लोकसभेचा मतसंग्राम

विवेक मराठी    20-Apr-2019
Total Views |

* ***संतोष  माळकर****

लोकसभा रणसंग्रामाचे अर्थात मतसंग्रामाचे दोन टप्पे पार पडले आहेत. पुढच्या पाच टप्प्यांसाठी घनघोर प्रचारयुध्द सुरू आहे. आश्वासनांचा धुरळा उडत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, अनेकदा त्याची पातळीही घसरत आहे. पण 2019 सालची ही निवडणूक खोटी आणि दिशाभूल करणारी आश्वासने देऊन जनतेला मूर्ख बनवायची नव्हे, तर अशा पक्षांना आणि उमेदवारांना जनतेकडून मूर्ख बनवण्याची ठरू शकते.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दुसऱ्या टप्प्याचे मतदान झालेले आहे. आणखी पाच टप्पे बाकी असून एक महिना हा उत्सव कायम राहणार आहे. लोकसभा निवडणूक म्हणजे देशाचे भवितव्य ठरवणारा आखाडा. त्यात कोण निवडून येणार यावर पुढील पाच वर्षांत आपला देश कुठल्या दिशेने जाणार हे ठरणार आहे. देशाच्या विकासापासून ते देशाचे संरक्षण आणि दहशतवादापर्यंतचे अनेक मुद्दे निश्चित होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांवर केवळ देशवासीयांचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. विशेषत: मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावरील जे निर्णय घेतले, त्यामुळे देशातील काही लोकांना आणि विशेषत: आपल्या शेजाऱ्यांना मोदी सरकार पुन्हा नको असले, तरीही जगातील अनेक देशांना हे सरकार भारतात सत्तेवर हवे आहे. 

गेल्या एक दशकात देशातील साक्षर मतदारांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. ही साक्षर मतदार जनता विचार करायला लागली आहे. त्यामुळेच तिने 2014 साली देशात कडबोळयाचं सरकार येऊ न देता एका पक्षाला संपूर्ण बहुमत दिलेले आहे. राज्यपातळीवरचे मुद्दे आणि देशस्तरावरील मुद्दे यांच्यामध्ये देशातील जनता फरक करू लागली आहे, त्यामुळे विधानसभेत एका पक्षाच्या बाजूने उभी राहणारी ही जनता, लोकसभेत अन्य पक्षाला मत देताना दिसत आहे. देशपातळीवरील नेतृत्व कोणत्या पक्षाकडे सक्षम आहे, याचे आराखडे बांधून त्यावरून मतदान होताना दिसत आहे. आपले मत निश्चित करताना मीडियाला फारसे गंभीर्याने न घेण्याकडे जनतेचा कल वाढतो आहे. या वेळी तर मतदानाच्या दृष्टीने जनतेने सोशल मीडियाही वगळला असल्याचे दिसून येऊ शकते. त्याऐवजी प्रत्यक्ष अनुभवातून या वेळी देशातील जनता आपले मत ठरवण्याची जास्त शक्यता आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला, तर 2019 सालची ही निवडणूक खोटी आणि दिशाभूल करणारी आश्वासने देऊन जनतेला मूर्ख बनवायची नव्हे, तर अशा पक्षांना आणि उमेदवारांना जनतेकडून मूर्ख बनवण्याची ठरू शकते.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आपल्या एनडीए आघाडीसह निवडणूक रिंगणात आहे. मागील पाच वर्षांत केलेली कामे आणि विरोधकांचा अपप्रचार यातून त्यांना आपले सरकार पुढील पाच वर्षे टिकवायचे आहे, तर मागील पाच वर्षे सत्तेपासून वंचित राहिलेल्या काँग्रेसला या वेळी काहीही करून सत्ता मिळवायची आहे. तर तिसऱ्या बाजूला कोणालाही बहुमत मिळू नये, कोणीही स्वबळावर सत्तेच्या जवळही पोहोचू नये, म्हणजे आपले 20-30 खासदार निवडून आले तरीही पंतप्रधानपद आपल्याला मिळेल, यासाठी देव पाण्यात बुडवून बसलेले कथित सेक्युलर लहान-सहान पक्ष आहेत. या पार्श्वभूमीवर ही लोकसभा निवडणूक रंजक ठरणार आहे. अर्थात मतदाता मात्र रंजकते-बेरंजकतेच्या पलीकडे जाऊन ही निवडणूक आपल्या भवितव्याची कसोटी म्हणून त्याकडे पाहत आहे. 2014 साली देशातील जनतेने भाजपाला बहुमत दिले, त्याचा अर्थच मुळी त्यांनी पाच वर्षे सरकार चालवून दाखवावे हा होता. केंद्रात आघाडीचे सरकार असेल तर देशाचा विकास कसा खुंटतो, हे जनतेने मागील काही सरकारबाबत पाहिले आहे. त्यातच भाजपाने मागील पाच वर्षांत सक्षमपणे सरकार चालवून दाखवलेले आहे. काँग्रेसशिवाय पाच वर्षे सरकार चालवण्यास भाजपा सक्षम आहे, हे सिध्द करून मोदी यांनी जनतेला पर्याय दिला आहे. पुन्हा मागील पाच वर्षांत कोणाच्याही दबावाला बळी न पडता देशहिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे या पातळीवर भाजपा देशातील जनतेच्या आशा-आकांक्षावर खरी उतरली आहे.

