केळी प्रक्रिया उद्योगवाट शाश्वत विकासाची

विवेक मराठी    30-Apr-2019
Total Views |

  जळगावची केळी हे समीकरण महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात पक्के बसलेले आहे. त्यातही येथील रावेर तालुका हा केळी उत्पादन आणि त्यावरील प्रक्रिया उद्योगासाठी विशेष ओळखला जातो. केळीच्या झाडाच्या प्रत्येक घटकावर प्रकिया करून किती वेगवेगळी उत्पादने करता येतात आणि उद्योगाच्या किती वेगवेगळ्या संधी त्यातून निर्माण होतात, हे रावेरमधल्या केळी प्रक्रिया उद्योग विश्वाचा आढावा घेतला की लक्षात येते.

 

 केळी म्हटले की जळगाव जिल्ह्यातील रावेर डोळ्यासमोर येते. रावेरची केळी संपूर्ण उत्तर भारतात प्रसिद्ध आहेत. या केळीचा इतिहासही खूप जुना आहे. जागतिकदृष्ट्या महत्त्वाचे फळ असलेल्या केळीचे महत्त्व आणि त्याच्या लागवडीचे संदर्भ रामायणातदेखील आढळतात. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात इ.स.पूर्व तीनशे-चारशेमध्ये - म्हणजे आजपासून अडीच हजार वर्षांपूर्वीदेखील केळी लागवडीचे महत्त्व सांगितले आहे. अजिंठा आणि वेरूळ लेण्यांतील चित्रांमध्ये केळीपासून तयार केलेले रंग वापरले आहेत. म्हणजेच केळीला सुमारे सात ते आठ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे हे निश्चित!

जिल्ह्याचा आर्थिक कणा

महाराष्ट्रात सुमारे 80000 हेक्टर्स क्षेत्रात केळीची लागवड होते. यातील निम्म्यापेक्षा जास्त, म्हणजे तब्बल 48 हजार हेक्टर्स क्षेत्रातील केळीची लागवड जळगाव जिल्ह्यात होते. त्यातली बरोबर निम्मी, म्हणजे सुमारे चोवीस हजार हेक्टर्स लागवड एकट्या रावेर तालुक्यात होते.

केळी म्हणजे कल्पवृक्षच

केळी म्हटले की पिवळीधम्म पिकलेली आणि उपवासाला खाण्यास उपयोगी असलेली म्हणून आपल्या डोळ्यासमोर येते. तसेच केळीचे पान जेवणासाठीही उपयुक्त आहे. पण केळीचे झाड हे नारळाप्रमाणे कल्पवृक्षच आहे, हे वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल. केळीची पाने, केळफूल, केळी, केळीचे खोड आणि बियाणे या सर्वांचा उपयोग विविध कारणांसाठी होतो.

लाखो लोकांची उपजीविका

जळगाव जिल्ह्यात सुमारे 48 हजार हेक्टर्स केळीची लागवड होते. जिल्ह्यातील हजारो शेतकरी आणि आणि लाखो मजूर केळीच्या शेतीवर आपली उपजीविका चालवितात. जमिनीतून केळीचे बियाणे खोदणे, त्याची वाहतूक करणे, त्याची लागवड करणे, नंतर केळीची मशागत, पाणी, खते देणे, विविध प्रकारच्या फवारण्या, कापणी, पॅकेजिंग, प्री-कूलिंग, वाहतूक या सर्व कामांसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज असते. अशा प्रकारे केळीच्या शेतीतून जळगाव जिल्ह्यात लाखो जणांच्या हातांना काम मिळते.

