अर्ध नव्हे, आद्य शक्तिपीठश्री सप्तश्रृंगी देवी

विवेक मराठी    17-Apr-2019
Total Views |

आदिशक्तिपीठे म्हणून ओळख असलेल्या 51 शक्तिपीठांची गणना निरनिराळे इतिहासतज्ज्ञ आपआपल्या परीने करतात. महाराष्ट्रात 108पैकी 4 शक्तिपीठे आहेत, असे ढोबळमानाने म्हटले जाते, पण त्यापैकी केवळ नाशिकची श्री सप्तश्रृंगी देवी आणि कोल्हापूरची श्री अंबाबाई यांचाच 51 शक्तिपीठांमध्ये समावेश होतो. स्वयंभू म्हणजे आद्य शक्तिपीठ असूनही केवळ बोली भाषेत 'आद्य' शब्द उच्चारण्याच्या अडचणीमुळे 'अर्धे' शब्द रुजला. त्यामुळे आपल्याकडे 'साडेतीन शक्तिपीठे' म्हटली जातात.

 महाराष्ट्रातील सर्व धर्मांत पर्यटन रुजलेले आहे. मुसलमान हाजी मलंगला जातात, त्याचप्रमाणे ख्रिस्ती माउंट मेरीला जातात. ख्रिस्ती धर्मातील बाल येशू तर फक्त जर्मनी आणि नाशिक येथेच आहे. शिखांसाठी नांदेड आहे, तर बौध्दांसाठी चैत्यभूमी आहे. हिंदूंसाठी शंकराचे ज्योतिर्लिंग आणि देवीची शक्तिपीठे आहेत. गणपतीची अष्टविनायक मंदिरे आणि पांडुरंगाची वारी तर महाराष्ट्राव्यतिरिक्त कुठेच नाही.

मोदी सरकारमधील सांस्कृतिक कार्यमंत्री महेशजी शर्मा यांनी रामायण सर्किट निर्माण केले. यापूर्वी भारतीय रेल्वेने सुरक्षित आणि किफायतशीर धार्मिक पर्यटन वाढीसाठी विशेष रेल्वे गाडयांतून पॅकेज टूर सुरू केल्या आहेत. रामायण सर्किटमध्ये प्रभू श्रीरामाचे ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य होते, त्या त्या ठिकाणी भेट देणारी पॅकेज टूर सुरू केली. सर्व स्थळांवर पर्यटकांना उत्कृष्ट दर्जाच्या सुविधा मिळाव्यात म्हणून केंद्र सरकारने आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. रामायण सर्किटच्या धर्तीवर शक्तिपीठ सर्किटदेखील सुरू करावे, म्हणून लेखकाने लोकप्रतिनिधींच्या सहयोगाने प्रयत्न सुरू केले आहेत. अष्टविनायक यात्रा शेकडो वर्षांपासून सुरू आहे आणि त्याची मोठी परंपरा आहे.

देवीची शक्तिपीठे

अखंड भारतात आणि आसपास देवीची शक्तिपीठे मोठया संख्येने आहेत. भारत, नेपाळ, बांगला देश, श्रीलंका, पाकिस्तान आणि चीन मिळून एकूण 108 शक्तिपीठे आहेत. त्यातील 51 शक्तिपीठे मानाची आणि महत्त्वाची आहेत. आदिशक्तिपीठे म्हणून ओळख असलेल्या या 51 शक्तिपीठांची गणना निरनिराळे इतिहासतज्ज्ञ आपआपल्या परीने करतात. त्यामुळे साधारणपणे 8-10 स्थानांचा फरक असल्याचे दिसते. महाराष्ट्रात 108पैकी 4 शक्तिपीठे आहेत, असे ढोबळमानाने म्हटले जाते, पण त्यापैकी केवळ नाशिकची श्री सप्तश्रृंगी देवी आणि कोल्हापूरची श्री अंबाबाई यांचाच 51 शक्तिपीठांमध्ये समावेश होतो.