देशात सक्षम नेतृत्व असणे हेही तितकेच महत्त्वाचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत आपले नेतृत्व दाखवून दिले आहे. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक असो की नोटबंदीचा निर्णय असो, विद्वानांना आणि विरोधकांना मोदींनी घेतलेल्या निर्णयांची ऍलर्जी असली, तरीही देशातील सर्वसामान्य त्यांच्या बाजूने उभा राहिला आहे. हा देश सक्षमपणे निर्णय घेणाऱ्या नेत्याच्या बाजूने नेहमीच राहिल्याचा इतिहास आहे. मग भले त्या नेत्याला विद्वानांनी हुकूमशहा म्हटले, तरीही देशातील जनतेने त्याची पर्वा केलेली नाही. तसे नसते, तर आणीबाणीनंतर इंदिरा गांधी पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्या नसत्या. सक्षम आणि कठोर नेतृत्वाला या देशाने नेहमीच साथ दिली आहे. त्या पातळीवर भाजपा आघाडीवर आहे. काँग्रेसकडील नेतृत्व दिशाहीन आहे, तर तिसऱ्या आघाडीचे नेते संधिसाधू आहेत. देशात सक्षम नेतृत्व केवळ मोदीच देऊ  शकतात ही भाजपाची जमेची बाजू, तर काँग्रेस आणि कथित सेक्युलर पक्षांची अगतिकता आहे. भाजपाला आणि विशेषत: मोदींना हरवण्यासाठी महाआघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण विरोधकांमध्ये त्यातही एकवाक्यता नाही हे दिसून आले. कर्नाटक सरकारच्या शपथविधी समारंभात स्टेजवर एकमेकांच्या हातात हात घालून फोटो काढणारे त्यानंतर काही दिवसात एकमेकांना शिव्याशाप देऊ लागले. आज मायावती, ममता हे आपला स्ट्राँग होल्ड असलेल्या राज्यात काँग्रेसला सोबत घ्यायला तयार नाही. केरळच्या वायनाडमधून राहुल गांधी निवडणूक लढणार म्हणून डावे, काँग्रेसच्या विरोधात उभे ठाकले आहेत. मोदी हटाव याशिवाय या विरोधकांकडे कोणताही कार्यक्रम नाही.

इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या, तेव्हा त्यांच्या विरोधकांनी इंदिरा हटाव याच एकमेव अजेंडयावर त्यांना हरवण्याचा प्रयत्न केला होता, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. नेमक्या त्याच अवस्थेत सध्या विरोधक आहेत. आश्वासनांचा फोलपणाही आता जनतेच्या लक्षात आला आहे. कोणती आश्वासने पूर्ण केली जाऊ शकतात आणि कोणती नाही, याची सर्वसामन्यांना कल्पना आहे.

आता माझ्याबद्दल प्रत्यक्षात घडलेला प्रसंग सांगतो आणि लेख संपवतो. काही दिवसांपूर्वी मी शेगावला विदर्भ एक्स्प्रेसने निघालो होतो. डब्यात एक फेरीवाली बाई चढली. तिचे वडापाव विकून झाल्यावर ती माझ्याबाजूला जागा असल्यामुळे येऊन बसली. आमच्या राजकारणावर गप्पा सुरू होत्या, त्या ती ऐकत होती. काही मिनिटानंतर न राहून ती म्हणाली, ''साहेब, हे राजकारण खूप वाईट असते, आपण त्यात न पडलेले बरे. तुम्हीही त्यात पडू नका, फक्त योग्य माणसाला मत द्या आणि बाजूला व्हा.'' माझी उत्सुकता वाढली, म्हणून मी तिला म्हटले, ''का?'' तेव्हा ती म्हणाली, ''अहो, कोणी कितीही सांगितले तरीही आपली दु:ख कमी होणार आहेत का? दु:ख कमी नाही झाली तरीही वाढवणार नाही त्याला मत देऊन मोकळे व्हायला हवे.'' देशातील जनता असा विचार करू लागली आहे. या लोकसभा निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब दिसणार, हे निश्चित.