'सशक्त भारत' हीच मतदारांची इच्छा

विवेक मराठी    02-Apr-2019
Total Views |

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. गेली पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत कणखरपणे देश चालवत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाची चांगलीच गोची झाली आहे. देश सशक्त, समर्थ बनण्यासाठी मतदारांपुढे मोदींशिवाय उत्तम पर्याय असू शकत नाही.

 लोकसभेची निवडणूक कोणत्या प्रश्नावर जाणार आहे? हाच प्रश्न वेगळया प्रकारे मांडता येईल की, मतदारांना कोणत्या विषयात अधिक रुची आहे? त्यांच्या भावनेला स्पर्श करणारा विषय या निवडणुकीत आहे का?

मतदारांच्या भावनेला स्पर्श करील असा विषय विरोधी पक्षांना निर्माण करता आलेला नाही. सत्ताधारी पक्षाविरुध्द असा विषय तयार करण्यासाठी त्या पक्षानेच राज्य चालवीत असताना काही घोडचुका कराव्या लागतात. मोदी सरकारने यापैकी काहीही केलेले नाही.

 

 सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

 जनता पार्टीचे सरकार अधिकारावर असताना मोरारजी देसाई आणि चरणसिंग यांच्यात सत्तासंघर्ष सुरू झाला, जनता पक्षातील घटक पक्ष राज्य चालविण्याऐवजी आपापसात भांडू लागले आणि या भांडणातच त्यांचे सरकार कोसळले. प्रचंड बहुमत असताना कोसळले. मतदारांना संदेश गेला की, काम करणारे सरकार हवे, भांडण करणारे सरकार नको. म्हणून त्यांनी इंदिरा गांधींना बहुमताने निवडून दिले.

2013 साली मनमोहन सिंग सरकारची प्रतिमा भ्रष्टाचाराच्या गाळात रुतलेले सरकार अशी झाली. अण्णा हजारेंनी दिल्लीत उपोषण करून सारा देश हालवून सोडला. भ्रष्टाचाराची एकापाठोपाठ एक एक प्रकरणे बाहेर येऊ लागली. मतदारांकडे संदेश गेला की, पैसा खाणारे शासन नको, भ्रष्टाचारमुक्त सरकार पाहिजे. लोककल्याणाची चिंता करणारे शासन पाहिजे. 2014च्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला नाकारले आणि भाजपाला सत्ता दिली.

कणखर नेतृत्व

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांनी अत्यंत कणखरपणे देश चालविला. विकासाच्या विविध योजना राबविल्या. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी, ज्यांना अनुदान मिळते त्यांच्या खात्यात परस्पर रक्कम भरण्याची रचना उभी केली. उच्च स्तरावरील भ्रष्टाचार पूर्णपणे संपविला. रस्ते बांधणी, महागाईवर नियंत्रण, उप्तादनात वाढ, शेतकऱ्यांसाठी विविध सवलतीच्या योजना, शिक्षणात सुधारणा अशा असंख्य गोष्टी मोदी यांनी केलेल्या आहेत. स्वच्छ भारत योजनेअंतर्गत खेडोपाडी शौचालयाची बांधणी केली.

विकास केला म्हणून कुठलीही निवडणूक जिंकता येत नाही. निवडणूक जिंकण्यासाठी लोकांच्या भावनेला स्पर्श करील असे विषय लागतात. 1989 सालापासून भाजपा निवडणुकीत लक्षणीय यश मिळवत चालली आहे, त्याचे कारण रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन आणि त्यातून निर्माण झालेली भावनिक भूमिका. यामुळे भाजपाला मते मिळत चाललेली आहेत. हा मतदार प्रामुख्याने हिंदू आहे, आणि अल्पसंख्याक वर्गातील भारतप्रेमी किंवा भारतभक्त वर्ग आहे. तो मोदींना आणि भाजपाला मतदान करतो.

देशाला दुर्बळ करणारे नेते

या मतदारसंघाचा भावनिक विषय कोणता? या मतदारसंघाचा भावनिक विषय मायावतीचा जातवाद राहू शकत नाही, राहुल गांधीचा घराणेशाहीवाद राहू शकत नाही, अखिलेश यादवचा यादववाद राहू शकत नाही, ममताचा प्रादेशिकवाद राहू शकत नाही आणि चंद्राबाबू नायडूंचादेखील प्रादेशिक वाद राहू शकत नाही. हे सर्व वाद देशाला दुर्बळ करणारे, कमकुवत करणारे आहेत. देश बलवान झाला पाहिजे आणि जगामध्ये त्याची शान मोठया प्रमाणात वाढली पाहिजे, ही या मतदारसंघाची इच्छा आहे. ही त्याची भावनिक गरज आहे.

म्हणून या निवडणुकीचा मुख्य विषय देश विरुध्द प्रादेशिक वाद, घराणेशाही, जातवाद, भ्रष्टाचारवाद असा आहे. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जे सर्व उभे राहिलेले आहेत, ते कोण आहेत? राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी यांना असे वाटते की, आपला जन्म प्रजेवर राज्य करण्यासाठीच झालेला आहे. यामुळे या दोघांनाही विधानसभेची निवडणूक लढली पाहिजे, आठ-दहा वर्ष उमेदवारी केली पाहिजे किंवा महानगरपालिकेची निवडणूक लढली पाहिजे, प्रशासकीय अनुभव घेतला पाहिजे, असे वाटत नाही. आपला जन्मच मुळी पंतप्रधानपदाचा चमचा तोंडात ठेवून झालेला आहे, अशी त्यांची धारणा आहे. आपण लोकशाही जगतो, लोकशाहीत आपण राजे आहोत, राजघराणे मोडीत निघाले आहे, इतकी वर्षे आपल्या मागच्या पिढीने आंधळेपणाने लोकशाही मार्गाने राजघराणे आपल्या डोक्यावर बसविली. तेच पाप आपण करायचं का? असा विचार आताची पिढी करते.

