संघाच्या वाटेला जाऊ नका

विवेक मराठी    17-Apr-2019
Total Views |

आजम खान यांनी जयाप्रदा यांच्यावर आरोप करताना खाकी चड्डी आणली. खाकी चड्डी हा दोन वर्षांपूर्वी संघाचा ब्रँड होता. आता गणवेशातील खाकी चड्डी गेली आणि आता गडद तपकिरी रंगाची फुल पँट गणवेशात आली. खाकी चड्डीला आता तसा अर्थ राहिलेला नाही. हा कपडयाचा विषय बाजूला ठेवू या. आजम खान यांना निवडणूक प्रचारात संघाला आणण्याचे काही कारण नव्हते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा राजकीय पक्ष नाही. निवडणुकांच्या राजकारणात संघ भाग घेत नाही. संघ भाग घेत नसल्यामुळे संघाचा कुणी अधिकृत उमेदवार नसतो. संघाचे सरसंघचालक आणि सरकार्यवाह असे चुकूनही सांगत नाहीत की, अमुक एका पक्षाला मत द्या आणि अमुक एका पक्षाला मत देऊ नका. याउलट संघ पदाधिकारी सांगतात की, न चुकता मतदान करा, शंभर टक्के मतदान करा, नकारात्मक (नोटा) मतदान करू नका, आपल्याला जो उमेदवार आवडेल त्याला मतदान करा.

  

 सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

संघ ही हिंदूसाठी काम करणारी संघटना आहे. हिंदू संघटन हे संघाचे ध्येय आहे. असे असले, तरी संघ असे आवाहन करीत नाही की हिंदू उमेदवारालाच मत द्या, अन्य धर्माच्या उमेदवाराला मत देऊ नका, त्यांच्याविरुध्द प्रचार करा, देशात फक्त हिंदूचे सरकार असले पाहिजे.... या गोष्टी संघ कधीही सांगत नाही आणि बोलतही नाही.

लोकशाही पध्दतीत नागरिक मतदार असतो. त्याचा धर्म कोणताही असेना का, राज्य कसे चालले पाहिजे आणि कुणी चालविले पाहिजे हे या मतदारांना ठरवायचे असते. आपल्या हिताची धोरणे कोणता पक्ष आखणार आहे आणि कोणता पक्ष आपल्या कल्याणाच्या योजना करील, याचा विचार करून मतदान करणे अपेक्षित असते. तेथे जात, धर्म, प्रांत याचा विचार केला जाऊ नये. लोकशाहीचा हा विचार संघाला मान्य आहे आणि माझा संघाचा अनुभव असा आहे की संघ हा विचार जगत असतो.

राजकीय पक्ष निवडणूक प्रचाराच्या काळात संघाला मध्ये खेचण्याचे काम करतात. इंदिरा गांधी सत्तेवर असताना संघाला राजकीय धुमाळीत खेचण्याचे काम त्यांनी न थकता केले. आज त्यांचा नातू राहुल गांधी आपल्या आजीचा हा वारसा प्रामाणिकपणे चालवीत आहे. या नातवाला इतिहास माहीत नाही की, 1977 साली संघावर जहरी टीका केल्याचा परिणाम म्हणून इंदिरा गांधी यांची सत्ता गेली. जनता संघावरील ही टीका सहन करीत नाही, खरी मानीत नाही आणि खोटे बोलणाऱ्यांना आपल्या परीने शासन करण्याचा प्रयत्न करते.

केंद्र सरकार संघाचा अजेंडा राबवीत आहे, असा आरोप 2014पासून वारंवार झाला. संघाचा अजेंडा कोणता आणि तो कसा राबविला जात आहे, याचे स्पष्टीकरण कुणी करीत नाही. सत्ताबदल झाला की अनेक संस्थांचे पदाधिकारी बदलले जातात, त्या ठिकाणी नवीन माणसे नियुक्त केली जातात, यात गैर काही नसते. माझी नियुक्ती सेन्सॉर बोर्डवर झाली. काही जणांची नियुक्ती विद्यापीठाच्या उपकुलगुरुपदावर झाली. तसेच कला-सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक संस्थांमध्ये नवीन नियुक्त्या झाल्या. या नियुक्त्या करीत असताना गुणवत्ता पाहिली जाते. ज्याच्याकडे त्या कामाची गुणवत्ता नसेल त्याच्याकडे ते काम दिले जात नाही. अशी सर्व माणसे जर संघस्वयंसेवक असतील, तर त्यात संघाचा दोष काय?

