म.गांधी आणि संघ

विवेक मराठी    16-Apr-2019
Total Views |

लेखक - डॉ. मनमोहन वैद्य

(सहसरकार्यवाह रा.स्व. संघ)


30 जानेवारी 1948 रोजी सरसंघचालक श्रीगुरुजी मद्रासमधील एका कार्यक्रमात होते, त्या वेळी त्यांना गांधीजींच्या मृत्यूची वार्ता कळली. त्यांनी लगेच पंतप्रधान पं. नेहरू, गृहमंत्री सरदार पटेल आणि गांधीजींचे पुत्र देवदास गांधी यांना टेलिग्रामद्वारे आपला शोकसंदेश पाठवला.  तसेच  गांधीजींविषयीच्या आदरापोटी त्यांच्या मृत्यूचा शोक व्यक्त करण्यासाठी 13 दिवसांपर्यंत संघाचे दैनंदिन कामकाज स्थगित करण्याची सूचना त्यांनी देशभरातील स्वयंसेवकांना दिली.  

 निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्व पक्ष आपापल्या संस्कृती आणि परंपरेनुसार निवडणुकीची भाषणे देत आहेत. एका पक्षाचा नेता म्हणाला, या निवडणुकीत गांधी आणि गोडसे यांच्यापैकी एकाची निवड करायची आहे. मी एक गोष्ट पाहिली आहे की, गांधीजींचे खरे अनुयायी आपल्या आचरणावर अधिक लक्ष देतात, ते कधी गोडसेंचे नावही घेत नाहीत. संघातही गांधीजींविषयी अनेकदा चर्चा झाल्याचे पाहिले आहे, पण गोडसेंच्या नावाची चर्चा कधी ऐकली नाही. परंतु ज्या लोकांचा गांधीजींच्या आयुष्याशी आणि विचारधारेशी दूरदूरपर्यंत संबंध नाही, असे लोक आपल्या राजकीय स्वार्थाच्या हेतूने गांधीजींना अधोरेखित करण्यासाठी गोडसेंचे नाव वारंवार घेतात. एरव्ही हे लोक असत्याचा आणि हिंसेचा आधार घेतात आणि आपल्या राजकीय फायद्यासाठी गांधीजींच्या नावाचा वापर करतात.   

 

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

 एका दैनिकाचे संपादक, जे संघस्वयंसेवकही आहेत, ते म्हणाले की एका गांधीवादी विचारवंतांचे लेख आमच्या दैनिकात प्रकाशित होत आहेत. त्या संपादकांनी पुढे सांगितले की लेख लिहिण्याविषयी बोलणे सुरू असताना या गांधीवादी विचारवंतांनी सांगितले की संघाचे आणि गांधीजींचे संबंध कशा प्रकारे होते हे मला माहीत आहे. तरीही मी त्यातील कोणाला फारसे माहीत नसलेल्या मुद्दयांवर लिहीन. हे ऐकून मी त्यांना विचारले की संघ आणि गांधीजी यांचे संबंध कसे होते, हे त्यांना खरेच माहीत आहे का? लोक काहीही माहीत नसताना, कोणताही अभ्यास न करता आपली धारणा तयार करतात. संघाविषयी तर अनेक विद्वान, स्वत:ला स्कॉलर म्हणवणारेही पूर्ण अभ्यास करण्याचे कष्ट न घेता किंवा निवडक अभ्यास करून त्याआधारे किंवा एका विशिष्ट दृष्टीकोनातून लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास करून आपले 'विद्वत्तापूर्ण' विचार व्यक्त करतात. परंतु या विचारांचे सत्याशी काही घेणे-देणे नसते.