निर्यातीत वाढ

पूर्वी येथील केळी रेल्वेतून उघडीच भरून उत्तर भारतात पाठविण्यात येतं. पण अलीकडे हे तंत्र बदलले आहे. केळीला चांगला भाव मिळण्यासाठी दर्जेदार उत्पादनाबरोबरच केळीची कापणीनंतर योग्य हाताळणी, पॅकिंग, वाहतूक यालाही महत्त्व आले आहे. म्हणून केळीचे पॅकेजिंग, प्री-कूलिंग व निर्यात करणे याला गेल्या तीन-चार वर्षांत रावेरसह जळगाव जिल्ह्यात मोठी चालना मिळाली आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून देशातील मोठ्या शहरांतील मॉल्समध्ये दर्जेदार केळीची विक्री होतच होती. अलीकडे निर्यातीला मोठी चालना मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यातून मागील वर्षी सुमारे 500 आणि महाराष्ट्राच्या अन्य भागांतून सुमारे 200 अशी सुमारे 700 कंटेनर्स केळी विदेशात निर्यात झाली आहे. कापणी, पॅकेजिंग, प्री-कूलिंग यासाठीदेखील मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज असते. विदेशात केळीची निर्यात करण्यासाठी फक्त दर्जेदार केळी उत्पादन करून चालत नाही, तर काढणीपश्चात तंत्रज्ञानाचीही आवश्यकता असते. निर्यातक्षम केळी झाडावरून काढून तिच्या फण्या करणे, त्यांना बुरशीनाशकांत धुणे, वाळवून पॅकेजिंग करणे आणि त्याची वाहतूक करणे या सर्व कामांसाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. जळगाव जिल्ह्यात सध्या पंधराशे कुशल मजूर केळी निर्यातीच्या कामात आपला वाटा उचलतात. सावदा, फैजपूर, तांदलवाडी, वाघोदा पाठोपाठ आता अटवाडा येथेही अनेक सेंटर्स निर्यातीसाठी सुरू झाली आहेत. यातून मोठी रोजगार निर्मिती होत असून युवा उद्योजक आणि शेतकरीदेखील त्यासाठी पुढाकार घेत आहेत. इराक, इराण, ओमान, दुबई, पाकिस्तान, सौदी अरेबिया या देशांमध्ये सध्या लक्षणीय प्रमाणात केळी निर्यात होत आहे.

 शेतकरीही करतात केळीवर प्रक्रिया

तालुक्यातील तांदलवाडी येथील कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी प्रेमानंद महाजन आणि त्यांचे सहकारी प्रशांत महाजन यांनी दर्जेदार, निर्यातक्षम केळी उत्पादनाबरोबरच निर्यातीसाठी मदत करण्यासाठी पॅकेजिंग आणि प्री-कूलिंग युनिट उभारले आहे. यात स्वत:च्या केळीबरोबरच परिसरातील प्रयोगशील शेतकर्‍यांची केळी निर्यात केली जाते. तालुक्यातील सावदा, वाघोदा आणि यावल तालुक्यातील फैजपूर येथे निर्यातक्षम आणि दर्जेदार केळीचे पॅकेजिंग करणारे 8-10 व्यापारी आहेत. निर्यातीबरोबरच देशातील मोठ्या शहरांतील मॉल्समध्ये दर्जेदार केळीला मोठी मागणी आहे. केळी कापून, धुऊन पुन्हा कोरडी करून कागदी खोक्यात काळजीपूर्वक पॅक करून देणे हा एक नवा व्यवसाय पुढे येत आहे. यापुढील काळात निर्यात जसजशी वाढेल, तसतसे पॅकेजिंग आणि प्री-कूलिंग हाउस यांची संख्या वाढणार आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील ‘एकदंत बनाना’ या कंपनीने केळी निर्यातीसाठी तांदलवाडी येथे युनिट उभारले आहे. ते वर्षभरात सुमारे 150 कंटेनर्स केळी निर्यात करतात.

‘जैन’चा मोठा वाटा

जिल्ह्यातून केळीची निर्यात व्हावी यासाठी जळगावच्या जैन इरिगेशनने नियोजनपूर्वक प्रयत्न केले आहेत. निर्यातीला सुरुवात करण्यापूर्वी निर्यातक्षम केळी उत्पादनावर जैनने लक्ष केंद्रित केले. त्यासाठी शेतकर्‍यांना टिश्यूकल्चर रोपे, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन संच, स्करटिंग बॅग्स, तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी जैन इरिगेशनचे तत्कालीन चेअरमन पद्मश्री भंवरलाल जैन यांनी नियोजनबद्ध प्रयत्न केले. आज या कंपनीचे चेअरमन अशोकभाऊ जैन, व्हाइसचेअरमन आणि केळी तज्ज्ञ के.बी. पाटील यांच्या प्रयत्नांनी 3 वर्षांपूर्वी जिल्ह्यातून प्रथम केळी निर्यात सुरू झाली. प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी के. बी. पाटील यांचे नेहमीच सहकार्य असते.