माझेच उदाहरण घेऊन सांगायचे, तर माझी नियुक्ती सेन्सॉर बोर्डवर केली पाहिजे, असा संघाने आदेश दिलेला नाही. सरकारमधील बसलेल्या लोकांना वाटले की, हा बोर्डात नीट काम करील, पक्षपात करणार नाही, गैरव्यवहार करणार नाही. यावरून जर कुणी असे आरोप करायला लागला की, संघाच्या आदेशावरून सर्व चाललेले आहे, तर त्याला 'बावळट' हाच शब्द लागू होईल.

काही लोकांना आपल्या संविधानाच्या रक्षणाची खूप चिंता असते, बिचाऱ्यांना रात्री झोपही लागत नसावी. त्यांना असे वाटते की संघ राज्यघटना बदलणार आहे. तो संघाचा छुपा अजेंडा आहे. असे आरोप करणारे कोण आहेत, हे आपण सर्व जाणतोच, म्हणून नावे देत नाही.

मी डॉन क्विक्झोट ही कादंबरी वाचली. ती फार मजेशीर कादंबरी आहे. या कादंबरीत लेखकाने त्या वेळच्या कादंबरी नायकांची भलतीच फिरकी घेतली आहे. हा डॉन क्विक्झोट शिलेदार आहे आणि शिलेदाराच्या गुणधर्माप्रमाणे त्याला सुंदर स्त्रीचे रक्षण करायचे आहे, तिच्यावर प्रेम करायचे आहे, दुष्टांना मारायचे आहे, आणि त्यासाठी तो जिवावर उदार झालेला आहे. घोडयावर बसून तो निघालेला आहे. समोर त्याला पवनचक्की दिसते. हा राक्षस आहे, दुष्ट आहे, त्याला मारलेच पाहिजे, म्हणून तो त्याच्याशी लढाई करायला लागतो.

संविधान बचावाची भाषा करणारे सगळे डॉन क्विक्झोट आहेत. संविधान म्हणजे काय? ते कसे निर्माण होते? का निर्माण होते? कोण निर्माण करते? त्याचे तत्त्वज्ञान कोणते? त्याची अंमलबजावणी कशी होते? संविधानात बदल आणि संविधान सुधारणा याचे अर्थ काय? बदल करणे जवळजवळ अशक्य कसे आहे? आदी सर्व प्रश्नांची माहिती यापैकी कुणालाही जवळजवळ शून्य असते. म्हणून काहीही आरोप ठोकून देण्यात त्यांचे काहीच जात नाही. ज्यांनी डॉन क्विक्झोट होण्याचे ठरविले आहे, त्यांचा सांचो पांजा (डॉन क्विक्झोटचा सेवक) आपल्याला होणे शक्य नाही, म्हणून डॉन क्विक्झोटला पवनचक्कीशी लढाई करू द्यावी.

संविधान ही त्या देशाची कायमस्वरूपी राहणारी कृती असते. आपण जसे कपडे बदलतो, घरातील फर्निचर बदलतो, पादत्राणे बदलतो, तसे संविधान बदलता येत नाही. संविधानाचे अस्तित्व कायमस्वरूपी असते. संविधानाचा विषय सर्वप्रथम राजसत्तेशी येतो. राजसत्ता राबविणाऱ्या राजकीय पक्षांशी येतो. संघ ना राजसत्तेत आहे, ना राजकीय सत्ता राबविणारा राजकीय पक्ष आहे. म्हणून संघाला संविधान बदलायचे आहे हा एकविसाव्या शतकातील महाविनोद समजला पाहिजे.

राजकीय पक्षांना लवकरात लवकर शहाणपण आले पाहिजे की जो सत्तेच्या संघर्षात नाही, त्याला निवडणूक प्रचारात ओढू नये. पक्षाची विचारधारा, पक्षाची सामाजिक व आर्थिक धोरणे, पक्षाच्या नेत्यांचे चारित्र्य इत्यादी विषयांवर निवडणूक प्रचार केंद्रित असला पाहिजे. त्याचबरोबर सामान्य माणसालादेखील निवडणूक साक्षर केले पाहिजे. लोकशाहीच्या संकल्पना त्यांना समजावून सांगितल्या पाहिजेत. संसदीय लोकशाही म्हणजे काय, हे समजावून सांगायला पाहिजे. संघाला आपल्या पध्दतीने काम करू द्या, संघाच्या वाटेला जाऊ नका. संघ काही करणार नाही, पण जनता तुमची वाट लावील.

vivekedit@gmail.com