महात्मा गांधीजींची काही मते संघाला पटत नसतानाही संघाशी त्यांचे संबंध कसे होते, याबाबत उपलब्ध माहितीवर नजर टाकली पाहिजे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुध्दच्या संघर्षात व्यापक जनाधार तयार करण्याच्या शुध्द हेतूमुळे त्यांनी मुस्लिमांच्या कट्टर आणि जिहादी मानसिकतेसमोर शरणागती पत्करली. ही बाब मान्य नसली, तरी स्वातंत्र्य आंदोलनात सर्वसामान्य लोकांना सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी चरख्यासारखे सहज उपलब्ध साधन आणि सत्याग्रहासारखा सहज स्वीकारार्ह मार्ग दिला, ही त्यांची महानता आहे. ग्राम स्वराज्य, गौरक्षा, अस्पृश्यता निवारण आदी त्यांचे आग्रहाचे विषय लक्षात घेतले तर भारताच्या मूलभूत हिंदू चिंतनाविषयी त्यांना असलेली आत्मीयता आणि त्याविषयीचा त्यांचा आग्रह यांचे महत्त्व कोणी नाकारू शकत नाही. त्यांचे स्वत:चे मूल्याधारित जीवन त्यांच्या अनुयायी तरुण-तरुणींना आजीवन व्रतधारी बनून समाजाची सेवा करण्याची प्रेरणा देणारे होते.

1921चे असहकार आंदोलन आणि 1930चे सविनय कायदेभंग आंदोलन या दोन्ही सत्याग्रहात डॉक्टर हेडगेवार सहभागी होते. यासाठी त्यांना 19 ऑगस्ट 1921 ते 12 जुलै 1922पर्यंत आणि 21 जुलै 1930 ते 14 फेब्रुवारी 1931पर्यंत दोन वेळा सश्रम कारावासाची शिक्षाही भोगावी लागली होती. महात्मा गांधींना 18 मार्च 1922 रोजी सहा वर्षांची शिक्षा झाली होती. तेव्हापासून त्यांच्या सुटकेपर्यंत प्रत्येक महिन्याची 18 तारीख 'गांधी दिन' म्हणून साजरी केली जात होती. 1922च्या ऑक्टोबर महिन्यात 'गांधी दिना'च्या औचित्यावर डॉ. हेडगेवारांनी केलेल्या भाषणात ते म्हणाले की ''आजचा दिवस अतिशय पवित्र आहे. महात्माजींसारख्या पुण्यश्लोक पुरुषाच्या सद्गुणांचे श्रवण आणि चिंतन करण्याचा हा दिवस आहे. स्वत:ला त्यांचे अनुयायी म्हणवण्यात अभिमान बाळगणाऱ्यांच्या शिरावर तर त्यांच्या सद्गुणांचे अनुकरण करण्याची विशेष जबाबदारी असते.''

1934 साली वर्धा येथे श्री जमनालाल बजाज यांच्याकडे गांधीजींचे वास्तव्य होते, तेव्हा जवळच संघाचे हिवाळी शिबिर सुरू होते. उत्सुकतेपोटी गांधीजी तिकडे गेले. पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आणि स्वयंसेवकांशी त्यांचा संवादही झाला. संवादादरम्यान त्यांच्या लक्षात आले की शिबिरातील काही स्वयंसेवक अनुसूचित जातीतील असून त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सगळे बंधुत्वाच्या भावनेने एकत्र राहतात, सर्व कार्यक्रम एकत्र करतात, तेव्हा त्यांना आनंद झाला.

