अन्न प्रक्रिया उद्योगात उज्ज्वल संधी

विवेक मराठी    30-Apr-2019
Total Views |

 अन्न प्रक्रिया संदर्भात महाराष्ट्र हे भारताचे अग्रगण्य राज्य आहे. अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये इतर विविध क्षेत्रे अद्याप नेसन्ट (प्रारंभिक) अवस्थेमध्ये आहेत. ह्या उद्योगात खूप क्षमता आहेत. ते शेतकरी, उद्योजक आणि ग्राहकांना चांगले मूल्यवर्धन देऊन आर्थिक वाढीस प्रोत्साहन देऊ शकते. ह्यातून सशक्त राष्ट्राच्या निर्मितीस फायदा होऊ शकतो. थोडक्यात, भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग महत्त्वपूर्ण आहे.

 

महाराष्ट्र हे उद्योग क्षेत्रात पुढारलेले राज्य म्हणून ओळखले जाते. भारतीय अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा आहे. उत्कृष्ट मृदा व भौगोलिक परिस्थिती ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत. कॉपारेट कॅटलिस्ट इंडिया (सीसीआय) सर्वेक्षणानुसार, भारत हा अन्नधान्याचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. भारतातील अन्न उद्योगात अन्न उत्पादक आणि प्रसंस्करण उद्योग समाविष्ट आहेत. भारतीय उद्योग महासंघाच्या (सी.आय.आय.च्या) अहवालानुसार येत्या 10 वर्षांत अन्न प्रक्रिया उद्योगात 90 लाख नोकर्‍या उपलब्ध होणार आहेत. उत्पादन, अन्न प्रक्रिया उद्योग, वापर, निर्यात आणि अपेक्षित वाढीच्या दृष्टीने भारताचे पाचवे स्थान आहे. अन्न प्रक्रिया उद्योगासाठी महाराष्ट्र हे भारतातील अग्रगण्य राज्य आहे. राज्यात धान्य, फळे, भाज्या, मत्स्यपालन तसेच पशुपालन यासारखे विविध प्रकारचे उत्पादन केले जाते. महाराष्ट्राच्या प्रमुख पिकांमध्ये तांदूळ, ज्वारी, बाजरी, डाळी, गहू आणि तेलबिया (शेंगदाणे, सूर्यफूल आणि सोयाबीन) यांचा समावेश आहे, तर फळे, भाजीपाल्याच्या लागवडीखालील क्षेत्र राज्यात मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये प्रामुख्याने केळी, आंबा, द्राक्षे, संत्री, कांदा आणि टोमॅटो इ.चा समावेश आहे.

महाराष्ट्राचे अंदाजे तीन लाख चौरस किलोमीटर क्षेत्र आहे आणि त्याची लोकसंख्या 12 कोटीपेक्षा जास्त आहे. भारतीय फूड प्रोसेसिंग उद्योगात महाराष्ट्र राज्याचे योगदान 13 टक्के आहे आणि योग्य उपाययोजना राबवण्यात आल्यास ते 25 टक्क्यांनी वाढू शकते.

 भारतातील वाइन उत्पादनापैकी 90% महाराष्ट्रात केले जाते, तसेच आंबा आणि कांदा प्रसंस्करण उद्योगाचादेखील मोठा वाटा आहे. द्राक्षे, केळी, संत्री, डाळिंब, कोथिंबीर, स्ट्रॉबेरी, टोमॅटो, गहू, दूध व दुधाचे पदार्थ आणि मासे यांच्या प्रक्रियेसाठी महाराष्ट्रात चांगली संधी आहे, याचे मुख्य कारण म्हणजे प्रचंड उत्पादन आणि संधी होय. आजच्या यांत्रिकी युगात रेडी-टू-ईट, रेडी-टू-कुक आणि रेडी-टू-यूज अन्नपदार्थांना मागणी आहे. उन्नत जीवनशैली आणि शहरीकरणाच्या बदलांमुळे, तसेच जागरूकतेमुळे गुणवत्तेच्या फळांची आणि भाज्यांची मागणी वाढत आहे. त्यामुळे मूल्यवर्धित पदार्थनिर्मिती उद्योग वाढीस लागले आहेत, यासाठी ऑरगॅनिक अन्न हे उत्तम उदाहरण आहे.

