स्वागत नववर्षाचे...  भारताच्या प्रांतोप्रांतीचे

विवेक मराठी    02-Apr-2019
Total Views |

 गुढीपाडवा महाराष्ट्रात साजरा होतो तो नववर्ष स्वागताचा दिवस म्हणून. भारताच्या प्रांतोप्रांती आपापली भौगोलिक, सांस्कृतिक वैशिष्टये जपत नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. चला तर मग, महाराष्ट्राबाहेर चैत्रातच सीमोल्लंघन करू या आणि प्रांतोप्रांतीचे नववर्ष स्वागत अनुभवू या...

 

 मराठी विकिपीडियावर वेगवेगळे लेख संपादित करताना माझ्यातली उत्सुकता कायम वाढत असते. सण-उत्सव हे माझ्या विशेष जिव्हाळयाचे विषय. त्याविषयी लिहिताना, वाचताना मी केवळ लेखिका किंवा संपादिका उरत नाही, तर त्या त्या सण-उत्सवांचा आनंद स्वत: अनुभवून त्या रंगात रंगून जाण्याची प्रक्रियाही मी नकळत अनुभवते. माझ्या या प्रवासाचे तुम्हीही सोबती व्हा.

गुढीपाडवा महाराष्ट्रात साजरा होतो तो नववर्ष स्वागताचा दिवस म्हणून. भारताच्या प्रांतोप्रांती आपापली भौगोलिक, सांस्कृतिक वैशिष्टये जपत नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. चला तर मग, महाराष्ट्राबाहेर चैत्रातच सीमोल्लंघन करू या आणि प्रांतोप्रांतीचे नववर्ष स्वागत अनुभवू या...

 

 सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

आधी दक्षिण भारतात जाऊ या...

या दिवसासाठी घराची स्वच्छता करणे, दारासमोर रांगोळी काढणे, दाराला सुंदर तोरण बांधणे हे दक्षिण भारतातील सर्वच प्रांतांत दिसून येते. नव्या कपडयांची खरेदीही आवर्जून केली जाते.

घरातील देवघरासमोर फुले, फळे यांची आरास करून देवपूजा केली जाते. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. जवळपासच्या देवळात जाऊन दर्शन घेतले जाते. दुपारी शाकाहारी भोजनाचा एकत्रित आनंद घेतला जातो.

दक्षिण भारतात बहुतेक सर्व ठिकाणी एक महत्वाचा विधी नववर्षदिनी केला जातो, तो असा-

आदल्या दिवशी संध्याकाळी घरातील महिला एका सजवलेल्या थाळीत देवासमोर आंबा, केळे, फणस ही फळे मांडतात. सुपारी, विडयाची पाने, सोन्याचा दागिना, पैसे, फुले आणि आरसा मांडून ठेवतात. या थाळीत कृष्णाची किंवा विष्णूची मूर्तीही ठेवली जाते. नववर्षाच्या पहाटे या पवित्र वस्तूंचे दर्शन घेतले जाते.

मंदिरांमध्ये देणगी देणे, गोरगरिबांना दान देणे अशी कृत्ये या दिवशी आवर्जून केली जातात.

'उगादी' हा आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगण प्रांतात साजरा होणारा नववर्ष सण आहे. हिंदू सौर कालगणनेशी संबंधित हा सण सामान्यत: मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो.

उगादी या शद्बात युग असा शब्द आहे. युग म्हणजे नवे युग किंवा शक किंवा कालखंड. नव्या वर्षाची सुरुवात असा याचा अर्थ आहे.

उगादीला स्वयंपाकात पचडी नावाचा विशेष पदार्थ केला जातो. मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले जाते. पचडी या पदार्थात गोड, आंबट, तिखट अशा सर्व चवींचे एकत्रित मिश्रण असते. चिंच, कडुनिंबाची पाने, गूळ, मीठ, कैरी घालून हा पदार्थ तयार केला जातो. येणाऱ्या कडू-गोड आठवणींचे स्मरण राहावे, ही यामागील प्रतीकात्मकता आहे, असे मानले जाते. कर्नाटकात नवीन वर्षाचे पंचांग श्रवण करण्याची पध्दती आहे.