 वेफर्सचे मोठे उत्पादन

जळगाव जिल्ह्यात, विशेषत: रावेर, यावल तालुक्यांत फेरफटका मारताना आपल्याला जवळपास प्रत्येक गावात रस्त्याच्या कडेला कुठेतरी केळीचे वेफर्स तयार करणारा एकतरी छोटासा उद्योग दिसेल. जळगाव जिल्ह्यात वेफर्स तयार करणारे तब्बल 800 लहान-मोठे उद्योग आहेत. सावदा भागात तर एकाच दिवसात पाच ते दहा क्विंटल केळी वेफर्सचे उत्पादन करणारे उद्योग आहेत. मुंबई, पुणे, जळगाव, नाशिक, इंदूर अशा मोठ्या शहरांमध्ये हे सगळे केळी वेफर्स विक्रीसाठी पाठविले जातात. रावेर, यावल, भुसावळ, मुक्ताईनगर तालुक्यातदेखील वेफर्स तयार करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. वेफर्स तयार करणे आणि विक्री करणे या व्यवसायातून सुमारे पाच हजार जणांना रोजगार मिळाला आहे.

केळीपासून चिवडा

उपवासाला आपण बटाट्याचा चिवडा आवडीने खातो. मात्र केळीपासून तयार केलेला चिवडादेखील तितकाच रुचकर, खमंग आणि कुरकुरीत लागतो हे अनेकांना माहीत नसेल. रावेर तालुक्यातील निंभोरा येथील संजय चौधरी आणि यावल तालुक्यातील साकळी येथील शोभा वाणी हे केळीचा चिवडा तयार करतात. त्यांची रोजची उलाढाल प्रत्येकी वीस-पंचवीस किलो केळी चिवड्याची आहे. त्यांच्याकडची मोठी मागणी पाहता चिवडा तयार करण्याच्या उद्योगात अधिक उत्पादन करण्याची गरज आहे; यातून रोजगाराची आणि उद्योगाची मोठी संधी निश्चित उपलब्ध होईल.

जेवणासाठी उपयोग

केळीची पाने जेवणासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात वापरली जातात. लग्नसराईमध्ये जळगाव जिल्ह्यात केळीच्या पानांचा वापर करण्यावर भर दिला जातो. तसेच येथून मुंबई-पुण्यासारख्या शहरातदेखील रोज हजारो केळीची पाने जेवणाच्या पंगतीसाठी पाठवली जातात. जळगाव जिल्ह्यात साधारणपणे दोनशे ते तीनशे कुटुंबे केळीच्या पानांची विक्री करून आपली उपजीविका चालवतात. तसेच श्रावण महिन्यात आणि विविध उत्सवाला केळीची खोडे, पाने मोठ्या प्रमाणात मुंबईला पाठवली जातात, यातूनही शेकडो महिलांना रोजगार मिळतो.

 सेंद्रिय खते आणि संप्रेरके

केळीच्या खोडापासूनदेखील अनेक प्रकारची द्रवरूप खते आणि संप्रेरके तयार केली जातात. पूर्वी केळी कापल्यानंतर केळीचे खोड शेतकरी फेकून देत असत. आता काही ठिकाणी या खोडातून केळी बागेच्या बांधावरच पाणी काढून त्यापासून द्रवरूप खते, संप्रेरके, रंग तयार केले जातात. रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ जावळे यांनी फैजपूर येथे ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग अँड प्रॉडक्ट्स को-ऑप. सोसायटीच्या माध्यमातून अशा प्रकारची खतनिर्मिती मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. रावेर, यावल तालुक्यातील 10-12 ठिकाणी केळी खोडापासून पाणी आणि धागा काढण्याची उपकेंद्रे सुरू केली आहेत, त्यामार्फतदेखील बेरोजगारांना रोजगार आणि शेतकर्‍यांना दोन पैसे मिळतात. त्याचबरोबर केळीच्या पाणी काढून घेतलेल्या खोडापासून धागादेखील मोठ्या प्रमाणात तयार केला जातो. अर्थात या धागा तयार करण्याच्या उद्योगाकडे युवकांनीही अधिक लक्ष देण्याची गरज आहे. या केळी धाग्यापासून शेतकर्‍यांना शेतात विविध कारणासाठी उपयोगात येणारा दोर, दोरखंड आणि पिशव्या, पर्स, टेबल क्लॉथ, साडी, पायपुसणी, बाहुल्या, शोभेच्या वस्तू, टोप्या अशा वस्तू तयार करता येतात. रावेर तालुक्यातील पाल येथे सातपुडा विकास मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत या विविध वस्तू तयार करण्याचे 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते.