 


महाराष्ट्रात अन्न उद्योगात न्यूट्रास्यूटिकल्स, वाइन प्रोसेसिंग, प्री- आणि प्रोबायोटिक्स, पॅकेज वॉटर, पारंपरिक खाद्यपदार्थ, पॅकेज्ड कट भाज्या, ताजी फळे, निर्यातयोग्य खाद्यपदार्थ आणि उत्पादित अन्न प्रसंस्करण उपकरणे हे उद्योग अन्न प्रक्रियेच्या वाढीस मजबुती आणू शकतात आणि परिवर्तकही सिद्ध होऊ शकतात. गेल्या 40 वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचे विकास धोरण व स्थैर्य यामुळे अनेक अन्न प्रक्रिया उद्योग आघाडीवर आहेत. यासाठी अनुकूल अशी सरकारी धोरणे (विशेषत: चेऋझखकडून), मूलभूत शेती संशोधन आणि हायब्रिडायझेशनमधील कार्य, आधुनिक शेतकरी आणि उत्पादनाचा पुरवठा, आणि उच्च निर्यातक्षमता यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पायाभूत सुविधा आणि त्याच्या मोठ्या बाजारपेठेशी निकटता लक्षात घेता महाराष्ट्रात पारंपरिक कमोडिटी बेस प्रोसेसिंगपेक्षा मूल्यवर्धित प्रक्रियेत मोठी क्षमता आहे.

भाजी व फळ प्रक्रिया उद्योग

महाराष्ट्रात अनेक भाजी व फळ प्रक्रिया उद्योग आहेत. यामध्ये विविध पदार्थ समाविष्ट होतात, उदा., ज्यूस, स्क्वाश, जेली, जॅम, मार्मालेड, सॉस, केचअप, चटण्या इत्यादी. ताजी फळे किंवा भाज्या ह्यापेक्षा मूल्यवर्धित पदार्थातून शेतकर्‍यांना नफा जास्त मिळतो. तसेच सीझनल भाज्यांवर व फळांवर प्रक्रिया केल्यामुळे पूर्ण वर्षभर उपलब्ध राहतात, ही उत्तम व्यावसायिक संधी आहे. सह्याद्री फार्म्स नाशिक, रवी मसाले औरंगाबाद, वरुण अ‍ॅग्रो नाशिक, मॅप्रो, माला, नोगा नागपूर, कणङ, किसान, फूड राईट, निलोन्स, प्रवीण मसाले, गणराया फूड, संगमनेर हे महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे उद्योजक आहेत.

पेय उद्योग

पेय उद्योगात अल्कोहोलिक व नॉनअल्कोहोलिक असे दोन भाग आहेत. वाइन, डिस्टिल्ड पेय, बिअर यांचे उत्पादन मुबलक होते. यामध्ये सुला वाईन नाशिक, युनाइटेड स्पिरिट, औरंगाबाद डिस्टिलरी, रॅडिको महत्त्वाचे उद्योजक आहेत, तर शीतपेय किंवा नॉनअल्कोहोलिकमध्ये पेप्सिको, कोकाकोला इ. उद्योजक आहेत. औरंगाबाद जिल्ह्यास डिस्टिलरी हब म्हणून ओळखले जाते, तर सुला वाईनची आंतरराष्ट्रीय ख्याती आहे.

साखर व गूळ उद्योग

ऊस उत्पादन भरघोस असल्याकारणाने महाराष्ट्रात अनेक साखर कारखाने व गूळ उद्योग आहेत. सध्या ऑरगॅनिक गुळाला बाजारात खूप मागणी आहे. ह्याबरोबरच काकवी, गूळ पावडर, पिठी साखर यासाठीदेखील बाजारात वाव आहे.


