‘दि ताश्कंद फाइल्स’  सब चलता है !

विवेक मराठी    22-Apr-2019
Total Views |
 लेखक-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘दि ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटाद्वारे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर ‘ताश्कंद फाइल्स’चे वेगळेपण प्रेक्षकांसमोर आणले आहे.
  
 

भारत सत्य और अहिंसा का देश है.. ये गांधी और नेहरू का देश है ...’ या विधानावर प्रतिप्रश्न केला जातो, ‘‘शास्त्रीजीका ःयों नही?’’... चौकशी समितीतले सर्व या प्रश्नावर निरुत्तर होतात. त्याचबरोबर चित्रपटगृहात बसलेला प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक सच्चा राष्ट्रभक्त भारतीयसुद्धा. होय, निरुत्तर करणारे असे अनेक विषय लेखक-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने ‘दि ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटाद्वारे समोर आणले आहेत. निमित्त शास्त्रीजींच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूचे जरी असले, तरी विवेकने ‘‘शास्त्रीजींचे पोस्ट मॉर्टेम का नाही झाले?’’ हा अनुत्तरित प्रश्न विचारत त्या बरोबर अनेकांचे पोस्ट मॉर्टेम चित्रपटात केलेय, मग यात दिल्लीतला ल्यूटियन्स वर्ग आला, राजकारण्यांकडे स्वत:ला गहाण ठेवणारी मीडियातली मंडळी, सत्तेतले आणि विरोधातले राजकीय नेते, स्वयंघोषित बुद्धिजीवी व साहित्यिक, इतिहासकार, सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्यायाधीश, समाजसेवक, गुप्तहेर संघटनेचे निवृत्त प्रमुख असे सर्व आले. या सर्वांचा स्वत:चा कसा एक अजेंडा आहे आणि तो राबविण्यासाठी व अर्थातच त्यातून होणार्‍या अर्थार्जनासाठी ही सर्व मंडळी देशाला विकायला कमी करणार नाहीत, हे ठळकपणे सांगितले आहे. आणि नेमकी हीच बाब ‘ताश्कंद फाइल्स’चे वेगळेपण सिद्ध करते.

शास्त्रीजींच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ कथन करणार्‍या या कथेच्या केंद्रस्थानी आहे इंडिया टाइम्स नावाच्या वृत्तपत्र समूहासाठी राजकीय बीट सांभाळणारी तरुण महिला पत्रकार रागिणी फुले (श्वेता बसू प्रसाद). आठ दिवसांच्या आत काहीतरी वेगळी, गरमगरम अशी राजकीय स्टोरी आणून दे असा तिच्या बॉसचा अल्टिमेटम मिळाल्यावर त्याच्या शोधात असलेल्या रागिणीला एक निनावी फोन येतो. समोरची अनोळखी व्यक्ती भारताच्या दुसर्‍या पंतप्रधानांचा, म्हणजेच शास्त्रीजींचा रशियात ताश्कंद येथे भारत-पाकिस्तान शांती करार झाल्यावर त्याच रात्री कसा गूढ मृत्यू झाला, याची माहिती देते व नंतर त्यासंबंधित उपलब्ध दस्तऐवजही तिच्यापर्यंत पोहोचवते. रागिणीच्या कव्हर स्टोरीनंतर वातावरण इतके तापते की प्रमुख विरोधी पक्षनेते श्यामसुंदर त्रिपाठी (मिथुन चक्रवर्ती) यांची मागणी मान्य करत त्यांच्याच अध्यक्षतेखाली गृहमंत्री नटराजन (नासिरुद्दीन शहा) एक आठ सदस्यीय चौकशी समिती नेमतात. मग या समितीत सरकारतर्फे आपल्या सोयीचे व जवळचे इतिहासकार, निवृत्त सुप्रीम कोर्ट जज, साहित्यिक, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी घेऊन चौकशीचा देखावा केला जातो. या सदस्यांत एक रागिणीसुद्धा असते, जिला हळूहळू सत्याशी निगडित एक एक बाब कळायला लागल्यानंतर आता तिच्यासाठी ही केवळ एक कव्हर स्टोरी नसून सत्य बाहेर आणण्याचे मिशन होते. आणि मग समितीतल्या सरकारप्रणीत इतरांना ही बाब खटकते आणि इथून पुढे रागिणीच्या संघर्षास सुरुवात होते. सरकारप्रणीत समिती असल्याने व प्रत्येक सदस्याचे काहीना काही स्वार्थी हेतू दडलेले असल्याने मुळात ही समिती म्हणजे एक फार्स आहे आणि आपला यात कोणीतरी उपयोग करून घेत आहे हे रागिणीला कळून चुकते. सत्याच्या शोधात रागिणी ताश्कंदपर्यंत पोहोचते. तिथे तिला 60 आणि 70च्या दशकातले आंतरराष्ट्रीय पटलावरील राजकारण, अमेरिका-रशिया या दोन देशांदरम्यान चालू असलेले शीतयुद्ध, अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयए व रशियाची केजीबी यांची एकमेकांवर चालू असणारी कुरघोडी याची धक्कादायक माहिती मिळते. त्याहून पुढे जात रागिणीला मोठा धक्का बसतो, जेव्हा या गुप्तचर संघटना त्या त्या देशातील सरकारांशी संगनमत करून, त्यांना अमाप पैसा पुरवून, हे सर्व करायच्या याची खात्री झाल्यावर. या देशात मग भारतही होता. रशियाची केजीबी या कालखंडात भारतात इतकी सक्रिय होती की राजकारणी, सरकारातला उच्चपदस्थ अधिकारिवर्ग मोठ्या प्रमाणात यात सामील होता, जो सरकारच्या सर्व निर्णयप्रक्रियेला आपल्या सोयीनुसार बाधित करायचा. हे सर्व सत्य समोर आल्यावर रागिणीला शास्त्रीजींच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यास गती मिळते.