गांडूळ खत

केळीची शिल्लक राहिलेली पाने व खोडाचा काही भाग यांचा वापर करून गांडूळ खत सहज तयार करता येऊ शकते. फैजपूरच्या ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग अँड प्रॉडक्ट्स को-ऑप. सोसायटी या कारखान्यात सध्या मोठ्या प्रमाणावर गांडूळ खतदेखील तयार केले जात आहे. तसेच केळीच्या खोडातील पाण्यात पिकांच्या वाढीला पोषक अन्नद्रव्ये असल्याने ‘ताप्ती एनर्जी’ या नावाने सेंद्रिय द्रवरूप खते तयार केली जातात. केळीच्या खोडापासून निघालेल्या पाण्यात दशपर्णी आणि नीम अर्क मिसळून सेंद्रिय कीटकनाशके तयार केली जातात. या सहकारी संस्थेची वार्षिक उलाढाल सुमारे 75 लाख रुपयांची आहे. ही सर्वच उत्पादने महाराष्ट्रासह अन्य राज्यांत विक्री होतात. यातून 200 जणांना रोजगार उपलब्ध झाला असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. आर.ए. चौधरी यांनी सांगितले. केळीच्या पानापासून नोटा तयार करण्याचा कागद जपानमध्ये मोठ्या प्रमाणात तयार केला जातो. भारतात असा कागद तयार करण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार जावळे यांनी व्यक्त केला आहे. असे झाल्यास आणि हा कागद नोटांसाठी तयार वापरला गेल्यास त्यातूनही शेतकर्‍यांना मोठे उत्पन्न मिळू शकेल.

ग्राहकांना जिल्ह्यात, राज्यात आणि देशातही वर्षभर ताजी पिकलेली केळी खायला मिळत असल्याने केळीपासून पावडर, ज्यूस, जेली आदी तयार करण्यासाठी फारशी संधी नाही. केळीपासून वाइन तयार करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत, पण तिला बाजारपेठ मिळण्याची शक्यता नसल्याने उत्पादन करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.

केळीपासून बिस्किटे, लाडू आणि गुलाबजामही

हे वाचून आपल्याला आश्चर्य वाटले असेल. पण यावल तालुक्यातील साकळी येथील शोभा उमेश वाणी यांनी ही किमया केली आहे. आपल्या ‘निर्मल महिला गृहोद्योगा’च्या माध्यमातून त्यांनी केळीपासून तब्बल 36 प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले. 1998पासून या पदार्थांची विक्री सुरू केली. दिल्ली, हैदराबाद, पुणे, कोइमतूर, पंजाब आदी ठिकाणी त्यांच्या या खाद्यपदार्थांचे स्टॉल लागले होते. केळीपासून बिस्किटे, ब्रेड, शिरा, लाडू, गुलाबजाम, उपमा हे पदार्थ त्या तयार करीत. आता सध्या केळीपासून शेव, लाडू, चिवडा, वेफर्स तयार करतात. आता वयोमानाने जास्त धावपळ होत नाही, पण दर्जेदार उत्पादन करण्याकडे त्यांचा कल असतो. चविष्ट खाद्यपदार्थांबरोबरच स्वच्छता, नीटनेटकेपणा, सफाई ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. आजही त्यांचे खाद्यपदार्थ मोठ्या शहरात जातात. हैदराबाद येथे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी त्यांच्या स्टॉलवर भेट दिली होती. 15 वर्षांपूर्वी केळीपासून तयार या सर्वच पदार्थांना मोठी मागणी असे. अलीकडे वेफर्स, शेव, लाडू आणि गुलाबजामपर्यंतच उत्पादन मर्यादित केले आहे. मात्र या व्यवसायात अजूनही मोठी संधी असल्याचे शोभा वाणी सांगतात.

ठिबक उद्योग भरभराटीला

केळीला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन संचाचा उपयोग वाढल्याने जळगाव जिल्ह्यात ठिबक सिंचनचे पाइप, नळ्या, विविध वस्तू यांचे उत्पादन करणारे कारखाने मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. सध्या असे सुमारे तीनशे छोटे-मोठे कारखाने जिल्ह्यात सुरू असून त्यातून 5 हजार युवकांना रोजगार मिळत आहे.

-दिलीप वैद्य

9657712050