दुग्ध प्रकिया उद्योग

दूध प्रक्रिया उद्योगास महाराष्ट्रात खूप चालना आहे. विविध सहकारी संघटना, तसेच शासकीय व खाजगी प्रकल्प राज्यभर वाखाणण्याजोगे आहेत. यात टोन्ड दूध, दूध पावडर, दही, लस्सी, श्रीखंड, पनीर, चीज, सुगंधी दूध, तूप इ. उत्पादने अग्रगण्य आहेत. स्कायबर डायनॅमिक्स बारामती, कात्रज डेअरी, महानंद डेअरी, गोकुळ डेअरी, चितळे डेअरी, विकास डेअरी, आरे डेअरी हे प्रमुख उद्योजक आहेत.

मांस व मासे प्रक्रिया उद्योग

सलामी, फ्रोजन मीट, कॅन्ड मीट, ड्राइड फिश, कॅन्ड फिश, एग पावडर इ. पदार्थ ह्या उद्योगात तयार केले जातात. ह्या उद्योगात खूप निर्यातक्षमता आहे. फ्रिगोरिफिको अलाना, गद्रे मरीन्स, गोदरेज, टेम्प्टेशन फूड, सगुणा, डिलाइट इ. काही महत्त्वाचे उद्योजक आहेत.

धान्य व तेलबिया प्रक्रिया उद्योग

विविध डाळ मिल्स, तांदूळ प्रक्रिया (पोहे, मुरमुरे, चिवडा, तांदूळ स्टार्च), गहू प्रक्रिया (रवा, मैदा इ.), तेलबिया प्रक्रिया, मका प्रक्रिया (स्टार्च, कॅन्ड मका, फ्रोझन मका) ह्यामध्ये महाराष्ट्र देशातील महत्त्वाचा वाटा घेतो. खढउ, धारा तेल उद्योग, महाराष्ट्र दाल मिल, अधानी विल्मर पुणे, कारगिल, कमानी ऑइल, मुंबई, मॅरिको इ. महत्त्वाचे उद्योजक आहेत. सध्या कोल्ड प्रेस्ड ऑइलला व राइस ब्रॅन ऑइलला बाजारात खूप मागणी आहे. ऑइल फॉर्टिफिकेशन (अ आणि ड जीवनसत्त्व) हा सध्याचा मार्केट ट्रेंड झाला आहे.

बेकरी उद्योग

आधुनिकीकरणामुळे तयार पदार्थांना जास्त मागणी आहे. केक, ब्रेड, बिस्कीट, कुकीज, पाव, मफिन्स यांना अबालवृद्धांपर्यंत बाजारात खूप मागणी आहे. उऋढठख म्हैसूर येथे बेकरीसाठीचे सर्टिफाइड कोर्स चालतात, जे शेतकर्‍यांना फायद्याचे ठरू शकतात. बेकलाईट, डिलक्स, माँजिनीज, ब्रिटानिया, जलाराम, चाकोते हे बेकरी उद्योगातील सर्वश्रुत खेळाडू आहेत.

रेडी टू ईट फूड

महाराष्ट्रात मुख्यत्वेकरून असंघटित उद्योग समूह ह्या उद्योगात अंतर्भूत आहे. ह्यात चिप्स, चिवडा, पफ्ड डाळी, तळलेल्या डाळी, चटण्या, फ्रायम्स, खाकरा, फरसाण, मिठाई इ. रेडी टू कुकमध्ये विविध भाजण्या, पापड, भाजी मिक्स, मसाले, प्रीमिक्स (उपमा, इडली, ढोकळा, गुलाबजाम इ.)चा समावेश होतो. बालाजी, हल्दीराम, देसाई ब्रदर्स, रवी मसाले, सुहाना हे काही महत्त्वाचे उद्योजक आहेत. हा उद्योग खूप नफा मिळवून देणारा असून पदार्थाच्या कल्पकतेला वाव आहे.

