श्रीलंकेवर दहशतवादाचे सावट

विवेक मराठी    27-Apr-2019
Total Views |

 श्रीलंकेतील साखळी बाँबस्फोटांना एक आठवडा उलटून गेला आहे. या हल्ल्यांतील मृतांची संख्या 250वर पोहोचली असून 500हून अधिक जखमी झाले. या हल्ल्यांची जबाबदारी आयसिसने घेतली असून आत्मघातकी पथकातील तरुण हे उच्चशिक्षित आणि चांगल्या घरातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीलंकेतील मसाल्यांच्या सर्वात मोठ्या आणि श्रीमंत व्यापार्‍यांपैकी एक असलेल्या महंमद युसुफ इब्राहिम यांची दोन मुले - इन्शाफ आणि इल्हाम - मानवी बाँब बनून या हल्ल्यांत सहभागी झाली होती. या बातमीने श्रीलंका हादरून गेला आहे. आजवर श्रीलंकेत वांशिक हिंसाचार प्रचंड प्रमाणात झाला. तामिळ फुटीरतावाद्यांबरोबर तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या या संघर्षात 80000हून अधिक लोक ठार झाले. 2005-09 या पाच वर्षांमध्ये जेव्हा श्रीलंकेने लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देऊन तामिळ फुटीरतावादाला चिरडून टाकले, तेव्हा सुमारे 40000 लोक ठार झाले होते. पण त्यानंतर श्रीलंकेत शांतता नांदत होती. सुमारे 70% बौद्ध, 12% मुस्लीम आणि 7-8% ख्रिस्ती आणि हिंदू लोकसंख्या असलेल्या, तसेच सिंहली आणि तामिळ अशा वांशिक गटांत विभागल्या गेलेल्या श्रीलंकेत धर्माच्या नावावर मोठा हिंसाचार झाल्याच्या फारशा घटना घडल्या नव्हत्या. 21 एप्रिल 2019 रोजी, म्हणजेच ईस्टरच्या दिवशी ही परिस्थिती पालटली.

या दिवशी सकाळी पावणेनऊ ते दुपारी सव्वादोन या कालावधीत श्रीलंकेत एकापाठोपाठ एक 8 बाँबस्फोट झाले. त्यात कोलंबोच्या उत्तरेकडील नेगोंबो येथे सेंट सेबेस्टिअन चर्च, कोलंबोतील सेंट अँकथनींची समाधी आणि पूर्व किनार्‍यावरील बट्टिकलोआ येथील झायन चर्च यांचा समावेश होता. याशिवाय शांग्रिला, किंग्जबरी आणि सिनामॉन ग्रँड या पंचतारांकित हॉटेलांमध्ये, तसेच देहीवाला आणि देमतगौडा या भागांतही स्फोट झाले. कोलंबोच्या बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीतील बाँब निकामी करण्यात आला. विशेष म्हणजे यातील एक स्फोट ताज समुद्रा या पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार होता, पण बाँब ट्रिगर न झाल्यामुळे संशयित दहशतवाद्याने तो दुरुस्त करण्यासाठी नेला असता तिथे त्याचा स्फोट झाला. या स्फोटांमध्ये 15 देशांतील 40हून अधिक विदेशी नागरिकांचा समावेश असून त्यात 11 भारतीय आहेत. सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई करत 76हून अधिक संशयितांना ताब्यात घेतले असून 10000 सैनिक आणि साध्या वेशातील 2000हून अधिक पोलीस तपास करत आहेत. श्रीलंकेचे संरक्षण सचिव हेमसिरी फर्नांडो आणि कोलंबोचे इन्स्पेक्टर जनरल पुजिथ जयसुंदर यांनी राजीनामा दिला आहे.

जेव्हा हल्ला झाला, तेव्हा श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना भारत आणि सिंगापूरच्या खाजगी दौर्‍यावर होते. श्रीलंकेला परतल्यावर त्यांनी देशात आणीबाणी जाहीर केली असून समाजमाध्यमांवर निर्बंध आणले आहेत. तपास यंत्रणांनी नॅशनल तौहिद जमात या संघटनेने हे स्फोट घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला. 23 एप्रिल रोजी आयसिसची वृत्तसंस्था अमक न्यूजने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आणि मानवी बाँब बनलेल्यांचे स्फोटांपूर्वीचे कथित व्हिडिओ प्रसिद्ध केले. तपास यंत्रणांनी सहा संशयितांची छायाचित्रे प्रकाशित केली असून त्यात तीन तरुण आणि तीन तरुणी आहेत. आणखी किमान दोन तरुण फरार असून ते आणखी काही हल्ले करू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे की, एखादी स्थानिक संघटना स्वतःच्या जोरावर एवढे मोठे हल्ले कशी करू शकते? तसेच या हल्ल्यांची पूर्वसूचना 10 दिवसांपूर्वी मिळूनही श्रीलंका सरकार एवढे गाफील कसे राहिले?