गुरू नानकजींचे जन्मस्थान कर्तारपूर साहेब हे पाकिस्तानात आहे. त्या ठिकाणी भारतीयांना सहज जाता यावे म्हणून ज्याप्रमाणे एक कॉरिडॉर तयार केला जात आहे, त्याचप्रमाणे पाकव्याप्त काश्मीरमधील श्री शारदा शक्तिपीठासाठीदेखील कॉरिडॉर करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

श्री सप्तश्रृंगी देवी

महाराष्ट्रात आदिशक्ती देवीचे अनेक अवतार, अनेक रूपे आहेत. विविध अवतारांत वेगवेगळया शक्ती अंगीकृत केल्याने अनेक शक्तिपीठे स्थापन केली गेली. कोल्हापूरची श्री अंबाबाई म्हणजे महालक्ष्मीचा अवतार आहे. तुळजापूरची श्री भवानीमाता म्हणजे सरस्वतीचा अवतार आहे आणि माहुरची श्री रेणुकामाता म्हणजे कालीचा अवतार. वरील तिन्ही शक्तिपीठे हे धन, ज्ञान आणि शौर्य यांची प्रतीके आहेत. नाशिक जिल्ह्यातील श्री सप्तश्रृंगी देवी ही सर्वगुणसंपन्न आहे. तिच्यात धन, ज्ञान आणि शौर्य असल्याने तिला त्रिगुणी शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. देवीच्या अवतारांमध्ये वरीलपैकी एकच गुण असतो. मात्र श्री सप्तश्रृंगी देवीत लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा या सर्वांचे गुण आहेत.

भारतातील 108 शक्तिपीठांमध्ये श्री सप्तश्रृंगी पीठाचा अपवाद सोडला, तर उर्वरित सर्व शक्तिपीठे माणसाने स्थापलेली आहेत. श्री सप्तश्रृंगी देवी पीठ हे एकमेव स्वयंभू शक्तिपीठ आहे. येथील देवीची मूर्ती सह्याद्री पर्वताच्या काळया कातळातून प्रकट झालेली आहे. अन्य ठिकाणच्या मूर्ती मानवनिर्मित आणि स्थापित आहेत. स्वयंभू म्हणजे आद्य शक्तिपीठ असूनही केवळ बोली भाषेत 'आद्य' शब्द उच्चारण्याच्या अडचणीमुळे 'अर्धे' शब्द रुजला. त्यामुळे आपल्याकडे 'साडेतीन शक्तिपीठे' म्हटली जातात.

श्री सप्तश्रृंगी गड

महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात सीमेजवळ संपूर्ण आदिवासी भागातील कळवण तालुक्यातील श्री सप्तश्रृंगी गड, समुद्रसपाटीपासून 4500 फूट उंचीवर आहे. डोंगरावर एक मोठे पठार आहे, पण त्यावर मोजकी वस्ती आहे. या वस्तीचे गावठाण तयार झाले आहे, परंतु उर्वरित सर्व डोंगर वनखात्याचा असल्याने गावठाणाची हद्द वाढू शकत नाही. येथील गवळी परिवार आणि काही वनवासी हेच मूळ निवासी आहेत. ग्रामपंचायतीची लोकसंख्या साधारणत: 800-850 ग्रामस्थ आणि 250-300 नोकरीनिमित्त राहत असलेले इतकी आहे.

श्री सप्तश्रृंगी मातेचे मंदिर गडापासून आणखी उंचावर आहे. त्यासाठी पायथ्यापासून सुमारे 550 पायऱ्या चढाव्या लागतात. अतिदुर्गम भाग, उंच सुळक्याचा डोंगर, प्राणवायूचे अल्प प्रमाण त्यामुळे अपुऱ्या शारीरिक क्षमता असलेले भाविक, वृध्द, दिव्यांग येण्याचे टाळीत. फार पूर्वी डोंगर पायथ्यापासूनच पायी यावे लागे. त्या वेळी भक्तांची संख्या अल्पच होती. राज्य शासनाने घाट रस्ता बांधल्यापासून वाहने आणण्याची सोय झाल्यामुळे पर्यटक संख्या वाढली. चैत्रोत्सव आणि कोजागिरी पौर्णिमेचा अपवाद सोडल्यास पायी येणाऱ्यांची संख्या रोडावली आहे.

बदलती जीवनशैली, उंचावणाऱ्या अपेक्षा, सहज उपलब्ध झालेला पैसा यामुळे अनेकांना देवीच्या दर्शनासाठी येण्याची इच्छा असूनही केवळ शारीरिक कष्टामुळे येणे शक्य होत नाही. याचा विचार करून महाराष्ट्र सरकारने श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टशी करार करून ट्रस्टच्या जागेत, ट्रस्टसाठी आधुनिक फनिक्युलर ट्रॉली रोप-वेची निर्मिती केली. 'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' या तत्त्वावर हा प्रकल्प योजला आहे. ठेकेदार कंपनी ट्रस्टला स्वामित्वाची रक्कम दर वर्षी देणार होती, परंतु शासनाने त्याऐवजी गावठाणातील काँक्रीट रस्ते, सुलभ शौचालय, पेयजल व्यवस्था, मलनिस्सारण व्यवस्था, भूमिगत गटार आदी बांधून/उपलब्ध करून देणार असल्याचे परस्पर ठरवून ट्रस्टला आर्थिक कोंडीत पकडले.

