टिकटॉक विरंगुळा की व्यसन?

विवेक मराठी    22-Apr-2019
Total Views |
 सोशल मीडियावरील तरुणाईचं लाडकं अ‍ॅप असलेलं टिकटॉक नुकतंच गूगल प्ले स्टोअरवरून गायब झालं आहे. त्यामुळे आता हे अ‍ॅप डाउनलोड करता येणार नाही. तरुण वर्गात क‘ेझ असलेली अशी अनेक अ‍ॅप्स सातत्याने येत असतात आणि विरंगुळा म्हणून मोबाइलमध्ये शिरलेली ही अ‍ॅप्स हळूहळू व्यसनच बनून जातात.

 
 
तुम्ही टॅलेंटेड आहात का? असाल, तर तुमचं टॅलेंट दाखवण्याचं माध्यम काही दिवसांपूर्वी प्रचंड प्रसिद्ध होतं. त्याचं नाव ‘टिकटॉक’. तुम्ही गात असाल, अभिनय करत असाल इथपासून ते एखादा पदार्थ तयार करण्याची कृती हे सर्व त्यात सामावलेलं होतं. पण, याचा दुरुपयोग होतोय असं म्हणत वकील मुथुकुमार यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेबाबत टिकटॉकची मालकी असलेल्या चिनी बाइट डान्स या कंपनीने दाद मागितली. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. मात्र सध्यातरी सर्वोच्च न्यायालयाने या अ‍ॅपवर बंदी आणण्याचा निर्णय कामय ठेवला आहे. हे प्रकरण नेमके काय आहे हे समजून घेताना टिकटॉक आहे तरी काय, हे समजून घेऊ.

टिकटॉक अ‍ॅप नेमकं काय?
बॉलीवुडच्या गाण्यांवर त्या गाण्याच्या बोलांप्रमाणे ‘लिपसिंक’ म्हणजेच ओठांनी ते गाणं म्हटल्याचा भास निर्माण करणं, तसंच एखाद्या चित्रपटातील संवादाची नक्कल करणं अशा अनेक प्रकारच्या चित्रफिती टिकटॉकवर तरुणाईकडून प्रसिद्ध केल्या जातात. या चित्रफिती जगाला दाखवण्यासाठी या अ‍ॅपवर तसे पर्यायही उपलब्ध असतात. नेहमीच्या दिनचर्येतून थोडासा विरंगुळा यासाठी मु‘यत: या अ‍ॅपचा वापर होतो. यात आवडीच्या पदार्थापासून ते हस्तकलेच्या वस्तू तयार करण्यापर्यंत सर्व चित्रफिती पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. या अ‍ॅपचे यूजर्स या चित्रफिती पाहतातही आणि तयारही करतात.

‘गुगल प्ले स्टोअर’वरून टिकटॉक काढून का टाकलं? 
या अ‍ॅपवर अश्लाघ्य चित्रफिती यूजर्सना दिसू लागल्या होत्या. अशा प्रकारच्या चित्रफितींमुळे अ‍ॅपची विश्वासार्हता धुळीला मिळाली. यामुळे अनेक अपघात, तसंच चुकीच्या घटनाही घडल्या होत्या. टिकटॉकने या चित्रफिती काढून टाकल्याचा दावा केला असला, तरी पुढील संभाव्य धोके लक्षात घेऊन हे अ‍ॅप बंद करण्यात यावं, याबाबत वकील मुथुकुमार यांसह तामिळनाडू सरकारही आग‘ही आहे. वर म्हटल्याप्रमाणे हे अ‍ॅप आता डाउनलोडसाठी उपलब्ध नाही, तरीही ज्यांच्याकडे हे अ‍ॅप आधीपासूनच आहे, त्यांना हे अ‍ॅप वापरता येणार आहे.