विशेष म्हणजे सुमारे महिनाभरापूर्वीच सीरियामधील आयसिसचा शेवटचा तळ उद्ध्वस्त केल्यामुळे आयसिसचा पराभव झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केली होती. 2015पासून धुमाकूळ घालणारी आयसिस एक राजवट म्हणून संपली आहे हे खरे आहे. पण जगभरात मूलतत्त्ववादी इस्लामची राजवट स्थापन करण्याचे त्यांनी दाखवलेले स्वप्न आजही अनेक तरुणांना भुरळ घालत आहे. अल-कायदाच्या तुलनेत आयसिसकडे अजूनही 2000 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे. संघटना गुप्तहेर यंत्रणांची नजर चुकवून, इंटरनेटद्वारे आणि समाजमाध्यमांद्वारे आपल्या छुप्या समर्थकांशी संपर्क ठेवण्यात यशस्वी झाली आहे. श्रीलंकेतील हल्ल्यांनंतर दोन दिवसात आयसिसने मानवी बाँब बनलेल्या तरुणांचा व्हिडिओ प्रसिद्ध करावा, यातून त्यांच्यात संपर्क होता, किमान एवढे तरी स्पष्ट होते. जे श्रीलंकेत झाले, ते अन्यत्रही घडू शकते. भारतातही राष्ट्रीय तपास यंत्रणेने दोन आठवड्यांपूर्वी हैदराबादमध्ये, तसेच वर्ध्यामध्ये धाडी टाकून 4 आयसिस संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 13 मोबाइल फोन्स, 11 सिम कार्ड्स, 1 आयपॅड, 2 लॅपटॉप, एक एक्स्टर्नल हार्डडिस्क, 6 पेन ड्राइव, 6 एसडी कार्ड आणि 6 वॉकी टॉकी सेट जप्त केले.

श्रीलंकेची सुरक्षा यंत्रणा गाफील राहण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तेथील राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना आणि पंतप्रधान रणिल विक्रमसिंघे तसेच त्यांच्या मंत्रीमंडळातून विस्तव जात नाही. 2015च्या निवडणुकीत दोघांचे पक्ष एकमेकांशी लढले असले, तरी लवकरच त्यांच्यात वितुष्ट आले. श्रीलंकेत अध्यक्ष पंतप्रधानांच्या तुलनेत जास्त शक्तिशाली असतो. ऑक्टोबर 2018मध्ये सिरिसेनांनी माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षेंशी संधान बांधून विक्रमसिंघेंना पदावरून हटवण्याचा प्रयत्न केला. सवोर्र्च्च न्यायालयाने तो प्रयत्न हाणून पाडला आणि विक्रमसिंघेंची पुनर्नियुक्ती केली. पण दोघांच्यात 36चा आकडा आहे. या हल्ल्याबाबत भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी श्रीलंका सरकारला 4 एप्रिल रोजी, तर अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी 11 एप्रिलला पूर्वसूचना दिली होती. पण त्यावर कार्यवाही झाली नाही. धक्कादायक बाब म्हणजे अध्यक्ष सिरिसेना यांनी खुद्द पंतप्रधान विक्रमसिंघेना आणि त्यांच्या सहकार्‍यांना सूचित केले नव्हते.

श्रीलंकेला भारतापाठोपाठ स्वातंत्र्य मिळाले असले, तरी खर्‍या अर्थाने ब्रिटिशांचा अंमल संपून स्वराज्य मिळायला 1972 साल उजाडावे लागले. लवकरच श्रीलंका बहुसंख्याक सिंहली आणि अल्पसंख्याक तामिळ गटांच्या यादवी युद्धात भरडून निघाला. वेळोवेळी नॉर्वेच्या मध्यस्थीने शांततेचे प्रयत्न झाले, पण ते असफल ठरले. 2005मध्ये दक्षिण श्रीलंकेतील बाहुबली म्हणून ओळख असलेले महिंदा राजपक्षे श्रीलंकेचे अध्यक्ष बनले आणि पुढील 10 वर्षे पदावर राहिले. राजपक्षे यांनी आपल्या पाच वर्षांच्या पहिल्या टर्ममध्ये तामिळ वाघांविरुद्ध जोरदार आघाडी उघडली. मानवाधिकारांची पर्वा न करता त्यांनी तामिळ वाघांचा म्होरक्या प्रभाकरनला ठार करून इलमला नेस्तनाबूत केले. गेली 10 वर्षं श्रीलंकेत एकही मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही.