श्री सप्तश्रृंगी देवीचे उत्सव

हिंदू नवीन वर्षाच्या सुरुवातीला 'चैत्रोत्सव' साजरा केला जातो. या वेळी खान्देशातील आणि मध्य प्रदेशातील लाखो भाविक रोज पायी दिंडीने गडावर येतात. चैत्रातील रखरखते ऊन आणि त्यात पाय पोळणारे डांबरी रस्ते यामुळे या यात्रेची महती सर्वाधिक आहे.

दसऱ्याच्या आधी घटस्थापनेपासून 'नवरात्रोत्सव' साजरा होतो. अनेक महिला गडावर येऊन घटस्थापना करतात. संपूर्ण 9 दिवस इथेच मुक्काम करून दसऱ्याला घरी परततात. कैक कुटुंबांमध्ये पिढयान्पिढया ही परंपरा सुरू होती; परंतु बोकडबळी ही कालबाह्य संकल्पना असून त्यास कोणतेही धार्मिक आधार नसल्याने ती बंद करण्यात आली.

लक्ष्मीपूजनाचा सणदेखील महत्त्वाचा आहे. या दिवशी देवीची सर्व आभूषणे, दागिने पूजेसाठी काढली जातात. सर्व भाविकांना बघण्यासाठी ते ठेवण्यात येतात.

दिवाळीपूर्वीच्या कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव अनन्यसाधारण आहे. या दिवशी तृतीयपंथीयांची जगातील सर्वात मोठी यात्रा भरते. साधारणपणे 50 ते 60 हजार बांधव येतात. त्यांना पाहण्यासाठी तितक्याच मोठया प्रमाणात इतर भाविक येतात. तृतीयपंथीयांचे छबीने, त्यांच्या मिरवणुका, गुरुपूजन, नवीन शिष्यांची दीक्षा समारंभ सर्व काही अद्भुत असते. देशभरातून तसेच विदेशातूनही तृतीयपंथी देवीच्या चरणी लीन होतात.

या व्यतिरिक्त खंडेरायाचा नवरात्रोत्सव आणि शाकंभरी नवरात्रोत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो. धर्म-जात यांच्या पलीकडे जाऊन समस्त मानवांचे रक्षण करण्यासाठी जगदंबेला साकडे घातले जाते.

श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्ट

श्री सप्तश्रृंगी मातेच्या मंदिराची नीट काळजी घेतली जावी, तिथे येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना चांगल्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात म्हणून सन 1961मध्ये श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टची स्थापना करण्यात आली. नाशिकच्या जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या कारभारासाठी समाजातील महत्त्वाच्या घटकांच्या प्रतिनिधींची नियुक्ती केली जाते.

विश्वस्त संस्थेने भाविकांच्या हितसंवर्धनासाठी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. गड परिसर दुर्गम भागात असल्यामुळे भाविकांना मुक्कामाची अडचण होती, त्यावर उपाय म्हणून विश्वस्त संस्थेने मोठमोठया धर्मशाळा बांधल्या आहेत. आज जवळपास 250 सुसज्ज खोल्या आहेत. या सुविधा निर्माण केल्यावर मोठया संख्येने भाविक मुक्कामी येतात. खोल्यांची मागणी सातत्याने वाढते आहे, पण जागेअभावी नवीन धर्मशाळा बांधता येत नाही; परंतु अशी जरी स्थिती असली, तरी खोल्यांचे देणगी शुल्क संस्थेने वाढविले नाही. विश्वस्त संस्थेस मिळणारे उत्पन्न हे भगवतीसाठी आणि नंतर भाविकांसाठीच खर्च झाले पाहिजे, असे विद्यमान विश्वस्तांचे धोरण आहे.

श्री भगवतीच्या दर्शनासाठी फार मोठया प्रमाणात भक्त येतात. वीक-एंडला 20 ते 25 हजारांची असलेली संस्था सलग सुट्टयांच्या काळात आणि पौर्णिमेच्या दिवशी एकदम 45 ते 50 हजारांपर्यंत पोहोचते. नवरात्रात तर हजारात नव्हे, लाखात मोजदाद करावी लागते. अल्प क्षेत्राचे गावठाण, डोंगरमाथ्यावरचा भूभाग, खडकाळ जमीन या व अशा अनेक कारणांमुळे विश्वस्त संस्थेस बऱ्याच पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी मर्यादा आल्या आहेत.

