अण्णा गोसावी - एक आधारवड

विवेक मराठी    23-Apr-2019
Total Views |

अण्णा गोसावी उर्फ मधुकर रामचंद्र गोसावी (जन्म 6 ऑॅगस्ट 1939), एक प्रसिध्द कायदेतज्ज्ञ, ऍडव्होकेट यांनी दि. 15 एप्रिल 2019 रोजी सकाळी 2 वाजून 20 मिनिटांनी डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, संभाजीनगरमध्ये अखेरचा श्वास घेतला. सकाळी कानावर आलेली ही वार्ता मन सुन्न करून गेली. अण्णा एक आधारवड, मार्गदर्शक होते. समाजातल्या प्रत्येक  घटकाला त्यांचा आधार वाटायचा. लौकिकदृष्टया ते प्रसिध्द वकील म्हणून, उत्कृष्ट संघटक म्हणून ज्ञात होते. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर त्यांनी अनेक माणसे पुढे आणली. देवगिरी व खान्देश प्रांत संचालक म्हणून 2001 ते 2009पर्यंत ते कार्यरत होते. अखंड प्रवास आणि काम, निगर्वी स्वभाव, कुठल्याही लौकिक लाभापासून दूर असलेले अण्णा, रामभक्त, रामनामाचे पुरश्चरण पूर्ण केलेले एक सिध्द होते, पण तसे ते जाणवू देत नसत. समर्थ साहित्याचा अभ्यास, जांब येथील समर्थ मठ, तिथले ग्रंथालय आणि सज्जनगड येथील समर्थ संस्थान - विशेषत: भूषणस्वामी, ज्येष्ठांचे ज्येष्ठ वंशज स्वामी संस्थान सज्जनगड यांच्याशी कौटुंबिक स्नेहसंबंध, यातूनच त्यांनी समर्थांचे मोठे बंधू, ज्येष्ठांचे जीवनचरित्र, अंबड जि. जालना येथील सद्गुरू श्री अच्युतानंदस्वामी यांचे चरित्रलीलामृत, तसेच कल्याणस्वामी चरित्र, आनंदस्वामी जालना यांची चरित्रे  लिहिली. रामचंद्रसुत या नावाने त्यांनी या रचना केल्या.

अच्युतानंदस्वामी यांच्या एकूण साहित्यरचनेचा लावण्या व संपादन्यांचा समग्र अभ्यास तर त्यांनी केलाच, याशिवाय संजीवन समाधीच्या संदर्भात लिहिताना या विषयीच्या सर्व परंपरा, ग्रांथिक संदर्भ मुळातून अभ्यासले व त्यातून त्यांचे गुरू गोंदी येथील रामानंदस्वामी यांच्या रचनांचाही त्यांनी अभ्यास केला. रामानंदांकडून आज्ञा मिळाल्यावर वानप्रस्थी राघवाने ज्येष्ठ कृष्ण 11, शके 1720 (इ.स. 1798) रोजी संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन अच्युताश्रम असे नाव धारण केले. त्यांचे पहिले चातुर्मास्य गोंदी येथील सिध्देश्वर मंदिरात गोदावरी व मंगला नद्यांच्या संगमावर साजरे झाले. इथपासूनचे सारे तपशील त्यांनी या चरित्रात नोंदविले आहेत.

 मधुकर रामचंद्र गोसावी

जन्म 6 ऑगस्ट 1939, अंबड. अण्णा या नावाने परिचित.  व्यवसाय वकील - दिवाणी आणि फौजदारी. सन 1947मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले व स्वयंसेवक झाले. सुरुवातीला भारतीय जनसंघाचे काम करण्यास सुरुवात केली. सन 1967मध्ये अंबड नगरपरिषदेत भारतीय जनसंघाचे नगरसेवक म्हणून विजयी झाले. भारतीय जनसंघाच्या वतीने कच्छ करार आंदोलनात सत्याग्रह केला. कारावासाची शिक्षा भोगली. अनेक वर्षे अंबड नगरपरिषदेचे मार्गदर्शक म्हणून काम केले. सन 1984मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अंबड तालुका संघचालक, 1989मध्ये जालना जिल्हा कार्यवाह, 1997  ते 2001 देवगिरी विभाग संघचालक, 2001 ते 2009 देवगिरी प्रांत संघचालक.