स्वातंत्र्यानंतर जेव्हा दिल्लीतील भंगी कॉलनीत गांधीजींचे वास्तव्य होते, तेव्हा समोरच्या मैदानात संघाची प्रभात शाखा चालत असे. सप्टेंबरमध्ये गांधीजींनी प्रमुख स्वयंसेवकांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली. त्या वेळी गांधीजी त्यांना म्हणाले, ''अनेक वर्षांपूर्वी मी वर्धा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका शिबिरात गेलो होतो. त्या वेळी संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार जिवंत होते. स्वर्गीय जमनालाल बजाज मला त्या शिबिरात घेऊन गेले होते. त्या शिबिरातील लोकांमधील कडक शिस्त, साधेपणा आणि स्पृश्यास्पृश्यतेला दिलेली पूर्ण समाप्ती हे पाहून मी प्रभावित झालो. तेव्हापासून संघ खूप मोठा झाला आहे. माझे तर कायमच हे मानणे असते की, जी संस्था सेवा आणि आत्मत्याग यांसारख्या आदर्शांनी प्रेरित असते, तिची शक्ती वाढतेच.'' हे उद्गार 'गांधी समग्र वाङ्मय', खंड 89मधील पृष्ठ क्र. 2015-17 वर प्रकाशित आहे.


गांधीजींविषयीच्या आदरापोटी त्यांच्या मृत्यूचा शोक व्यक्त करण्यासाठी 13 दिवसांपर्यंत संघाचे दैनंदिन कामकाज स्थगित करण्याची सूचना त्यांनी देशभरातील स्वयंसेवकांना दिली. दुसऱ्याच दिवशी - 31 जानेवारी 1947 रोजी श्रीगुरुजींनी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना एक विस्तृत पत्र लिहिले. त्यात त्यांनी लिहिले की, ''काल मद्रासमध्ये ती भयंकर वार्ता ऐकली की कोणा अविचारी भ्रष्टहृदयी माणसाने पूज्य महात्माजींवर गोळया झाडून या महापुरुषाचे जीवन आकस्मिकरित्या संपवण्याचे निघृण कृत्य केले. हे निंदनीय कृत्य जगासमोर आपल्या समाजाला कलंक लावणारे आहे.''30 जानेवारी 1948 रोजी सरसंघचालक श्रीगुरुजी मद्रासमधील एका कार्यक्रमात होते, त्या वेळी त्यांना गांधीजींच्या मृत्यूची वार्ता कळली. त्यांनी लगेच पंतप्रधान पं. नेहरू, गृहमंत्री सरदार पटेल आणि गांधीजींचे पुत्र देवदास गांधी यांना टेलिग्रामद्वारे आपला शोकसंदेश पाठवला. त्यात श्रीगुरुजींनी लिहीले होते, ''प्राणघातक क्रूर हल्ल्यात एका महान विभूतीची दु:खद हत्या झाल्याच्या बातमीने मला मोठा धक्का बसला. सध्याच्या कठीण परिस्थितीत यामुळे देशाची अपरिमित हानी झाली आहे. या अतुलनीय संघटकाच्या मृत्यूने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्यास आणि त्यामुळे जी जबाबदारी खांद्यावर आली आहे ती पूर्ण करण्यास परमेश्वर आपणास सामर्थ्य देवो.. ''

Justice on Trial नावाच्या पुस्तकात आणि श्रीगुरुजी समग्र या पुस्तकात ही सर्व माहिती उपलब्ध आहे.

6 ऑक्टोबर 1969मध्ये महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दीसमयी सांगलीमध्ये गांधीजींच्या प्रतिमेचे श्रीगुरुजींच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्या वेळी श्रीगुरुजी म्हणाले, ''आज आपण एका महत्त्वाच्या आणि पवित्र दिवसाच्या निमित्ताने एकत्र जमलो आहोत. 100 वर्षांपूर्वी याच दिवशी सौराष्ट्रात एका बालकाचा जन्म झाला होता. त्या दिवशी अनेक बालकांचा जन्म झाला असेल, पण आपण त्या सगळयांची जन्मशताब्दी साजरी करत नाही. महात्मा गांधींचा जन्म कोणत्याही सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे झाला. पण गांधीजी आपली कर्तव्यनिष्ठा आणि अंतकरणातील प्रेम यामुळे परमश्रेष्ठ व्यक्तींच्या श्रेणीत पोहोचले. त्यांच्या जीवनाचा आदर्श आपल्या समोर ठेवून त्यानुसार आपल्या आयुष्याला आकार दिला पाहिजे. त्यांच्या जीवनाचे जितके जास्त अनुकरण आपण करू शकतो, तितके केले पाहिजे.