या सणाच्या निमित्ताने आंध्र प्रदेशमध्ये आणि तेलंगणमध्ये भक्षालू हा पुरणपोळीसारखा पदार्थ केला जातो. तो तुपाबरोबर खाल्ला जातो. कर्नाटकात बोब्बाटू नावाचा विशेष पदार्थ केला जातो. पुरणपोळीशी साम्य असणारा हा पदार्थ दूध, तूप किंवा नारळाच्या दुधासह खाल्ला जातो.

तामिळ कालदर्शिकेनुसार सुरू होणारा तामिळनाडूमधील नवीन वर्ष सण आहे 'पुंथंडू'. हिंदू सौर कालगणनेनुसार चैतिराई या तामिळ महिन्यानुसार हा सण साजरा केला जातो. याला 'पुथुवरुषम' असे संबोधिले जाते. ग्रेगोरिअन कालदर्शिकेनुसार हा सण सामान्यत: 14 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो.

प्रसिध्द संगम साहित्यात सूर्याच्या मेष राशीतून भ्रमणाचे संदर्भ मिळतात. सिल्लप्पदिकरम नावाच्या ग्रंथातही या काळातील सूर्याचे भ्रमण आणि त्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या सणाचा उल्लेख आलेला आहे. मणिमेखलई या प्रसिध्द ग्रंथातही या सणाचे उल्लेख सापडतात.

तामिळनाडूमधील नववर्षाच्या पहिल्या दिवशी मदुराई येथील मीनाक्षी मंदिरात मोठया सोहळयाचे आयोजन केले जाते.

'विशू' हा केरळ राज्यातील नववर्ष स्वागताचा दिवस आहे. मेड्डम नावाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी हा नववर्ष आरंभाचा सण साजरा केला जातो. ग्रेगोरिअन कालगणनेनुसार सामान्यत: एप्रिल महिन्याच्या मध्यात चौदा किंवा पंधरा तारखेला हा सण साजरा केला जातो. भौगोलिकदृष्टया वसंत ऋतूशी संबंधित हा विषुववृत्तीय सण आहे.

आता जाऊ या पंजाबात...

'वैशाखी किंवा बैसाखी' हा भारतातील पंजाब येथे साजरा होणारा नववर्ष सण आहे. हा सण शेतात कापणी करण्यावेळी साजरा केला जाते. हा सण 13 किंवा 14 एप्रिलला साजरा केला जातो. वैशाखी किंवा बैसाखी हा शीख आणि हिंदू संप्रदायांचा ऐतिहासिक आणि धार्मिक सण आहे. या दिवशी शीख संप्रदायाचे नवीन वर्षही सुरू होते. इ.स. 1699मध्ये गुरू गोविंद सिंह यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या खालसा पंथाचा स्थापना दिवस म्हणूनही हा दिवस ओळखला जातो. हिंदू धर्मात तसेच शीख धर्मात वसंत ऋतूतील कापणीच्या हंगामाचा दिवस म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहे. हिंदूंमध्ये वैशाखी हा सौर कालगणनेनुसार नव्या वर्षाचा पहिला दिवस मानला जातो.

वैशाखीच्या दिवशी गुरुद्वारांचे सुशोभन केले जाते. कीर्तन, जत्रा यांचे आयोजन होते. मंदिरात जाण्यापूर्वी नदीत वा तळयात स्नान केले जाते. मिरवणुका काढल्या जातात. हिंदू लोक या दिवशी गंगा, यमुना, कावेरी, झेलम अशा पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. मंदिरात दर्शनाला जातात. आप्तमंडळींसह भोजनाचा आनंद घेतात. हिंदू धर्मात हा दिवस विविध नावांनीही ओळखला जातो. श्रध्दाळू व्यक्ती या दिवशी 'कारसेवा' करतात.

शीख समाजाचे लोक या दिवशी शहरात मिरवणूक काढतात. यामध्ये खालसा पंथाचे पारंपरिक वेशातील पाच सदस्य मिरवणुकीचे नेतृत्व करतात. त्यांना 'पंच प्यारा' म्हणतात. रस्त्यातून जाताना लोक गाणी म्हणतात, तसेच पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब यांच्यातील वेच्यांचे उच्चारण/पठण केले जाते. काही महत्त्वाच्या मिरवणुकीत गुरु ग्रंथ साहिबाची प्रतही आवर्जून गौरवाने नेली जाते.

पंजाब प्रांतात सर्वदूर कापणीच्या हंगामाचा काल या दिवसात साजरा होतो. पंजाबातील शेतकरी हा दिवस कृतज्ञता दिवस म्हणूनही शेतात साजरा करतात आणि विपुल अन्नधान्यासाठी देवाला धन्यवाद देऊन प्रार्थना करतात.