मुळात या सर्व संशयास्पद बाबी अधोरेखित करण्यासाठी याची निर्मिती झाली आहे -  
1. ‘जय जवान जय किसान’चा नारा देणार्‍या स्वतंत्र भारताच्या दुसर्‍या पंतप्रधानांचा तिसर्‍याच देशात संशयास्पद मृत्यू होतो, तरीही त्यांचे साधे पोस्ट मॉर्टम तर सोडा, पण नंतर गूढ मृत्यूची चौकशी व्हावी या हेतूने समितीसुद्धा नेमली जात नाही. 

2. 1965चे पाकिस्तानविरुद्धचे युद्ध जिंकल्यावर शास्त्रीजींची भारतात वाढलेली लोकप्रियता ही देशाबाहेरील कमी पण देशातील त्यांच्याच पक्षातील अति महत्त्वाकांक्षी व देशाला घराणेशाहीकडे नेऊ इच्छिणार्‍यांसाठी जास्त डोकेदुखी झाली होती. 

3. शास्त्रीजींचा मृत्यू नैसर्गिक झाला असे सांगण्यात आले. पण हा मृत्यू नसून योजनाबद्धरीत्या केलेली एक हत्या होती, याचे अनेक सबळ पुरावे असूनही त्याकडे जाणूनबुजून पूर्णत: दुर्लक्ष का केले गेले? 

4. दुपारी भारत-पाकिस्तान दरम्यानचा ताश्कंद करार झाल्यावर दिवसभर पूर्णपणे नॉर्मल असलेल्या शास्त्रीजींचा रात्री 2 वाजता अचानक मृत्यू होतो, पण तरीही रशिया किंवा भारत दोन्हीकडील सरकारांना याचे कारण जाणून घेण्यासाठी म्हणून पोस्ट मॉर्टेमची आवश्यकता का वाटली नव्हती?  

