मजबूत अंतर्गत सुरक्षा

विवेक मराठी    17-Apr-2019
Total Views |

सुप्रिया पोतनीस 

गेल्या पाच वर्षांत बाह्य सुरक्षेइतकंच अंतर्गत सुरक्षेकडेही तितकंच लक्ष दिलं गेलंय. अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्यासाठी बऱ्याच काही प्रमुख गोष्टी सरकारने केल्या आहेत. देशाच्या मध्यवर्ती भागापासून ते सीमाभागापर्यंत ही सुरक्षा चोख ठेवण्याचे काम केले आहे.



 जेव्हा धर्म, मंदिरे, भाषा, संस्कृती, स्त्रिया, गाई-वासरे आणि मनुष्यगणासह सर्व सजीवांचे संसार स्वातंत्र्यात बिनघोर नांदत असतात,  तेव्हा त्या राष्ट्राची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था नीट कार्यरत असते असं समजायला हरकत नाही. यासाठी परकीय आक्रमणांपासून देशाला सुरक्षित ठेवणं ही बाह्य सुरक्षा व्यवस्था जितकी गरजेची  असते, तितकीच गरजेची असते अंतर्गत सुरक्षा व्यवस्था. बाह्य सुरक्षेची जबाबदारी संरक्षण मंत्रालयाकडे असते, तशी अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी गृह मंत्रालयाकडे असते.

बाह्य सुरक्षेइतकीच ही अंतर्गत सुरक्षाही तितकीच महत्त्वाची असते. नाहीतर बाहेरून सुंदर दिसणाऱ्या घरात गृहकलह, अशांती असेल तर ते घर आतून पोखरत चाललेलं असतं. आणि मग असं घर ढासळायला बाहेरच्या वादळाची गरजच नसते.

अगदी हेच लक्षात घेऊन परकीय शक्ती घरभेद्यांना हाताशी धरून अनेक रूपांनी ही अंतर्गत सुरक्षा व्यवस्था खिळखिळी करायचा प्रयत्न करत असतात.

आजवर आपण पाहिलं... दहशतवादाने पोळलेलं आणि गिळलेलं राज्य म्हणजे जम्मू आणि काश्मीर.

तर ईशान्येकडची राज्ये ही घुसखोरी, वांशिक चळवळी, 'सीमेपलीकडून' अवैधरीत्या होणारी मादक पदार्थांची तस्करी आणि त्यामुळे वाढलेली संघटित गुन्हेगारी याची बळी होती.

बाकी देशभर सामाजिक सलोखा नष्ट करण्यासाठी आजवर धार्मिक दंगे व भाषिक वाद याबरोबर एक नवीन शत्रू तयार झालाय... नवीन तंत्रज्ञान! मोबाईल, इंटरनेट याचा वापर करून एखाद्या विशिष्ट द्वेषपूर्ण विचारसरणीचा प्रचार केला जातोय.

या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी गेल्या पाच वर्षांत बाह्य सुरक्षेइतकंच अंतर्गत सुरक्षेकडेही तितकंच लक्ष दिलं गेलंय, हे जाणवतं.

अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्यासाठी बऱ्याच काही प्रमुख गोष्टी केल्या गेल्या आहेत, हे अगदी सहज जाणवतं.

1) पाकिस्तानच्या ISISला उंबरठयावर थांबवण्यात यश आलंय. पुरावे गँगसाठी... गेल्या पाच वर्षांत देशभरात एकही बाँबस्फोट झाला नाही.

2) एप्रिल 2016मध्ये 21 नक्षलग्रस्त जिल्ह्यांपैकी 44 जिल्हे सरकारने नक्षलमुक्त घोषित केले. Infra Boost in Naxal Areas हेही याचं प्रमुख कारण.

3) 'नोटबंदी' या विषयावर खूप ऊहापोह झालाय. अर्थतज्ज्ञांच्या बाजूकडून यावर वाद-प्रतिवाद असतील, पण याचा एक जबरदस्त परिणाम झालाय, तो आपण अंतर्गत सुरक्षा याखाली विचारात घ्यायलाच हवा.

आपल्या देशात अनेक खनिजसंपन्न आणि निसर्गसंपन्न राज्य आहेत. डावी विचारसरणी आणि शहरी नक्षलवाद, अतिरेकी करत असलेल्या चकमकी अशा अनेक रूपांतील लांडगे साम्यवादाची झूल चढवून यावर कुऱ्हाड फिरवत होते. थोडक्यात, माओवाद बोकाळला होता.

अतिरेक्यांना माणूसबळ मिळत होतं. बेकायदेशीर शस्त्रं मिळत होती. त्याचे अवैध कारखाने खुलेआम चालू होते.

