प्रथमग्रासे मक्षिकापात:

विवेक मराठी    26-Apr-2019
Total Views |

 

एवढा गाजावाजा करत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर  प्रियांका वडेरा यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला, तोही अतिमहत्त्वाच्या पूर्व उत्तर प्रदेशाची संघटनात्मक जबाबदारी त्यांच्या हाती देऊन. मुळात उत्तर प्रदेश हेच निवडणुकीच्या राजकारणातलं सर्वात महत्त्वाचं राज्य. पूर्वानुभव नसलेल्या व्यक्तीवर या राज्याची जबाबदारी देण्याची जोखीम पक्षाने पत्करली, कारण गांधी घराण्याचा करिश्मा. त्यातही पूर्व उत्तर प्रदेश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मतदारसंघ असलेला भाग. त्यामुळे प्रियांका यांच्यावर सोपवलेली जबाबदारी फार मोठी. गांधी घराण्याची वारसदार असल्याने राजकारणातली मुळाक्षरं गिरवून पक्की झाली असतील या विश्वासाने कदाचित इतकी मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असावी, असा अंदाज केला जाऊ लागला. या भागात मरगळलेल्या काँग्रेसची संघटनात्मक बांधणी करायची, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनमत आपल्या दिशेने वळवायचं हे आव्हान खचितच त्यांच्या क्षमतांचा कस पाहणारं होतं. आजीचा तोंडवळा लाभलेली नात म्हणून बरीच चर्चा झाल्याने, आजीसारखी कणखर आणि धूर्त असेल तर सोपवलेलं आव्हान नात पेलेल, असं वाटत होतं. त्यानुसार सुरुवातही मोठी धडाक्यात झाली होती.

लोकांच्या थेट भेटी, रोड शो, प्रचार दौरे असा कार्यक्रम सुरू झाला. प्रकृतीच्या कारणामुळे सोनिया यांनी जर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, तर रायबरेलीचा बालेकिल्ला प्रियांका यांना मिळेल अशी अटकळ होती. मात्र सोनियांनी निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि काँग्रेससाठी अतिप्रतिष्ठेच्या झालेल्या वाराणसी मतदारसंघातून प्रियांका उभ्या राहतील, असं पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी सूतोवाच केलं. जनतेकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे असेल कदाचित, सक्रिय राजकारणात आल्या आल्या लोकसभेची निवडणूक - तीही नरेंद्र मोदींच्या विरोधात लढवायची स्वप्नं प्रियांकाही पाहत आहेत असे संकेत मिळू लागले. महिन्याभरापूर्वी वाराणसी इथे झालेल्या रोड शोदरम्यान प्रियांका यांनी वाराणसीतून निवडणूक लढण्याविषयी तिथल्या स्थानिकांच्या भावना जाणून घेतल्या. जनमताने त्यांना कौल दिला, तरी याबाबत पक्ष आणि पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील असं सांगून प्रियांका यांनी राजकीय सावधगिरीचं दर्शन घडवलं. तरीही, तेव्हापासूनच प्रियांका यांच्या उमेदवारीमुळे वाराणसीची निवडणूक रंगतदार होणार असं बोललं जाऊ लागलं. इतकंच नव्हे, तर घसघशीत मताधिक्याने त्या विजयी होणार अशी दिवास्वप्नं अनेकांना पडू लागली होती.

मात्र पडद्यामागे अशा काही हालचाली झाल्या असाव्यात, ज्यामुळे नरेंद्र मोदी यांची वाराणसीतली भव्य प्रचारयात्रा सुरू झाली तीच वेळ साधून, प्रियांका वाराणसीमधून निवडणूक लढत नसल्याचं जाहीर करत काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा अजय राय यांना वाराणसीतून उमेदवारी दिली. 2014मध्येही मोदींच्या विरोधात निवडणूक हरून तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेलेल्या व्यक्तीलाच पुन्हा उमेदवारी देऊन काँग्रेसने निवडणुकीआधीच वाराणसीमधली आपली हार मान्य केली आणि प्रियांका यांची मूठ झाकलीच राहिली.

