पौष्टिकतेचा ‘मॉडर्न’ पर्याय

विवेक मराठी    30-Apr-2019
Total Views |

  इन्स्टंट फूडच्या बाजारपेठेवर एक नजर टाकली असता, काही पौष्टिक आणि आरोग्यास हितकारक असे तयार पदार्थही आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये ‘मॉडर्न’ असे ‘ब्रँड नेम’ असलेले शेंगदाणा चिक्की आणि राजगिरा लाडू हे पदार्थ चटकन आपले लक्ष वेधून घेतात. बागींनी 25 वर्षांपूर्वीच मेक इन इंडियाची सुरुवात केली आणि भारतीय पारंपरिक पदार्थांना पुन्हा एक नवी ओळख मिळवून दिली.


गेल्या 25-30 वर्षांत फूड इंडस्ट्रीजचा झपाट्याने विस्तार झाला आहे. किंबहुना 21वे शतक हे विज्ञानयुगाबरोबरच ‘इन्स्टंट’, ‘रेडी टू इट’ आणि केवळ 2 मिनिटांत तयार होणार्‍या खाद्यपदार्थांचे युग म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. घरी अगदी सहज तयार करता येणारे पोहे, उपमा, घावन, शिरा यासारखे पदार्थही आज बाजारात ‘रेडी टू इट’ स्वरूपात सहज उपलब्ध आहेत. अतिरिक्त साखर, तेल, कृत्रिम रंग आणि प्रिझर्वेटिव्हज वापरून तयार केलेले खाद्यपदार्थ आरोग्यास घातक आहेत हे माहीत असूनही, लोकांचा ते वापरण्याकडे अधिक कल दिसून येतो. आजची व्यग्र जीवनशैली, चंगळवाद, नोकरी, करियर यामध्ये अडकल्यामुळे स्त्रियांना घरी स्वयंपाक, नाश्ता बनविण्यासाठी न मिळणारा वेळ ह्या सार्‍या कारणांमुळे तयार खाद्यपदार्थांना पसंती दिली जात आहे आणि रोजच्या जीवनात त्यांचा सररास वापर केला जात आहे. इन्स्टंट फूडच्या या बाजारपेठेवर एक नजर टाकली असता, काही पौष्टिक आणि आरोग्यास हितकारक असे तयार पदार्थही आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये ‘मॉडर्न’ असे ‘ब्रँड नेम’ असलेले शेंगदाणा चिक्की आणि राजगिरा लाडू हे पदार्थ चटकन आपले लक्ष वेधून घेतात. आबालवृद्धांना आवडणार्‍या आणि मुख्यतः उपवासासाठी लागणार्‍या ह्या पौष्टिक पदार्थांचे निर्माते आहेत डोंबिवलीस्थित सुभाषकुमार बागी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी भारती बागी. या दोघांनी मिळून सुरू केलेल्या हा शेंगदाणा चिक्की आणि राजगिरा लाडवाच्या यशस्वी व्यवसायाचा प्रवास प्रेरणादायक आहे.

सुभाषकुमार बागी यांनी बाँबे ऑइल मिल, व्होल्टास, मर्फी, मॅरिको अशा नामवंत कंपन्यामध्ये नोकरी केली. प्रॉडक्शन, सेल्स अँड मार्केटिंग अशा विभागांमध्ये काम केले. या कंपन्यांमधून त्यांनी अनेक यशस्वी प्रयोग केले. विविध योजना राबविल्या, जाहिरातींचे तंत्र आत्मसात केले आणि त्या कंपन्यांना फायदा मिळवून दिला. ह्या सार्‍या कामांचा अनुभव बागींपाशी होताच आणि त्यातूनच स्वतःच असा काही व्यवसाय सुरू करावा, आपली स्वतःची एक ओळख निर्माण करावी आणि समाजाला काही चांगले द्यावे हा विचार त्यांच्या मनात निर्माण झाला. बागींनी तयार खाद्यपदार्थांच्या बाजारपेठेचे सर्वेक्षण केले, अभ्यास केला. लोकांची गरज ओळखली आणि पौष्टिक शेंगदाणा चिक्की, राजगिरा लाडू ह्या आपल्या अस्सल भारतीय पारंपरिक पदार्थांची लोकांना नव्याने ओळख करून देण्याचे त्यांनी ठरविले.