जहाल डाव्या विचारसरणीचा प्रचार करायला समाजातील वेगवेगळया स्तरांवरील मनुष्यबळ हवं. त्यांना देण्यासाठी हवा अमाप पैसा.

नोटबंदीमुळे या सगळया सिस्टिमचं कंबरडं एका क्षणात मोडूनच गेलं.

4) जम्मू आणि काश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक करणारे,  शाळा, बसेस जाळणारे, मुद्दाम सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारे, देशद्रोही कार्यात सामील होणारे यांना पैसे येत होते हवाला ट्रॅन्झॅक्शनने. JKLFचा नेता यासीन मलिक याचा प्रमुख सूत्रधार. त्याला अटक करून हवालावर चाप बसवण्यात बरंच यश आलं.

5) या पाच वर्षांत अंतर्गत सुरक्षेसाठीचं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं, ते म्हणजे बेलगाम, बेकायदेशीर अशा 14,000हून अधिक NGOsना मिळणारे परदेशी निधींचे परवाने रद्द करून त्यांना चौकशीच्या घेऱ्यात घेतलं.

कारण या NGOsच्या आडून बेकायदेशीर भूसंपादन, धर्मांतरण करून देशाला घातक शक्तींची पाळमुळं घट्ट रोवली जात होती.

अंतर्गत सुरक्षेला किती मोठा धोका होता हा, ज्याला कितीतरी मोठया प्रमाणात आळा घातला गेला.

6) अंतर्गत सुरक्षेसाठी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'सीमा'. आता या सीमेअंतर्गत दोन गोष्टी येतात. एक म्हणजे सीमा सुरक्षा आणि सीमा सीलबंद करणं. गेल्या पाच वर्षांत बऱ्याच ठिकाणी सीमा सीलबंद करण्याचं काम झालंय आणि सुरूही आहे. तसंच सीमेवरच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती अत्याधुनिक रडार, क्षेपणास्त्रांना नष्ट करणारी उपकरणं बसवण्याचं कामही झालंय व सुरूही आहे.

7)  26/11सारखे प्रकार घडू नयेत म्हणून सागरी सुरक्षाही सक्षम केलीय. आणखी अत्याधुनिक उपकरणं, पाणबुडया त्यात सामील होतायत.

8) अंतर्गत सुरक्षेसाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे सीमाभागात विकास योजना कार्यन्वित करणे, जेणेकरून तिथले नागरिक अवैध उद्योगधंदे सोडून चांगलं आयुष्य सुरू करतील. यासाठी ईशान्य भारतात प्रचंड प्रमाणात रस्त्यांचं जाळं विणलंय. मोठे मोठे पूल, विमानतळ बांधलेत. यामुळे पर्यटनाला चालना मिळून तिकडचे लोक अवैध धंदे सोडून वैध, सन्मानाचा पैसा कमावतील. देशाच्या मुख्य प्रवाहात येतील.

आणि दुसरा मुद्दा म्हणजे सीमाभागात रस्ते,  विमानतळ,  पूल यांचं जाळं झाल्यामुळे चीनला धाक बसेल. कारण जर चीनने कुरापत काढलीच, तर सैन्याला तिथे पोहोचायला वेळ लागायचा, तो लागणार नाही. अप्रत्यक्षपणे तिकडचे लोकही मनातून एक प्रकारे समाधानी आणि मुख्य म्हणजे आपणही आता सुरक्षित आहोत या भावनेने आश्वस्त झालेत.

शेवटी अंतर्गत सुरक्षा म्हणजे तरी काय हो ?

काश्मीरमध्ये अतिरेक्यांना संरक्षण देणाऱ्यांपासून,  टुकडे गँगपासून, धर्मांतर करणाऱ्या व विकासकामात मुद्दाम अडथळे आणून पैशासाठी विदेशी शक्तींना देशात पाय रोवून देणाऱ्या खोटया NGOsपासून, पैशासाठी जनतेची दिशाभूल करणाऱ्या, गोध्रासारख्या प्रकरणी जनतेचा आवाज दडपून ठेवून देशद्रोह्यांना हिरो करणाऱ्या तथाकथित पत्रकारांपासून, स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जातीजातीत भडके कसे उडतील हे बघणाऱ्यांपासून, शहरी नक्षलवादाला खतपाणी घालणाऱ्यांपासून या देशाला वाचवणेच की.

गेली पाच वर्षं याचसाठी दिवसरात्र एक करून, अंतर्गत सुरक्षेसाठी परदेशी हितसंबंध मजबूत करण्यासाठी कुणीतरी अहोरात्र झटलंय.

आणि जेवढं शक्य होईल तेवढं देशाच्या मध्यवर्ती भागापासून ते सीमाभागातल्या घरकुलात समाधानाचा आणि मुख्य म्हणजे शांतीचा दिवा तेवत राहील याची काळजी घेतलीय.