21 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यांमुळे श्रीलंकेच्या लोकसंख्येतील वाढत्या मुस्लीम टक्क्याचा आणि समाजावरील मूलतत्त्ववादाच्या प्रभावाचा विषय ऐरणीवर आला आहे. स्वातंत्र्यानंतर अन्य अल्पसंख्याक धार्मिक समूहांच्या तुलनेत मुस्लीम समाजाच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पूर्वी 7-8% असलेले प्रमाण आज सुमारे 12.5%वर पोहोचले आहे. आजवर श्रीलंकेतील संघर्ष मुख्यतः वांशिक - म्हणजेच बहुसंख्य सिंहली वि. अल्पसंख्य तामिळ लोकांमध्ये होता. तामिळ फुटीरतावादी चळवळ ठेचून काढताना श्रीलंकेच्या सुरक्षा यंत्रणांचे मुस्लीम संघटनांकडे दुर्लक्ष झाले. गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम आशियातून निर्यात झालेल्या सुन्नी-वहाबी इस्लाममुळे श्रीलंकेतील मुसलमानांमध्येही मूलतत्त्ववादाचा प्रसार होत असून त्यातून कट्टरतावादी संघटना निर्माण झाल्या आहेत. श्रीलंकेतून 30हून अधिक तरुण आयसिसतर्फे लढण्यासाठी सिरियात गेले होते.

अध्यक्ष सिरिसेना यांनी श्रीलंकेत परतताच या हल्ल्यांच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समितीची घोषणा केली. श्रीलंकेत यादवी युद्धाच्या समाप्तीनंतर पहिल्यांदाच आणीबाणी लावण्यात आली असून पोलिसांना वॉरंटशिवाय अटकेचे अधिकार देण्यात आले आहे. सोमवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत श्रीलंकेतील वाढत्या इस्लामी मूलतत्त्ववादाचा आणि नखशिखांत बुरख्यावर बंदी घालण्याचा मुद्दा ऐरणीवर आला. मंत्री मंगला समरवीरा यांनी मुस्लीम संसद सदस्यांना सांगितले की, या विषयांकडे गांभीर्याने पाहा आणि आपल्या समाजात वाढत्या मूलतत्त्ववादाविरुद्ध प्रबोधन करा. नखशिखांत बुरख्यातील महिलांकडे लोक संशयाने बघतात. अनेक देशांनी त्यांवर बंदी घातली असल्याने त्याच्याकडे गांभीर्याने बघण्याची विनंती त्यांनी मंत्रीमंडळातील आपल्या मुस्लीम सहकार्‍यांना केली. या स्फोटमालिकेच्या पाठोपाठ पुन्हा एकदा हल्ले होऊ शकतात, असा इशारा सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे. समुद्रमार्गे होऊ शकणार्‍या हल्ल्यांचा विचार करता भारतानेही कोचीन येथील आपला नौदलाच्या तळावरील, तसेच दक्षिण भारताच्या किनार्‍यांवरील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.

पर्यटन हा श्रीलंकेतील सगळ्यात मोठ्या आणि जास्त रोजगार पुरवणार्‍या उद्योगांपैकी एक आहे. गेल्या वर्षी श्रीलंकेला 23 लाख विदेशी पर्यटकांनी भेट दिली. त्यात साडेचार लाख भारतीय पर्यटकांचाही समावेश होता. श्रीलंकेतील पर्यटन उद्योगाला या बाँबस्फोटांचा मोठा फटका बसणार हे निश्चित आहे. हे टाळायचे असेल, तर श्रीलंकेला सत्ताधारी सिरिसेना आणि विक्रमसिंघे यांच्यातील मतभेद लवकरात लवकर आटोक्यात आणून देशाची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवावी लागेल. या हल्ल्यांत अल्पसंख्याक ख्रिस्ती समुदायाला लक्ष्य केले असले, तरी त्यांनी वेळोवेळी बहुसंख्य बौद्ध धर्मीयांविरुद्ध चिथावणीखोर भाषा वापरली असून सार्वजनिक ठिकाणच्या गौतम बुद्धांच्या मूर्तींचीही विटंबना केली आहे. या हल्ल्यांमुळे बौद्ध आणि मुस्लीम धर्मीयांमध्ये तणाव वाढला आहे. कोलंबोपासून एक तासाच्या अंतरावर असणार्‍या नेगोंबो शहरात शेकडो पाकिस्तानी शरणार्थी राहतात. पाकिस्तानमध्ये अहमदिया पंथीयांना धर्मद्रोही ठरवले असल्यामुळे त्यांनी देश सोडला. त्यातील काही श्रीलंकेत स्थायिक झाले होते. पण या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या धार्मिक विद्वेषाच्या वातावरणामुळे सहाशेहून अधिक शरणार्थींना तातडीने दुसर्‍या ठिकाणी हलवण्यात आले.