पंजाबी महिला-पुरुष या दिवशी पारंपरिक वाद्यांच्या साथीने लोकगीते गातात आणि लोकगीतांचा आनंद घेतात.

भारताचा महत्त्वपूर्ण प्रांत म्हणजे काश्मीर. विविध कारणांनी आक्रमणांचे आणि संघर्षाचे माहेरघर बनलेले काश्मीर मात्र हिंदू नववर्षाचे स्वागत पारंपरिक पध्दतीने करते.

'नवरेह' हा काश्मीरमधील हिंदू पंडितांचा नववर्ष सण आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. वसंताचे स्वागत करणारा दिवस म्हणूनही हा सण ओळखला जातो.

दक्षिण भारतात जशी पवित्र वस्तूंची थाळी सजवली जाते, तशीच ती काश्मिरातही पूजनीय मानतात. फक्त सर्व पवित्र वस्तू दक्षिण भारतासारख्याच ठेवल्या जातात. त्यामध्ये उकळवलेला तांदूळ, आक्रोड अशा गोष्टी काश्मीरमध्ये ठेवल्या जातात. या दिवशी नक्षत्र पत्री म्हणजेच पंचांगाचे विशेष महत्त्व असते. परस्परांना फळे आणि आक्रोड भेट दिले जातात. चार मुखे असलेल्या ब्रह्मा देवतेचे या दिवशी आवर्जून दर्शन घेतले जाते.

निसर्गसमृध्द असे भारताचे नंदनवन म्हणजे ईशान्य भारताच्या सप्तभगिनी. आसामात 'बिहू' हा सण कृषीशी संबंधित आहे.

'रोंगाली किंवा बोहाग बिह' हा आसामातील तीन सणांपैकी महत्त्वाचा आहे, जो आसामी नववर्षाशी तसेच वसंत उत्सवाशी संबंधित आहे.

शेतीचा हंगाम या दरम्यान सुरू होतो. सामान्यत: 14 किंवा 15 एप्रिलच्या आसपास हा सण साजरा होतो. आनंद आणि उत्साह यांनी सात दिवस साजरे केले जातात. शेतकरी तांदळाची लावणी करण्यासाठी या काळात शेताची मशागत करतात आणि सगळीकडे वातावरण आनंदाने भरलेले असते. स्त्रिया या दिवसात भात आणि नारळ घालून केलेले पारंपरिक पदार्थ तयार करतात, ज्यामध्ये ॠतूच्या आगमनाची विशेष चाहूल असते.

पक्वान्ने, संगीत आणि नृत्य यांच्या आनंदात हा सण आसामी लोक साजरा करतात. काही लोक आपल्या घरापुढे तांबे, चांदी इ.ची भांडी टांगतात. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शुभेच्छा देत लहान मुले फुलांच्या माळा घालून गावातील रस्त्यांवरून फिरतात. या बिहूचा सोहळा सात दिवस साजरा केला जातो.

खरे तर नव्या वर्षदिनी संपूर्ण भारताची अशी परिक्रमा करणे शक्य आहे. पण ज्या प्रांतात मी तुम्हाला नेले नाही, अशा प्रांतांमध्ये तुम्ही फेरफटका मारावा आणि तिथल्या नववर्ष आनंदात सहभागी व्हावे अशी इच्छा. मलाही सांगा हं तुम्ही आणखी कोणत्या प्रांतात जाऊन नव्या वर्षाचा आनंद कसा लुटलात ते!

शेवटी काय, तर आपण सारी भारतभूमीची लेकरे. त्यामुळे आपल्या सांस्कृतिक अस्मिता समानच आहेत. तरीही भौगोलिकदृष्टया आपल्या सीमा आपल्याला एकमेकांपासून वेगळे करतात. भाषा, भूषा, भोजन यामध्ये फरक असेल आपल्या, पण तरीही आपली सांस्कृतिक पाळेमुळे एकत्रच घट्ट रुजली आहेत. ती जोपासण्याचा संकल्प आणि शुभेच्छा एकमेकांना देतच येणाऱ्या नूतन संवत्सराचे स्वागत करू या!

(लेखिका धर्मशास्त्राच्या अभ्यासक आणि मराठी विकिपीडियावर संपादिका म्हणून कार्यरत आहेत.)

9422059795