जबाबदारी स्वीकारल्यापासून प्रियांका यांनी पूर्व उत्तर प्रदेशात धडाक्यात कामाला सुरुवात केली असली, तरीही 2014च्या आधीची वाराणसी नाही, हे त्यांनाही तिथे फिरताना समजून चुकलं असावं. टीकेसाठी त्या वेगवेगळे मुद्दे पुढे करत असल्या, तरी वाराणसीचा झालेला कायापालट त्यांनीही अनुभवला असावा. त्यामुळेच कदाचित, तिथून निवडणूक लढवण्याची उत्सुकता प्रदर्शित केल्यानंतरही, पक्षाने घेतलेला निर्णय त्यांनी बिनबोभाट मान्य केला असावा. शिवाय वाराणसी मतदारसंघापुरत्या अडकून पडण्यापेक्षा त्यांनी पूर्ण पूर्व उत्तर प्रदेशात प्रचार करणं ही सध्या त्यांच्या पक्षाची गरजही आहे. ती त्यांनी जाणली असावी.

या सगळया तर्कापलीकडचीही एक शक्यता कुजबुजीच्या स्वरूपात समोर येते आहे, ती म्हणजे भावाची डुबती नैय्या सावरण्यासाठी प्रियांका यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला असला आणि उत्साहात कामाला सुरुवात केली असली, तरी तीच त्यांना यंदाच्या निवडणुकीपासून रोखते आहे. बहिणीची वाढती लोकप्रियता, पक्षांतर्गत तिला मिळणारा प्रतिसाद पाहून राहुल गांधी यांना आपल्या भविष्याची चाहूल लागली असावी. पक्ष बळकट करता करता बहिणीचंही पक्षातलं स्थान बळकट झालं, तर आपल्या स्थानाला भविष्यात धोका उद्भवू शकतो, या अंदाजामुळेही प्रियांका यांना पक्षाध्यक्षांनी उमेदवारी दिली  नसल्याचं बोललं जात आहे.

प्रियांका यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेतला आणखी एक मोठा अडथळा म्हणजे त्यांचे यजमान रॉबर्ट वढेरा यांचे कथित हेराफेरीचे उद्योग. प्रियांका यांच्या राजकारणातील सक्रियतेला त्यानेही मर्यादा पडल्या आहेत. इच्छा असो वा नसो, रॉबर्टच्या उद्योगांचं ओझं प्रियांकांना वागवावंच लागणार आहे. विरोधक या मुद्दयाचा फायदा उठवणार याची कल्पना असल्यानेही कदाचित प्रियांका यांची चाल 'आस्ते कदम' झाली असावी.

सध्या तरी प्रियांकांनी वाराणसीतून न लढण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. अन्य काही ठिकाणची उमेदवारी अद्याप जाहीर व्हायची असली, तरी या वेळच्या लोकसभेत त्या असणार नाहीत असा या निर्णयाचा अर्थ घेता येईल. मात्र काही राजकीय पंडितांच्या अंदाजानुसार, अमेठीतून पोटनिवडणूक लढवायची वेळ आली, तर प्रियांका यांच्यासाठी तिथून लोकसभेत जाणं केव्हाही सोयीचं ठरेल. मुळात अमेठीत स्मृती इराणी यांच्यासमोर आपला निभाव लागेल याची राहुल गांधींना खात्री नसल्याने त्यांनी वायनाडमध्येही गळ टाकून ठेवला आहे. ही वस्तुस्थिती असतानाही राहुल यांच्या अमेठीतील विजयाबाबत राजकीय पंडितांनी इतकं आशावादी राहणं कौतुकास्पद आहे.

तात्पर्य - वाराणसीतून निवडणूक न लढण्याच्या निर्णयामागचं कारण, राजकीय सावधपण की पडद्यामागे सुरू झालेली भाऊबंदकी ते आगामी काळात कळेलच. कशाने का असेना, पण प्रियांका यांना 'प्रथमग्रासे मक्षिकापात:' झाला खरा!