आनंदाचे तरंग

विवेक मराठी    23-Apr-2019
Total Views |

उत्तरायणाच्या उंबरठयावर

 दु:खाचं कारण आपला अहं/इगोही असतो. त्याला धक्का लागला की मन दुखावतं. हा अहं वयानुसार लहानसहान गोष्टींनीही  दुखावतो. अपेक्षा पूर्ण न होण्याचं लेपण असतंच. यातून बाहेर पडायचं. आता हा इगोही टाकून द्यायचा नि अपेक्षाही. आपलं आपलं वेगळं जगणं सुरू व्हायला हवं.

 वयाच्या 52व्या वर्षी मी सासू झाले. म्हणजे तुमच्यापैकी अनेक जण सासू वा सासरे झालेच असतील. आजीचा रोल नंतरचा. ती भूमिका मिळण्याआधी मात्र सासूचा रोल मिळतो. कुणाला किती मिळेल नि तो किती टिकेल? हे ज्याच्या-त्याच्यावर अवलंबून. त्या रोलमधल्या काही गोष्टी मात्र मला बरंच काही शिकवून गेल्या. कोणीतरी म्हणालं, ''आता जरा पोक्तपणा आण. सासू झालीस ना!'' म्हणजे काय करायचं हे विचारायच्या फंदात मी पडले नाही. एक दिवस गंमत झाली. मुलगा प्रॅक्टिसला लागला. त्याच्या अर्थप्राप्तीचा तो क्षण वेगळा होता. त्याच्या शरीरबोलीवरून कळत होतं, त्याला खूप आनंद झालाय. मी माजघराच्या दारात उभी होते. त्याने चपला काढल्या आणि गाडी माझ्याआधी वळून बेडरूममध्ये बायकोकडे वळली. बायकोच्या हातात पैसे ठेवून स्वारी फक्त हसून निघून गेली. क्षणभर मी हलले. कारण याआधी तो हे मला पहिल्यांदा सांगायचा. मी मनात विचार केला, 'मला नाही आधी सांगितलं. समोर मी असूनही नाही सांगितलं...' पण मग मनाला थोपटवलं. 'याआधी हा आनंद तुला मिळालाय ना? आता अपेक्षा सोड ना!' जरा हलकं वाटलं. समजायला थोडं अवघड गेलं, कारण गोष्ट सोपी नव्हती. मग जेवताना त्याने सगळयांनाच सांगितलं. म्हणाला, ''तुम्हाला दोघांना एकदम सांगायचं होतं. म्हणून मघाशी आई मी तुला सांगितलं नाही. बाबांनाही तुझ्याबरोबरच हवं ना सांगायला.'' मुलं वेगळा विचार करतात, व्यापक विचार करतात, पण मी मात्र संकुचित विचार करून फुरंगटून बसले. कीव आली.

खरंच स्वत:ला बाहेर पडलं पाहिजे... कशाकशातून? सगळयातून... पुढच्या पिढीच्या हाती सगळं सोपवलं पाहिजे... वगैरे वगैरे वाक्य ऐकू येतात. समजतात. पण इतकी वर्षं गुंतलेला जीव असा काय पटकन बाहेर पडतो? घरात असून घराबाहेर पडायला हवं. हे फक्त घराबाहेरच नाही, तर आजूबाजूच्या जगातून आणखी बाहेर पडायचं म्हणजे जायचं कुठे? शरीराने आहे तिथेच राहायचं. तर कणाकणात गुंतलेल्या मनाला बाहेर काढायचं. नाहीतर मग हे गुंतणं पुढच्याही पिढीत तसंच राहणार. माझ्या पुढची पिढी त्याच रोलमध्ये आली की ती माझ्यासारखीच वर्चस्व गाजवणार. माझ्या आधीच्या पिढीनेही गाजवलेलंच असतं हे वर्चस्व! एकत्र कुटुंबात हे गरजेचंच आहे. एकत्र म्हणजे जिथे वृध्द, तरुण, बाल अशा तीन पिढया नांदत असतात तिथे.

कारण आपण तसे सामान्य असतो. यात कमीपणा नाही. उलट छान असतं हेही. छोटया छोटया गोष्टी घडून येतात त्याचा आनंद होतो नि एवढंसंच चिमूटभर जगणं मणभर होतं. आनंद लहान लहान गोष्टीत, तसं दु:खही लहान लहान गोष्टीत.