लोकमान्य टिळकांच्या पश्चात महात्मा गांधींनी स्वातंत्र्याची सूत्रे सांभाळली आणि त्या दिशेने अनेक प्रयत्न केले. शिक्षित-अशिक्षित स्त्री-पुरुषांमध्ये ही प्रेरणा निर्माण केली की इंग्रजांचे राज्य हटवायला हवे, देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे आणि स्व-तंत्राने चालण्यासाठी जे मूल्य द्यावे लागेल ते दिले पाहिजे. महात्मा गांधींनी मातीतून सोने निर्माण केले. सर्वसामान्य लोकांमध्ये असामान्यत्व निर्माण केले. या सर्व वातावरणामुळेच इंग्रजांना जावे लागले.

ते म्हणायचे, मी कट्टर हिंदू आहे. त्यामुळेच फक्त हिंदूंवरच नाही, तर संपूर्ण प्राणिमात्रावर प्रेम करतो. त्यांच्या आयुष्यात आणि राजकारणात सत्याला आणि अहिंसेला जे प्राधान्य मिळाले, ते कट्टर हिंदुत्वामुळेच मिळाले.

ज्या हिंदू धर्माविषयी आपण इतके बोलत असतो, त्या धर्माच्या भविष्याविषयी त्यांनी 'फ्युचर ऑफ हिंदूइझम' या शीर्षकाखाली आपले विचार व्यक्त केले आहेत. त्यांनी लिहिले आहे की, 'हिंदू धर्म म्हणजे न थांबणारा, निग्रहाने पुढे जाणारा, सत्यशोधनाचा मार्ग आहे. आज हा धर्म थकलेला, पुढे जाण्याची प्रेरणा देण्यात साहाय्यक ठरत नसल्याचा अनुभव येत आहे. त्याचे कारण धर्म थकलेला नसून आपण थकलेले आहोत. ज्या क्षणी आपला हा थकवा दूर होईल, त्याच क्षणी भूतकाळात कधीच झाला नाही असा मोठा स्फोट हिंदू धर्मात होईल, इतक्या मोठया प्रमाणात हिंदू धर्म आपल्या प्रभावाने आणि प्रकाशाने जगात चमकून उठेल.' महात्माजींची ही भविष्यवाणी पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे.

देशाला राजकीय स्वातंत्र्य हवे, आर्थिक स्वातंत्र्य हवे. त्याचबरोबर धार्मिक स्वातंत्र्य हवे की कोणी कोणाचा अपमान करणार नाही. भिन्न भिन्न पंथांचे, धर्मांचे लोक एकमेकांसह राहू शकतील. परदेशी विचारांच्या दास्यातून आपली मुक्ती झाली पाहिजे. गांधीजींची हीच शिकवण होती. मी गांधीजींना अनेक वेळा भेटलो आहे. त्यांच्याशी खूप चर्चाही केली आहे. त्यांनी जे विचार व्यक्त केलेत, त्यांच्याच अभ्यासातून मी हे करत आहे. त्यामुळे अंतःकरणापासून मला महात्माजींविषयी नितांत आदर आहे.''