नरेंद्र मोदी यांच्याविरोधात यादव आणि दलित अशा दोन जातींचे राजकारण करणारे अखिलेश यादव आणि मायावती एकत्र आले आहेत. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी एकत्र आलेले आहेत. उत्तर प्रदेशातही जातवाद आणि संप्रदायवाद यांची बेरीज झालेली आहे, त्यांनाही मुसलमानांना जवळ करायचे आहे. यांचे राजकारण समाजाचे जातीपातीत विभाजन करणारे आहे, आणि मुसलमान समाजाला मुख्य राजकीय प्रभावापासून अलग करून त्यांच्या मनात फुटीरतेची बीजे पेरणारे आहे. मुस्लीम फुटीरतावादामुळे देशाची फाळणी झाली. त्या मार्गाने आपल्याला पुन्हा जायचे नाही ही गोष्ट नव्या पिढीच्या मनात पक्की आहे. जातीचे राजकारण समाजात समता निर्माण करीत नाही. समतेचा ढोल वाजविण्याचे काम करते. राजकीय समता निर्माण करायची असेल तर, कोण कुठल्या जातीचा आहे, याचा विचार न करता पक्षाची बांधणी केली पाहिजे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका ठेवायला पाहिजे.

ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबू नायडू यांचे राजकारण घातक वळणावर जाणारे आहे. ममता बॅनर्जींनी केंद्र सरकार विरोधात टोकाची भूमिका घेतली होती. सीबीआयला प्रवेशबंदी केली. घटनात्मकदृष्टया असे करता येत नाही. आपली राज्यघटना प्रादेशिक वादाला आवाजवी महत्त्व देत नाही. आपली राज्यघटना प्रबळ केंद्र सत्तेचा पक्ष घेणारी आहे. राज्य सरकार स्वायत्त आहे, परंतु सार्वभौम नाहीत. एका मर्यादेपलीकडे केंद्र सरकारच्या संस्थांबद्दल त्यांना भूमिका घेता येत नाहीत. घेतल्या, तर त्या देशविरोधी ठरतात. चंद्राबाबू नायडू यांना स्पेशल पॅकेज पाहिजे, आंध्र प्रदेशातील प्रादेशिक भावना भडकविण्याचे काम ते करतात. हा प्रादेशिक वाद देशाच्या एकात्मतेला घातक आहे.

हे सर्व राजकीय पक्ष पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून बालाकोटवर जो हल्ला झाला, त्याचे पुरावे मागत फिरत असतात. सर्जिकल स्टाइक झाला तेव्हादेखील त्यांनी अशीच भूमिका घेतली. या शहाण्यांना हे समजत नाही की, दुसऱ्या देशात जाऊन ज्या कारवाया कराव्या लागतात, त्याची गुप्तता पाळावी लागते. आम्ही इतकी माणसे मारली असे सरकार उघडपणे सांगू शकत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे चांगले परिणाम होत नाहीत. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीनेदेखील याचे परिणाम काय होतील, याचा विचार करावा लागतो.

मोदी एक उत्तम पर्याय

या सर्व विवेचनाचा अर्थ असा आहे की, या लोकसभा निवडणुकीचा मुख्य विषय देश विरुध्द अन्य सर्व गोष्टी. एका बाजूला देशभक्तीची भावना आहे आणि दुसऱ्या बाजूला या भावनेवर आघात करणारे राजकारणी आहेत. एका बाजूला देशासाठी जगणारी राजकीय नेतृत्वाची पलटण आहे आणि दुसऱ्या बाजूला घराण्यासाठी, जातीसाठी, प्रादेशिक अस्मितेसाठी, जगणाऱ्यांची पलटण आहे. एका बाजूला 'भारत तेरे तुकडे होंगे' म्हणणारी फौज आहे आणि दुसऱ्या बाजूला 'भारत अखंड होगा' असे म्हणणाऱ्यांची फौज आहे.

एका बाजूला ही लढाई भावनिक आहे, तशीच ती वैचारिकदेखील आहे. परंतु वैचारिक लढाई सामान्य मतदाराला समजतेच असे नाही. त्याला भारत समजतो. भारतावर सतत आघात करणारा पाकिस्तान समजतो, पाकिस्तानला ठोकून काढला पाहिजे, ही भाषा त्याला समजते. भारतावर सतत दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानची कंबर मोडली पाहिजे, असे सर्व सामान्य मतदाराला वाटते. त्याच्या मनातील इच्छा आहे की, जगाच्या नकाशावरून पापी पाकिस्तानचे नाव कायमचे मिटवून टाकले पाहिजे. आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही सरकारला ते शक्य नाही, पण पाकिस्तानला ठोकून काढणे हे आपल्याला सहज शक्य आहे.

ते काम नरेंद्र मोदी उत्तम प्रकारे करीत आहेत. ते त्यांनी असेच करीत राहिले पाहिजे, हीच मतदारांची इच्छा आहे. या इच्छेविरुध्द जो बोलेल त्याच्याकडे मतदार पाठ फिरविणार आहे. या निवडणुकीचा विषय म्हणून देशभक्ती, भारतभक्ती, सशक्त भारत, समर्थ भारत हा बनत चाललेला आहे. बाकी कोणी कितीही हवा बाण सोडले, तर त्याचा फारसा उपयोग होईल असे वाटत नाही.

vivekedit@gmail.com