दु:खाचं कारण आपला अहं/इगोही असतो. त्याला धक्का लागला की मन दुखावतं. हा अहं वयानुसार लहानसहान गोष्टींनीही  दुखावतो. अपेक्षा पूर्ण न होण्याचं लेपण असतंच. यातून बाहेर पडायचं. आता हा इगोही टाकून द्यायचा नि अपेक्षाही. आपलं आपलं वेगळं जगणं सुरू व्हायला हवं. कुणाला त्रास होणार नाही याची दक्षता घेत छंद जपावेत. कुणाला व्यत्यय येणार नाही, असा प्रवास करावा, वाचन करावं, जे जे करायचं राहून गेलं ते करावं, पण इतरांना लक्षात घेऊन. नाहीतर नवी पिढी आपल्याला केव्हाच घराच्या गणितातून वजा करते. आपणही सैरभैर. जीव रमवायचा कुठे? गुंतवायचा कुठे? रिकामपण सगळया जगण्याला व्यापतं - नव्हे, पोखरायला लागतं. कुणी आपल्याला वजा करण्यापेक्षा आपणच आपला Exit घेऊ या ना! आदर तरी वाटेल.

माझी एक मैत्रीण बँकेत होती. इतर नोकऱ्यांसारखी ही एक नोकरी. घर आणि घराबाहेर होणारी कसरत! आयुष्यभर तारांबळ, धांदल, गडबड आणि धावत सुटणं. कुठून स्वत:साठी वेळ देणार? गेलेलं जगणं परत कसं येणार? एकदम रिकामपण आलं निवृत्तीनंतर. मन:स्थिती बिघडली. भजनाला जाऊ लागली. देवळात जाऊ लागली. कुणाकुणाकडे जाऊ लागली. मन रमेना. काय घडतंय काही कळेना. नवऱ्याचं विश्व वेगळं झालं होतं. नवऱ्याला तिच्या सोबतीची गरज होती, तेव्हा ती घरात अडकली होती. मुला-नातवंडांचं केलं नाही, तर नंतर ती आपल्याला कशी विचारतील? या विचाराने त्यांना प्राधान्य देत गेली. नवऱ्याने ऐकवलं, ''तुला नवरा आहे याचं भान असू दे.'' तिनेही तेव्हा समजूतदार उत्तर दिलं. ''अहो, मी तुमचीच आहे. आता यांना गरज आहे. शेवटी तेच करणार.'' नवरा म्हणला, ''गरज संपेल त्यांची, तेव्हा बाजूला पडशील. तेव्हा मीच असेन तुला. पण मला वेळ असेल असं नाही. कारण तुझी वाट पाहून मी माझ्या वेळेचं ठरवलं असेल...'' आता तिची ही तक्रार होती. दोघांचे रस्ते वेगळे नव्हते. दोघे तसे स्वतंत्रही नव्हते. काय करावं तिला सुचत नव्हतं. तिचं कळवळणं समजत होतं. जीवनव्यवहारांचा हिशोब सुरू झाला होता. ''तुझ्या तेव्हा प्रायॉरिटीज वेगळया होत्या. आता माझ्या वेगळया आहेत'' असं नवऱ्याचं म्हणणं. हा गुंता वाढतच होता. सोबत हवी होती, पण सोबत नव्हती. मनात आलं, यांच्याबरोबर एकत्र बसावं. बोलावं. तो त्याचं दु:ख सांगू लागला. ''खरंच सांगतो. तेव्हा मुलांना हिची एवढी गरज नव्हती. हिला वाटत होतं मुलं नंतर विचारणार नाहीत. मी तिला सांगायचा प्रयत्न केला, आपण असेपर्यंत एकमेकांसाठी आता तरी जगू. आता तुझी धावपळ थांबलीय! कमी कर ना हे!...'' त्यांचंही बरोबर होतं. कदाचित दोघं बोलले असते, समजूतदारपणे घेतलं असतं तर तिची नि त्याचीही सैरभैर स्थिती झाली नसती. थोडासा वेळ एकमेकांसाठीही दिला असता तर! हे जुळलंच नाही. नात्यांचा गुंताही या वयात जास्तच गुंतत जातो, सुटत सुटत नाही. काय करायचं?

'घरात असून घरात नसणं, घरात नसून घरात असणं' जमलं तर किती छान. या अवस्थेलाच म्हणायचं का आत्मिक वा आध्यात्मिक? सगळे संत लोकांत होते, लोकांसाठी होते, पण त्यांच्यात दंग नव्हते. लोकांनी त्यांना आपलं नाही मानलं, पण सहसा निग्रह ढळला नाही. मनाची ही स्थिरावस्था म्हणजेच आध्यात्मिकता नव्हे? हीच म्हातारपणाची अवस्था. इतरांसाठी, इतरांना गरज असेल तेव्हा, जशी गरज असेल तसं. अगदी शक्य आहे. सोपी पध्दत आहे. जे खायला आपल्याला आवडतं ते खायला नकार द्यायचा आपण! अवघड,
पण अशक्य नाही.

छायाचित्र सौजन्य : इंटरनेट