गुरुजी सांगतात, 'महात्माजींशी माझी शेवटची भेट 1947 साली झाली होती. त्याच दरम्यान देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि शासन सूत्र सांभाळायला मिळाल्यामुळे नेते खूश होते. त्याच वेळी दिल्लीत दंगल घडली होती. मी त्या वेळी शांतता प्रस्थापित करण्याचे काम करत होतो. गृहमंत्री सरदार पटेलसुध्दा त्यासाठी प्रयत्न करत होते. आणि त्यात त्यांना यशही मिळाले. अशा वातावरणात माझी महात्मा गांधींशी भेट झाली. महात्माजी मला म्हणाले, ''पहा, हे काय चालले आहे.'' मी म्हणालो, ''हे आपले दुर्दैव आहे. इंग्रज म्हणायचे, आम्ही गेल्यानंतर तुम्ही एकमेकांचे गळे कापाल. आज प्रत्यक्षात हेच होत आहे. जगभरात आपली अप्रतिष्ठा होत आहे. हे थांबवले पाहिजे!'' गांधीजींनी त्या दिवशीच्या प्रार्थनासभेत माझ्या नावाचा उल्लेख गौरवपूर्ण शब्दात केला. माझे विचार लोकांना सांगितले आणि देशाची अप्रतिष्ठा थांबवण्यासाठी प्रार्थना केली. त्या महात्म्याच्या मुखातून माझा कौतुकास्पद उल्लेख झाला हे माझे सुदैव आहे. या सर्व संबंधांमुळेच मी सांगतो की आपण त्यांचे अनुकरण केले पाहिजे.''

मी जेव्हा बडोद्याला प्रचारक होतो (1987-90), तेव्हा सहसरकार्यवाह श्री. यादवराव जोशी यांचे बडोद्यात प्रकट व्याख्यान होते. त्यात श्री यादवराव यांनी महात्मा गांधींचा आदराने उल्लेख केला. व्याख्यानानंतर कार्यालयातील एका कार्यकर्त्याने त्यांना विचारले की आज आपण महात्मा गांधीजींचा आदरपूर्वक उल्लेख केला, तो मनापासून केला होता का? त्या वेळी यादवरावजी म्हणाले की, मनात नसताना बोलायला मी काही राजकीय नेता नाही. जे बोलतो, ते मनापासूनच बोलतो. मग त्यांनी समजावले की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आपण आदर करतो-सन्मान करतो, त्याचा अर्थ असा नव्हे की, त्यांच्या सगळया विचारांशी आपण सहमत असतो. एका विशिष्ट प्रभावी गुणासाठी आपण त्यांचे स्मरण करतो, त्यांना आदर्श मानतो. उदा. पितामह भीष्मांना आपण त्यांच्या कठोर प्रतिज्ञेसाठी नक्कीच मानतो, परंतु भर सभेत द्रौपदीच्या वस्त्रहरणसमयी ते सर्व अन्याय मौन धारण करून पाहत राहिले, त्याचे समर्थन आपण नाही करू शकत. त्याचप्रमाणे कट्टर आणि जिहादी मुस्लिमांच्या नेतृत्वाविषयी गांधींजींचे वागणे पटत नाही. मात्र स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होण्यासाठी जनसामान्यांना त्यांनी दिलेली संधी, स्वातंत्र्यासाठी सामान्यांच्या मनात त्यांनी प्रज्वलित केलेली आग, भारतीय चिंतनावर आधारित त्यांचे अनेक आग्रहाचे विषय, सत्याग्रहाच्या माध्यमातून व्यक्त केला जाणारा जनआक्रोश इ. त्यांचे योगदान नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायक आहे.

या सर्व तथ्यांचा विचार केल्यास संघ आणि गांधीजींच्या संबंधांविषयी टिप्पणी करणे असत्य आणि अयोग्यच म्हटले पाहिजे. ग्रामविकास, सेंद्रिय शेती, गोसंवर्धन, सामाजिक समरसता, मातृभाषेतून शिक्षण आणि स्वदेशी अर्थव्यवस्था तसेच जीवनशैली आदी महात्मा गांधींच्या आवडत्या क्षेत्रांत संघस्वयंसेवक पूर्णपणे सक्रिय आहेत. या वर्षी महात्मा गांधींची 150वी जयंती आहे, त्यानिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र आदरांजली.

 

 

 (अनुवाद : सपना कदम-आचरेकर)