नेपाळकन्या

विवेक मराठी    11-Apr-2019
Total Views |

सांस्कृतिकदृष्टया भारताशी एकरूप असलेल्या नेपाळमधून काही कन्या भारताच्या स्नुषा होऊन आल्या, भारताच्या झाल्या, भारताचे सौभाग्य लिहित्या झाल्या आणि भारतात वंदनीय झाल्या! अशा या नेपाळकन्यांविषयी.

 

हिमालयाच्या तळटेकडयांचा (foothillsचा) भाग म्हणजे अरुणाचलपासून अगदी पाकिस्तानपर्यंतचा. त्यामध्ये भूतान, सिक्किम, नेपाळ, उत्तराखंड आणि हिमाचलचा भाग येतो. हिमालयाच्या अतिउंच व दुर्गम भागातील रहिवाशांविषयी भारतीय कथा-साहित्यात खूप मजेदार कल्पना आढळतात. इथे किन्नर, गंधर्व, यक्ष, विद्याधर, राक्षस, किरात, नाग आदी लोक राहत असत. अतिशय बलवान असलेल्या नाग लोकांच्या कथा महाभारतात येतात. त्यापैकी गंधर्व आणि विद्याधर यांच्याकडे विशेष अशी उडायची शक्ती होती. आकाशातून पुष्पवर्षाव करणारे गंधर्व आणि विद्याधर शिल्पातून, चित्रातून दिसतात. तसेच गंधर्व गायनकलेत प्रवीण असल्याने, आजही गायनाशी 'गंधर्व' नाव जोडले जाते. नंतरच्या काळात चित्रगुप्त नावाच्या गंधर्वाकडे पाप-पुण्याचा हिशोब ठेवायचे कामसुध्दा दिल्याचे दिसते. कालिदासाच्या मेघदूतमधील शापित यक्ष किंवा हर्षवर्धनच्या नागानंदमधील विद्याधर राजपुत्र किंवा कथासरित्सागरमधील विद्याधर नरवाहनदत्त हे कथा-साहित्यात प्रसिध्द असलेले हिमालय रहिवासी. पण सर्वात प्रसिध्द आहे यक्ष कुबेर! धनसंपत्तीचा देव. हातात नाण्यांची थैली घेतलेल्या गुटगुटीत कुबेराची प्रतिमा शिल्पांतून पाहायला मिळते. तसेच कुबेर हा उत्तर दिशेचा रक्षक देव आहे.   

महाभारतात हिमालयातील किरात नावाच्या लोकांचा उल्लेख येतो. उत्तम शिकारी असलेल्या किरातांचे मुख्य शस्त्र म्हणजे धनुष्यबाण आणि शूल होते. थंड ठिकाणी राहत असल्याने ते प्राण्यांचे कातडे पांघरत असत. किरातवेष धारण केलेल्या शिवाचे आणि अर्जुनाचे युध्द महाभारतात वर्णिले आहे. तसेच महाभारताच्या युध्दात किरातांची एक तुकडी दुर्योधनाच्या बाजूने लढली होती असे कळते.

हा हिमालयातील प्रांत, आजचा नेपाळ हा भारतापेक्षा सांस्कृतिकदृष्टया फार काही वेगळा नाही. नेपाळ हे मुघल आणि ब्रिटिश सत्तांचा स्पर्श न झालेले भारतीय राज्य होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. येथील हिंदीसारखी बोली असलेली नेपाळी भाषा, मुख्यत्वेकरून हिंदू व बौध्द धर्मीय लोक, भारतासारखेच पंचांग, सण आदी इथे दिसते. नेपाळ व त्याला लागून असलेल्या उत्तर प्रदेश व बिहार या प्रांतांमधील interactions खूप जुन्या आहेत. विदेह, कोसल, लिच्छावी, वज्जी यासारख्या प्राचीन राज्यांचा काही भाग आजच्या नेपाळमध्ये व काही भारतात होता.

नेपाळमधून विवाहोत्तर भारतात आलेल्या काही कन्या पाहू. या कन्या भारताच्या स्नुषा होऊन आल्या, भारताच्या झाल्या, भारताचे सौभाग्य लिहित्या झाल्या आणि भारतात वंदनीय झाल्या!

