एकपात्री पोपटपंची...

विवेक मराठी    20-Apr-2019
Total Views |

 

सध्या आपल्या देशात लोकशाहीचा पवित्र उत्सव साजरा केला जात आहे. दर पाच वर्षांनी होणारा हा उत्सव विविध कायदे आणि निवडणूक यंत्रणातील सुधारणा यामुळे प्रगल्भ होताना दिसत आहे. प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि हा हक्क बजावताना कोणत्याही दडपणाला, आमिषाला आणि खोटया प्रचाराला बळी पडू नये, अशी निवडणूक आयोगाकडून अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय कुवतीप्रमाणे उमेदवार उभे केले आणि जाहीरनामेही प्रकाशित केले. लोकशाहीचा हा उत्सव 23 मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालानंतर थांबेल. ही लोकसभा निवडणूक आपल्या देशाच्या दृष्टीने महत्त्वाची असून 'विकास विरुध्द घराणेशाही' असेच सध्यातरी तिचे चित्र आहे. त्यामुळे प्रचाराचे वारेही तशाच पध्दतीने वाहताना दिसत आहेत. महाराष्ट्रात मात्र या प्रचारादरम्यान एक बहुरंगी तमाशा जोरदार चालू आहे. त्या तमाशाचे वर्णन करण्यासाठी राज कपूरवर चित्रित झालेल्या 'बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना' या गीताचा आधार घ्यावा लागेल. कारण एकही उमेदवार उभा न करताही प्रचाराच्या रणधुमाळीत स्वतःला झोकून देऊन तमाशा करणाऱ्याला 'दिवाना अब्दुल्ला' नाही म्हणायचे, तर काय म्हणायचे?

महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे स्वप्न घेऊन आपल्या उत्तम भाषणशैलीच्या जोरावर काही यश पदरात पाडून घेणारे राज ठाकरे आता आपल्या राजकीय प्रचाराचा तंबू गावोगावी ठोकत आहेत आणि तापलेल्या राजकीय वातावरणात मतदारांचे मनोरंजन करण्याचा एकपात्री प्रयोग सादर करत आहेत. या प्रयोगाला थोडीफार गर्दी होते, पण ती त्यांच्या समर्थकांची असते की ज्यांच्या वरदहस्तामुळे राज ठाकरे हा एकपात्री पोपटपंचीचा खेळ करतात, त्यांच्या पिट्टयांची असते हे मतदारांना कळत आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ मनोरंजनासाठी अनेक हौशे-नवशे-गवशे या खेळाला हजेरी लावतात. 'लाव रे तो व्हिडिओ' हा एकपात्री कलावंताचा उद्गगार आता सोशल मीडियावर गाजू लागला असून साडी चोरीपासून ते नाशिकच्या नागरिकांनी दिलेल्या नकारापर्यंतच्या विविध चित्रफिती सोशल मीडियावर फिरत आहेत. आता कुणी किणी प्रकरण पुन्हा उकरून काढू नये म्हणजे झाले. सोशल मीडियावर या एकपात्री प्रयोगावर प्रचंड टीका होत असताना राज ठाकरे मात्र नव्या जोशात महाराष्ट्रात फिरत आहेत. आधी यादीत नसलेल्या नाशिकमध्येही म्हणे ते सभा घेणार आहेत. खोटे बोल पण रेटून बोल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापार करून खोटे बोल आणि आपल्याला मिळालेल्या बिदागीचे काम पुरे कर एवढे एकच लक्ष्य सध्या राज ठाकरे यांच्यासमोर आहे. राज ठाकरे यांना मोदी-शहा यांच्या द्वेषाची इतकी कावीळ झाली आहे की ज्यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले, ते त्यांना प्रिय आणि प्रामाणिक वाटू लागले आहेत. ''काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोदींनी आंघोळ केलेले पाणी दोन दोन चमचे प्यायले पाहिजे'' असे जाहीरपणे सांगणारे राज ठाकरे आज मोदी-शहांना आपले शत्रू का मानत आहेत? असा सर्वसामान्य मतदारांना प्रश्न पडतो. पण त्याचे उत्तर राज ठाकरे स्पष्टपणे देत नाहीत. मात्र आपल्या पोपटपंचीत ते ''राहुल गांधींना एकदा संधी द्यायला हरकत नाही'' असे सांगतात. मोदी-शहांनी मतदारांची फसवणूक केली हे दाखवण्यासाठी त्यांचे अर्धवट व्हिडिओ दाखवणारे राज ठाकरे राहुल गांधीच्या चांगल्या कामाचे कौतुक करणारे व्हिडिओ दाखवण्याची हिंमत का करत नाहीत? असाही प्रश्न मतदारांना पडत आहे. ज्या काँग्रेसने राज ठाकरेंच्या पक्षाला आघाडीत घ्यायला विरोध केला, त्या काँग्रेसची तळी उचलण्याची राज ठाकरेंवर वेळ का आली? असा प्रश्न सर्वसामान्य मतदाराला पडला आहे आणि या पोपटरावांनी एखाद्या खेळात त्याचे जाहीरपणे उत्तर द्यावे अशी अपेक्षाही मतदारांना आहे. राज ठाकरे ही अपेक्षा पूर्ण करतील का?