सुभाषकुमार बागी आणि भारती बागी

शेंगदाणा चिक्की म्हटले की आपल्याला लोणावळ्याची चिक्की आठवते. परंतु त्या चिक्कीला मुंबई-पुणे प्रवासाची आणि पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळा गावापुरतीच ओळख आणि उपलब्धता होती. बागींनी शेंगदाणा चिक्कीला राजगिरा लाडवाचीही जोड देऊन हे दोन्ही पदार्थ मुंबईच्या बाजारपेठेत बाराही महिने उपलब्ध करून देण्याचे ठरविले. 1996मध्ये बागींनी नोकरी सोडली आणि व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. बागींच्या या विचाराला घरातूनही पाठिंबा आणि सहकार्य मिळाले. भारती बागी त्यांच्या मदतीला तयार होत्याच. व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल, कच्चा माल आणणे, सरकारी नियमांची पूर्तता करणे, लायसन्स मिळविणे, कामगार नेमून त्यांना योग्य प्रशिक्षण देणे ही सारी कामे दोघांनी अतिशय कष्ट घेऊन पूर्ण केली आणि व्यवसायाला सुरुवात केली. या पदार्थांसाठी लागणारा कच्चा माल म्हणजे शेंगदाणे, गूळ, राजगिरा वगैरे, ते वाशीच्या होलसेल मार्केटमधून मागवितात. हे सारे पदार्थ उत्तम प्रतीचे वापरायचे, यावर त्यांचा कटाक्ष असतो. खाण्याचा पदार्थ हा स्वच्छ आणि उत्तम दर्जाचाच असावा असे त्यांचे मत आहे. या पदार्थांचे पॅकिंग बनवितानाही त्यांनी युक्तीचा वापर केला आहे. हे दोन्ही पदार्थ आपले भारतीय पारंपरिक पदार्थ आहेत. हे पौष्टिक आणि आरोग्यदायक आहेत.

 शेंगदाणा चिक्की ही पूर्वी ‘गुडदाणी’ म्हणून ओळखली जात असे. राजगिरा या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, जे आरोग्यास आवश्यक आहे. म्हणून बागींनी पॅकिंगवर आपल्या राष्ट्रध्वजात असलेले केशरी, पांढरा आणि हिरवा हे तीन रंग वापरून आपले भारतीयत्व जपले आहे. आधुनिक काळातही आपले हे पारंपरिक पौष्टिक पदार्थ आवडीने खाल्ले जावेत म्हणून ‘मॉडर्न’ असे त्याचे ब्रँड नामकरण केले आहे. आणि मुख्य म्हणजे लहान मुलांना, तरुण पिढीला जवळचे असणारे एक छानसे कार्टूनही त्यावर छापले आहे, जेणेकरून लहान मुले कार्टून बघून आकर्षित होतील आणि चॉकलेट, गोळ्या, वेफर्सऐवजी हे पौष्टिक पदार्थ आवडीने खातील. त्यांनी आपल्या ह्या व्यवसायात अशा अनेक युक्त्यांचा वापर केला आणि अल्पावधीत व्यवसाय भरभराटीस नेला आहे. हे दोन्ही पदार्थ त्यांनी इलायची, व्हॅनिला, जायफळ, क्रश रोज अशा फ्लेवर्समध्येही बनविण्याचा प्रयोग केला. बागींच्या ह्या दोन्ही पदार्थांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ह्या पदार्थांमध्ये साखरेऐवजी उत्तम दजार्र्च्या गुळाचा वापर केला आहे. कारण साखर शरीरास घातक तर आहेच, शिवाय साखरेमुळे दात किडण्याचे प्रमाणही वाढते. कोणत्याही केमिकल्सचा वापर न करता बनविलेले हे भेसळविरहित, शुद्ध पदार्थ खास उपवासाकरिताही आवडीने खाल्ले जातात. त्यामुळे ह्या पदार्थांना बाराही महिने मागणी असते. छोट्या-मोठ्या किरणा दुकानांबरोबरच, बिग बझार, रिलायन्स, फूडलँड, सहकार भांडार, डी मार्ट अशा ठिकाणीही बागींचे हे दोन्ही पदार्थ विक्रीस ठेवले जातात आणि त्यांचा खपही प्रचंड आहे. एका विचाराने प्रेरित होऊन बागी पती-पत्नींनी सुरू केलला हा छोटा व्यवसाय आज नावारूपाला आला आहे. भारती बागी यासाठी खूप कष्ट घेतात. आज व्यवसायाची सारी जबाबदारी त्याच सांभाळतात. भारतीताई एक आदर्श पत्नी, गृहिणी, माता तर आहेतच, त्याशिवाय एक आदर्श उद्योजिकाही आहेत.

आपल्या ह्या यशस्वी व्यवसायाचे रहस्य सांगताना सुभाषकुमार बागी म्हणतात, “कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आधी समाजाचे, बाजारपेठेचे निरीक्षण करावे. लोकांना नेमके काय हवे आहे, बाजारात कशाची कमतरता आहे याचा अभ्यास करावा. व्यवस्थित आखणी करून योजना तयार करावी आणि मगच एखादा उद्योग सुरू करावा. कष्ट, मेहनत, प्रामाणिकपणा आणि दर्जा हेच यशस्वी उद्योग-व्यवसायाचे रहस्य आहे. त्यात कधीही तडजोड करू नये. आज तरुणवर्ग बेरोजगारीने ग्रासलेला आहे. शिक्षण घेऊनही नोकर्‍या मिळत नाहीत. अशा तरुणांनी हताश निराश न होता, असे छोटे व्यवसाय, उद्योग सुरू करावेत. आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी. कोणत्याही कामात कमीपणा मानू नये.”

आज सर्वत्र आपल्याला ‘मेक इन इंडिया’चा नारा ऐकायला मिळतो. बागींनी 25 वर्षांपूर्वीच ह्या मेक इन इंडियाची सुरुवात केली आणि आपल्या शेंगदाणा चिक्की, राजगिरा लाडू ह्या भारतीय पारंपरिक पदार्थांना पुन्हा एक नवी ओळख मिळवून दिली.

 - प्रज्ञा कुलकर्णी 

9920513866