वरील सर्व बाबींचा एकत्रित विचार केल्यावर असे लक्षात आले की, डोंगर पठारावरील बहुतांश जागा वनखात्याची आहे. त्या जागेचा कोणताच वापर करता येत नाही. त्यामुळे पार्किंगची मोठी समस्या आहे. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी उपयुक्त जमीन नाही, त्यामुळे उघडया गटारी आणि दुर्गंधी हे नित्याचेच झालेत. या सगळयाचा परिणाम म्हणून समाजातील गरीब आणि मध्यमवर्गीय घटकच भगवतीच्या दर्शनाला येतात. इतरांना इच्छा असूनही येता येणे शक्य होत नाही. याचे आर्थिक पडसाद म्हणाल तर अल्प देणगी आणि भाविक कमीत कमी वेळ गडावर भाविक थांबणे पसंत करतात, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांचे व्यवसाय बहरत नाहीत. यातून मार्ग काढण्यासाठी मी श्री सप्तश्रृंगी ग्रामपंचायतीच्या विशेष विकास आराखडयाचा अभ्यास केला. नुसता अभ्यास करून थांबण्याऐवजी त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले आहेत.

पर्यटनवाढीसाठी नवीन प्रस्ताव

श्री सप्तशृंग देवी नवसाला पावणारी असल्याने अनेकांचा दर्शन योग हा नवस करण्यासाठी अथवा नवस फेडण्यासाठी असतो. नवस करताना भाविकांच्या मनात केवळ आपल्याला समस्येतून सुटण्याची अपेक्षा असते, पण नवस फेडण्याच्या वेळी मात्र त्याला भौतिक सुविधांची अपेक्षा असते. मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून नगररचना विभागाने जो विकास आराखडा मंजूर केला, त्याखालील बहुतांश मिळकती एकतर वन विभागाच्या आहेत अथवा महसूल विभागाच्या. त्या सरकारी जागेचा जलद विकास करण्यावर भविष्यातील पर्यटनवाढ अवलंबून आहे.

गडावर पोहोचल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला एक मोठे मोकळे पटांगण आहे. ही मिळकत वन विभागाच्या मालकी व कब्जे वहिवाटीत आहे. विकास आराखडयात या जागेवर पार्किंग प्रस्तावित केले आहे. ही जमीन खडकाळ असल्याने येथे गवत उगवणेदेखील दुरापास्त आहे. हे आरक्षण विकसित करणे सहज शक्य आहे. याच्या विकासानंतर गावठाणातील गाडयांची दाटी कमी होऊन रस्ते मोकळे होतील. याच जमिनीच्या दक्षिणेला एका भागात एस.टी. स्टँड प्रस्तावित आहे. हल्लीचे एस.टी. स्थानक ग्रामपंचायतीच्या जागेत आणि अतिक्रमणाच्या विळख्यात हरवले आहे. नवीन स्थानक झाल्यावर एकतर प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळतील आणि दुसरे म्हणजे गावठाण्यातील जागा मोकळी झाल्यावर त्या ठिकाणी भाविकांच्या उपयुक्त सुविधा निर्माण करता येतील.

विश्वस्त संस्थेने गडावरील 1000 एकर वनजमीन वृक्षारोपण करण्यासाठी मागितली आहे. वन विभागाच्या संयुक्त प्रयत्नांवर सदरची योजना आखण्यात आली आहे. या प्रस्तावात सुमारे 500 एकर जागेमध्ये भगवती सागरचा प्रस्ताव असून त्या ठिकाणी वर्षभर पाणी टिकेल असा तलाव बांधून जलसाठा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. अपेक्षित असलेली वनजमीन ताब्यात मिळाल्यावर खास पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता नवीन व्ह्यू पॉइंट्स शोधून विकसित केले जाणार आहेत.

गडावर येण्या-जाण्यासाठी केवळ एकमेव मार्ग उपलब्ध आहे. पावसाळयात तर दरड कोसळून तो बऱ्याच वेळा बंद केला जातो. शिवाय गर्दीच्या अन् यात्रेच्या वेळी मोठी वाहतूक समस्या निर्माण होते. परिणामी भाविकांची संख्या रोडावते. या समस्येवर उपाय काढण्यासाठी लेखकाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना अडचणींची जाणीव करून दिली. त्यांनीदेखील केंद्र सरकारच्या निधीतून नवीन परतीचा घाट रस्ता बांधण्याचा संकल्प सोडून प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. पर्यायी मार्गानंतर वाहतूक सुरळीत चालेल आणि वाहनांना अडचण येणार नाही.

उन्मेष गायधनी

uunmeshgaidhani@gmail.com

0253-2463593