श्रेयाच्या आटयापाटया

विवेक मराठी    02-Apr-2019
Total Views |

अक्कड बिक्कड बंबे बो

 

सध्या लोकसभा निवडणूक प्रचाराचे धम्माल वातावरण आहे. या वातावरणात अनेक गमतीशीर वाद, कोपरखळया, चिमटे (प्रसंगी हातघाईच्या लढाया), आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा इ. रोजच्या बातम्यांचे विषय बनतात आणि लोकांचे मनोरंजन करतात. या मनोरंजनात आणखी थोडी भर घालणारं हे नवं विडंबनात्मक सदर खास विवेकच्या वाचकांसाठी.

 
द यनिक गडगडाट प्रतिनिधी : गेल्या आठवडयात DRDOने 'शक्ती' या ऍंटीसॅटेलाईट मिसाईलची यशस्वी चाचणी घेत एका उपग्रहाला खाली पाडलं. या ऐतिहासिक घटनेचे अनेक पडसाद लोकल तसेच ग्लोबल पातळीवर आम्हाला पाहायला मिळाले. ते आम्ही आमच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.

ASAT काय असतं हे माहीत व्हायच्या आधीच नेहमीप्रमाणे देशभरात त्याच्या क्रेडिट खाण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली. पंतप्रधान मोदींनी पाठबळ दिल्यानेच हे मिशन यशस्वी झालं असं म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी हे मोदींचं यश आहे असं जाहीर केलं. तर याउलट नेहरूंनी जर DRDO आणि इस्रोची स्थापना नसती केली तर हे शक्य झालं नसतं, असं म्हणत नेहरूंना क्रेडिट देण्याची मागणी काँग्रेसने केली अन्यथा कोर्टात जाऊन आम्ही ते क्रेडिट घेऊन येऊ  असा धमकीवजा इशारादेखील सत्ताधारी भाजपला दिला.

इंग्लंडच्या पंतप्रधान सुश्री थेरेसाताई मे यांनीदेखील या श्रेयवादाच्या लढाईत उडी मारत म्हटलं आहे की, 'आम्ही जर भारत सोडून गेलो नसतो तर भारताने एवढी प्रगती कधीच केली नसती. म्हणून याचं श्रेय फक्त ब्रिटिशांना दिलं पाहिजे.' यावर जर्मनीचे माजी हुकूमशहा ऍडॉल्फ हिटलर यांनी टि्वट केलं आहे की, 'मी जर दुसऱ्या महायुध्दाला सुरुवात केलीच नसती तर ब्रिटीश दुबळे झाले नसते आणि ते भारत सोडून कधीच गेले नसते. म्हणून 'मिशन शक्ती'च्या यशाचं खरं श्रेय फक्त मलाच आहे.'  

श्रेयवादाची लढाई संपत नाही तोवरच महाराष्ट्रातले सगळयात 'पवार'फुल नेते असलेल्या साहेबांनी हे मिशन त्यांच्याच सल्ल्याने झालं आहे असं प्रतिपादन केलं. नेहमीप्रमाणे प्रसिध्द पेंटर राजू साहेबांनी असलं कुठलं मिशन झालेलं नसून मोदी त्यांच्या प्रचारासाठी खोटं बोलत आहेत असा गंभीर आरोप केला. त्याबरोबर ते हेदेखील म्हणाले की असले छोटे मोठे मॅटर मांडवली करून सेटल करता येत असताना सॅटेलाईट पाडायची काही गरज नाही.

या सगळया राजकीय वादात आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा सेटलकर यांनी त्यांच्या नवीन अंतराळ बचाव आंदोलनाची घोषणा करत अंतराळात जाऊन उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. या मिशनमुळे मुठा नदीच्या प्रवाहाला अडथळा येत असल्याचे सांगत पर्यावरणवादी कार्यकर्ते इसाम्बर चवधरी आणि ऍड. सर्वहप्तादे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे रिकाम्या बॅगा घेऊन धाव घेतली आहे.

यावर आमच्या दयनिक गडगडाट प्रतिनिधींनी शास्त्रज्ञांचं मत जाणून घेण्यासाठी त्यांना फोन केल, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

 - अक्कडबाज

vivekedit@gmail.com