चित्रपटात यासारखे व असे अनेक अनुत्तरित प्रश्न अधोरेखित करण्याचे काम केले गेलेय... ठळकपणे केले गेलेय आणि निडरपणे केले गेलेय. त्याबद्दल सर्वप्रथम विवेक अग्निहोत्री या लेखक-दिग्दर्शकाला मनापासून धन्यवाद. तसेच ज्या धैर्याने त्याने हा विषय पडद्यावर मांडलाय, त्या निडरतेसाठी त्यास दिलसे सलाम. माझ्या मते दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने ही कलाकृती करमणुकीसाठी बनवलेलीच नाही. म्हणून याचे बॉःस ऑॅफिस अँगलने परीक्षण करणे चुकीचे ठरते. लेखन-दिग्दर्शन या दोन्ही आघाड्या विवेकने लीलया पेलल्या आहेत. विवेक लिखित धारदार संवादांमुळे प्रत्येक दृश्य लक्षवेधी झाले आहे. विशेषतः ती दृश्ये, ज्यात चौकशी समितीच्या सदस्यांचे एकमेकांमध्ये होणारे वाद दाखवले आहेत, ते दिग्दर्शक म्हणून विवेकने अत्यंत प्रभावीपणे सादर केले आहेत. चौकशी अंतिम टप्प्यात येत असताना श्यामसुंदर त्रिपाठी कसे प्रत्येक सदस्याचा स्वार्थी हेतू उघडा पाडतात ते दृश्य तर मिथुन चक्रवर्तीने अगदी अभिनयातल्या दादाप्रमाणे रंगवले आहे. मणिरत्नम दिग्दर्शित व अभिषेक बच्चन अभिनित ‘गुरू’ चित्रपटातल्या मिथुनची आठवण ही व्यक्तिरेखा पाहताना होते. नासिरुद्दीन शहासोबतच चौकशी समितीतील इतर कलाकार पल्लवी जोशी, मंदिरा बेदी, पंकज त्रिपाठी, राजेश शर्मा, प्रकाश बेलावडी इ. या सर्वांनी त्यांच्या व्यक्तिरेखा प्रभावीपणे सादर केल्या आहेत. या चित्रपटाची खरी नायिका - सॉरी, हिरोच आहे - ती म्हणजे श्वेता बसू प्रसाद. शोधक पत्रकारितेचे रण‘रागिणी’ रूप तिने अत्यंत जबरदस्त ताकदीने रंगवले आहे. ताश्कंद फाइल्स हा तिच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरणार, यात शंका नाही. हॅट्स ऑॅफ टू हर! निर्मात्या मंडळीत विवेकसह प्रणय चोकशी, हरेश पटेल व आपली पल्लवी जोशी हिचे नावही असल्याचा आनंद वाटला. उदयसिंह मोहिते यांचे छायाचित्रण व रोहित शर्मा यांचे संगीत (विशेषतः पार्श्वसंगीत, कारण कथेची थीम सांगणारे ‘सब चलता है’ हे गाणे वगळता कथेत गीत संगीताला काही वाव नाही) अपेक्षित परिणाम साधते. 
चित्रपटाअंती बाहेर येणारी धक्कादायक माहिती ऐकून, बघून तुम्हाला जबरदस्त धक्का न बसला तर नवलच. हो, पण त्यासाठी काही अटी आहेत.. तुम्ही प्रखर राष्ट्रवादी विचारांचे हवेत, हा देश केवळ गांधी व नेहरूंचा नसून तो शास्त्री, बोस व सरदार पटेलांचाही तितकाच आहे ही विचारसरणी तुम्हाला मान्य हवी, लोकशाहीवर घराणेशाही स्वार झाल्यावर आणीबाणीच्या काळात थेट संविधानावर घाला घालत कसे सोयीनुसार बदल केले गेले व अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा जीव घेतला गेला, हे तुम्हास मान्य हवे... इत्यादी इत्यादी.
शेवटी हात जोडून एक विनंती करतो.. हा चित्रपट पाहाच, अगदी पाहाच. तुम्ही पाहिल्यावर तुमच्या मित्रपरिवारासही विनंती करा. कारण पहिल्या आठवड्यात सिनेमाचे शोज खूप कमी ठिकाणी होते. तेही मोजःयाच चित्रपटगृहांत. (250 स्क्रीन्स) मात्र हा लेख लिहीपर्यंत या चित्रपटांने केलेली कमाई 2.91 कोटी इतकी होती. या चित्रपटाद्वारे दाखवलेले नग्न सत्य जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. 
 
अजिंक्य उजळंबकर 
। 8087000024