रामायणातील जनकतनया सीता ही या यादीतील आद्य नेपाळकन्या. या मिथिलेच्या राजकन्येचा विवाह अयोध्येच्या राजा रामाशी झाला. वेळ आली तेव्हा ही अयोध्येची राणी क्षणाचाही विचार न करता, सर्व सुखांचा त्याग करून रामाबरोबर वनवासात गेली. आधी ती हट्टाने रामाच्या मागे मागे गेली आणि तिच्याशिवाय राहू न शकणारा राम नंतर हट्टाने तिच्या मागून येतो. 'सियावर रामचंद्र की जय' असो, 'जय जय सीताराम' असो किंवा 'जानकी जीवन स्मरण जय जय राम' हा जयजयकार असो, सीतेचे नाव घेतल्याशिवाय रामनाम पूर्ण होत नाही. आपल्या आचरणाने देवत्वाला पोहोचलेली सीता मंदिरातून, अभिजात साहित्यातून, लोकगीतातून पदोपदी भेटते.

दुसरी नेपाळकन्या रामायणानंतरच्या महाभारतात भेटते, ती म्हणजे हिडिंबा. ही हिमालयातील आदिवासी लोकांतील राजकन्या असावी. तिचा विवाह कुंतीपुत्र भीमाशी झाला होता. हिडिंबेने संकटात असलेल्या पांडवांना आश्रय दिला. पुढे महाभारताच्या युध्दात तिचा पुत्र घटोत्कचाने महत्त्वाची भूमिका वठवली. हिमाचल प्रदेशात हिडिंबेची पूजा केली जाते, तिचे मंदिरही पाहायला मिळते. उत्तर प्रदेश, बिहारच्या भागात हिडिंबापुत्र घटोत्कचसुध्दा लोकप्रिय होता असे दिसते.  

महाभारतानंतर आपण बौध्दकाळात येतो. इ.स.पूर्व 6व्या शतकात नेपाळच्या देवदह राजाची कन्या माया देवी शाक्य घराण्याची सून होऊन आली. कपिलवस्तूचा राजा शुध्दोधनशी हिचा विवाह झाला. संपूर्ण जगावर आपली जादू पसरवणाऱ्या गौतम बुध्दाची ही आई! बौध्द साहित्यातून ती मृत्युपश्चात स्वर्गात गेली व गौतम बुध्द तिला भेटायला स्वर्गात गेला, अशा कथा येतात. अनेकानेक बौध्द शिल्पांत तिचे चित्रण केलेले दिसते. अमरावती येथील दुसऱ्या शतकातील या शिल्पात माया देवीच्या डोहाळजेवणाचे चित्रण केले आहे. डावीकडे खुर्चीत ती बसली असून, कोणी सखी तिच्या पायात दागिने घालत आहे, कोणी दासी वस्त्र घेऊन उभी आहे आणि कोणी दागिने घेऊन आल्या आहेत. तर उजवीकडे तिचा पती, राजा शुध्दोधन सीमंतोन्नयन संस्कारासाठी आला आहे.

बुध्दानंतर आपण येतो समृध्द अशा गुप्त काळात. इ.स. चौथ्या शतकात. त्या वेळी मगध म्हणजे आजचा साधारण बिहारचा प्रदेश, येथे गुप्त राजे राज्य करत होते. गुप्तांचा राज्यकाल हा भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळात कला, साहित्य, स्थापत्य, गणित, खगोलशास्त्र अशा सर्व शाखांमध्ये भरभराट झालेली दिसते. गुप्त राजा घटोत्कचाचा मुलगा - चंद्रगुप्त गुप्त (पहिला). लिच्छावी राजकन्या कुमारदेवी हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. कुमारदेवीचे राजघराण्यात बरेच प्रस्थ असावे असे दिसते. कारण चंद्रगुप्तने काढलेल्या काही नाण्यांवर दोघांचे चित्र आहे. तसेच या नाण्याच्या मागच्या बाजूला 'लिच्छावया:' असे लिहिले आहे. या वैवाहिक संबंधाने चंद्रगुप्ताला मिळालेल्या लिच्छावींच्या पाठिंब्यामुळे त्याला राज्याच्या सीमा वाढवायला मदत झाली असावी, असे इतिहासकारांचे मत आहे.

चंद्रगुप्त व कुमारदेवी यांचा मुलगा समुद्रगुप्त पुढे गादीवर आला. भारतातील थोर राजांपैकी एक. याने उत्तर व दक्षिण दिग्विजय करून गुप्त साम्राज्याची सीमा पंजाबपासून आसामपर्यंत व हिमालयापासून विंध्य पर्वतांपर्यंत नेली. या दिग्विजयानंतर त्याने लिहिलेल्या प्रशस्तीमध्ये तो स्वत:ला अभिमानाने 'लिच्छावी दौहित्र' म्हणजे लिच्छावी कन्येचा पुत्र म्हणवतो. 

आर्ष साहित्यात, सोन्याच्या-चांदीच्या नाण्यांवर आणि मंदिरांतून भेटणाऱ्या या नेपाळच्या कन्या. भारताचे मंगल इच्छिणाऱ्या आणि भारताचे कल्याण करणाऱ्या माता!