मानसशास्त्रज्ञांचं मत काय?
के.ई.एम. रुग्णालयाच्या मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांना या अ‍ॅप बंदीमुळे टिकटॉकचं व्यसन अथवा अ‍ॅपवरील चुकीच्या गोष्टी रोखण्यात फारसा फरक पडेल असं वाटत नाही. त्या म्हणतात, ‘‘टिकटॉक जरी बंद झालं, तरी इतर मार्गाने त्या वस्तू मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल.’’ त्यांच्या मते, या अ‍ॅपशी स्पर्धा करू शकतील अशा आणखी अ‍ॅप्सची निर्मिती केली जाऊ शकते. तसंच याबाबत विशेषत: शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांना पालकांची भूमिका महत्त्वाची वाटते. पालक पाल्यांना स्मार्टफोन देतात, पण त्या स्मार्टफोनद्वारे पाल्य नेमका काय करतो आहे, यावर फार क्वचितच त्यांचे लक्ष असतं. ते लक्ष देणं महत्त्वाचं असतं, असंही त्या म्हणतात. टिकटॉकचे दुष्परिणाम रोखायचे असतील, तर त्यासाठी पालकांमध्ये तसेच शाळांमध्ये जनजागृती निर्माण करणं गरजेचं आहे, असं त्या म्हणतात. टिकटॉक वापरणार्‍यांमध्ये खरं तर किशोरवयीन, तसंच वयाने लहान असलेल्या मुलांचा भरणा जास्त आहे.

मग हे रोखायचं कसं?
बीएमएमच्या तिसर्‍या वर्षाला असलेली अंतरा शिंदे टिकटॉक दररोज वापरत नाही किंवा तिला त्याचं व्यसनही नाही. सर्व कुटुंब अथवा मैत्रिणी एकत्र आल्यावर किंवा नातेवाईक घरी आल्यावर केवळ एक विरंगुळा म्हणून ती टिकटॉक वापरते. मात्र, टिकटॉक पूर्ण बंद करण्याऐवजी त्यावर काही बंधन आणावीत असं तिचं म्हणणं आहे. उदाहरणार्थ, ‘पबजी’ हा खेळ फक्त काही तासांपुरताच स्मार्टफोनवर सध्या खेळला जाऊ शकतो. टिकटॉकवर अशी बंधनं आणली, तर चुकीच्या गोष्टींपासून टिकटॉक यूजर्स लांब राहतील असं तिचं म्हणणं आहे.



चित्रपटातील संवाद किंवा गाणी वापरून टिकटॉक त्या संवादांच्या व गाण्यांच्या कॉपीराईटचं उल्लघंन करत होतेच. दुसर असं की टिकटॉक वर अश्लील चित्रफिती होत्याच. मला असं वाटतं की ऑनलाईन गेम्सच्या तसेचं इतर अप्सच्या बाबतीत काही कायदे व नियम लागू केलेच पाहिजेत. हे कायदे व नियम भारतातील संस्कृती आणि शिक्षण याचा विचार करून लागू करण्यात यावेत.

- प्रशांत माळी, सायबर कायदेतज्ज्ञ

 
टिकटॉक खरंच व्यसन आहे का?

सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून एका कंपनीत नोकरी करत असलेला संकेत काळे हा टिकटॉकवर मजेशीर नकला असलेल्या किंवा बॉलीवुड चित्रपटांतील संवादांवर ‘लिपसिंक’ करत असलेल्या चित्रफिती बनवायचा. परंतु त्याला टीकटॉकचं स्वत:ला व्यसन जडत असेल असं वाटत नाही. तो सुटीच्या दिवशीही अगदी मित्रमैत्रिणींसह किंवा कुटुंबाबरोबर घालवण्याच्या वेळेतूनही वेळ मिळाला तरच टिकटॉक वापरतो, असं सांगतो. त्यामुळे टिकटॉक दररोज करण्याचा विरंगुळा नाही, असंही त्याला वाटतं. शेवटी हे प्रत्येकावर अवलंबून असतं. काही जण टिकटॉकवर कंटाळवाण्या चित्रफिती बनवतात, तर काही त्यातूनही चांगल्या संकल्पना असलेल्या चित्रफिती तयार करतात असं त्याचं म्हणणं आहे.

टॅलेंट दाखवण्यासाठी टिकटॉक पर्याय नाही

आपल्या अंगातील कलागुण दाखवण्यासाठी टिकटॉकच्या चित्रफिती बनवल्या जातात, असा प्रचलित समज आहे. परंतु केवळ यासाठी टिकटॉकऐवजी यूट्यूब हे चांगलं माध्यम आहे, असं पराग राणे याचं मत आहे. त्याचा स्वत:चा चित्रफिती तयार करण्याचा, तसंच त्यांचं संकलन करण्याचा व्यवसाय आहे. त्याच्या मते टिकटॉकवरच्या इतरांनीही तयार केलेल्या चित्रफिती पाहणं कंटाळवाणं असतं. एकाच प्रकारच्या चित्रफिती पाहून कंटाळा येतो आणि उशिरा का होईना, टिकटॉक बंद झालं याबाबत तो आनंद व्यक्त करतो.
 
अश्‍विनी पारकर
। 9326379301