'केवळ द्वेष' हेच तेरा वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या विकासाचा ब्ल्यू प्रिंट हाती घेऊन राजकारणात उतरलेल्या राज ठाकरे यांच्या इंजीनाचे इंधन आहे. आधी उध्दव ठाकरेंचा द्वेष करत सवतासुभा मांडला. नंतर परप्रांतीयांचा द्वेष करत मराठी मतदारांना भुलवून काही ठिकाणी यश संपादन केले आणि आता मुंबई वगळता राज्यात कोठेही अस्तित्व शिल्लक नसताना मोदी आणि अमित शहा यांच्या द्वेषाने राज ठाकरे यांना पछाडले आहे. ज्यांना आपला पक्ष संभाळता येत नाही, आमदार-नगरसेवकांना सांभाळता येत नाही, ते राज ठाकरे देशातील सर्वात मोठया पक्षाच्या नेत्यावर टीका करतात, आपला एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभा न करता प्रचारादरम्यान पोपटपंचीचे फड गाजवतात, तेव्हा राज ठाकरेंना नक्की काय म्हणायचे? हा प्रश्न मतदारांना पडल्याशिवाय राहत नाही. राज ठाकरे महाराष्ट्रातील निवडणुका होईपर्यंत हा पोपटपंचीचा खेळ मांडत राहतील. आणि या खेळाला थोरले अदृश्य हात मदतही करत राहतील. मात्र मतदारांवर त्याचा किती परिणाम होणार आहे हे निकालाच्या वेळीच कळणार आहे. आपला पक्ष स्थापन केल्यावर गेली तेरा वर्षे ज्या पक्षांच्या नावाने गळे काढले, त्याच पक्षांचा छुपा प्रचार करण्याची वेळ राज ठाकरे यांच्यावर का आली? नोटबंदी हे तर त्याचे कारण नाही ना? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या नोटबंदीने अनेकांची दुकाने बंद झाली आणि त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. राज ठाकरेंचा या बेकारात वरचा क्रमांक लागतो का? आणि त्या बेकारीतून निर्माण झालेले नैराश्य राज ठाकरेंना गावोगावी जाऊन एकपात्री पोपटपंचीचा खेळ करण्यास भाग पाडते आहे? की राज ठाकरे कठपुतळी झाले असून त्यांना नाचवण्याच्या दोऱ्या दुसऱ्या कोणाच्या हाती आहेत? असे अनेक प्रश्न राज ठाकरेंच्या या एकपात्री खेळातून निर्माण होत आहेत. मतदारांनी द्वेषाला नव्हे, तर विकासाला मतदान करून या सर्व प्रश्नाचा कायमचा निकाल लावला, तरच हा पुरस्कृत एकपात्री प्रयोग पुन्हा सादर होणार नाही. आणि म्हणूनच मतदार राजा जागा हो, कठपुतळयांच्या, बाहुल्यांच्या खेळाला न भुलता मतदान कर आणि देशाच्या विकासाचा साक्षीदार हो.