सन 2009नंतर पूर्णपणे आध्यात्मिक कार्यात रममाण झाले. विश्व हिंदू परिषद धर्माचार्य संपर्क प्रमुख. विपुल आध्यात्मिक लेखन केले. महंत अच्युतानंदस्वामी अंबड, आनंदी स्वामी जालना, समर्थ रामदासस्वामी यांचे पट्टशिष्य कल्याणस्वामी, समर्थांचे ज्येष्ठ बंधू श्रेष्ठी यांची ओवीबध्द चरित्रे लिहिली आहेत. मत्योदरी देवी अंबडचे इतिहास लेखन केले. दासबोध, भागवत यावर प्रवचनकार, कीर्तनकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ख्यातनाम व्यक्तिमत्त्व. जनजागृती मंडळ जालनाचे अध्यक्ष, डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे विश्वस्त, जांब समर्थ रामदासस्वामी यांच्या परिसराचे संशोधन केले. अतिशय मितभाषी, सहजपणे सोप्या शब्दात विषयमांडणी करण्याची विलक्षण हातोटी.

 मुळात अत्यंत प्रतिभा असलेले, अष्टकोनी पैलूंचे अण्णा प्रथम भेटीतच आपल्या उमद्या व प्रसन्न अशा व्यक्तिमत्त्वामुळे आपलेसे करत. ज्या ज्या ठिकाणी अडचणी येत, तेथून ते सहज मार्ग काढत. वकिली हा त्यांनी केवळ व्यवसाय म्हणून केला नाही, तर परिवाराला न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेतून ते काम करत. आयुष्यात उत्कृष्ट शेतकरी, उत्तम भागवतकार, उत्तम प्रवचनकार, आदर्श वारकरी अशा विविध भूमिकांमधून ते वावरले. ते विविध आश्रमांचे मार्गदर्शकही होते. अच्युताश्रमांच्या मठांचे एक नवीन स्वरूप त्यांनी निर्माण केले. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे मठाकडून जे विविध उपक्रम सुरू करण्यात आले, त्यात दैनंदिन उत्सवांबरोबर रामदासस्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अंबड ते गोंदी हा दिंडी सोहळा (पौष व. 11) आहे. सद्गुरू अच्युतानंद स्वामी यांचे मोक्षगुरू यादवस्वामी यांची समाधी कोयाळ ता. आष्टी जि. बीड येथे असून भाद्रपद व. 3 रोजी त्यांची पुण्यतिथी असते. या पुण्यतिथीस अंबड येथील मठापासून प्रतिवर्षी वाहन दिंडी निघते, शिवाय दासनवमी, अच्युताश्रमांच्या पादुकांचे पूजन, गाथा व चरित्रलीलामृताचे पारायण  यासारख्या सांप्रदायिक परंपरा त्यांनी सुरू केल्या.

संघ, संघटन आणि भाजपा (भारतीय जनता पक्ष) यांच्यासाठी ते मार्गदर्शक म्हणून विविध पातळयांवर कार्यरत होते. दै. तरुण भारत, देवगिरी प्रांत, श्री नाथ्रेकर वाचनालय, डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, दत्ताजी भाले शाळा, दत्ताजी भाले रक्तपेढी, अनेक रामदासी मठ व वारकरी संप्रदाय यांच्याशी आणि असंख्य परिवारांबरोबर त्यांचा स्नेह होता. अण्णांचा शब्द शक्यतो कोणी मोडत नसत. गाव सोडून बाहेर पडलेल्या अनेकांना अण्णांचे सतत आकर्षण राहिले. जय श्रीराम अशी सुरुवात करून अधूनमधून दूरध्वनीवर काही सूचना आली की आम्हाला खूप बरे वाटायचे.

अनेकांना मार्गदर्शक ठरलेल्या अण्णांना एकदा मी कल्याणच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसलो असता विचारले, ''खरंच आज कोणी सिध्दपुरुष अस्तित्वात आहे का हो?'' त्यावर ते सहज म्हणाले, ''अरे, तू कोणाजवळ बसला आहेस याची तुला जाणीव आहे का?'' हा एकच क्षण आणि पुन्हा नेहमीप्रमाणे इतर विषयांवर गप्पा सुरू.

मी एका शिलालेखाच्या वाचनाच्या संबंधात अण्णांकडे बसलो, तेव्हा 5-6 तासांच्या बैठकीतून यादवकालीन देवनागरी लिपीतील लेख, तसेच मोडीमधील ताम्रपट प्रथमच पाहिल्यावर ते सहज भाष्य करू शकत व वाचू शकत. विलक्षण प्रतिभा व साधना असलेला आधुनिक भीष्म असे त्यांचे वर्णन करावेसे वाटते. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

     

 

- अरुणचंद्र शं. पाठक

                         9619046069