श्रीलंकेतील स्फोटांच्या पार्श्वभूमीवर भारतात गेल्या पाच वर्षांत दिसून आलेल्या शांतता आणि सुव्यवस्थेचे विशेष विशेष कौतुक करायला हवे. यूपीए-1 सरकारच्या काळात, देशाच्या कानाकोपर्‍यात नियमित अंतराने बाँबस्फोट होत होते. बाँबस्फोटांचे सूत्रधार पाकिस्तानात किंवा आखाती देशांमध्ये विनासायास लपून राहत होते. आणि एवढे होऊनही सरकार आणि राहुल गांधींसारख्या नेत्यांसाठी, त्यांनीच निर्माण केलेले हिंदू दहशतवादाचे कुभांड, इस्लामी दहशतवादापेक्षा अधिक धोकादायक होते. मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या काळात हे पूर्णतः बंद झाले आहे. प्रशासन तेच आहे, पोलीस आणि तपास यंत्रणा त्याच आहेत. पण अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय सुरक्षेचे आणि त्यातही गुप्तचर यंत्रणेचे महत्त्व जाणणार्‍या व्यक्ती महत्त्वाच्या पदांवर बसल्या असून त्या थेट पंतप्रधानांपर्यंत तसेच गृहमंत्र्यांपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवू शकत आहेत. अनेकदा प्रशासकीय जबाबदारी हाताळणार्‍या सचिवांकडून फील्डवर काम करणार्‍या अधिकार्‍यांकडून मिळालेली माहिती, इशारे पुरेशा गांभीर्याने घेतले जात नाहीत. आता तसे होत नाही. जेव्हा तुम्ही सुरक्षित असता, तेव्हा तुम्हाला त्यात काही विशेष असल्याचे वाटत नाही. पण पडद्यामागे अनेक सुरक्षा यंत्रणा कार्यरत असतात. अनेक जण स्वतःचा जीव धोक्यात घालून देशाच्या सुरक्षेसाठी झटतात. जर देशात स्थिर सरकार आणि खंबीर नेतृत्व नसेल, तर सरकारमधील विविध विभागांचा ताळमेळ हरवतो आणि श्रीलंकेसारख्या घटना घडतात.

या निमित्ताने भारतात होत असलेल्या बौद्धधर्मीय दलित आणि मुस्लीम समुदायांची मोट बांधण्याच्या प्रयत्नांचीही दखल घ्यावी लागेल. दोन्ही समाजातील अज्ञान आणि गरिबी यांचे भांडवल करून, त्यांची अनैसर्गिक मोट बांधण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यात अतिडाव्या आणि नक्षलवाद्यांप्रती सहानुभूती असणार्‍या शक्तीही सहभागी आहेत. आपले प्रश्न सोडवण्यासाठी कायदा हातात घेण्याची, दुसर्‍याला ठोकून काढण्याची भाषा त्यांच्याकडून केली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायमच दलितांना आधुनिक शिक्षण, तर्क, विज्ञान आणि शांततेचा मार्ग दाखवला. आपली प्रगती साधण्यासाठी घटनेच्या चौकटीतच त्याची व्यवस्था केली. याउलट मुस्लीम समाजातील मागासलेपणा हा मुख्यतः रूढीवादातून, आधुनिक विचार आणि शिक्षण पद्धतीचा अवलंब न करण्याच्या अट्टाहासातून आला आहे. बुद्धाचा विचार, इतर धर्मांचा, तसेच विचारांचा अनादर करायला शिकवत नाही. सुन्नी-वहाबी मतप्रवाह स्वतःखेरीज अन्य विचारांना तुच्छ लेखतो. श्रीलंकेतील हल्ल्यांनी आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीने अनेकांच्या डोळ्यांत अंजन घातले आहे. श्रीलंकेच्या उदाहरणातून शहाणे होऊन आपल्याला आगामी निवडणुकीत स्थिर आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देणारे सरकार निवडावे लागेल.