आपण महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या कच्च्या मालापासून विविध मूल्यवर्धित पदार्थ बघू, जे शेतकर्‍यांना उद्योग सुरू करण्यास साह्यभूत ठरू शकतात


अन्न प्रक्रिया उद्योगासंबंधित

काही आव्हाने

  1. महाराष्ट्रातील अन्न प्रक्रिया उद्योगाला महत्त्वाचे आव्हान म्हणजे कच्च्या मालाचा तुटवडा. कारण दुष्काळी परिस्थिती आणि मालाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष यामुळे कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही. ह्याचा परिणाम म्हणून त्या पदार्थाची बाजारातील मागणी पूर्ण होत नाही व उद्योजकतेवर विपरीत परिणाम होतो.
  2. अन्न प्रक्रिया उद्योग हे मुख्यत: असंघटित उद्योजकांद्वारे सुरू आहेत, ज्यामुळे देशाच्या जीडीपीमध्ये याचा समावेश होत नाही. निर्यातीच्या संधीदेखील यामुळे उपलब्ध होत नाहीत.
  3. शेतमालाला हमी भाव तसेच साठवणीसाठी व्यवस्था.
  4. प्रक्रिया उद्योग, शासकीय धोरणे तसेच कर्जविषयक माहिती नसणे.
  5. संघटित शेतीचा अभाव.

आव्हानांवर उपाययोजना

‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे संघटित शेती हा नक्कीच एक फायदेशीर उपाय ठरू शकतो. शेतमाल प्रकिया उद्योगात मूल्यवर्धित पदार्थ बनवून नफ्याच्या संधी मिळू शकतात. शासनाचे धोरण, संधी, सबसिडी याची माहिती चेऋझख या वेबसाइटवरून घेऊन आपला उद्योग आपण सक्षम करू शकतो.

अन्न प्रक्रिया उद्योगाला संधी

खाद्य प्रसंस्करण क्षेत्राला त्याच्या क्षमतेमुळे ‘रायझिंग सेक्टर’ म्हटलेले आहे. अन्न प्रक्रिया क्षेत्र शहरीकरणामुळे फायद्याचे आहे. ग्राहकांची खरेदीची उच्च शक्ती, वाढणारी बाजारपेठ, वाढती घरगुती मागणी, नवीन अन्न सुरक्षा नियम, उच्च शेती उत्पादन, पायाभूत सुविधांचे विकास आणि उत्तम गुंतवणूक क्षमता ह्या काही विशेष संधी आहेत. अन्न प्रक्रिया उद्योगाला मरण नाही असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही.

निष्कर्ष

अन्न प्रक्रिया संदर्भात महाराष्ट्र हे भारताचे अग्रगण्य राज्य आहे. ही गुंतवणूकदारांची नैसर्गिक निवड आहे. तथापि येथे भविष्यातील वाढीसाठी प्रचंड सुसंधी आहेत. अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये इतर विविध क्षेत्रे अद्याप नेसन्ट (प्रारंभिक) अवस्थेमध्ये आहेत. ह्या उद्योगात खूप पोटेन्शिअल आहे. ते शेतकरी, उद्योजक आणि ग्राहकांना चांगले मूल्यवर्धन देऊन आर्थिक वाढीस प्रोत्साहन देऊ शकते. ह्यातून सशक्त राष्ट्राच्या निर्मितीस फायदा होऊ शकतो. थोडक्यात, भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग महत्त्वपूर्ण आहे.

श्रुतिका कणाद देव 

- साहाय्यक प्राध्यापिका, एफ .आय.टी. अन्नतंत्र महाविद्यालय, औरंगाबाद.

संदर्भ :

http://www.fnbnews.com/Top-News/Present-and-future-scenario-of-food-processing-industry-in-Maharashtra>

http://maidcmumbai.com/ (Maharashtra Agro Industries Development Corporation)

http://mofpi.nic.in/ (Ministry of Food Processing Industries, Govt of India)

http://nhb.gov.in/ and http://agricoop.nic.in/