष्टीत रंग, गंध व स्वर यांचा उत्सव सुरू होतो. हा ॠतू सूर्याचा, पण तितकाच चैतन्याचाही. होरपळून टाकणाऱ्या ग्रीष्माचा दाह कमी करण्यासाठी निसर्ग अतोनात धडपड करतो. चराचराला शांतवण्यासाठी अनेक वृक्ष ईश्वरी हातांसारखे फुलून येतात.

ज्ञानेश्वर माउलींनी म्हटलंय -

जैसे ॠतुपतीचे द्वार। वनश्री निरंतर।

वोलगे फळभार। लावण्येसी।

खरंच, हे फुलांचं वैभव बघणं म्हणजे 'मनाने श्रीमंत होणं.' हे वसंतवैभव पाहताना रोजचा दिवस सुगंधी होऊन जातो.

महाकवी कालिदासांनी 'ॠतुसंहार' या काव्यरचनेत वसंत ॠतूला 'हातात प्रेमाचं धनुष्य घेतलेला योध्दा' म्हटलंय. ॠतुसंहारमध्येच वसंत ॠतूचं शब्दचित्र रंगवताना कालिदास म्हणतात, 'सर्वं प्रिये चारुतरंवसंते' - वसंतात सर्व काही सुंदर व मधुर भासते.

हेमंत व शिशिर या आधीच्या ॠतूंमध्ये पक्ष्यांच्या स्थलांतरांमुळे वातावरण सामसूम, उदास होतं. वसंत ॠतू येताच वातावरणाचा कायापालट होतो.

कडुनिंबाची झाडं सतेज पर्णसंभाराने व मोहोराच्या सुगंधाने वसंताचं स्वागत करतात. कोवळया सूर्यकिरणांमुळे तांबूस-सोनेरी नवपालवी झळाळून उठते.

पहाटेपासून पक्ष्यांच्या किलकिलाटाने आसमंत भरतो. तार सप्तकातल्या पंचम स्वरात गाऊन सर्वांना 'ॠतुराज आज आला' असं सांगणारा कोकीळ. शेपटीचा सुंदर पंखा पसरून नाचण गात नर्तन करतो. फांदीवर बसलेला हळद्या पक्षी पिवळयाधमक रंगाने चमकतो. हा काळ कामसू कावळयांच्या फांद्यांच्या सुकलेल्या काडया, गवत शोधून घरटी बांधण्याचा.

या काळात फुलणारे अनेक वृक्ष. बहावा भरभरून बहरला की त्या बहराला अंगाखांद्यावरून सोनपिवळया पुष्पमाला दागिन्यांसारखा मिरवणारा भारतीय वृक्ष. म्हणूनच ॠग्वेदात त्याला 'राजवृक्ष' म्हटलंय.

गुलमोहोराची नाजूक पोपटी पालवी व लाल, किरमिजी, नारिंगी रंगाचे सुंदर फुलोरे यांची विरोधी रंगसंगती डोळयांचं पारणं फेडते.

या ॠतूत फुलणारे काही परदेशी वृक्ष. पांढरा चाफा, पिवळया फुलांचा पेल्टोफोरम, नारिंगी फुलांचा सिल्व्हर ओक, निळा-जांभळा जॅकरांडा वा नीलमोहोर.जॅकरांडा मूळचा दक्षिण अमेरिकेतला वृक्ष. वसंत ॠतूतच फुलायला सुरुवात करून ग्रीष्मातही फुलत राहणारा. जॅकरांडा बहरला की झाड निळया-जांभळया, नाजूक, तजेलदार व उत्साहवर्धक फुलांच्या तुऱ्यांनी डोलू लागतं.

ज्याला चुकीने लाल शिरीष म्हणतात, तो गुलाबी फुलांचा रेन ट्री मूळचा ब्राझिलचा. वसंतातच बहरायला सुरुवात होणारी शिरिषाची पोपटी पालवी व सुंदर, नाजूक गुलाबी फुलं सुखावतात.

या दिवसात पळस फुलल्यावर झाडं लालसर ज्वाळांनी उजळल्यासारखी दिसतात.

'पलाशमुकुलभ्रांत्याशुकतुंडेपतत्यलि:।

सोऽपिजंबूफलभ्रांत्या तमिल धतृर्मिच्छति?'

पोपटाची चोच पाहून 'ही पळसाची कळीच आहे' या समजुतीने भुंगा मधुप्राशन करण्यासाठी पोपटाच्या चोचीतच शिरतो आणि 'हे जांभूळचआहे' असं समजून पोपटही त्या भुंग्यास खाण्यासाठी धरू पाहतो.. असा संस्कृत श्लोक.

काटेसावरीची किंवा शाल्मलीची लाल पाकळयांची मोठी फुलं त्याच्या मधोमध असलेल्या गुलाबी-पांढरट केसरामुळे आकर्षक दिसतात.

वसंतात बेभानपणे फुलणाऱ्या झाडांमध्ये निसर्ग बहुतांश लाल-पिवळा रंग भरभरून उधळत असताना हळूच नाजूक गुलाबी, जांभळा रंग दिसू लागतो. 'प्राइड ऑॅफ इंडिया' हे इंग्लिश नाव असणारं, मराठीत 'तामण' म्हणून ओळखलं जाणारं हे झाड.. सुंदर जांभळा मोहोर मिरवणारं, महाराष्ट्राचं राज्यपुष्प म्हणून सन्मानित झालंय.

चैत्रातल्या सरत्या पुष्पोत्सवानंतर ग्रीष्मातही तामणीचं मध्यम आकाराचं झाड जांभळट, गुलाबी फुलांनी बहरून येतं.

असा हा पंचज्ञानेंद्रियांना व तनामनाला सुखवणारा ॠतुराज वसंत... जीवनोत्सव, जीवनरस, जीवनछंद, जीवनसंगीत अनुभवण्याची क्षमता राखून असणं हे आयुष्यात वसंत ॠतू अनुभवणं आहे. निसर्गाचं जतन हा एक वसंत ॠतूच आहे.

सर्वच ॠतूंमधून जीवनाचं प्रतीक दिसतं. जीवनाच्या बऱ्या-वाईट कालावधीत नेटाने तग धरून राहता आलं पाहिजे, निसर्गासारखं.

वसंतानंतर येणारा ग्रीष्म.. आयुष्यातही ॠतुचक्र चालूच असतं. सर्व ॠतूंकडे समभावाने बघता यायला हवं.

'जन्मणारा प्रत्येक क्षण शेवटास ढळतो, तरीही वसंत फुलतो.'

pourohitamita62@gmail.com